ह्या कामीं तुम्ही आतां सरकारच्या मदतीची मुळींच अपेक्षा करूं नका, इतकेंच नव्हे तर तुमच्या संघटनेला सरकार आणि नोकरशाही संधि मिळेल तेथें कसून विरोधच करीत राहिल हें तुम्ही गृहित धरून चालाल तरच बरें. परवां दिल्लीच्या मध्यवर्ति कायदेमंडळांत काय घडून आलें ! तुमच्या हलाखीची नुसती चौकशी करण्याचा ठरावहि नोकरशाहिनें पालथा घातला ! लॉर्ड आयर्विनसारखा सज्जन व्हाइसरॉय पुनः मिळणें दुरापास्त आहे ! येतांना त्यानें तुमच्या कल्याणाचा चंग बांधला असल्याबद्दल बहाणा केला. स्वतः त्याचीच आतां नामुष्की चालली आहे, मग त्याच्या बहाण्याची काय कथा ? हें असेंच होणार. परकीय सरकारनें तुम्हांला काय म्हणून भ्यावें ? आणि भ्याल्याशिवाय कोणत्याहि सरकारनें कधीं कांहींच दिलें नाहीं, व देणार नाहीं. परकीय सरकारापेक्षां आमच्या संस्थानांतील स्वकीय सरकारांनीं तर अधिकच ताळ सोडला आहे. हे संस्थानिक पुनः आपलीच तुंबडी भरण्यासाठीं ह्या परकीय सरकारास शरण जात आहेत ! सुधारणेसाठीं नाणावलेलें म्हैसूरचें संस्थान, तेथील राजा अगदीं सच्छील ! महाराज कैलास पर्वताची यात्रा करून परत येतात न येतात तोंच, त्यांची राजधानी जें बंगलूर शहर त्यालगतच्याच खेड्यांत काय प्रकार घडला ? उपासमाराच्या वेदना सहन न होऊन एका शेतक-यानें आपल्या बायकोचा व दोन मुलांचा जीव घेऊन स्वतः पण आत्महत्या केली व चौघेहि ख-या कैलासाला गेले ! पण तेथें तरी दाद लागेल काय ? अशी हलाखी किंबहुना त्याहिपेक्षां जास्तच हिंदुस्थानांत सर्वत्र आहे.