रा. राजवाडे ह्यांनीं मराठ्यांविरुद्ध आगळीक करून एकाच जातींत दुही माजविण्याचें पुण्य कसें संपादन केलें आहे, हें मागच्या अंकीं दाखविलें. आतां त्यांनीं “सनातन” म्हणविणा-या हल्लींच्या धेडगुजरी हिंदु धर्माचे आपण सर्वाधिकारी आहों अशी स्वत:ची भ्रामक कल्पना करून घेऊन, तीच आपल्या भाळ्या भोळ्या वाचक अनुयायांत पसरविण्याचा उपद्व्याप ह्या लांबट प्रस्तावनेंत कसा चालविला आहे हें या अंकीं सांगावयाचें आहे. मराठ्यांविरुद्ध लिहितांना मनाची नसली तरी जनाची लाज ठेवावी लागतेच. कारण, मराठे पडले अर्वाच्य शस्त्रधारी. ते हीन असोत उत्तम असोत, नाकें मुरडीत कां होईना, त्यांना क्षत्रिय म्हटल्याशिवाय आपली पोळी पिकत नाहीं, अशी कांहीं “संशोधकांची” समजूत झालेली दिसते. पण ह्या पोळीचा व ख-या सत्यशोधनाचा कांहीं संबंध नाहीं, अशी आमची नम्र बुद्धि झाली आहे. लोकायतीक, जैन, बौद्ध, लिंगायत इत्यादि स्मृतिशेष अथवा हल्लीं हयात पण अशस्त्रधारी वैश्य जातीविषयीं आणि धर्माविषयीं खरीं खोटीं मतें पसरवितांना ह्या “संशोधकाची” लेखणी अगदींच बेलगामी होते. परंतु जोंपर्यंत आम्हांला सत्यावरच दृष्टि ठेवावयाची आहे, तोंपर्यंत मराठे-ते आर्य असोत नसोत, त्यांना कोणी धूर्त क्षत्रिय म्हणोत किंवा शूद्र म्हणोत - कोण आहेत हें आम्हांला ख-या इतिहासांतच पाहिलें पाहिजे. जोंपर्यंत ब्राह्मणांना तो इतिहास कळत नाहीं. किंवा कळूनहि पोटासाठीं ते तो निराळे भासवीत आहेत तोंपर्यंत मराठ्यांनीं आपणच आपलें मूळ शोधणें उचित आहे; व तसा अल्प प्रयत्न मागच्या अंकीं झाला.
ह्या अंकांत राजवाड्यांनीं आपल्या लेखणीची भांडकुदळ जैनबौद्धांवर विनाकारण कशी उगारली आहे तें पाहूं. शहाजीचें चरित्र, त्यांत जैनबौद्धांना शिव्या, असें केवळ जाणूनबुजून विषयांतर राजवाडे ह्यांनीं केलें आहे. तें सभ्य शब्दांत केलें असतें, तर त्यांच्या हेतूचा तरी आम्हाला संशय आला नसता. तीहि वाट त्यांनीं मोकळी ठेविली नाहीं. पान १३८-९ व इतर पुष्कळ ठिकाणीं जैन बौद्ध इ. धर्मांना सनातन धर्मांचे द्वेष्टे, असूयक, स्त्रीशूद्रादि ‘हलकट’ जातींत व समाजांत आपलें पाखंड पसरून ब्राह्मण्याचा उच्छेद करणारे, इ. इ. उघड उघड निंदात्मक उद्गार काढिले आहेत, हें फार अयोग्य आहे; “ब्राह्मण म्हटला म्हणजे त्याला देहान्त शिक्षा नाहीं, असा दंडक असल्यामुळें, बिकट प्रसंगीं इतर वर्ण शिक्षा ऊर्फ दंड टाळण्यासाठीं ब्राह्मणाचें सोंग घेत.” (पान १२८) असा इतिहासाचा विपर्यास करून जैन बौद्ध महंतांना त्यांनीं स्पष्ट “सोंगाडे संन्याशी” ठरविलें आहे. इतकेंच नव्हे तर त्यांच्या जुलमाला कंटाळून मराठे हे उत्तरेकडून दक्षिणेंत आले, (पान १५८). दक्षिणेंत आल्यावरहि “जैन, लिंगायत, मानभाव, गोरख पंथी इत्यादि नानापाखंडी ह्या लोकांना भुलवीत व हे लोक त्यांच्या भुलविण्याला बळी पडत.......जो कोणी पोटाला देईल मग तो स्वधर्मी असो, विधर्मी असो, त्याची सेवा करण्यास हे नागोत्पन्न मराठे व यजुर्वेदी ब्राह्मण सारखेच तयार असत” (पान१९४) इ. वाक्यांनीं जैन, लिंगायत, मराठे ह्या सर्वांची सारखीच बेअब्रू केली आहे. शेवटच्या ह्या एकाच वाक्यांत राजवाड्यांनीं आपलें चित्पावनी हृद्य उघडें करून, जैन, लिंगायत, मराठे आणि देशस्थ ब्राह्मण ह्यांची थोडक्यांत सांगावयाचें तर अखिल महाराष्ट्राची बदनामी केली आहे. चितपावन हे महाराष्ट्रांत येऊन फार दिवस झाले नाहींत, तोंच आपल्या पोषक मातृभूमीवर कसे व किती उलटूं शकतात, ह्याचें हें एक शहाजोग उदाहरण राजवाड्यांच्या लेखणींतून गळून पडलें आहे, हें महाराष्ट्रानें ध्यानांत ठेवण्यासारखें आहे. श्रीशहाजीची व भोसले घराण्याची व्यक्तिशः तळी उचलून राजवाड्यांनीं अखिल मराठा जातीविषयीं आपला तिरस्कार व्यक्त करण्याचें धाडस खालील वाक्यांत केलें आहे. “अशा राजकीयदृष्ट्या अर्धवट, लज्जास्पद व अधम स्थिंतींत दक्षिणेंतील नाग महाराष्ट्रिकोत्पन्न मराठे म्हणजेच उत्तरेकडील ऐत्तिरेय ब्राह्मणानें गायिलेल्या भोजक्षत्रियांचे वंशज जे शहाजी राजे भोंसले त्यांनीं यवनाशीं करामतीनें व पराक्रमानें झुंजून स्वराज्याचा पाया घालण्याचा साहसी उपक्रम स्वत:च्या एकट्याच्या हिमतीवर रचिला; आर्य क्षत्रियांचें नांव पुनरपि त्रिभुवनभर गाजविलें, आणि अखिल आर्यांच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार केला” ! ह्यावरून राजवाड्यांची निष्ठा एका भोसले कुळावर तरी होती, असा कोणी गैरसमज करून घेतील, तर पान १९२ वर भोसले कुळाच्याहि बदनामीचें विष त्यांनीं पुढील वाक्यांत ओकलें आहे. “भोसले हे पंचकुळीच्या बाहेरील मराठ्यांना परमार्थानें संस्कृतीदृष्ट्या कमतर समजत, तर उलट बाहेरील मराठे लोक, भोसले व त्यांची दशकुळी व पंचकुळी ह्यांना रागानें कमअस्सल म्हणून नांवें ठेवीत.” हा बेशरम कुटाळपणा मराठ्यांपुरता येथेंच न थांबवितां भोसले घराण्याचाच धर्म मात्र खरा धर्म, त्यांची संस्कृति तेवढीच उच्च दर्जाची आणि अखिल मराठ्यांचा धर्म व संस्कृति मात्र अत्यंत हीन दर्जाची हें ठरविण्याकरितां त्याच पानावरील पुढच्याच वाक्यांत “एकपक्षाची जैनलिंगायतावर साम्राज्यें चालविण्याची योग्यता, तर दुस-या पक्षाची सामान्य देशमुखीहि टिकविण्याची अयोग्यता; एक चतुरस्त्र विद्येचा भोक्ता; दुसरा विद्येचा पिढीजात शत्रु. एक सनातन धर्माचा व गोब्राह्मणांचा कैवारी, दुसरा भेटेल त्या देवधर्माचा व साळूमाळूचा अनुयायी !” एकंदरींत राजवाडी हृदय म्हणजे विषाचें एक पेंवच कसें होतें, हें ज्यांना पूर्ण ओळखावयाचें असेल त्यांनीं हा अनैतिहासिक प्रस्तावनारूपी उपद्व्याप समग्र मार्मिकपणानें वाचावा अशी आमची शिफारस आहे. आम्ही तरी स्पष्ट म्हणतों कीं, ही संशोधनी प्रस्तावना नव्हे तर एका चितपावनाला वगळून बाकी उरलेल्या अखिल आधुनिक महाराष्ट्राची एकजात शहाजोग बदनामी आहे ! ज्याला जशी सहन होईल तशी होवो !!
जैन बौद्ध हेहि क्षत्रियच होते व मराठेहि क्षत्रियच आहेत, हें राजवाड्यांनाही कबूलच आहे. तेव्हां जैन बौद्ध ह्या स्वकीयांच्या जुलमाला कंटाळून मराठ्यांनीं दक्षिणेंत येणें हें संभवत नाहीं; मुळीं हें खरेंच नाहीं. पारशांप्रमाणें अगर चित्पावनांप्रमाणें मराठे जर महाराष्ट्रांत बाहेरून आले असतील, तर ते निदान कोणाला भिऊन जीव धरून दडून बसण्यासाठीं आले नाहींत. राज्यें आणि साम्राज्येंदेखील चालिवण्यासाठीं आले आहेत. हें मत राजवाड्यांसारख्या उपटसुळाला सहन होत नसलें तरी श्री. चि वि. वैद्यांसारख्या सन्मान्य व जबाबदार इतिहासकाराला मान्य आहे; इतकें पुरे. परंतु हा अंक मराठ्यांना पाठबळ देण्याकरितां आम्ही लिहीत नाहीं. ते ब्राह्मणांना पुरून उरण्यासारखे आहेत. श्री शहाजीच्या चारित्र्याच्या सावलीखालीं बसून राजवाड्यांनीं भारतीय धर्मांचा खोटा इतिहास पसरविण्याचें जें दुकान उघडलें आहे, तें मात्र आम्हांला उघड्या डोळ्यांनीं पाहवत नाहीं. लोकायतिक जैन, बौद्ध, लिंगायत, मानभाव, शीख, इ. वेदबाह्य धर्मांच्या इतिहासाचीं साधनें अद्यापि संग्रहित व्हावयाचीं आहेत. तीं हळूहळू होऊं लागलीं आहेत. त्यांना आपल्या अनैतिहासिक हाताचा स्पर्श करून राजवाड्यांसारख्या ब्राह्मणांनीं विटाळ वाढवूं नये अशी आमची नम्र सूचना आहे. सर्व ब्राह्मणसारखेच अनधिकारी आहेत, असें आमचें म्हणणें नाहीं. विजयनगर कॉलेजचे दोन प्रोफेसर एम्. एस्. रामस्वामी अय्यंगार आणि बी. शेषगिरीराव हे देशस्थ ब्राह्मण आहेत. त्यांनीं गेल्या सालीं “Studies in South Indian Jainism” (दक्षिण हिंदुस्थानांतील जैन धर्माचें अध्ययन) हा आपला स्तुत्य ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. ह्या ग्रंथाचा निष्कर्ष असा स्पष्ट निघत आहे कीं, दक्षिण हिंदुस्थानांतील मध्ययुगीन वाङ्मय, सद्धर्म व सुसंस्कृति ह्यांचें सर्वच नाहीं तरी बहुतेक श्रेय, जैन आणि बौद्ध धर्मांच्या उदार आणि विरक्त प्रचारकांनाच आहे. जैन-बौद्धांचा धर्म आणि संस्कृति हीं आर्य आहेत किंवा अनार्य आहेत हे प्रश्न बाजूस ठेविला, तरी तीं वेदबाह्य आहेत, येवढें निर्विवाद आहे. निदान त्यांना ब्राह्मणी हातांचा विटाळ घडला नाहीं, हें तरी निश्चित आहे म्हणून महाराष्ट्रांतील कांहीं ब्राह्मण म्हणविणा-यांनीं ती साळूमाळूंची संस्कृति, ती सोंगाड्या संन्याशांची वृत्ति, ती नागनरसोबांची कृति असें इतरांना भासवून तिला हेटाळावें, ह्यांत ब्राह्मणी हृदय ओळखून असणा-यांना आश्चर्य वाटण्यासारखे कांहीं नाहीं. आश्चर्य हेंच कीं, विजयनगरचे वरील दोन्ही देशी ब्राह्मण इतिहासकारांनीं जैन-बौद्धांचे सप्रमाण गोडवे गावे आणि आमच्या महाराष्ट्रांतील संशोधकांनीं तिकडे दुर्लक्ष करून त्यांची नुसती कुटाळकी करीत बसावें. आमच्या मतें खरा प्रकार असा आहे.
जैन-बौद्धांचा धर्म व संस्कृति ब्राह्मणांच्याइतकीच जुनी आहे. किंबहुना जैनांची संस्कृति ब्राह्मणांच्याहूनहि फार दिवसांची प्राचीन असावी. आम्हांला ती शुद्ध द्राविड असावी असा जब्बर संशय येऊं लागला आहे. तिचा जन्म उत्तर हिंदुस्थानांत झाला कीं पश्चिम एशियांत झाला, हें ठरविणें तूर्त तरी कठीण आहे. ज्या क्षत्रियानें तिला निर्माण केलें ते हिंदी आर्य कीं पश्चिम आशिआंतील प्राचीन द्राविड होते किंवा मध्य आशियांतील मुद्गल ऊर्फ मोगल होतें हें ठरविण्यास अद्यापि पुरेशीं साधनें उपलब्ध झालीं नाहींत. मूळ पीठिका कशीहि असो, जैव-बौद्धांची वृत्ति ब्राह्मणांप्रमाणें जुलमी, आततायी अथवा अत्याचारी मुळींच नव्हती. उलट त्यांनीं प्राथमिक अवस्थांतल्या व मागासलेल्या दक्षिण हिंदुस्थानांत सात्त्विक धर्म व अत्युच्च संस्कृतीचा अलोट प्रसार केला असतांहि ब्राह्मणांनीं मात्र इ. स. ७०० पासून ९०० वर्षांच्या कालांत त्यांचा कल्पनातीत छळ करून, दक्षिणेंतील राजवटींतून त्यांना घालवून दिलें व त्यांनीं अत्यंत श्रमानें व स्वार्थत्यागानें दळलेल्या संस्कृतीच्या पिठावरच आतां ब्राह्मणी शंकराचार्य चरत आहेत व रेघा ओढीत आहेत. इ. स. ७०० शतकापर्यंत जैनधर्म आणि जैन संस्कृतीचा प्रसार आणि विजय दक्षिणेंत निरंकुशपणानें होत होता. दक्षिणेंतील (महाराष्ट्रांतील) सामान्य जनता ह्या संस्कृतीची होती; इतकेंच नव्हे तर कदंब, यादव, शिंदे, राष्ट्रकूट, चालुक्य, कलच्छुरी इत्यादि प्रसिद्ध क्षत्रिय राजवटींनीं जैन, बौद्ध अथवा लिंगायत धर्म उघडपणें अथवा प्रच्छन्न सहानुभूतीनें स्वीकारलेला होता. सुमारें इ. स. ७७० पर्यंत श्री. चिं. वि. वैद्यांनीं आपल्या मध्ययुगीन भारतांत वर्णिल्याप्रमाणें दक्षिणेंत अथवा समग्र भारतांत जातिभेदाचीं बंधनें हल्लींप्रमाणें निगडित झालीं नव्हतीं. इतकेंच नव्हे तर व्यक्ति अथवा समूह जैन, बौद्ध, लिंगायत अथवा वैष्णव धर्मांचा अथवा संप्रदायांचा स्वीकार करीत किंवा अदलाबदलीहि करीत. मात्र एवढेंच कीं, राजवाडे म्हणतात त्याप्रमाणें हें धर्मांतर केवळ पोट जाळण्यासाठीं नसून अत्यंत भक्तिनें व श्रद्धेनें होत असें. कदाचित् राजवटींत असें धर्मांतर झाल्यास तें राजकीय धोरण म्हणून होत असे. पण तेथेंहि केवळ रा. राजवाडे बरळतात त्या न्यायानें पोटाची खळगी भरण्यासाठीं होत नसे. फार तर काय, उत्तरीय ब्राह्मण कुमारिल भट्ट आणि दाक्षिणात्य ब्राह्मण आद्य शंकराचार्य ह्या दोघांनीं ज्या जैन बौद्ध धर्मांची गळेचेपी केली, ते दोन्ही धर्म केवळ राजवाडे हिणवतात त्याप्रमाणें साळूमाळू नव्हते. प्रत्यक्ष कुमारिल (सुमारें इ. स. ७००) ह्यानें प्रथम बौद्धांचें शिष्यत्व पत्करिलें होतें. नंतर त्यानें कृतघ्नपणें त्यांच्यावरच उलटून त्यांचा नाश केला. आद्य शंकराचार्यानें तर बौद्धांचा विज्ञानवाद, अहिंसावाद, विभूतिवाद, मूर्तीपूजा, पुनर्जन्म ऊर्फ अवतारवाद आणि संन्यास संप्रदाय हीं सारीं तत्वें आपलींशी करून, जुन्या वैदिक धर्माच्या यज्ञयागांचा व कर्मठपणाचा पसारा गुंडाळून ठेवून, हल्लींच्या धेडगुजरी, कमअस्सल, बेवारसी, बेपत्ता हिंदुधर्माची मूळ मेढ रोंवली आणि बौद्ध-जैन धर्माला हतवीर्य केल्याचें कुमारिल भट्टाचें श्रेय अथवा अपश्रेय इ. स. ७०० नंतर आपण बळकावलें. ह्यावरून जैनबौद्ध आचार्य हे सोंगाडे संन्याशी आणि साळूमाळू किंवा कुमारिल आणि शंकराचार्य हेच कृतघ्न व घरगिळू हें वाचकांनींच ठरवावें. अशा शंकराचार्यांना धर्माचार्य म्हणण्यापेक्षां धर्ममुत्सद्दी म्हणणें अधिक शोभेल. आद्य शंकराचार्यानें तर बौद्धतत्त्वांवर इतका ताव मारिला आहे कीं, त्याचे काळीं त्यास वैदिकमताचे लोक ‘प्रच्छन्न बौद्ध’ असा टोमणा मारीत. कां तर त्यानें द्राविडांची पूजा, शाक्तपंथ, देवीपूजा आणि लिंगपूजा ह्यांच्याच परंपरागत बळावर आणि विशेषतः बौद्धांचा विज्ञानवाद ऊर्फ मायावादाच्या आयत्या आधारावर आपला “शांकरदिग्विजय” गाजविला ! असें असतां राजवाडे ह्या ब्राह्मण प्रचारकांना परिव्राजकाचार्य समजतात आणि जैनांच्या व बौद्धांच्या अथवा लिंगायतांच्या आचार्यांची सोंगाडे संन्याशी म्हणून निंदा करितात हिला काय म्हणावें ? अशा निंदेला चित्पावनी चोराची उलटी बोंब ह्याहून अधिक अन्वर्थक नांव कोणी वाचकानें शोधून काढिल्यास ते आम्ही आभारपूर्वक इतिहाससंशोधकास बहाल करूं !
कसेंही असो. जैन धर्मावर जो जुलुमाचा आरोप राजवाड्यांनीं केला आहे तो मात्र उलट्या काळजाचा आहे. सुमारें इ. स. ७०० पर्यंत दक्षिणेंत सामान्य जनसमुदायांतच नव्हे, तर प्रसिद्ध राजवटींतूनहि जैन, बौद्ध आणि द्राविडी शैव धर्मांचीच बलवत्तर प्रतिष्ठा होती. वैदीक यज्ञयागांची कांहीं चालुक्य राजांनीं अधून मधून उचल केली. पण संस्कृतीशी समेट करूं पाहणा-या हल्लींच्या वैष्णवसंप्रदायानें आर्य संस्कृतीच्या जीर्णोद्धारार्थ चालुक्यांनीं केलेल्या ह्या तुरळक प्रयत्नांनाहि दाबून टाकून शेवटीं आर्यसंस्कृति नामशेष केली, व हल्लींच्या द्राविडी संस्कृतीची ध्वजा कायमची उभारली. हल्लींची सारी हिंदु संस्कृति आणि हिंदु धर्म वेदबाह्य आहेत. इ. स. ७०० पर्यंत ही संस्कृति जैनांच्या अथवा द्राविड शैवांच्या नांवावर विकत होती. दक्षिणेंतील पुष्कळसा मोठा ब्राह्मण समुदाय जरी संस्कृतीनें पूर्वींपासूनच पूर्ण द्राविड होता अथवा ह्या काळीं झाला होता, तरी त्याला आर्यांच्या संस्कृतीला अशा प्रकारें मूठमाती मिळाली, हें पाहून वाईट वाटत होतें. म्हणून वस्तुतः नाहीं, तरी नांवानें तरी निदान ही दाक्षिणात्य संस्कृति आर्यांच्या नांवानें विकावी, असा त्यांचा फार दिवसांचा प्रयत्न होता. इ. स. ७५० च्या सुमारास अशा खवळलेल्या ब्राह्मणांनीं तत्कालीन राज्यांच्या साह्यानें पुनः एकवार आणीबाणीचा आणि शेवटचा प्रयत्न केला व तो मात्र पूर्ण यशस्वी ठरून बौद्ध धर्मांस तर तिलांजळीच मिळाली व जैन धर्मास भयंकर धक्का बसून, तो आतां कसाबसा जीव धरून आहे. जैन-बौद्धांच्या उलट ह्या प्राणघातकी चळवळीचा पुढाकार तिरुज्ञानसंबंदर आणि तिरुनावुक्करसर उर्फ अप्पार ह्या दोन समकालीन शैव ब्राह्मणांनीं घेतला. पहिल्यानें मदुरेच्या कूण नांवाच्या पांड्य राजाला आणि दुस-याने कांची येथील महेंद्रवर्मा नांवाच्या पल्लव राजाला जैन धर्मांतून शैव धर्मांत घेतलें. तेव्हांपासून जैनांवर कल्पनातीत भयंकर कहर गुदरला. आठ हजार जैन आचार्यांना व पुढा-यांना सुळावर चढवून देहान्त शिक्षा देण्यांत आल्या. (रामस्वामी आयंगारचा वरील ग्रंथ, पान ६६।६७ पाहा.) अशा देहान्त शिक्षेचीं चित्रें अद्यापि मदुरा येथील प्रसिद्ध मीनाक्षीच्या देवळांतील भिंतींवर मोठ्या दिमाखानें कोरलेली स्पष्ट आढळतात.
राजवाड्यांनीं हें देऊळ पाहिलें आहे. त्यांच्या नाहीं, तरी जैनांच्या डोळ्यांना हीं भेसूर चित्रें दिसण्यासारखीं आहेत. पण लक्षांत घेतो कोण ? प्रोफेसर आयंगार हे ब्राह्मण असूनहि वरील तिरुज्ञानसंबंदर आणि अप्पार ह्या दोन ब्राह्मणांच्या कसाईपणाबद्दल आपला निर्भीड शेरा पान ७० वर इंग्रजींत स्पष्ट शब्दांत दिला आहे. त्यांचें शब्दशः भाषांतर असें आहे : “जैनांसंबंधीं सामान्य लोकांत गैरसमज पसरविणें आणि त्यांच्या आचारासंबंधीं काळ्याकुट्ट रंगांत प्रतिकूल वर्णनें वठविणें हा संबंदरचा मुख्य हेतु होता. शिवीगाळ म्हणजे युक्तिवाद नव्हे. ज्याअर्थीं संबंदर आणि अप्पार ह्यांच्या काव्यांत जैनांविरुद्ध अंगावर शहारे उठविणा-या शिव्याशापांच्या वर्षावाशिवाय दुसरे कांहींच नाहीं, त्याअर्थी त्यांनीं स्वीकारलेली जैनांवर जय मिळविण्याची पद्धत केवळ अडाणीच नव्हे, तर क्रूरपणाची होती, असा निर्णय करणें आम्हांला भाग आहे.” ब्राह्मणांविरुद्ध ब्राह्मणानेंच दिलेला हा निर्णय वाचणा-या वाचकांनींच ठरवावें, कीं “जैन सोडून साप मारावा, कीं ब्राह्मण मारावा !” झाली ती गोष्ट झाली. पण राजवाड्यांसारख्या संशोधकांनीं ती आपल्या अनुयायांना उलट कां भासवावी ? सापहि असे कृत्य करीत नाहीं, तें महाराष्ट्रीय संशोधक अलीकडे कां करूं लागले आहेत ? हें कोडें कोणी उकलील काय?
रा. राजवाड्यांनीं अखिल महाराष्ट्राची कशी नाचक्की केली आहे, हें वर दाखविलें. ब्राह्मणाला तेवढें पूज्य मानून बाकी उरलेल्या क्षत्रिय वैश्यांसंबंधी त्यांनीं आपला अनादर उघडपणें व्यक्त केला आहे. शूद्र म्हणजे तर कुत्र्या-मांजराहून कमी, अशी त्यांची भावना दिसते. आर्य स्त्रियांविषयीं देखील त्यांची दाक्षिण्यबुद्धी नाहीं, तर मग शूद्रांविषयीं कोठून असणार ? त्यांतल्या त्यांत शूद्र स्त्रियांविषयीं त्यांनीं जी बेशरमपणाची नालस्ती केली आहे, ती वाचून तर राजवाड्यांना आई होती कीं नाहीं, ह्याचाहि संशय येऊं लागतो. आर्यवंश आणि ब्राह्मण वर्ण ह्यांच्या धुंदीमुळें स्त्रीदाक्षिण्य ही चीज त्यांच्या मनःकोषांतून अजीबत नष्ट झालेली दिसते. पितृसावर्ण्य आणि मातृसावर्ण्य अशा गंभीर विषयांची मीमांसा त्यांना ह्याहून अधिक भारदस्त वृत्तीनें, निदान शब्दांनीं तरी खास करतां आली असती. असो हा लेखांक फार लांबला म्हणून बाकीचा विषय पुढील अंकी समाप्त करूं.