पुराणांचा विपर्यास

पुराणांचा काल खरें पाहतांना वेदांच्याहि पूर्वींचा आहे. अव्वल पुराणग्रंथांतून अति प्राचीन काळच्या दंतकथा एकत्र केलेल्या असाव्यात. वेदांप्रमाणेंच द्वैपायनव्यासांनीं पुराणांचीहि संहिता जमविली असें प्रसिद्ध आहे. पण हीं मूळ पुराणें हल्लीं उपलब्ध नाहींत व पुढें होण्याची आशाहि नाहीं. हीं पुराणें क्षत्रियांनीं आपली देवादिकांची आणि सर्व जगताची पूर्वपीठिका ठरविण्यासाठीं रचिलीं होतीं. ह्या प्रकरणीं कलकत्त्याचे माजी हायकोर्ट जज्ज पार्जिटर ह्यांनीं ‘Ancient Indian Historical Tradition’ नांवाचा जो ग्रंथ अलीकडेच प्रसिद्ध केला आहे तो बिनमोल आहे! जेव्हां क्षत्रिय दुर्बल आणि ब्राह्मण सबळ झाले अशा काळीं बौद्ध आणि जैन संप्रदायांना हाणून पाडण्यासाठीं शैव-शाक्त वैष्णव मतवादी ब्राह्मणांनीं वरील मूळ क्षत्रियकृत पुराणांच्या आपल्या दृष्टीनें सुधारून व छाटाछाट करून विस्तारपूर्वक नवीन आवृत्त्या काढण्यास सुरुवात केली. मुख्य पुराणें अठराहून जास्त आणि उपपुराणें तर असंख्यच आहेत व अद्यापि नवीन निर्माण होत आहेत. हरतालिका आणि सत्यनारायणाची पोथी अशा अगदीं अलीकडच्या उपपुराणांना तर हल्लीं चातुर्मास्यांत दरसाल वेदान्तसूत्रें आणि भगवद्गीता ह्यांच्यापेक्षांहि अधिक भाव येत असतो.

जीं हीं पुराणें प्राचीन युगांत जगताच्या उत्पत्तिशास्त्रासाठीं रचलीं व गाइलीं जात असत, तीं ह्या मध्ययुगांत सांप्रदायिकांनीं परस्परांच्या उलट उखाळ्यापाखाळ्या काढण्याचीं लौकिक साधनें केलीं. हल्लीं मोहरमांत जसे कलगीवाले व तुरेवाले शाहीर आपल्या कवनांच्याद्वारें लढत खेळतात, तसे हे पुराणकर्ते एकमेकांच्या देवांना व गुरूंना उघड उघड शिव्या देऊन आपला संप्रदाय वाढवूं लागले. हल्लींच्या २०|२५ वर्षांच्या गणपति-उत्सवांतील मेळ्यांचीं पदें जर कोणीं चतुर संपादकानें एकत्र करून प्रसिद्ध केलीं तर तें एक सुंदर (?) गणपतिपुराणच होईल. असो. हीं मध्ययुगीन पुराणें लवकरच इतकीं लोकप्रिय झालीं कीं, कंटाळवाणी आणि किळसवाणी वेदोक्तपूजा मागें पडून ह्या पुराणांत सांगितलेल्या बहुरंगी तांत्रिक पूजाच सर्वमान्य झाल्या. केवळ युद्धासाठीं आणि लौकिक देवाच्या बडेजावासाठीं रचलेल्या जाळ्यांत शूद्रांप्रमाणेंच ब्राह्मणांचेहि गळे गुरफटले. कांहीं थोड्या नैमित्तिक गृह्यसंस्काराशिवाय वेदमंत्रांची आठवण ब्राह्मणांनाहि होईना, मग इतरांची गोष्ट दूरच राहिली. पापमूलक जादूचा डाव मरणाराला सोडून मारणारावरच उलटतो. त्या न्यायानें ह्या पुराणरूपी विषारी पेवांत हिंदु सांप्रदायिकच गडप झाले आहेत; बौद्ध हिंदुस्थानाबाहेर आणि जैन हिंदुस्थानांतच ह्या पेवापासून दूर सुरक्षित आहेत! वेदोक्ताचा आणि पुराणिकांचा खरा ऐतिहासिक अर्थ आणि सांप्रदायिक पेंच न कळल्यामुळें कांहीं ब्राह्मणेतर मात्र ह्या शुष्क वादाचें भूस अलीकडे विनाकारण कांडीत बसले आहेत!