पूर्वपीठिका

हाल नांवाच्या शातवाहन कवीनें जुळविलेल्या “गाथा-सप्तशती” नांवाच्या प्राकृत काव्यसंग्रहांतील ताल ३ –या शतकांतील ८५ वा श्लोक असा आहे.
पोट्टं भरन्ति सडणावि माडआ अप्पणो अणुव्विगा विहलुद्धरण सहावा हुवन्ति जह केवि सप्पुरिता ||८५|| मराठींत अर्थ - पोटभरति पक्षी ही माई आपण अनुद्विग्न | विव्हलोद्धरण स्वभाव होती जरी कांहीं सत्पुरष ||८५||
ह्यावरून ख्रिस्ती शकाच्या सुमारें दुस-या शकांतील महाराष्ट्री वाङ्मयाच्या भाषेशीं जुन्या व नव्या मराठीचा कसा काय संबंध लागतो ह्याची किंचित् ओझरती कल्पना येण्यासारखी आहे. अनेक प्राकृत भाषाकोविद जैन आचार्य मुनी विजयजी हे एकदां असे म्हणाले कीं, ज्ञानेश्वरीची मराठी भाषा ही प्राकृत जाणणाराला जशी व जितकी दुर्बोध वाटते तशी व तितकीच दुर्बोध हल्लींची मराठी जाणणारालाहि वाटते. ह्याचा अर्थ असा कीं, ज्ञानेश्वरी मराठी ही पूर्वींच्या प्राकृताहून जितकी अलीकडची तितकीच हल्लींच्या मराठीहून पलीकडची आहे. पण येवढ्यावरूनच ती दुर्बोध कां व्हावी? हिंदी, गुजराथी व बंगाली ह्या अर्वाचीन भाषांचा जुन्या प्राकृताशीं जितका संबंध जुळतो तितका मराठीचा कां जुळत नाहीं? त्याचें कारण मराठी ही कानडीचे मागून व तिच्या तालमींत किंबहुना सासुरवासांत वाढलेली भाषा आहे, म्हणून कानडीचा तिच्यावर जबर परिणाम झाला आहे. यदाकदाचित् वैदिक भाषेशीं मराठीचा संबंध असेलच तर तो कानडी भाषेचा मूळ द्राविडी भाषेशीं जितका दूरचा संबंध आहे त्याहून अधिक दूरचा असावा. तामिळपासून कानडी जितकी दूर आहे त्यापेक्षां शब्दकोशाच्या दृष्टीनें नसली तरी व्याकरणाच्या दृष्टीनें मराठी हीं संस्कृतापासून जास्त दूर आहे. दूरीभाव डोळ्यांत न भरण्याचें कारण असें कीं, आधुनिक मराठींत संस्कृत व तत्सम शब्दांचा भरणा फार होऊं लागल्यामुळें मराठीं वस्तुतः आहे त्यापेक्षां संस्कृतच्यां जवळ असल्याचा भास होतो.
ज्ञानेश्वरीच्या मराठीचा उद्य होऊं लागण्यापूर्वीं बरींच शतकें कानडींतील लिखित वाङ्मयाची भरभराट होऊन चुकली होती. शके बाराशेंच्या पूर्वीं मराठीच्या वाङ्मयाचाच नव्हे तर शिलालेखांचाहि लागावा तितका पत्ता अद्यापि लागत नाहीं. पण कानडीचा इतिहास ह्याहून अगदीं निराळा आहे. ता. २३ जुलै सन ६१३ च्या एक शिलालेखांत रविकीर्ति नांवाच्या एका जैनधर्मी कानडी कवीचा उल्लेख आहे तो भारवि आणि कालिदास ह्यांच्या तोडीचा होता असें त्याचें म्हणणें आहे. राष्ट्रकूट वंशांतील पहिला अमोघ वर्ण ऊर्फ नृपतुंग अथवा शव ह्या राजाचे नांवावर ‘कविराजमार्ग’ नांवाचा अलंकरशास्त्रावरील एक कानडी ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्याचा काळ शके ७७५-७९९ चे दरम्यान आहे. ह्या पूर्वींच्या ब-याच ग्रंथांचे उल्लेख शिलालेखांतून मिळतात. पण ते ग्रंथ मात्र अद्यापि उपलब्ध नाहींत. ह्यानंतर १|२ शतकांनीं पंप आणि पोन्न हे कानडी कवि उद्यास आले. पंपाचे आदिपुराण, रामायण, भारत इ. ग्रंथ प्रसिद्ध आहेत. केवळ लिखित व अभिजात वाङ्मयाच्या भाषेचा कानडीला हा मोठेपणाचा मान आहे असें नव्हे, तर विस्ताराच्या दृष्टीनेंहि हल्लींपेक्षां मध्ययुगीन कानडीचा मराठीहून अधिक मोठ्या प्रदेशावर विस्तार होता. “आकावेरियिंद आ गोदावरी वरे गम” म्हणजे कावेरीपासून गोदावरीपर्यंत कानडीचें साम्राज्य पसरलें होतें. आणि त्यांतल्या त्यांत वक्लंद (बेळगांव) आणि कोप्पळ ह्यांचेमधील प्रदेशांत तर अत्युत्कृष्ट अशा कानडीचा प्रचार होता अशा अर्थाचा उल्लेख “कविराजमार्ग” ह्या ग्रंथांत आहे असे प्रो. पाठक यांचें म्हणणें आहे. देवगिरीच्या यादव-घराण्यांतील १२ व्या शतकांतल्या महादेव राजापर्यंत तरी कानडीच्या ह्या अवाढव्य प्रसाराला ओहोटी लागल्याचीं चिन्हे दिसत नाहींत. तोंपर्यंत महाराष्ट्राच्या निरनिराळ्या सम्राटांच्या राजधान्या खालीं कर्नाटकांतच बनवासी, बदामी, धनकटक, मालखेड इत्यादि दक्षिणेकडील शहरांत असल्यामुळें अर्थातच अभिजात मराठीच्या प्रसाराला गोदावरीच्या दक्षिणेकडे वावच मिळाला नाही. पण देवगिरीच्या यादवांच्या प्रतापामुळें महाराष्ट्राच्या राजकारणानेंच नव्हे तर वाङ्मयानेंदेखील जो अपूर्व उठाव केला आणि विशेषतः कानडीला दक्षिणेकडे रेटण्याची जी सुरुवात केली तिचा प्रभाव अद्यापि जाणवत आहे. मात्र आतां हा प्रसार बंद पडून लवकरच मराठीला मागें हटावें लागेल असें सेन्सस रिपोर्टाच्या आंकड्यांवरून दिसूं लागलें आहे.