१ प्रस्तावना

कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या या लेखसंग्रहाचें वैशिष्ट्य असें कीं इतक्या विविध प्रश्नांवरील त्यांचे संशोधनपर निबंध प्रथमच ग्रंथरूपानें प्रसिद्ध होत आहेत. यापूर्वीं १९१२ सालीं ‘विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याख्यानें आणि उपदेश’ या नांवाचा त्यांचा लेखसंग्रह प्रसिद्ध झाला होता. परंतु त्यांतील लेख हे मुख्यत: इंग्लंडमधील त्यांचीं प्रवासवर्णनें, प्रार्थनासमाज व ब्राह्मोसमाज यांची शिकवण व तत्सम इतर कांहीं विषय यांच्यापुरतेच मर्यादित होते. या लेखसंग्रहामध्यें त्यांनीं केलेला धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, भाषाशास्त्र, मराठ्यांचा इतिहास, समाजशास्त्र इत्यादि विषयांचा ऊहापोह समाविष्ट आहे. या लेखसंग्रहामध्यें विषयांची विविधता वैशिष्ट्यपूर्ण आहे.
लेखन मुख्यत: १९२३ ते १९३५ च्या काळांतील
कर्मवीर शिंदे यांचे या लेखसंग्रहांतील निबंध मुख्यत: १९२३ ते १९३५ या काळांत लिहिले गेलेले वा प्रसिद्ध झालेले आहेत. १९०६ पासून १९२३ पर्यंत ते ‘डिप्रेसड् क्लासेस मिशन’ या संस्थेच्या कामांत गढून गेले होते. १९२३ सालीं ते या संस्थेच्या कामांतून मुक्त झाले. त्यामुळें त्यांना स्वाभाविकच तुलनात्मक दृष्ट्या अधिक स्वास्थ्य मिळूं लागलें. १९३५ सालीं नंतर ते मधुमेह, गाऊट व इतर आजारानें अंथरूणाला खिळून होते, त्यामुळें १९३५ नंतरहि ते फारसें लेखन-वाचन करूं शकत नव्हते; म्हणून त्यांच्या आयुष्यांतील सर्व महत्त्वाचें लेखन १९२३ ते १९३५ या एका तपाच्या काळांतच झालेलें दिसतें. या लेखसंग्रहांतील कांहीं लेख विविधज्ञानविस्तार, रत्नाकर, केसरी, किर्लोस्कर, विजयीमराठा, सुबोध-पत्रिका यांतून प्रसिद्ध झालेले आहेत. तसेंच कांहीं लेख या संग्रहांत प्रथमच प्रकाशित होत आहेत. गेलीं अनेक वर्षें ते कर्मवीर शिंदे यांच्या खाजगी संग्रहांत हस्तलिखित स्वरूपांत पडून होते.
पिण्ड संशोधकाचा वा तत्त्वचिंतकाचा
श्री. विठ्ठल रामजी शिंदे हे महाराष्ट्राला मुख्यत: समाजसुधारक वा कर्मवीर म्हणूनच परिचित आहेत. परंतु या लेखसंग्रहांतून व्यक्त होणारें त्यांचें व्यक्तिमत्त्व एका तत्त्वचिंतकाचें वा संशोधकाचें आहे असें दिसतें. कर्मवीर शिंदे यांचा पिंड हा जसा एका कर्मवीराचा होता त्याचप्रमाणें एका तत्त्वचिंतकाचा, संशोधकाचा होता, असें यामधून दिसत आहे. भागवत धर्माचें मूळ कशांत आहे, अस्पृश्यतेचें उगमस्थान कोणतें आहे, मराठ्यांची पूर्वपीठिका कोणती आहे, मराठी भाषेचें उगमस्थान कोठें आहे यासंबंधीं त्यांनीं केलेल्या विवरणामध्यें त्यांच्या तत्त्वचिंतनात्मक मनाचा चांगला प्रत्यय येतो. महाराष्ट्राला त्यांचें हें दर्शन पुष्कळच वेगळें आहे. या दृष्टीनेंहि हा लेखसंग्रह उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.

आर्यपूर्व संस्कृतीचें महत्त्व
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनीं आपल्या लेखांतून भारतीय संस्कृतीवर आर्यपूर्व संस्कृतीची केवढी मोठी छाप होती हें दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. अण्णासाहेर शिंदे ज्या काळांत हे विचार मांडीत होते त्या काळाची पार्श्वभूमि या दृष्टीनें विशेष उल्लेखनीय आहे. ज्या काळांत अण्णासाहेब शिंदे हे विवेचन करीत होते त्या काळांत महाराष्ट्रांतीलच नव्हे तर हिंदुस्थानांतील बहुतेक सर्व विचारवंत भारतीय संस्कृति म्हणजे केवळ आर्यसंस्कृति आहे, असें समीकरण मांडीत होते. या विचाराचें मूलस्थान जर्मनींतील १९ व्या शतकाच्या उत्तरार्धांतील विचारवंतांच्या मध्यें आहे. आर्यसंस्कृति हीच खरी संस्कृति, आर्यपूर्व संस्कृति अत्यंत रानटी, मागासलेली, जंगली होती, असा विचार जर्मनीमधून १९ व्या शतकाच्या उत्तरार्धांत जगभर पसरला. या विचारवंतांची छाप हिंदुस्थानांतील व पर्यायानें महाराष्ट्रांतील बहुतेक सर्व संशोधकांवर पडली होती. त्यामुळें स्वाभाविकच भारतीय संस्कृतीची सुरुवात ही केवळ आर्यांच्या आगमनानंतरच झाली, येथील आर्यपूर्व संस्कृति ही अतिशय मागासलेली, केवळ रानटी टोळ्यांची होती, असें गृहीत धरूनच ते सर्व विवेचन करतात. याचा प्रत्यय ज्ञानकोशकार केतकर, इतिहासाचार्य राजवाडे, डॉ. भांडारकर, न्यायमूर्ति तेलंग या सर्वच विचारवंतांच्याबाबत येतो. आपल्या देशांतील बहुतेक सर्वच विचारवंत वरील विचाराच्या छायेखालीं वावरत असतां भारतीय संस्कृतीवर आर्यपूर्व संस्कृतीची फार मोठी छाप आहे, असें अण्णासाहेब शिंदे आपल्या लेखांतून सांगत होते. त्यांच्या विचाराचें दुसरें वैशिष्ट्य असें कीं, भारतीय संस्कृति म्हणजे केवळ आर्य व आर्यपूर्व संस्कृति नव्हे. या आर्यपूर्व संस्कृतीच्याहि आधीं येथें जे मूळचे रहिवासी राहात होते त्यांच्या जीवनपद्धतीचा आर्यपूर्व व आर्यसंस्कृतीवरहि परिणाम झालेला होता. या सर्व संस्कृतींचा एकत्रित झालेला परिणाम म्हणजे भारतीय संस्कृति आहे. या तिन्ही संस्कृतींमधून तयार झालेली एकात्म जीवनपद्धति म्हणजे भारतीय संस्कृति आहे, असें ते आपल्या विवेचनांतून सूचित करतात. त्यांची ही अभ्यासपद्धति अधिक वस्तुनिष्ठ व समाधानकारक आहे असें वाटतें.
योग - भक्ति - तत्त्वें : आर्यपूर्व संस्कृतीचीं वैशिष्ट्यें
आर्यपूर्व संस्कृतीचा भारतीय संस्कृतीवर झालेला परिणाम ते अनेक पद्धतीनें दाखवितात. ‘भागवत धर्माचा विकास’ या लेखांत भक्तिमार्ग हा आर्यपूर्व आहे, असें त्यांनीं सांगितलें आहे. ज्ञान आणि कर्म हीं आर्यसंस्कृतीचीं वैशिष्ट्यें आहेत तर योग व भक्ति हीं आर्यपूर्व संस्कृतीचीं वैशिष्ट्यें आहेत, असें ते सांगतात. याला त्यांनीं वाङ्मयीन व पुरातन संशोधनाचे आवश्यक ते पुरावे दिलेले आहेत. अण्णासाहेब शिंदे यांचा हा मध्यवर्ती सिद्धान्त पुष्कळच विचारप्रवर्तक व नव्या ज्ञानाच्या कसोटीला उतरणारा आहे, असें वाटतें. सिंधमध्यें मोहेंजोदारो, हराप्पा येथें सांपडलेल्या उत्खननांतील पुराव्यांवरून शिवपूजा व लिंगपूजा आर्यपूर्व असावी असें वाटते. तेथें तर सांपडलेल्या नागपूजा व वृक्षपूजेच्या पुराव्यांवरून भक्तिमार्ग हा आर्यपूर्व असावा असें वाटतें. आर्यांच्या अगदीं प्रारंभींच्या वाङ्मयांत योग व भक्ति यांचे उल्लेख अगदीं तुरळख तुरळक आहेत. अगदीं प्रारंभींच्या या वाङ्मयाकडून अलीकडच्या काळांत जसजसें यावें तसतसें त्याचे पुरावे अधिकाधिक मिळूं लागतात. यावरूनही आर्यपूर्व संस्कृतीचा आर्यांशीं दीर्घकाळ सहवास आल्यानंतरच हीं दोन्हीं तत्त्वें आर्यसंस्कृतींत आलेलीं असावींत, असें वाटतें. शिवाय भक्तितत्त्व हें दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत गेलें आहे. हें तत्त्व आर्यसंस्कृतींत असतें तर तें उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकत गेलें असतें. यावरूनहि भक्तितत्त्व हें आर्यपूर्व असावें, असेंच वाटतें.
अस्पृश्यता आर्यपूर्व संस्कृतींतच असली पाहिजे
भक्तितत्त्वाच्या मीमांसेप्रमाणेंच अस्पृश्यतेची मीमांसाहि मूलगामी व विचारप्रवर्तक आहे असें वाटतें. भारतीय अस्पृश्यतेचें मूळ शोधीत असतांनाहि अस्पृश्यता आर्यपूर्व असावी, असें अण्णासाहेब शिंदे यांना वाटतें. याला पुरावे म्हणून त्यांनीं दोन गोष्टींचा उल्लेख केला आहे. पहिला पुरावा असा कीं, आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे जसजसे जातों तसतशी अस्पृश्यतेला अधिक धार प्राप्त होते. यावरून अस्पृश्यता ही मुळांत दक्षिणेकडे व आर्यपूर्व असावी, असें त्यांना वाटतें. शिवाय वाङ्मयीन पुरावे शोधिले तरी आर्यांच्या अगदीं प्रारंभींच्या वाङ्मयांत अस्पृश्यतेचा उल्लेख आढळत नाहीं. अगदीं प्रारंभींच्या वाङ्मयाकडून अलीकडे अलीकडे बुद्धकाळाकडे येऊं लागतों तसतसे यासंबंधींचे उल्लेख जास्त प्रमाणावर आढळूं लागतात. यावरूनहि अस्पृश्यता आर्यपूर्व असावी, असें त्यांनीं सूचित केलें आहे.
अस्पृश्यतेचें मूळ आग्नेय आशियांत असण्याचा संभव
भारतीय अस्पृश्यतेचें मुळ आर्यपूर्व संस्कृतींत असावें असें त्यांनीं म्हटलें आहे. परंतु भारतांत या आर्यपूर्व संस्कृतींतहि हें तत्त्व कोठून आलें असावें याचीहि त्यांनीं मीमांसा करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत ते म्हणतात, भारतीय अस्पृश्यता ही आग्नेय आशियांतील देशांतून आर्यपूर्व संस्कृतीमध्यें दक्षिणेकडे प्रथम आलेली असावी. याला पुरावा देतांना ते असें म्हणतात, कीं उत्तरेपेक्षां दक्षिणेंत अस्पृश्यता तीव्र प्रमाणांत आहे. परंतु दक्षिणेंतहि ती मलबारांत अधिक तीव्र स्वरूपांत आढळते. याचें कारण पूर्वीं दक्षिण हिंदुस्थानचा समुद्रमार्गें आग्नेय आशियांतील देशांशीं संबंध असावा, असें त्यांना वाटते. पुढें आर्यांच्या काळांत हिंदुस्थानचा संबंध वायव्येकडून मध्य आशियांतील संस्कृतीशीं मोठ्या प्रमाणावर आला. त्याचप्रमाणें आर्यपूर्वं काळांत हिंदुस्थानचा संबंध दक्षिणेकडून आग्नेय आशियांतील देशांशीं अधिक आला होता असें संशोधकांच्या संशोधनावरून दिसून येतें. हटनसारख्या विचारवंतानें याच गोष्टीवर विशेष भर दिला आहे. अस्पृश्यतेचें मूळ आर्यपूर्व संस्कृतींत व या आर्यपूर्व संस्कृतींतील अस्पृश्यतेचें मूळ आग्नेय आशियांतील बेटांत असावें, असेंच त्यानें आपल्या ‘Castes in India’ या ग्रंथांत सुचविलें आहे. अद्यापहि आग्नेय आशियांतील बेटांतून राहणा-या जंगली जातींच्या लोकांत ह्या अस्पृश्यत्वाचा व तद्दर्शक शब्दांचा प्रचार जास्त आहे. या दृष्टीनें भारतीय अस्पृश्यतेचें मूळ आग्नेय आशियांतील बेटांतून असावें हा अण्णासाहेब शिंदे यांनीं मांडलेला विचार अतिशय महत्त्वाचा आहे, असें वाटतें.
जातिव्यवस्थादेखील आर्यपूर्व असावी
हटन यांच्याप्रमाणेंच इतरहि कांहीं मानववंश शास्त्रज्ञांनीं केवळ अस्पृश्यताच नव्हे तर जातिव्यवस्था ही देखील आर्यपूर्व असावी, असें म्हटलें आहे. प्रत्येक जातिजातींत आढळणा-या चालीरीति, ल्गनपद्धति, अंत्यसंस्कार, त्यांच्या धर्मकल्पना, वेगवेगळ्या समजुती यांवरून या कल्पनेस पुष्टिच मिळते. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनीं हा विचार प्रथम फार स्पष्ट स्वरूपांत १९०९ व १९११ सालीं प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘History of Caste’ या पुस्तकांतून मांडला. आधीं या देशांत चार वर्ण होते व त्यांतून वर्णसंकरानें व इतर कारणांमुळें या देशांत शेंकडों जाति निर्माण झाल्या अशी कल्पना अनेक वर्षें रूढ होती. डॉ. केतकर यांनीं याबाबत बरोबर उलटा सिद्धांत मांडला. त्यांनीं असें सांगितले कीं, या देशांत अगोदर शेंकडों रानटी टोळ्या होत्या. त्यांच्याच पुढें जाति निर्माण झाल्या. या शेंकडों जातींतून आर्यांनीं चार वर्ण निर्माण केले. या सर्व जातींचें त्यांनीं वेगवेगळ्या प्रांतांत वेगवेगळ्या वेळीं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या वर्णांत वर्गीकरण केलें. हें वर्गीकरण करीत असतांना निरनिराळ्या ठिकाणीं त्यांनीं निरनिराळे मानदंड वापरले. जाति या आर्यपूर्व होत्या हें सिद्ध करण्यासाठीं त्यांनीं कांहीं समाजशास्त्रीय पुरावे दिलेले आहेत. डॉ. केतकर यांच्यानंतर वेगवेगळ्या भूमिकेवरून याविषयीं संशोधन झालें आहे. त्यावरूनहि जाति या आर्यपूर्व असाव्या या कल्पनेला पुष्टिच मिळते. डॉ. इरावती कर्वे यांनीं पंचवीस-तीस वर्षें मानववंश शास्त्राच्या आधारें संशोधन करून जो निष्कर्ष काढला आहे तो वरील कल्पनेस पुष्टीच देत आहे. ‘Hindu Society-an Interpretation’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या आपल्या पुस्तकांत डॉ. इरावती कर्वे ह्यांनीं हाच विचार समाजशास्त्रीय व मानववंशशास्त्रीय पुराव्यांच्या आधारें मांडला आहे. जातिव्यवस्था ही आर्यपूर्व असावी असें मानावयाला आतां पुष्कळ नवे पुरावे पुढें येत आहेत. जातिव्यवस्थाच आर्यपूर्व असेल तर अस्पृश्यताहि स्वाभाविकच आर्यपूर्व असावी असें समजावयाला अधिक बळकटी येते. या दृष्टीनें कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनीं यासंबंधीं केलेल्या विवरणाला पंचवीस-तीस वर्षांनंतर नव्या संशोधनानें पुष्टिच मिळत आहे, असें दिसून येईल.
अस्पृश्य एके काळचे राज-वैभव भोगलेले राजे
भारतीय अस्पृश्यांची मीमांसा करतांना ते असें म्हणतात कीं, येथील अस्पृश्य मूळचे येथील राजवैभव भोगलेले मोठमोठे राजे असले पाहिजेत. परंतु केवळ जेत्यांनीं त्यांचा पराभव केल्यामुळें त्यांच्या कपाळीं ही अस्पृश्यता आलेली असावी. आजचे अस्पृश्य हे एके काळचे मोठे राजे होते, असें त्यांना अनेक पुराव्यांवरून वाटते. ‘ब्रह्मदेशांतील बहिष्कृत जमाती’ या आपल्या लेखांतून त्यांनीं हाच विचार मांडला आहे. ब्रह्मदेशांतील बहिष्कृत जमातींचें संशोधन करतांना त्यांना वरील सिद्धान्ताला अगदीं अलीकडचा म्हणजे दहाव्या शतकांतला पुरावा मिळाला. त्यामळें त्यांच्या वरील संशोधनाला विशेष महत्त्व आहे, असें ते मानतात. भारतीय अस्पृश्यतेचें मूळ त्यामुळेंच राजकीय गुलामगिरींत असावें, असें त्यांनीं म्हटलेलें आहे. अस्पृश्य मानलेले वंश सारे संस्कृतिहीनच होते असें मुळींच नाहीं. ब्रह्मदेशांत तुहा याजा (अशुभ राजा) फया चुन वगैरे जे अस्पृश्य वंश आढळत आहेत ते जिंकले जाण्यापूर्वीं राजवंश होते असें अण्णासाहेब शिंदे आपल्या ‘अस्पृश्यांचें राजकारण’ या लेखांतूनहि सांगतात. (पान ९७)
अण्णासाहेब शिंदे यांनीं मांडलेला हा विचार पुढें डॉ. आंबेडकर यांनीं ‘Who were the Shudras ? How they came to be the furth in the Indo-Aryan Society’ या १९४६ सालीं प्रसिद्ध झालेल्या आपल्या ग्रंथांत मांडलेला आहे. डॉ. आंबेडकरांनीं यासाठीं महाभारतांतील शांतिपर्वांत उल्लेख केलेल्या पैजवन राजाचा आधार आपल्या विवेचनाच्या पुष्ट्यर्थ दिलेला आहे. पिजवन राजाचा मुलगा सुदास् याचा पुरोहित वाल्मीकि होता असें निरुक्तांतील वचनावरून डॉ. आंबेडकर यांनीं वरील ग्रंथांत दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचे अस्पृश्य हे एकेकाळचे लढवय्ये शूर राजे होते हेंच सिद्ध करण्याचा प्रयत्न डॉ. आंबेडकर यांनीं आपल्या वरील ग्रंथांतून केला आहे. महाराष्ट्रांत हा विचार प्रथम महात्मा फुले यांनीं १८६७ सालीं आपल्या ‘गुलामगिरी’ या पुस्तकांतून मांडला आहे. म. फुले, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व डॉ. आंबेडकर यांनीं याबाबत एकच विचार मांडला आहे असें दिसतें. परंतु कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे आणि महात्मा फुले व डॉ. आबेडकर यांच्या भूमिकेत कांहींसा फरक आहे. म. फुले व डॉ. आंबेडकर हे मुख्यत: आजचे अस्पृश्य एके काळचे माळी, कुणबी वगैरेसारखे शूद्र व क्षत्रिय होते. वंशानें ते सर्व आर्यच होते हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. उलट कर्मवीर शिंदे हे अस्पृश्य हे आर्यपूर्व वंशाचेहि असण्याचा संभव आहे, असें सूचित करतात. त्यांच्या भूमिकेंतील वरील फरक लक्षांत घेऊनसुद्धां या संशोधकांची अस्पृश्यांबाबत भूमिका पुष्कळशी समान आहे, असें दिसतें.
मानवी समाजांतील अस्पृश्यतेचें मूळ
जगांतील अस्पृश्यतेचें मूळ कशांत आहे यासंबंधीं निरनिराळ्या समाजशास्त्रज्ञांनीं व मानववंशशास्त्रज्ञांनीं वेगवेगळे सिद्धान्त मांडले आहेत. होकार्ट, इमाइल सेनार्ट, डॉ. घुर्ये, डॉ. आंबेडकर, हटन यांनीं यासंबंधीं केलेली मीमांसा महत्त्वाची आहे. परंतु कर्मवीर शिंदे यांनीं या प्रश्नांची केलेली समीक्षा वरील सर्व समाजशास्त्रज्ञांपेक्षां वेगळी आहे. मानवाच्या प्राथमिक अवस्थेंत त्याचा जादूटोणा, मंत्रतंत्र यांवर विश्वास होता. रोग बरे करायचे झाले व इडापीडा टाळायची झाली तर तो या जादूटोण्याकडे वळे. या जादूचे दोन प्रकार होते. त्यांतील एका प्रकारची जादू संकटें दूर करण्यासाठीं वापरली जाई आणि दुस-या प्रकारची जादू शत्रूला त्रास देण्यासाठीं उपयोगांत आणली जाई. या जादूटोणा करणा-या वर्गाला कोणी स्पर्श करायचा नसे. एका अर्थानें ते अस्पृश्यच होते. ही अस्पृश्यता प्रथम प्रथम वैयक्तिक व प्रासंगिक होती. परंतु पुढें तिला गूढ आणि दृढ स्वरूप प्राप्त होऊं लागलें व पुरोहितांच्या द्वारें त्याची परंपरा व घटना बनत चालली तसतशी अस्पृश्यता वैयक्तिक आणि स्थानिक स्वरूपांत न राहतां तिला जातीचें व सार्वत्रिक स्वरूप प्राप्त होऊं लागलें. अस्पृश्यतेचें मूळ अशा प्रकारें मंत्रतंत्राच्या (Magic) कल्पनेंत आहे, असें कर्मवीर शिंदे यांनीं म्हटलें आहे. आपल्या या विचाराचा प्रपंच करतांना ते आपल्या ‘भारतीय अस्पृश्यांचा प्रश्न’ या पुस्तकांत म्हणतात-
“अस्पृश्यता ही एक स्वतंत्र मानवी संस्था आहे. हिचा उदय मानवी जातीच्या अगदीं प्राथमिक स्थितींतच झाला असला पाहिजे. भूत, प्रेत, पिशाच्च, इत्यादि कल्पना मानवी जातीच्या प्राथमिक म्हणजे अगदीं रानटी स्थितींत सर्वत्र पसरलेल्या होत्या. तौलनिक धर्मशास्त्रांत ह्या कल्पनासमुच्चयाला भूतवाद (Animism) असें नांव आहे. हा भूतवाद व ह्याप्रमाणेंच इतर प्राथमिक धर्माच्या अडाणी कल्पना व त्यावरून बनलेल्या जादूटोणा, थातुरमातुर, इत्यादिकांना मीं पुढें अपधर्म असें नांव दिलें आहे. ज्या धर्माचा पाया मानवी प्रज्ञा आहे तो जरी निष्काळजीपणामुळें विकृत झाला तरी त्याला मी अपधर्म हें नांव देणार नाहीं. रागावलेल्या भुतांना संतुष्ट करणें किंवा एखाद्या भुताला लालूच दाखवून किंवा (एखाद्या भुताला भेडसावून त्याच्याकडून आपल्याला इष्ट असा अर्थ किंवा अनर्थ घडवून आणणें शक्य आहे, अशी प्राथमिक मानवाची समजूत असे. ह्या समजुतीप्रमाणें जादू, टोणा, मंत्र, तंत्र, यंत्र, वगैरे जे अपधर्माचे अनेक प्रकार असत त्याला अभिचार (Magic) असें एक सामान्य नागर नांव देतां येईल. ह्याचे कृष्ण अभिचार (Black magic) आणि भेषज (Medicinal) अथवा शुक्ल अभिचार (White magic) असे दोन मुख्य प्रकार सुधारलेल्या वैदिक काळांतहि होते..... जन्म, मृत्यु, सांथीचे रोग व इतर आकस्मिक आपत्ति ह्यांचा संबंध प्राथमिक जगांत भुताखेतांकडे आणि क्रुद्ध देवतांकडे लावण्यांत येत असे. त्याचें निवारण करण्यांत निष्णात असे पंचाक्षरी अथवा वैदु (Medicine men) होते. तेच पूर्वकाळचे ऋषि आणि पुरोहित असत. त्यांच्या
ब-यावाईट क्रियांना जादू किंवा अभिचार म्हणतां येईल. ह्याप्रमाणें ह्या जादूचा प्राचीन धर्मांत समावेश झाला, तो अद्यापि पुष्कळ ठिकाणीं सामान्य जनतेंत प्रचलित आहे. ह्या अपधर्मांतच अस्पृश्यतेचा उगम आहे.
प्रथम प्रथम ही अस्पृश्यता वैयक्तिक व प्रासंगिक उर्फ नैमित्तिक होती. बाळंतीण व तिची खोली, मृतांची जागा व आप्त, विशिष्ट रोगी, झपाटलेलीं माणसें, विक्षिप्त झाडें, खुनासारख्या अपघाताचीं ठिकाणें वगैरे बाबी अस्पृश्य आणि वर्जनीय ठरल्या. जादू करणारे जादूगार आणि पुरोहित हे देखील सोवळे म्हणजे एक प्रकारें अस्पृश्यच असत. देवपूजा करणा-या ब्राह्मणाला आणि यज्ञपरिषद् चालू असेतोपर्यंत सर्व ऋत्विजांना आणि इतर याज्ञिकांना नेहमीं सोवळ्यांत म्हणजे अस्पृश्य अथवा अलग स्थितींतच राहावें लागे. ... ... अशा अपधर्माला उत्तरोत्तर जसजसें गूढ आणि दृढ स्वरूप प्राप्त होऊन पुरोहितांच्या द्वारें त्याची परंपरा आणि घटना बनत चालली तसतशी ह्या अस्पृश्यतेच्या वैयक्तिक आणि स्थानिक स्वरूपाची परिणती जातीय आणि सार्वत्रिक उर्फ नित्य स्वरूपांत होऊं लागली........ आणि अस्पृश्यतेचें मूळ कारण हा जो अभिचारमूलक अपधर्म तो जरी पुढें लुप्त होऊन विस्मृत झाला तरी जातीय अस्पृश्यता शिल्लक उरलीच.”
(भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, पृ १२-१४)
अस्पृश्यता हिंदुस्थानांतच कां स्थिरावली?
अस्पृश्यता मानवाच्या प्राथमिक अस्थेंत सर्वत्रच उद्याला आली, परंतु ती हिंदुस्थानांतच शेंकडों वर्षें कां स्थिरावली व तिला इतकें घृणास्पद स्वरूप कां प्राप्त झालें हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यासंबंधीं कर्मवीर शिंदे यांनीं वरील ग्रंथांत मीमांसा केली आहे. भारतीय समाजांत अस्पृश्यता शेंकडों वर्षें टिकून राहिली याचें मुख्य कारण हा समाज स्वयंपूर्ण ग्रामरचनेवर उभारला आहे, असें त्यांना वाटतें. आमच्या ग्रामसंस्थेबरोबर अस्पृश्यतेमागील तात्विक भूमिका महत्त्वाची आहे. कर्मविपाकाचा सिद्धान्त, पुनर्जन्माची कल्पना हा जातिव्यवस्थेचा व अस्पृश्यतेचा तात्त्विक पाया आहे. अस्पृश्यतेविरुद्ध शेंकडों वर्षें वैचारिक बंड होऊं शकलें नाहीं याचें प्रमुख कारण या तत्त्वज्ञानात्मक अधिष्ठानांतहि असण्याचा संभव आहे. कर्मवीर शिंदे यांच्या विवेचनांतून हा विचार निसटलेला असावा असें वाटतें.
महाराष्ट्रांतील मराठे शकवंशाचे
‘मराठ्यांची उपपत्ति’ या लेखांत कर्मवीर शिंदे यांनीं महाराष्ट्रांतील मराठ्यांचें मूळ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. भाषाशास्त्र, समाजशास्त्र व लिखित पुरावे यांच्या आधारें मराठे हे शक वा पल्लव वंशाचे असावे असें त्यांनीं या लेखांत म्हटलें आहे. त्यांच्या वरील तीन प्रकारच्या पुराव्यांमध्यें समाजशास्त्रीय पुरावे विशेष महत्त्वाचे आहेत. शक वा पल्लव आणि मराठे यांच्या चालीरीति, आहार, पडदा-पद्धति, धर्मकल्पना, व्यवसाय, पोशाख-पद्धति, यांमध्यें मोठें साम्य आहे. यावरून मराठे हे शक वंशाचे असावे असें त्यांनीं सुचविलें आहे. गेल्या कांहीं वर्षांत महाराष्ट्रांतील लोकसमूहाचें मानववंशशास्त्रदृष्ट्या जें संशोधन झालें आहे त्यावरून कर्मवीर शिंदे यांच्या वरील निष्कर्षास पुष्टीच मिळते असें दिसतें. डॉ. इरावती कर्वे यांनीं महाराष्ट्रांतील वेगवेगळ्या जातींची मानवशास्त्रदृष्ट्या जी पाहणी केली त्यावरून त्यांनीं वरीलसारखाच निष्कर्ष काढला आहे. ‘मराठी लोकांची संस्कृति’ या ग्रंथांत त्या म्हणतात, “मराठे व इतर जाती आल्या कोठून हा प्रश्न शिल्लक राहतोच. मध्ययुगाच्या सुरुवातीस रजपुतांचें नांव प्रथम ऐकूं येतें. नंतर गुर्जरांचें ऐकूं येतें व गुर्जर रजपुतांपैकींच एक टोळी असावी असें दिसतें; पण त्यांच्याहि आधीं महाराष्ट्राच्या इतिहासांत अतिप्राचीन काळीं महाराष्ट्राचे पहिले राजे जे शातवाहन ते पश्चिमेकडून येणा-या शकांच्या आक्रमणाला तोंड देत होते असा इतिहास आहे. आर्यांच्या टोळ्या उत्तरेकडून दक्षिणेकडे ज्याप्रमाणें शतकेंच्या शतकें येत होत्या व जुन्या स्थायिक आर्यांचें जसें नव्यांशीं युद्ध होत होतें, तसेंच शकांच्या बाबतींत झालें असणार. शक लोक उत्तरेकडून येऊन गुजरातेंतून महाराष्ट्रांत शिरले, ते एका लहानाशा कालखंडांत नसून त्यांचें वांशिक आक्रमण कित्येक शतकें चाललेलें असण्याचा संभव आहे. ह्या शकांपैकींच अगोदर आलेल्या वंशांतील शातवाहन राजे असावेत असें दिसते. ह्या राजांचें राज्य जरी प्रतिष्ठानीं होते तरी सर्व महत्त्वाचे शिलालेख पश्चिमपट्टींत आहेत, हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे व त्या शिलालेखांत स्वत:स महारठी व महारठीजी म्हणविणारे लोक म्हणजेच मराठे असावे असा कयास करण्याजोगा आहे. रजपुत लोक हिंदुस्थानांत येण्याच्या आधीं कित्येक शतकें मराठी लोक महाराष्ट्रांत स्थायिक होऊन, राज्यें स्थापून, राहिले होते व ते इतिहासांत प्रसिद्ध पावलेल्या शक वंशापैकीं अगदीं पहिल्यानें आलेले वसाहतकार असावे असा तर्क करण्यास सध्यां हरकत दिसत नाहीं.” (मराठी लोकांची संस्कृति, पृ. १५३.)
कर्मवीर शिंदे आपल्या वरील लेखांत रजपूत व मराठे हे एकाच वंशाचे असावे असें भाषाशास्त्रीय पुराव्याच्या आधारें म्हणतात. परंतु डॉ. इरावती कर्वे यांनीं मानववंशशास्त्राच्या आधारें काढलेल्या निष्कर्षाशीं तो जुळतामिळता नाहीं. ‘रजपूत लोक दीर्घमस्तक आहेत’ व ‘मध्य महाराष्ट्रांतील बलाढ्य मराठा शेतकरी मध्यम कपाल आहेत’ व यावरून मराठे व रजपूत एकाच वंशाचे नव्हेत, असें डॉ. इरावती कर्वे म्हणतात. कोणताहि समाज पूर्णपणें एकाच वंशाचा आहे असें शास्त्रीय दृष्ट्या म्हणणें अवघड आहे. प्राचीन काळीं अनेक वंशांची परस्परांमध्यें मिसळ झाली आहे. त्यामुळें वरील विधान कांटेकोरपणें करतां येणार नाहीं. स्थूल अर्थानेंच तें आतां घ्यावें लागेल.