या विशिष्ट प्रकारच्या अन्यायाला जे बळी पडलेले आहेत, त्यांच्यामध्यें याबद्दलची जी जाणीव व जागृति उत्पन्न व्हावयास पाहिजे, ती उत्पन्न करण्याचें प्राथमिक काम बहुतेक यापूर्वींच होऊन चुकलें आहे. आतां आम्हांस सोडवावयाचा बिकट प्रश्न विचारप्रांतांतला नसून तो इच्छाप्रांतांतला आहे. आतां यापुढें या प्रश्नाचा आणखी ऊहापोह व्हावयास पाहिजे अशांतला प्रकार नाहीं. पण आमच्या विचारांचें प्रत्यक्ष कृतींत रूपांतर कसें व्हावें हाच काय तो प्रश्न आहे. यासंबंधींचे आमचे विचार कितीहि पूर्णत्वास पोहोंचले, तथापि त्यांच्या योगानें आमच्या हातून प्रत्यक्ष कृति घडण्यास जी इच्छाशक्ति अवश्य आहे, ती आमच्यांत प्रादुर्भूत होईल असें म्हणतां येत नाहीं. यासंबंधानें विचार करतां अत्यंत दुदैवाची गोष्ट ही कीं लाला लजपतराय यांच्यासारख्या प्रसिद्ध पुढा-यांच्या नेतृत्वाखालीं भरलेल्या हिंदु सभेंतहि हा प्रश्न निर्णयाकरतां अजूनहि शास्त्री-पंडितांकडे सोपविण्यांत यावा. या प्रश्नाच्या निर्णयाला जर कोणी अगदीं नालायक असेल, तर ते हे शास्त्री-पंडितच होत. यांच्या अंगचा मोठा गुण म्हटला म्हणजे यांची विद्वत्ता. पण हा प्रश्न तर पडला अत्यंत निकडीच्या व्यवहारांतला. तेथें नुसती विद्वत्ता काय कामाची ? शिवाय अशा प्रश्नांचा निर्णय करण्यास जी निःपक्षपात बुद्धि असावयास पाहिजे ती त्यांच्या अंगीं असणें शक्य नाहीं. त्यांच्या पोशिंद्यांच्या पसंतीवर त्यांची सारी भिस्त असणार. दुसरें सांप्रतचीं कायदेकानूनचीं पुस्तकें वेगळीं व ज्यांच्यावर या शास्त्रीपंडितांची सारी मदार ते स्मृत्यादि ग्रंथ वेगळे. हे स्मृत्यादि ग्रंथ म्हटले म्हणजे त्या प्राचीन काळीं जे जे प्रघात अथवा रूढी प्रचारांत असतां त्यांच्या नोंदीचीं पुस्तकें अथवा पोथ्या. त्यांचा अर्वाचीन कालाच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांच्या उलगड्यास उपयोग होण्याचा संभव बहुतेक थोडाच असणार. शेवटची मुद्द्याची गोष्ट ही कीं, या दुर्दैवी अस्पृश्य वर्गाविषयीं यांना बिलकूल सहानभूती नसून उलट आपले अभिप्राय त्यांना प्रतिकूल असल्याचें त्यांनीं स्पष्टपणें बोलूनहि दाखविलें आहे. अर्वाचीन कालाचीं न्यायासनें निःपक्षपाती म्हणतात, पण तेथेंहि पाहावें तों न्यायाधिशाचा कल अनुकूल असल्याची शंका आल्यामुळें खटला वर्ग केल्याचीं उदाहरणें घडून आलेलीं आहेत. मी विचारतों कीं हा अस्पृश्यांचा प्रश्न जर शास्त्री-पंडितांकडे सोपवावयाचा तर, पतितपरावर्तन, हिंदुमुसलमानांतील एकी, हिंदूंची संघटना इत्यादि प्रश्नहि त्यांच्याकडेच निर्णयाकरितां कां सोपवूं नयेत ? आपला इतका छळ होत असूनहि आपल्याला आदि हिंदु म्हणवून हिंदु धर्माविषयींचा आपला आपलेपणा जे जाहीर करीत आहेत, त्यांना निदान ख्रिस्ती वगैरे अन्यधर्मांचा आश्रय करणा-यांच्या बरोबरीनें वागविणें हें आपलें कर्तव्य आहे, इतकेंहि हिंदु सभेला वाटूं नये काय ? धर्मांतर केलेले आदि हिंदु आणि आपणास अद्याप हिंदु म्हणविणारे आदि हिंदु यांच्या बाबतींत असा भेदाभेद कां करावा ? तात्पर्य, या सर्व प्रकारचें मूळ शोधूं गेल्यास, त्या बाबतींत आमच्या अंतःकरणांत उत्कट इच्छेचा पूर्ण अभाव आहे हेंच कबूल करावें लागेल.
गुलामांचा व्यापार, सतीची अमानुष चाल वगैरे बंद करण्याच्या कामीं जसें कायद्याचें साह्य मिळालें, तसेंच याहि बाबतींत मिळवूं म्हटलें, तर तोहि मनु बहुतेक पालटल्यासारखा दिसतो. इतकेंच नाहीं, तर वायकोम येथें घडलेला प्रकार मनांत आणतां कायद्याकडून नको त्या पक्षालाच साह्य मिळूं पाहात आहे. अशा स्थितींत अन्यायाला नाहक बळी पडत असलेला हा अस्पृश्यवर्ग व त्याचे प्रतिपक्षी यांच्यांतील लढा, ‘बळी तो कान पिळी’ या न्यायानुसार नुसत्या परस्परांच्या बाहुबलाच्या उणेंअधिकपणावरच निकालांत लावण्याचा प्रसंग आम्हीं येऊं देणार काय?
ब्राह्मणेतरांचा प्रश्न
या प्रश्नाचा विचार करतांना ब्राह्मणेतर पक्षाचे मद्रासचे प्रसिद्ध पुढारी व नायक सर त्यागराज चेट्टीआर यांच्या निधनानें कधींहि न भरून येणारें त्या पक्षाचें जें नुकसान झालें आहे.