विष्णु-भागवत

शिव-भागवत आणि बुद्ध-भागवत ह्यांच्यासंबंधीं जें ऐतिहासिक विवेचन वर केलें आहे त्यावरून विष्णु-भागवतांच्या उत्पत्तीविषयीं बराच मजकूर वर येऊन गेलाच आहे. कृष्णानें स्थापलेल्या धर्मसुधारणेला पूर्वीं ‘सात्वत धर्म’ एवढेंच नांव होतें. कृष्ण हा बुद्धाप्रमाणेंच वेदाला फारसें न मानणारा पण शिव देवतेला मानणारा एक भाग्यवान् मुत्सद्दी पुरुष होता. नीतिधर्मापेक्षां युक्तिधर्माविषयीं त्याची प्रसिद्धि जास्त आहे. भारतीय युद्धासारख्या अवनतीच्या काळांत त्यानें मोठीच राष्ट्रीय कामगिरी केली असणें अगदीं शक्य आहे. पण बुद्धासारखें जगदुद्धाराचें काम त्याच्या हातून झाल्याचा पुरावा नाहीं. तो आर्य होता, कीं सुमेरुवंशीय होता, कीं द्राविड होता, हें निश्चित कळण्यास मार्ग नाहीं. कृष्ण हें व्यक्तीचें नांव नाहीं. कृष्णायन ऊर्फ कण्हायन नांवाचें गोत्र होतें. नांवाप्रमाणें तें खरेंच काळें असल्यास तें आर्यवंशीय नसावें हें उघड आहे. कृष्ण म्हणून कोणी एक वैदिक ऋचा करणारा ऋषिहि होता. ८ व्या मंडळांतील ७४ वें सूक्त त्यानें रचिलें आहे. तो आंगिरस म्हणजे (घोर अभिचार करणा-या कुळांतला) होता. तो ब्रह्मज्ञानी, राजकारणी, अथर्ववेदी क्षत्रिय असावा, “तद्धैतद घोर: आंगिरस: कृष्णाय देवकीपुत्राय उक्त्वोवाच अंपिरास: एव स: बभूव” हें वाक्य छांदोग्य उपनिषदाच्या तिस-या अध्यायाच्या १७ व्या खंडांतील ६ श्लोकांत आहे. ह्यावरून घोर आंगिरसाचा एक शिष्य देवकीपुत्र कृष्ण होता, असें दिसतें. हा कृष्ण व वेदांतील ऋचा करणारा कृष्ण एकच असावा, असें कांहीं खात्रीनें सांगतां येत नाहीं. पण देवकीपुत्र कृष्ण यादव कुळांत जन्मला व त्यानें कांहीं एक नवीन गुप्त धर्म स्थापन केला. त्याचा प्रसार वृष्णि कुळांतील यादवांनीं प्रथम आपल्यापुरतांच केला असें दिसतें. ज्या कृष्णानें हिंदुस्थानांतील धर्माच्या इतिहासांत ही सुधारणा केली त्याचें नांव वासुदेव असें असून तो देवकीचा मुलगा होता. तो स्वत: आर्य असो किंवा अनार्य असो, ती सुधारणा त्यानें आर्य लोक हिदुंस्थानांत आल्यावर केली; व ती बुद्धापूर्वीं कांहीं शतकांपूर्वीं केली, हें इतिहाससिद्ध आहे; आणि तो कृष्ण शिवोपासक असल्यामुळें त्याचा एकान्तिक ऊर्फ एकेश्वरी धर्म शिव-भागवत धर्मच असण्याचा संभव आहे. बुद्धाच्या काळापूर्वीं वासुदेव हीच एक उपास्य देवता झाली नसली, तरी निदान वासुदेव हा एक वंदनीय महापुरुष झाला होता, असें कांहीं पाली ग्रंथांतील उल्लेखांवरून दिसतें. तरी पण हा वासुदेव – कृष्ण विष्णूचा अवतार हें मत मात्र नारायणीय पर्वाचा महाभारतांत शिरकाव होईपर्यंत अस्तित्वांत नव्हतें. तें मत बुद्धानंतरचेंच नव्हे-अशोकाच्याहि नंतर जी शुंग नांवाच्या ब्राह्मणी धर्माच्या कुळानें राज्याची व धर्माची क्रांति मगध देशांत केली तिच्यानंतरचें असावें, हें खालीं सांगितलें आहे.