''भागवत'' शब्दाचा इतिहास

भग हा शब्द हिंदी वेदांत पुष्कळ वेळां आढळतो. बग ह्या रूपानें इराणी अवेस्तामध्येंहि आढळतो. हीं दोन्हीं रूपें सूर्यदेवतेचीं नांवें आहेत. स्लाव (रशियन) भाषेंत बोगू म्हणजे देव ह्या सामान्य अर्थी हा शब्द होता, असें भाषाभिज्ञ मॅक्समुल्लर म्हणतात. ह्यावरून हा शब्द फारच प्राचीन आहे, हें सिद्ध होतें. छांदस् भाषेंत (मागाहून ह्या भाषेला संस्कृत हें नांव पडलें) भग शब्दाचा धात्वर्थ पूर्वीचा भज-विभागणें, वांटून देणें, असा आहे. संपत्ति अथवा सुखें भक्तांमध्यें वांटून देणारा अशा अर्थी म्हणजे उदार श्रीमान् कृपाळु देव, असा नंतर भग शब्दाचा विशेषनामवाचक अर्थ झाला. श्रीमंती, भाग्य, धन्यता असा सामान्यनामवाचक अर्थ पूर्वी होता. पुढें उपनिषत्काळीं विशेषतः महावीर आणि बुद्धाच्या काळीं ह्या शब्दाचा कदाचित् सामान्यनामवाचक अर्थ उरला असावा, म्हणून त्याला वत् असा प्रत्यय लागून भगवत् असें रूप सिद्ध झालें. भगवान् ही संस्था इंद्र, सूर्य वगैरे देवतांनाच नव्हे तर वासुदेव, महावी, गौतम बुद्ध वगैरे थोर आणि पूजनीय पुरुषांनाहि लागूं लागली. ही पूजनीय संज्ञा मनुष्याला लावण्यांत आली, ती प्रथम जिन् बुद्धाला लागून नंतर वहिवाटीच्या जोरावर वासुदेवालाहि लागली किंवा उलट प्रकार झाला, हें निश्चित सांगतां येत नाहीं. पण सात्वत आणि पांचरात्रांच्या ग्रंथापेक्षां कांहीं पाली ग्रंथ अधिक प्राचीन असल्यामुळें भगवान् ही संज्ञा बहुतकरून महावीर आणि सिद्धार्थ ह्या महन्तांनाच अगोदर लागलेली असणें, अधिक संभवनीय आहे, असें वाटतें.

भग शब्दांतील भज् ह्या धातूपासून भक्ति ह्या शब्दाची व्युत्पत्ति आहे. हा धातू जेव्हां आत्मनेपदीं चालतो, तेव्हां ह्या शब्दाचा अर्थ 'आवडणें' असा होतो; हा अर्थ पाणिनीलाहि माहीत होता. पण साखर, तूप, करंजी, खमंग चटणी वगैरे साध्या वस्तूंवर जी भौतिक आवड असते, त्या भौतिक अर्थी ह्या भक्ति शब्दाचा तेव्हां अधिक प्रचार असे. भक्ति ह्या शब्दाचा पारमार्थिक अर्थ एखाद्या देवतेसंबंधीं, असा समग्र वेदांत किंवा बुद्धकालापूर्वीच्या वैदिक वाङ्‌मयांत नाहीं, क्वचित् बुद्धानंतरच्या उपनिषदांमध्यें आढळतो. (MaxMuller : Natural Religion Giff. Lec. पान ९७) गुरुवर्य भांडारकरांचें मत असें आहे कीं, भक्तीची भावना वैदिक कवींच्या अंतःकरणांत होती. पण ती बाह्यविधीचें अवडंबर माजविणार्‍या ब्राह्मण काळांत मावळली. उपनिषत्काळांत ती पुन्हां कांहीं अंशीं उदयाला आली. तरी तिचा अर्थ 'देवाविषयीं एकान्तिक भाव किंवा अनन्यपणा' इतकाच होता. श्वेताश्वेतरोपनिषदामध्यें मात्र 'देवावरील' प्रेम असा अर्थ आहे. गीतेमध्ये देखील भक्ति ह्या पदाचा अर्थ उपासना ह्या अर्थीच आहे. इतकेंच नव्हे तर पुढें रामानुजांनीं देखील ह्या शब्दाची योजना उपनिषदांतल्यांप्रमाणें सतत चिंतन किंवा उपासना ह्याच बौध्दिक अर्थानें नेहमीं केली असून प्रीति ह्या भावनात्मक अर्थानें नाहीं वगैरे (Vaishnavism lec. पान २८, २९) ह्या दोघां पंडितांच्या मतानेंहि भागवत धर्माचें जें मुख्य प्रेममय लक्षण तें वैदिक धर्मांत सांपडणें फारच दुर्मिळ होतें, असें सिद्ध होतें. यास्कानें इंद्रभक्तीनि, अग्निभक्तीनि अशी कर्मकर्तरि प्रयोगांत भज् धातूची योजना केली आहे; पण तेथेंहि इंद्रसंबंधीं वस्तु, अग्नीला प्रिय असलेल्या वस्तु असा अर्थ आहे. श्वेताश्वेतर उपनिषदांत देवावरील प्रेम असा भक्तीचा अर्थ असला तरी हें उपनिषद् बरेंच अलीकडचें आहे, व त्यांतील उपास्य दैवत रुद्रशिव हें असून हें दैवत वैदिक अथवा आर्यांचें मुळींच म्हणतां येत नाहीं. असो.

भगवत् किंवा भगवान् कोणी देव, देवी, अथवा पूजनीय पुरुष असा होऊं लागल्यावर त्या भगवंताला भजणारे ते भागवत आणि त्यांचा धर्म तो, भागवत धर्म, असा अर्थ सिद्ध झाला. ह्या धर्मांत श्रद्धापूर्वक भक्ति (प्रेम) हें मुख्य लक्षण आहे. बाह्य कर्मठपणाचा जो ब्राह्मणांत अथवा पूर्वमीमांसा दर्शनांत ऊत आला, त्या अर्थाच्या कर्मवादाला भागवत धर्मांत मुळींच महत्त्व नाहीं. ज्ञानाला व जाणिवेलाहि फार तर जैन आणि बौद्धांच्या भागवत धर्मांत महत्त्व आहे, पण शाक्त, शैव, किंवा वैष्णव भागवतांमध्यें केवळ तत्त्वज्ञानाला गौणत्वच आहे. श्रद्धा, भक्ति आणि शरणागति ह्यांनाच मुख्य स्थान आहे. किंबहुना शरणागतीचें तत्त्वहि बौद्ध धर्मांतच महावीर आणि सिद्धार्थ बुद्ध ह्यांना अनुलक्षून प्रथम अस्तित्वांत आलें असावें. बुद्धाच्या निर्वाणानंतर तीनचार शतकांतच महायान नांवानें बौद्धांचा एक जगभर पसरणारा पंथ निघाला. त्यांत बुद्ध हाच ईश्वर, परब्रह्म, आदि तत्त्व असून, त्याचे केवळ अवतार हे निरनिराळ्या युगांत झालेले अथवा पुढें होणारे बुद्ध असा अवतारवाद निर्माण झाला. हाच अवतारवाद मोठ्या प्रामुख्यानें पुढें विष्णु भागवतांच्या धर्मांत शिरला. येणेंप्रमाणें शाक्त भागवत, शिव भागवत, जैन भागवत, बौद्ध भागवत, शेवटीं वासुदेव ऊर्फ विष्णु भागवत, असे इतिहासक्रमानें भागवताचे पांच प्रकार सिद्ध होतात. सौर, गाणपत्य इत्यादि आणखीहि बारीक बारीक भागवताचे प्रकार सांपडतील, पण त्यांचा हल्लीं प्रचार नाहीं, किंवा ते फारच गौण आहेत; म्हणून त्यांची ह्या व्याख्यानांत गणना केली नाहीं. भागवत धर्माचा पाया घालण्याच्या कामीं ह्या पांचहि प्रकारच्या भागवतांची कामगिरी रुजू आहे. जैन आणि बौद्ध आपल्याला भागवत म्हणून घेण्यास तयार नसतील, किंवा इतर भागवत त्यांना भागवत म्हणावयास तयार नसतील पण कोणी म्हणवून घेण्यास किंवा म्हणण्यास तयार आहे किंवा नाहीं, हा प्रश्न आम्हांपुढें नाहीं. तर भागवत धर्माच्या विकासांत कोणाची किती व कशी कामगिरी आहे हें पाहणें इतिहासाचें काम आहे. ह्या विशिष्ट पंथाला अभिमान अथवा तिरस्कार करण्याशीं इतिहासशास्त्राचा संबंध नाहीं.