अण्णांच्या लेखसंग्रहाबाबत

कुठल्याही गोष्टीस मग ती कोणत्याही स्वरूपांत असो ती घडून येण्यास योग हा निश्चित यावा लागतो. तशी संधि प्राप्त व्हावी लागते परंतु या सर्व घटना प्रत्यक्षांत उतरण्यास अनुरूप अशी परिस्थिति निर्माण जेव्हां होते त्याच वेळेस त्या घडूं शकतात. तसाच कांहींसा प्रकार आमचे तीर्थरूप कै. महर्षि अण्णासाहेब उर्फ विठ्ठलराव रामजी शिंदे यांचे मृत्यूनंतर १९ वर्षांनीं आज महाराष्ट्रापुढें त्यांचा ‘शिंदे लेखसंग्रह’ हा ग्रंथ प्रसिद्ध होत आहे, हें परमभाग्य होय. त्यांच्या ह्यातींत तो जर प्रसिद्ध झाला असता तर अधिक बरें झालें असतें असें मला वाटतें, पण उशीरा कां होईना तो शेवटीं प्रसिद्ध झाला, हें पाहून माझ्या जिवास समाधान व शांति प्राप्त होत आहे.

या ग्रंथांत त्यांचे निवडक असेच कांहीं लेख घेण्यांत आले आहेत. त्यांचे इतर अनेक लेख आणि वर्तमानपत्रांतून झालेलीं त्यांचीं भाषणें हीं सर्वच्या सर्व छापावयाचीं झाल्यास हा ग्रंथ बराच मोठा करावा लागेल, म्हणून विस्तारभयास्तव ती योजना रद्दल करणें भाग पडलें.
आमचे अण्णांनीं काँग्रेसच्या १९३० सालच्या कायदेभंगांत उडी घेतली, बेकायदेशीर मिठाची विक्री केल्याचा आरोप ठेवून पिनल कोड ११७ कलमाप्रमाणें त्यांना कोर्टाकडून सहा महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यांत आली, आणि हिंदमातेच्या मंदिरांत, येरवड्याच्या तुरुंगांत ता. १२ मे १९३० सोमवारीं, या सत्याग्रही वीराचा प्रवेश झाला. कारागृहांत ता. २१ जुलै १९३० पासून त्यांनीं आपली रोजनिशी लिहिण्यास सुरुवात केली, ती अत्यंत उद्बोधक आणि महत्त्वपूर्ण अशी आहे. आपल्या रोजनिशीच्या वहीमधील अगदीं पहिल्या पानावर खालीं दिलेला उतारा त्यांच्याच शब्दांत मी देत आहे तो असा : “येथें मी केवळ खासगी अनुभव व स्मरणार्थ टिपणें लिहिणार आहे – विशेषत: धार्मिक विचार लिहीन असा बेत आहे. राजकारण, समाजकारण अगर कोणतेही सार्वजनिक विचार करण्याचें हें स्थळच नव्हे. अध्यात्मिक चिंतनाला हा तुरुंगवास मला अनुकूल दिसतो. नुसते माझ्यापुरतेंच पाहिल्यास मला स्वत:ला तुरुंगांत त्रास झाला नाहीं!”
त्यांच्या “माझ्या आठवणी” या पुस्तकाची रूपरेषा आणि टिपणें यांचा जन्मसुद्धां तुरुंगातच झाला आहे.
आमचे अण्णांना अभंग, पदें, कविता आणि पोवाडे करण्याचा छंद होता. ते उत्तमपैकीं कीर्तनकार होते ही गोष्ट पुष्कळांना माहीत नाहीं. कीर्तनसंस्था ही प्रभावी शक्ति आहे, अनेक व्याख्यानें देऊन सुद्धां जें लोकमनावर ठसवितां येत नाहीं तें कीर्तनद्वारें केलेला प्रचार आणि उपदेशाचा परिणाम याचा बहुजनसमाजाच्या मनावर अधिक पगडा बसतो हें ओळखूनच कीं काय अण्णा नेहमीं कीर्तनें करीत असत. तद्वारां अनायसेंच प्रार्थना समाजाचे धार्मिक तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्यास सुलभ जात असे.
सामाजिक समता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य या दोन ध्येयांसाठीं ते आमरण झगडले, सार्वजनिक सेवेंत सारें आयुष्य खर्ची घातलें आणि हे करीत असतांना त्यांना कधींच शारीरिक आणि मानसिक विश्रांती मिळाली नाहीं. त्यामुळें शांतपणें त्यांना लेखन आणि चिंतन करण्यास जी मनाची एकाग्रता व स्थैर्य लागतें तीं मुळींच त्यांना लाभलीं नाहीत. पण आरामखुर्चीवर बसून आणि लायब्ररीच्या सान्निध्यांत, सर्व सोयी उपलब्ध असतांना ग्रंथ लिहिणें ही बाब सोपी आहे. तें आमच्या अण्णांना कधींच जमलें नाहीं. त्यांचे सारें जीवन धांवपळींत, कटकटींत आणि प्रवास करण्यांत गेल्यामुळें त्यांचे हातून म्हणावी तशी ग्रंथरचना परिस्थितीनुरूप ते करूं शकले नाहींत, ही माझ्या मतें एक महान दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांच्या उतारवयांत त्यांनां मधुमेहाचे रोगानें पछाडिले. त्यामुळें तर कोणतीच शक्ति व उत्साह त्यांच्या अंगीं उरला नाहीं. म्हणून सरस्वतीची सेवा अधिक करण्यांत त्यांच्या हातून खंड पडला.

देवानें मला या थोर पुरुषाच्या पोटीं जन्मास घातलें, म्हणून मी स्वत:ला धन्य आणि भाग्यवान समजत आहे. माझें पूर्वसंचित म्हणूनच मला हा लाभ घडला असावा. माझा जन्म १९०० सालीं ११ सप्टेंबरला झाला आणि आमचे अण्णा ता. २ जानेवारी १९४४ रोजीं दिवंगत झाले. त्यांच्या सहवासांत आणि कृपाछत्राखालीं मी वाढलों आणि बागडलों. त्यांच्या प्रेमाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ मला ४४ वर्षें सतत लाभला. त्यांच्या जीवन-स्मृति चित्रपट अजूनहि ताजातवाना माझ्यासमोर उभा आहे. ते कधीं कधीं मला प्रवासाला बरोबर घेऊन जात असत. विशेषत: देवास, इंदोर, बडोदें आणि कोल्हापूर येथील राजेमहाराजांचे दरबारांत सरकारी पाहुणे म्हणून वडिलांचे बरोबर असतांना श्रीमंतांच्या पंक्तीचा लाभ आणि समोर ताटांतलें मिष्टान्न यावर मीच चापून हात मारीत असे. इस्टेट, धनसंपत्ति या जड वस्तूंच्या आनंदापेक्षां त्यांनीं जो आपला अध्यात्मिक ठेवा मागें ठेऊन गेले, तो वारसा हक्क आणि ती परंपरा मी मोठा झाल्यावर पुढें चालूं ठेवण्यांत मला कर्तव्याची जाणीव झाली. “आम्ही थोरांचीं लेकुरें टाकूं जपून पाऊलें” ही संतांची शिकवण आणि त्याची प्रत्यक्ष ओळख आमचे अण्णांनीं आपल्या अध्यात्मिक जीवनांत जी वाटचाल केली आणि त्याप्रमाणें कुटुंबांत ती शिस्त आम्हांला त्यांनीं घालून दिली. दर मंगळवारी घरामध्यें ते नियमितपणें कौटुंबिक उपासना करीत असत. हें व्रत त्यांनीं कधींच मोडलें नाहीं. या त्यांच्या प्रेरणेनें मी त्यांचे मागून प्रार्थना समाजाचा सभासद झालो. पुढें सेक्रेटरीचें कामहि केलें. प्रार्थना समाजांत उपासना आणि प्रवचनें करण्याची शक्ती त्यांच्यामुळेंच मला आली आणि हें कार्य करण्यांत मला सात्त्विक आनंद व समाधान वाटतें, हें काय थोडें झालें!
आमचे अण्णांचें घरच्या संसाराकडे कधींच लक्ष नव्हतें. घरांत कांहीं कमी जास्त आहे कीं नाहीं याची चौकशीसुद्धां ते करीत नसत. आम्ही लहान होतों तेव्हां बाजारांतून कांहीं आणावयाचे झाल्यास आमची आईच आणीत असे. मुलांचे शिक्षणाकडे वेळ देण्यास कधींच झालें नाहीं. म्हणून आम्ही सर्व भावंडें शिक्षणांत मागासले राहिलों. स्वत:च्या संसारांत लक्ष घालण्यापेक्षां समाजाच्या आणि राष्ट्राच्या प्रपंचांत ते अधिक तन्मयतेनें पडले. अण्णांच्या कामांत आमचे आत्याबाईंचा जनाबाईंचा सर्वांत मोठा वांटा आहे. अस्पृश्य स्त्रियांच्या शिक्षणाच्या उन्नतीसाठीं त्यांनी फार मोठें कार्य केलें आहे. आमची आईसुद्धां महारमांगांच्या झोपड्यांत जाऊन अडलेल्या स्त्रियांचीं बाळंतपणे स्वत: करीत असे. अस्पृश्यतानिवारणाचे कामांत अण्णा पडलेमुळें कट्टर सनातनी स्वजातिबांधव हे निराळे दृष्टीकोणांतून आमचे घराण्याकडे पाहत असत. पण या ग्रामण्याचा विशेष असा त्रास कधीं झाला नाहीं.
१९०६ सालीं डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था मुंबई येथें अण्णांनी स्थापिली. तिच्या अनेक शाखा वडाच्या झाडाच्या पारंब्यांप्रमाणें महाराष्ट्रांत ठिकठिंकाणीं अद्यापी विखुरल्या आहेत. ही संस्था म्हणजे त्यांचा आत्मा होय. तिच्यावर पुत्रवत् प्रेम त्यांनीं केलें, परंतू दैवदुर्विलास हा कीं त्याच संस्थेतील कांहीं सेवकवर्ग आणि अस्पृश्य समाज यांच्याकडून त्यांना त्यांच्या वृद्धापकाळांत विरोध आणि अपमान सहन करावा लागला.
        मान अपमान गोंवे । अवघे गुंडूनी ठेवावें ।।
        हेंचि देवाचें दर्शन । सदा राहे समाधान ।।
हें समाधान अण्णांचे जीवनांत त्यांना पूर्णत्वानें लाभले. त्यांची लौकिकापुरती नव्हती. संत ज्ञानेश्वर  महाराजांना असाच छळ आणि अपमान समाजाकडून सोसावा लागला. त्यामुळें निराशेनें स्वत:ला घरांत कोंडून ते स्तब्ध बसले. त्या वेळीं त्यांची बहिण मुक्ताबाई हिंने उपदेश केला कीं,
मजवरी दया करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।
संत जेणें व्हावें । जग बोलणें सोसावें ।।
तरीच अंगी संतपण । जया नाहीं अभिमान ।।
संतपण जेथें वसे । भूत दया तेथें वसे ।।
रागें भरावें कोणासी । आपण ब्रह्म सर्व देशीं ।।
ऐसी समदृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।१।।
असाच एका प्रसंगीं अण्णांचा भयंकर अपमान झाला. त्यामुळें मन बरेंच अस्वस्थ झालें. कांही सुचेना. ज्यांच्यासाठीं मी ध्येयवादानें सतत झगडलों शेवटीं त्यांचेकडूनच मला निंदा, अपमान हीं सर्व सहन करावीं लागत आहेत. म्हणून दु:खी अंत:करणानें बसले असतां भगिनी जनाबाई त्यांच्या जवळ जाऊन सद्गदित कंठानें म्हणाल्या, “विठू, हे रे काय ? असें करून कसें चालणार ?  धैर्य धर. मन शांत ठेव. तुझ्यासारख्या पुरुषांनीं एवढे मनाला लावून घेतल्यावर कसें होणार ? तुला जगाचें आघात सोसलेच पाहिजेत. रागावून काय उपयोग ?” हा त्यांनीं केलेला उपदेश आणि मुक्ताबाईंनीं संत ज्ञानेश्वराला केलेला उपदेश, या दोन्हीचें साम्य चित्र क्षणभर माझ्या डोळ्यांपुढें उभें राहिलें!
शेवटीं ‘ शिंदे लेखसंग्रहा ’बाबत सांगावयाचें झाल्यास महाराष्ट्राच्या वाङ्मयीन इतिहासांत ही नवीन मौलिक अशी भर पडत आहे. त्यांचें विविध लेख हें संशोधनात्मक व मूलगामी विचारांना चालना देणारे आहेत.
संसाराची सर्व जबाबदारी माझेवरच असे आणि माझा सर्व वेळ नोकरीमध्यें गेल्याकारणानें अण्णांचें पुस्तक लिहून काढण्याचें काम मला शक्य नव्हतें. कंपवायूमुळें अण्णांचे हातपाय सारखे हालत असत. त्या कारणानें ते स्वत: लिहूं शकत नसत. आणि मी कामांत गुंतलेला. तेव्हां माझे धाकटे बंधू चि. रवींद्र हे घरींच मोकळे होते. अण्णा तोंडानें मजकूर निवेदन करीत आणि तो लिहीत असे. हें काम मात्र त्यांनीं तत्परतेनें केलें. माझें सेवानिवृत्तीनंतर माझें लक्ष समाजसेवेकडे लागलें. आणि अनुभवांनीं समाजसेवा करणें किती कठीण आहे, हें नंतर कळून चुकलें. त्यामुळेंच मी अण्णांचे राहिलेले अप्रकाशित लेख प्रसिद्ध करण्याच्या खटपटीस नेटानें लागलों.
या पुस्तक प्रकाशनाच्या बाबतींत मला फार मोठी आणि मोलाची अशी मदत माझे मित्र श्री. ग. ल. ठोकळ यांची झाली. केवळ त्यांचेच कृपेमुळें आणि सहकार्यानें हें पुस्तक आज वाचकांच्या हातीं पडत आहे. इतके दिवस जिवापाड जतन केलेल्या ह्या साधनसामुग्रीचें पुढें काय करावें या चिंतेनें माझें मन सतत व्यग्र झालें असतांनाच श्री. ठोकळ यांनी तें मनावर घेऊन, स्वत: झीज सोसून हें प्रकाशनाचें कार्य अंगावर घेतलें व माझ्यावरच नव्हे तर अखिल महाराष्ट्रावर अगणित उपकार केले. यांचे आभार कसे आणि कोणत्या
त-हेनें मानावेत तें मला समजत नाहीं.
तसेंच माझे स्नेही डॅ. मा. प. मंगुडकर यांनीं माझ्या विनंतीस मान देऊन जी विद्धत्तापूर्वक विस्तृत अशी प्रस्तावना लिहिली आणि लेखांचा योग्य परामर्ष घेऊन शिंदे यांचे जीवनकार्याचें मूल्यमापन योग्य शब्दांत केलें, याबद्दल त्यांना बरेच परिश्रम घ्यावे लागले याची मला पूर्ण जाणीव आहे. विशेषत: अस्पृश्यांचा उगम आणि विकास, तौलनिक भाषाशास्त्र वगैरे लेखांसंबंधीं पाश्चात्य पंडीतांची मतें हीं शिंदे यांच्या मतांशीं कशी मिळतीं जुळतीं आहेत याचें सुंदर विवेचन आणि समालोचन त्यांनीं केलें. याबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानण्यास शब्द अपुरे पडतात.
महाराष्ट्रांतील एक थोर प्रज्ञावंत विद्धान डॉ. धनंजयराव गाडगीळ यांनीं जो आपला अमूल्य असा वेळ खर्चून समतोल बुद्धीनें शिंदे लेखसंग्रहाचे रसग्रहण आणि सूक्ष्म परिक्षण अत्यंत मार्मिक व मुद्देसूद पद्धतीनें करून जो अभिप्राय दिला तो फारच सुंदर, मार्गदर्शक आणि बोधयुक्त असाच झाला आहे. माझ्यासारख्या सामान्य माणसानें त्याचेबद्दल अधिक काय लिहावें ! मी त्यांचा शतश: आभारी आहे.
शेवटीं ईश्वराची महान कृपा म्हणूनच सर्वांच्या मदतीनें हा ‘ शिंदे लेखसंग्रह ’ वाचकांच्या भेटीसाठीं पुढें येत आहे, म्हणून माझें अंत:करण आनंदानें भारावून गेंलें आहे. आमचे वडिलांची चिरंतन स्मृति ग्रंथरूपानें जनताजनार्दनापुढें आली आहे. त्यांचे कार्य, त्यांचा उद्देश आणि त्यांच्या विचारांचें हें लेणें - हा महाप्रसाद
“ सेवितो हा रस वाटितो आणिकां ” या शब्दानें पुरा करतों.
प्रतापराव विठ्ठलराव शिंदे