दोन ज्ञानदेव व तीन नामदेव

ज्ञानदेव दोन होते आणि नामदेव तीन होते, असा प्रसिद्ध वाद सुमारें ३० वर्षांपूर्वीं नगरच्या परलोकवासी भारद्धाज ह्यांनीं ‘सुधारक’ पत्रांत उपस्थित केला होता. ह्याचा परिणाम डॉ. सर ह्यांच्यावरहि होऊन त्यांनींदेखील नामदेवाला सुमारें १०० वर्षें अलीकडे ओढिलें आहे. ह्या वादाचा मुख्य मुद्दा हा आहे कीं, नामदेवाच्या अभंगांची भाषा ज्ञानेश्वरीच्या भाषेसारखी जुनी नाहीं ! जणू काय अभंगांसारखा नित्यपाठांत असलेल्या गीतांची भाषा कायम राहणें शक्यच आहे! अलिकडे ३०।४० वर्षांत आम्हीं प्रार्थना समाजियनांनींच अशा अभंगांचें स्वरूप जुन्या लोकांच्या मतांची पर्वा न बाळगतां किती तरी बदलून टाकलें आहे. असें असतां हा भाषेच्या मुद्याचा बाऊ निदान आम्हांला तरी वाटूं नये. तुकारामाची अस्सल गाथा रा. भावे ह्यांनीं अलिकडे मूळ भाषेंत प्रसिद्ध केली आहे. तिच्यांत आज जो फरक झालेला आहे, तो पाहतां, नामदेवाच्या आजच्या गाथेहून मूळ गाथा फार भिन्न असावी, हें उघड आहे. सर भांडारकरांचा निर्वाणीचा मुद्दा असा आहे कीं, तुर्कांनीं मूर्ति फोडल्याचा उल्लेख नामदेवांनीं केला आहे, म्हणून तो १४ व्या शतकांतच असला पाहिजे. महमूद गिजनीनें सोमनाथाची प्रसिद्ध मूर्ती इ. स. १०१४ सालीं फोडून जें उदाहरण घालून दिलें, तें त्याच्या मागच्या मुसलमानांनीं सतत दोन शतकें गिरविलें. इ. स. १२७० पासून १३५० पर्यंत जगलेल्या आणि सा-या भरतखंडभर फिरवलेल्या नामदेवासारख्या बाणेदार आणि शूर क्षत्रिय भक्ताला मुसलमानांचा हा आततायीपणा कळल्याशिवाय राहणें शक्यच नाहीं. असो. भारत इतिहास मंडळाच्या गेल्या वार्षिक सभेंत आळंदीचे पंडीत पांडुरंग शर्मा यांनीं ह्या वादाला चांगलें सविस्तर उत्तर दिलेलें सदर मंडळाच्या अहवालांत आतां प्रसिद्ध झालें आहे. त्यांनीं नामदेव व ज्ञानदेव समकालीन असून त्यांचा काल इ. स. १३५० पूर्वींच होता, असें सिद्ध केलें आहे.