मराठेतर कोण ?

‘विजयी मराठा’कारांनीं गेल्या अंकीं ब्राह्मणेतर कोण ह्या प्रश्नाची मीमांसा केली आहे. आतां मराठेतर कोण ह्या विषयावर मीं माझे विचार प्रसिद्ध करावेत असा त्यांचा आग्रह आहे. आणि ह्यासाठीं गेल्या केसरींतील रा. बामणगांवकर त्यांचा मराठेतर हिंदू हा लेख मजकडे पाठविला आहे. हा लेख पाहिल्यानंतर ह्यांतील बरेच विचार मला पसंत आहेत. परंतु मी जर माझे निर्भीड विचार प्रसिद्ध करीन तर त्यांतील कांहीं भाग माझे मित्र बामणगांवकरांना पसंत पडणार नाहीं, तर कांहीं भाग स्वतः वि. मराठाकारांनाहि कदाचित् रुचणार नाहीं. पण राजकारणांतील विचार एका सख्ख्या भावाचेहि जर दुस-यास पटत नसतात, मग माझेच तेवढे सर्व विचार इतरांस पटतील अशी आकांक्षा मीं कां बाळगावी ? बामणगांवकर किंवा वि. मराठाकार हे जसे माझे मित्र आहेत तसेंच ब्राह्मणांतहि माझे पुष्कळ जिवलग मित्र आहेत. मतभेद होतात ते केवळ विचार चुकल्यानें होतात किंवा वाईट हेतूमुळेंच होतात असें नसून दृष्टीचा ठाव बदलल्यामुळेंहि होतात, हें जर खरें असेल तर एकाच विषयाकडे पाहावयाचें झाल्यास निरनिराळ्या माणसांनीं दृष्टीचा ठाव बदलून पाहिल्यास सत्य लवकर दिसूं लागतें, हें मित्रांना सांगणें नको. अमित्रांना, त्यांचें स्वतःचेच विचार जरी कोणीं बोलून दाखविले तरी ते वादच वाढवतील. अशासाठीं प्रयत्न नाहीं. ज्या राष्ट्रीय पक्षाकडे माझा स्वतःचा ओढा आहे, त्यांतच रा. बामणगांवकर तूर्त वावरत आहेत. फरक इतकाच कीं मी कोणत्याच पक्षाच्या चाबकाला पाठ देण्यास तयार नाहीं-कारण कोणताच पक्ष अलिकडे एक वर्षभरहि एका ठिकाणीं उभा राहून आपल्या ध्येयांची साक्ष आपल्या वर्तनानें इतरांस पटविण्याची दगदग करीत नाहीं; रा. बामणगांवकर अशा स्थितींतहि, “राष्ट्रीय” पक्षांतच आपला मोक्ष अद्यापि शोधीत आहेत, ह्यावरून त्यांचा सत्यशोधकपणा माझ्यापेक्षां अधिक चिंवट आहे, हें मला कबूल करणें भाग आहे. तरी ते आपल्या सुंदर लेखाच्या पहिल्याच वाक्यांत “ब्राह्मण तेवढा वगळावा व अहिंदू तेवढा मिळवावा, ह्या अहिंदू वृत्तिपर पक्षाची प्रतिष्ठा झाली आहे” असें जें जगाला भासवीत आहेत त्या भासाला सर्व ब्राह्मणहि बळी पडतील कीं नाहींत, ह्याची मला शंका येत आहे. कारण माझे मित्र रा. अ. ब. कोल्हटकर ह्यांनीं स्वतः ब्राह्मण असूनहि जी ब्राह्मणेतरांसंबंधीं दृष्टि ठेवली आहे; तिच्यांत मला जास्त बाणेदारपणा दिसत आहे. श्री. अच्युतरावांनीं आपल्या ता. ३ एप्रिलच्या “चाबुकस्वारांत” ब्राह्मणेतर पक्षाच्या केवळ नांवाउलटच आक्षेप घेतला आहे; ध्येयाउलट मुळींच नाहीं. पुण्यांत जीं त्यांचीं सडेतोड भाषणें अलीकडे झालीं आणि विशेषतः प. लो. वा. छत्रपति आणि विद्यमान श्री. सयाजीराव महाराज ह्यांची प. लो. वा. टिळक व रानडे ह्यांच्याशीं त्यांनीं जी नुकतीच मार्मिक तुलना केली, तीं त्यांचीं भाषणें व तो ओजस्वी लेख ज्यांनीं वाचला असेल त्यांना असें खास दिसेल कीं, अच्युतरावांमध्यें आक्षेप घेण्यासारख्या ब्राह्मण्याचे जंतु आतां कांहींच शिल्लक उरले नाहींत. असल्या ब्राह्मणांना ब्राह्मणेतर पक्षांत येण्याला कांहीं अडथळा राहिला असेल तर तो त्यांच्या स्वतःचाच. पण नांवाची सबब सांगून कोल्हटकर अद्यापि दूर आहेत. तर बामणगांवकर मात्र स्वतः ब्राह्मणेतर असूनहि मराठा आणि मराठेतर ह्या नाजूक विषयांत गढले आहेत. असो. दोघांचा उद्देश स्तुत्य आहे, असें मला वाटत आहे. कोणत्याहि विषयासंबंधीं केवळ शुष्क निर्विकारपणा दाखवून स्वस्थ न राहतां, त्याबद्दल सहानुभूती दाखविल्याशिवाय त्याचें मर्म कळत नाहीं, हें रा. कोल्हटकरांनीं आपल्या खोल धोरणी स्वभावानें सिद्ध केलें आहे. ह्याचा दाखला ब्राह्मणेतरांबद्दलची त्यांची धडाडीची सहानुभूतीच होय. बामणगांवकरांची धडाडी कोल्हटकरांच्याहून रतीभरहि कमी नाहीं. उणीव आहे, ती केवळ निष्काम सहानुभूतीचीच. ती असती तर त्यांच्या प्रस्तुत लेखाच्या पहिल्याच घासांत असा मक्षिकापात झाला नसता. हिंदू असोत, अहिंदू असोत, ब्राह्मण जातीच्या अन्यायाला वैतागून ब्राह्मणेतर पक्ष जो आजकाल इतर सगळ्या जगाला कवटाळींत आहे, त्यांत जर कोणाची अधिक चूक होत असेल तर ब्राह्मणेतरांपेक्षां ती ब्राह्मणांचीच अधिक आहे असें वि. मराठाकारांनीं आपल्या गेल्या अंकांत दखविलें आहे. तें रा. बामणगावकरांनीं पाहावें. माझा प्रस्तुत विषय मराठेतर एवढाच आहे. म्हणून मी वि. मराठाकारांच्या विचारांची पुनरावृत्ति करीत नाहीं. तरी पण वि. मराठाकारांना मला एवढेंच जाणवावयाचें आहे कीं, जें पाप ब्राह्मणांनीं केलें म्हणून “ब्राह्मण” नांवाची एक नवीन अस्पृश्य जात ब्राह्मणेतर पक्षांनीं निर्माण केली आहे, तेंच पाप आजकालचे मराठे करूं लागले आहेत; म्हणून मराठेतर पक्ष लवकरच निघेल अशी जी धोक्याची सूचना रा. बामणगांवकर देत आहेत, तिचा सर्व मराठ्यांनीं आदरपूर्वक विचार करावा. जर तसा विचार करतील तर मजसारख्या
ति-हाइताला असल्या जातीजातींतील तंटे तोडण्याची रिकामटेकडी मध्यस्थी करण्याचें कारणच उरणार नाहीं.
रा. कोल्हटकर आपल्या वर निर्दिष्ट केलेल्या लेखांत म्हणतात, “ब्राह्मणेतर पक्षास “जरीपटका संघ” हें नांव आम्हीं मागें सुचविलें होतें. दे. भ. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनीं “बहुजन पक्ष” असें नांव ठेविलें होतें. पण नांव कोणतेंहि असो, सध्यांचें ब्राह्मणेतर हें निरर्थक नांव ह्या पक्षास शोभल नाहीं, व तें बदलण्याचा विचार ह्या बैठकींत होईल अशी आम्हांस आशा आहे.” ब्राह्मणेतर ह्या नांवाचा वीट देशभक्त बामणगांवकरांना पुढें येणार नाहीं ह्याची हामी ते देतील काय? मीं स्वतः जी बहुजन पक्ष अशी शब्दयोजना सहा वर्षांपूर्वीं केली ती केवळ एक पोकळ नांव प्रचारांत आणण्यासाठीं नव्हे; किंबहुना जातिभेदाचा मला स्वभावतःच वीट आला आहे, त्याचें केवळ प्रदर्शन करण्यासाठींहि नव्हे; तर केवळ जातींच्या पायांवरच एखादी चळवळ करूं गेल्यास आज नाहीं  उद्यां समंजस माणासांना तिचा वीट येणें क्रमप्राप्तच आहे, निदान क्षम्य तरी आहे असें मला तेव्हां वाटलें व अद्यापि वाटत आहे. शिवाय दुसरी एक मला ह्याहूनहि वाईट शंका येत आहे ती ही कीं, रा. बामणगांवकरांनीं अत्यंत सद्धेतूनें हें धोक्याचें शिंग फुंकलें आहे, त्याचें वारें कानांत शिरल्यामुळें कांहीं वांसरांनीं जर कदाचित् महाराष्ट्रांत मराठेतर पक्ष निर्माण केला, तर त्याचा प्रतिध्वनि लिंगायतेतर समाज ह्या रूपानें कर्नाटकांत उमटणार नाहीं ह्याची तरी हमी बामणगांवकर घेतील काय? नाहीं तर गणपतीची सोंड मागें लागल्यानें माकड निर्माण होऊन, तें बामणगावकरांच्या ह्या नवीन गेणेशोत्सावाचा बेरंग करील ! मग राष्ट्रवीर बामणगांवकरांनीं पुनः केसरीकडे धांव घेतल्यास कर्नाटकांतील लिंगायत बंधू आतांप्रमाणें स्वस्थ बसतील काय?
जातिवाचक राजकारण म्हणजे एक मनोरंजक आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ आहे. तो खेळ युरोपांत जशी सुधारलेलीं (?) राष्ट्रें ऊर्फ जाती आजवर खेळत आलीं आहेत, तसेंच मागासलेल्या हिंदुस्थानांतील जाती उर्फ राष्ट्रेंहि आज खेळावयाला लागलीं आहेत. ह्या खेळांस पाश्चात्यांनीं पौरस्त्यांस मुळींच हंसावयास नको. मग एतद्देशीयांनीं कां हंसावें बरें? हा मनुष्यस्वभावाच्या आंधळेपाणाचा बोधकारक खेळ आहे. ह्या खेळांत ज्या राष्ट्रावर अथवा जातीवर डाव येत असतो, त्याला एकट्यालाच वगळून बाकीच्या सगळ्या खेळगड्यांनीं तात्पुरतें एकत्र होऊन त्या बिचा-या आंधळ्याला जीव नकोसा करून टाकावयाचें असतें. ब्राह्मणेतर अहिंदूंना  तेवढेंच मिळवूं पाहतात, असें जें बामणगांवकर म्हणतात, त्यावरून त्यांनीं हा खेळ कधीं खेळला नसावा अशी शंका येत आहे. गेल्या दोन शतकांत नुसत्या युरोपांत जीं स्थानिक युद्धें झालीं, त्यांत हा डाव आळीपाळीनें इंग्लंड व फ्रान्स ह्या डोईजड राष्ट्रांवर जेव्हां येत असे तेव्हां बाकीचीं सर्व डोईजड न झालेलीं राष्ट्रें एकत्र होत असत. इंग्लंडचें किंवा फ्रान्सचें डोकें हलकें झाल्याबरोबर डाव बदलत असे. ह्या खेळाला मराठींत साधें बालबोध आंधळी कोशिंबीर हें नांव असून तिकडे “बॅलन्स ऑफ पॉवर” हें भपकेदार नांव असे. पण अर्थ एकच; आणि डाव अंगावर घेण्याचें कारणहि केवळ डोईजडपणाच ! गेल्या दोन चार शतकांत ह्याच कारणामुळें हा डाव ब्राह्मणांवर आला होता, तो आतां हातघाईवर आला आहे. न जाणो, उद्यां मराठ्यांवर आणि परवां लिंगायतांवरहि येईल. बामणगांवकरांनीं मात्र उगाच खेळांत घाई करूं नये, नाहींतर खेळांत रडी झाली ह्या सबबीवर ब्रिटिश एंपायर ऊर्फ मतलबी एंपायर भलत्यांचेच डोळे बांधतील व आपण मजा पाहतील.

ब्राह्मणेतर पक्ष निघण्यापूर्वीं सुमारें १० वर्षांमागें रा. विजयी मराठाकार मजकडे आले होते. तेव्हां मीं ह्या खेळाचें रहस्य सांगून म्हटलें होतें कीं, सावध न राहिल्यास हा डाव महाराष्ट्रापुरता तरी मराठ्यांवर येण्याच संभव आहे. विजयी मराठाकार हें विसरण्याइतकें बेसावध नाहींत. म्हणूनच कादचित् ते आजहि मजकडे आले असतील. असो. बामणगांवकर म्हणतात कीं महाराष्ट्रांत मराठा जात बहुसंख्याक आहे. गोष्ट अगदीं खरी आहे, पण डाव येण्यास बहुसंख्या हें कारण नसून डोईजडपणा हें कारण असतें. एरवीं ब्राह्मणांवर आज डाव कां आला असता? ते काय बहुसंख्यांक आहेत? इतकें कशाला? आज नर्मदेच्या दक्षिण देशांत जसा हा डाव ब्राह्मणांवर आला आहे, तसाच उत्तरदेशांत तो मुसलमानांवर आला आहे. मग ते काय बहुसंख्याक आहेत? मुळींच नसून, त्यांचें डोकें मात्र मतलबी एंपायरांनीं अगदीं जड करून सोडलें आहे, हेंच कारण होय. तशांत खिलाफतवाल्यांनीं तर त्यांना हरभ-याच्या झाडावर चढविल्यामुळें हें आधींच जड झालेलें डोकें त्यांच्या खांद्यावरून त्यांच्या पायांत येऊन, त्यावरच ते अलीकडे क्वेट्टा, कलबुर्ग, कलकत्ता येथें अडखळल्यानें रक्तबंबाळ होत आहेत. महाराष्ट्रांत ब्राह्मण रक्तबंबाळ होत नाहींत ह्याचें कारण ते रक्ताला फार भितात. त्यांचें डोकें कितीहि जड झालें तरी राजकारण हा केवळ एक शिळोप्याचा खेळ - क्वचितपक्षीं पोटाचा धंदाहि आहे, हें त्यास माहीत आहे. करमणुकीसाठीं – किंबहुना पोटासाठीं, प्रत्यक्ष उत्तमांग जें डोकें तेंहि गमावून घेण्याइतके कांहीं ब्राह्मण बेसावध नाहींत. फार झालें तर किर्र म्हणून ते हार खातील आणि फक्त एकदां डोळे बांधण्यास सांगतील.
ह्या डावांत मराठेतरांनीं मात्र केवळ आपण अल्पसंख्याक आहोंत याच सबबीवर बेसावध राहूं नये. त्यांनीं मराठ्यांच्याच मागें मागें धांवावें असेंहि मीं म्हणणार नाहीं. ब्राह्मणेतर पक्षाच्या चाबकाच्या जोरावर यांच्या रंगणांत फिरणारे मराठेहि जर तसें म्हणत नाहींत, तर माझ्यासारख्या स्वतंत्राला तरी म्हणण्याचें काय कारण? ह्या दृष्टीनें ह्या खेळाकडे पाहत असतां मला सर्वांत जास्त भीति वाटते, ती विनाकारण अस्पृश्य मानलेल्या माझ्या हिंदु बंधूंकरितांच होय. खरोखर पाहतां हिदुंस्थानांत हे “अस्पृश्य”च बहुसंख्याक आहेत. ह्यांचें डोकें कधींच जड झालेलें नाहीं. ह्यांच्याविषयीं मला जें वाईट वाटतें, तें ह्यासाठीं कीं, ह्या बिचा-यांना ब्राह्मण काय, ब्राह्मणेतर काय, ख्रिस्ती काय, मुसलमान काय, मजूर काय, भांडवलदार काय, स्वकीय काय, परकीय काय, कोणीहि प्रामाणिकपणानें ह्या राजकारणाच्या खेळांतच घेण्यास तयार नाहींत; म्हणून मी स्वतः जरी जातवार प्रतिनिधित्वाच्या उलट होतों, तरी ह्यांच्यासाठीं मी त्या तत्त्वाचा पुरस्कार करीत आहें. पण चेम्सफर्ड आणि माँटेग्यु हा परकीय भटजी शेटजीनीं ही मज गरिबाची विनंति धिःकारली; आणि त्यांनीं उलट मुसमाना व अँग्लोइंडियन ह्या अल्पसंख्याक डोईजडांपुढें आपली मान वांकविली ! म्हणून खरे “मराठेतर कोण?” ह्या प्रश्नाचें जर माझ्या मनांतलें उत्तर कोणी विचारील तर मी स्पष्ट सांगेन कीं ते मुसलमान, अस्सल युरोपियन, आणि त्यांच्या अद्यापि मागें लागलेले अर्धवट अँग्लोइंडियन हेच होत ! अशांना भिऊन किंवा भुलून जर कोणी हल्लीं चालूं असलेल्या ब्राह्मणेतर पक्षांतच फूट पाडण्याचा प्रयत्न करील, आणि त्या प्रयत्नांत जर प्रामाणिकपणा असेल तर अशा प्रामाणिक मित्रांना मी नम्रपणानें सांगेन कीं आपला नेम चुकला; जे अप्रामाणिक असतील त्यांची गोष्टच वेगळी.
“अस्पृश्यां”विषयीं लिहीत असतां रा. बामणगांवकरांनीं माझी व. प. लो. वासी श्रीशाहू छत्रपतींची तुलना केली आहे. त्यांनीं हा मुद्दा अजिबात गाळला असता तर बरें झालें असतें. अस्पृश्यतानिवारणाचें काम खालून टेकडीवर धावत जाण्याप्रमाणें केवळ शक्तीचें आहे. येथें लोकमान्यतेची अगर राजमान्यतेची शक्ति हाच मुख्य मुद्दा आहे. ह्या दोन्ही शक्ति अंगीं नसतां माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीनें हें काम शिरावर घेणें म्हणजे धाडस आहे. असलें धाडस फार तर क्षम्य आहे, आणि त्याबद्दल माझ्या टीकाकारांनीं आजवर मला क्षमा केली किंवा कांहीं जहाल सोंवळ्या पक्षांनीं माझी गय केली हें मी माझें भाग्यच समजतों. तात्पर्य काय, कीं हा प्रश्न व्यक्तींचा नसून शक्तीचा आहे. उशीरां कां होईना, लोकमान्य-गांधीजींनीं हें काम अंगावर घेतलें, म्हणून ह्याला दहा डी. सी. मिशनचें बळ आलें आहे. श्री शाहूमहाराज तर बहुजनसमाजांत लोकमान्यच नसून, प्रत्यक्ष छत्रपति श्रीशिवरायाचा अंश असल्यानें जी कामगिरी त्यांचेकडून झाली ती अशी त्यांच्या शत्रूंनींहि दृष्टीआड करूं नये. अलीकडे म्हैसूरच्या महाराजांनीं चरख्याची प्रतिष्ठा आपल्या पूजेंत केली आहे, असें ऐकतों. माझ्या हिंदू बंधूंनीं आपल्या तेहतीस कोटी मूर्तींचें उद्यापन करून त्यांना चरख्याची खरी (दिखाऊ नव्हे) पूजा केल्यास, खरोखरीच एका वर्षांत स्वराज्य मिळेल, आणि ते टिकाऊ दिसेल असें मलाहि इतर पुष्कळांप्रमाणें वाटतें. पोषाखाची विषारी भुरळ टाकून बहुजनसमाज हा सात्त्विक धर्माचा तप आरंभीला तर महात्मा गांधीजींच्या जन्माचें सार्थक होईल. इतकेंच नव्हे तर मी हेंहि म्हणण्याचें धाडस करितों कीं, असलीं साधेपणाचीं तपें केवळ गांधीजींसाख्यांनींच करण्यापेक्षां म्हैसूर महाराजांप्रमाणें सर्वच महाराजांनीं चालविल्यास, आपलीं सर्व लष्करें आणि दुकानें घेऊन इंग्रजांना दुसरा देश आजच पाहावा लागेल. त्याला वर्षाची तरी मुदत कशाला पाहिजे? परंतु जोंपर्यंत काश्मीरांतल्याप्रमाणें केवळ राज्यारोहणाप्रीत्यर्थ लक्षावधि रुपयांचा चुराडा होतो, तोंपर्यंत गांधीजींसारख्यांनीं जन्मचे जन्म घेतले तरी, स्वराज्याचींहि वर्षाचीं वर्षें मुदतबंदीच होत राहील; हातीं प्रत्यक्ष कांहींच लाभावयाचें नाहीं ! जी गोष्ट खादीची, तीच अस्पृश्यता निवारणाचीहि आहे हें जाणून, इतर सर्व मतभेद बाजूस सारून, रा. बामणगांवकरांनीं दिवंगत श्रीशाहू छत्रपतींच्या श्रेयाला काट मारूं नये येवढेंच माझें म्हणणें आहे.
विजयी मराठाकारानीं ब्राह्मणेतर मीमांसा चालविलेली पाहून बामणगांवकारंकडून मराठेतर मीमांसा सुरू करण्यांत आली आहे ! मला वाटतें आतां ही “इतर” मीमांसा आमच्या देशांत पुरे झाली. डोईजडपणाची मेख मनुष्यस्वभावांतच ईश्वरानें जणूं मारली आहे. तिला ब्राह्मण काय, इतर काय, किंबहुना मराठेतरांप्रमाणें तिसरे कोणी काय, बळी पडण्याचा सारखाच संभव आहे. हा “इतर” रोग नुसत्या मीमांसेनें बरा होणें नाहीं. तसें असतें तर वर्णव्यवस्थेच्या विषाचें पीक आमच्या ह्या हतभागी देशांत इतकें माजलें नसतें. मीमांसा आणि मीमांसाविद्यालयें आमच्या देशांत थोडीं का आहेत? निदान पुणें शहराच्या पश्चिमभागीं अशा विद्यालयांच्या पाट्या गल्लोगल्लीं चमकत आहेत. आणि म्हणूनच हल्लीं ब्राह्मणेतर पक्ष हिंदुस्थानांत फोफावत आहे. हा “इतर” रोग समूळ उखडून टाकावयाचा असल्यास ही मीमांसेची सारंगी हिंदूंनीं हिंदीमहासागरांत फेकून द्यावी, किंवा तिच्याशिवाय चैनच पडत नसेल तर एखाद्या इतिहासमंडळाच्या प्रदर्शनांत भावी पिढीच्या कल्याणासाठीं धोक्याचें चिन्ह म्हणून ठेवावी, आणि सर्व पक्षांनीं हातीं चिकीर्षेची कुदळ घ्यावी असें माझें प्रांजल मत आहे. मग कोणी कांहीं म्हणो !