शैव-शाक्त-वैष्णव, बौद्ध-जैन, वगैरे कोणत्याहि नांवानें, ज्य सुसंस्कृत भागवत धर्माची उभारणी बौद्धकाळानंतर झाली, त्याला वैदिक ऊर्फ मांत्रिक धर्माचा आणि त्याच्या कर्मठपणाचा पूर्ण कंटाळा आला होता. हा मांत्रिक धर्म म्हणजे कांहीं ब्राह्मण-क्षत्रियांची केवळ दुकानदारीच झाली होती. अशा धंदेवाईक ब्राह्मणांनीं व त्यांच्या धार्मिक आश्रयाला राहिलेल्या ऊर्फ ब्राह्मणाळलेल्या त्रैवर्णिकांनीं ह्या निरनिराळ्या भागवत संप्रदायांना वेदबाह्य मानावें, ह्यांत आश्चर्य नाहीं. सात्वत, पांचरात्र, पाशुपत, कापालिक, स्मार्त, भागवत, वगैरे संप्रदाय आणि त्यांनीं उभे केलेले विशिष्ट देव आणि गुरु, ह्यांना ह्या शिरजोर वैदिक ब्राह्मणांनीं सारखेच निषिद्ध ठरविले. पण जेव्हां विस्तृत भरतखंडांत ह्या नवीन मतांचाच कल्पनेबाहेर फैलाव होऊं लागला, तेव्हां वरील वैदिक ब्राह्मणांनीं आपली दुकानदारी नीट चालत नाहीं हें पाहून आपली पगडी आधीं फिरविली. त्यांनीं ह्या नवीन भागवतांपैकीं शैव-शाक्त-वैष्णवांच्या गुरूंचाच नव्हे तर त्यांच्या दैवतांचा व त्यांच्या पार्थिव पूजेच्या साधनांचाहि स्वीकार सढळ हातानें करण्याचा डाव आरंभिला. ह्या डावालाच तंत्र हें धेडगुजरी नांव आहे. जें मंत्र नव्हे तेंच तंत्र, ह्यापेक्षां ह्या नवीन उपस्थित केलेल्या तंत्रबंडाची व्याख्या करणें तूर्त तरी फारसें जरूर नाहीं. मंत्र म्हणजे वैदिक जादु आणि तंत्र म्हणजे भागवत जादु ह्यापेक्षा ह्या नवीन तंत्रवादाची जास्त मीमांसा करण्यास तूर्त अवकाश नाहीं. ही भागवत तंत्रविद्या वैदिक मंत्रविद्येपेक्षांहि फार जुनाट आहे. हिलाच अथर्व आंगिरस अभिचार असेंहि नांव देतां येईल. वैदिक ब्राह्मण ह्या अनार्य विद्येच्या तांत्रिक भागवत धर्मांत शिरले. बंडानेंच बंड मारण्याची पूर्वापार युक्ति ब्राह्मणांनीं लढविल्यामुळें जरी अस्सल वैदिक धर्माचा जीर्णोद्धार होणें शक्य नव्हतें, तरी ब्राह्मणांच्या दुकानदारीचा जीर्णोद्धार पूर्णपणें होऊन श्रमणांच्या दुकानदारीला चांगलाच पायबंद बसूं लागला ह्यांत कांहीं शंका नाहीं !