संघटना

शेवटचें आणि खरें काम शेतक-यांची संघटना करणें हेंच आहे. ह्या घटनेचे सभासद केवळ शेतकरीच पाहिजेत. पण त्यांच्यांत हिंदु-मुसलमान, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, स्पृश्य-अस्पृश्य किंबहुना संस्थानिक-खालसांतले हे व इतर आगंतुक भेद असावयाचेच. ह्या भेदांमुळेंच जर लंडन येथें गेलेल्या शेंकडों शहाण्यांच्या वाटोळ्या परिषदेची इतकी शोभा झाली, तर आमच्या कार्यांत तींच विघ्नें येणार नाहींत कशावरून ? येथेंच तुमची शेतक-यांना फार जरूरी भासणार. शिवाय द्रव्याची मदत तुम्हांकडूनच पाहिजे. शेतक-यांजवळ द्रव्य कोठून येणार ? तें तर सर्व तुम्हांजवळ येऊन चुकलें आहे. फूल नाहीं फूलाची पाकळी, तरी परत करून पडलेल्या शेतक-याला पुनः त्याच्या पायावर उभा करा. बळी राजा उभा राहील तरच स्वराज्याची आशा. येरवीं सर्वच गप्पा. परवां महात्मा गांधी मुंबई बंदरांत उतरल्यावर वेल्फेअर ऑफ इंडिया लीग नांवाच्या एका संस्थेनें महात्म्यांचें एक व्याखान करवून त्यांच्याशीं विचारविनिमय केला, असें ऐकतों. महात्माजींनीं त्यांना शेवटीं काँग्रेसनें चालविलेल्या धर्मयुद्धाबद्दल एकच निर्वाणीचें वाक्य सांगितलें तें ‘टाइम्स ऑफ इंडियां’त पुढीलप्रमाणे आहे :
“ To you (The League) the Welfare of India is a matter of leasure. For the Congress it is a matter for which it exists !”
ह्या लीगला हिंदुस्थानचें कल्याण करणें ही फावल्या वेळची गोष्ट आहे. पण काँग्रेस केवळ त्याचसाठीं जगते. हाच गांधींचा रोकडा संदेश, पांढरपेशांना मी नम्रपणें शेतकरी बंधूंच्या वतीनें आज येथें देत आहे. शेतक-यांची संघटना जरी तुमचे फावल्या वेळेचें काम आहे, तरी त्या घटनेवरच शेतक-यांचे व पर्यायानें तुम्हां आम्हां सर्वांचें जीवित अवलंबून आहे. येरवीं आम्हीं सर्व मृतप्रायच आहों !!