पुराणिक आणि हरिदास

हीं पुराणें संस्कृतांत असल्यामुळें, हीं वाचून दाखविण्यासाठीं राजवाड्यांतून, झोपडींतून आणि रस्त्याच्या चव्हाट्यावर धंदेवाईक ब्राह्मणांची अद्यापि जरुरी आहे. ज्या पाटावर बसून हे पुराणिक पुराण सांगतात, त्याला व्यासपीठ म्हणतात. काशीप्रयागाकडे रस्तोरस्तीं अशा सार्वजनिक व्यासपीठांचे खुंट कायमचे उभे आहेत. त्यावर जे ब्राह्मण आल्या-गेलेल्या श्रोत्यांची वाट पाहात बसलेले असतात, त्यांना व्यास अशी बहुमानाची संज्ञा अद्यापि आहे. पूर्वीं राजवटींतून जे पुराणिक असत, ते वसिष्ठाप्रमाणें तपस्वी आणि चाणक्याप्रमाणें क्रांतिकारक मुत्सद्दीहि असत. ज्ञानमंबदर ह्यानें मदुरेच्य पांड्य राजास बौद्ध धर्मांतून शैव धर्मांत आणि रामानुजाचार्यांनीं म्हैसूरच्या बिट्टीवर्धनाला जैन धर्मांतून वैष्णव धर्मांत आणि अशाच एका पुराणिकानें विजयनगरच्या राजाला शैव धर्मांतून वैष्णव धर्मांत नेलें. ‘राजा बोले आणि दळ हालें’ अशा न्यायानें ह्या धर्मक्रांत्या केवळ वैयक्तिक आणि शांततेच्या पायावर घडलेल्या नसून राजाच्या मागोमाग त्यांच्या मुक्या प्रजाजनांनाहि रक्ताच्या पाटांतून पोहत जाऊन नवीन धर्मांचें परतीर गांठावें लागत असे. पुराणिकांच्यापेक्षांहि हरिदासांचें वजन बहुजनसमाजावर तर अधिकच असें. दोघेहि सख्खे भाऊच म्हणावयाचे. बौद्ध आणि जैन धर्मांवर कुमारिल भट्टांनीं व त्यांचे शिष्य आद्य शंकराचार्यांनीं विजय संपादिल्यावर शैव धर्माची दक्षिणेंत प्रतिष्ठा झाली. आणि पुन: ह्या शैव धर्मावर कुरघोडी करण्यासाठीं वैष्णव धर्माला ह्या हरिदासांची मोठीच मदत झाली. ह्यापैकीं बरेचजण मोठे सद्भक्त होते, ह्यांत शंका नाहीं. पुराणिक ब्राह्मणच असावयास पाहिजे, कारण पुराणें संस्कृतांतच असतात. पण हरिदास कोणत्याहि जातीचा असल्यास चालतो, व तो आपली कथा चालू देशी भाषेंत करितो, म्हणून त्याचें प्रस्थ जनतेंत फारच माजलेलें असतें. जें यश आजकालच्या वर्तमानपत्रकर्त्यांना व व्याख्यात्यांनाहि मिळालें नाहीं, तें ह्या पुराणिकांनीं व विशेषत: हरिदासांनीं मिळविलें. हरिदासाला उत्तर हिंदुस्थानांत कथाकथक आणि दक्षिण हिंदुस्थानांत कालक्षेपक अशीं नावें आहेत. त्रावणकोर आणि मलबारांत ह्यांना अंपलवासी अशी संज्ञा आहे. कदाचित् ही संस्था याच नैर्ऋत्य कोप-यांत उद्य पावून पुढें सर्व हिंदुस्थानभर पसरली असावी. याशिवाय दशावतारी दास, पोतदार व इतर असेच फिरते तमासगीरहि रामलीला, कृष्णलीला, शिवलीला, मरीआई वगैरे लाकडी चित्रांचे खेळ दाखवून अगदीं खालच्या जातींतून धर्माच्या कल्पना पसरून आपलीं पोटें भरीत.