लिखित इतिहासाचे पुरावे

वर विशेषत: भाषाशास्त्राचे आणि समाज-शास्त्राचे पुरावे यांचा विचार केला. आतां लिखाणाचे अथवा लिखित इतिहासाचे पुरावे या लेखांत देऊन हा विषय पुरा करावयाचा आहे. परंतु अस्सल ऐतिहासिक पुरावे अशा विषयांत निदान हिंदुस्थानांत तरी दुर्मिळच असणार हें प्रथमदर्शनींच कबूल केलें पाहिजे. आमचीं पुराणें हल्लीं ज्या स्थितींत आढळतात ती इतिहासाच्या दृष्टीनें अत्यंत विकृत स्थिति आहे. पुराणांचें मूळ स्वरूप अथवा त्यांत वर्णिलेली वस्तुस्थिति वेदकालाहूनहि प्राचीन आहे, अशी आधुनिक संशोधकांची समजूत होत चालली आहे. F. E. Pargiter, M. A. यांच Ancient Indian Historical Tradition  हा अत्यंत परिश्रमानें तयार केलेला ग्रंथ या समजुतीचें प्रमुख उदाहरण आहे. पुराणांचें हें प्राचीन स्वरूप आतां जरी उपलब्ध नाहीं आणि उपलब्ध होण्याची मुळीं आशाहि नाहीं, तरी हल्लींच्या महाभारत व पालीगाथा या ग्रंथांतून या पुराणांतील अव्वल कथाभागाचें अंधुक स्वरूप दिसून येतें.
महाभारतांत निरनिराळ्या प्राचीन वंशांचीं व देशांचीं अनेक ठिकाणीं वर्णनें आलीं आहेत; पण त्यांत रट्ट वंशाचा वंश या अर्थानें कोठेंच उल्लेख नाहीं. रट्ट हा शब्दच मुळीं पाली भाषेंतला, कदाचित् द्रावीड भाषेंतला, असल्यामुळें भारतासारख्या संस्कृत ग्रंथांत हा न आढळणेंच साहजिक आहे. पण पाली ग्रंथांतहि हा शब्द एक विशिष्ट वंश या अर्थानें नसून, राष्ट्र अथवा देश या सामान्य अर्थानें विशेष आढळतो. यावरून निरनिराळ्या वेळीं हिंदुस्थानांत शक, पल्लव, हूण, जाठ, अश्व वगैरे शूर आणि लढाऊ राज्यकर्ते वंश हल्ला करण्यासाठीं येऊन येथेंच ठाणे देऊन राहिले, त्यांनाच उत्तर हिंदुस्थानांत राजपूत आणि दक्षिणेंत मराठे हें सामान्य नांव अर्वाचीन काळीं मिळालें हें सिद्ध होतें. यांपैकीं शक, पल्लव, अश्व हे शब्द अथवा नांवें महाभारतांत आढळतात. तीं मात्र प्राचीन आहेत खास. अश्व अथवा असी हा मानव वंश मध्यआशियांत प्रमुख असून त्यावरूनच असीरियाच नव्हे तर आशिया हें नांव सिद्ध झालें आहे. हा शक वंशच होय. अश्व म्हणजे घोडा. शकांचें व घोडा या जनावराचें मोठें अभेद्य साहचर्य आहे. या वंशावरून घोड्याला हें नांव पडलें किंवा घोड्याच्या अश्व नांवावरून या वंशाला हें नांव पडलें, हा समाजशास्त्रांतला एक रंजक प्रश्नच आहे. असो. महाभारतांतील अनेक प्रख्यात राजांच्या नांवांत किंवा आडनांवांत अश्व हा शब्द मोठ्या प्रामुख्यानें झळकत आहे, हें खालील संदर्भावरून दिसतें. अश्वग्रीम, अश्वचक्र, अश्वपति, अश्वशकू, अश्वशिरा : हीं नांवें आदिपर्वाच्या ६६ व्या अध्यायांत वरचेवर आलीं आहेत. मागधाचा पुत्र अश्वकेतु याला अभिमन्यूनें मारलें असा द्रोणपर्व (४८-७) यांत उल्लेख आहे. प्रत्यक्ष शक या नांवाचाहि उल्लेख सभापर्व ७८-९९ आणि भीष्मपर्व ९-४५ यापेक्षां जास्त ठिकाणीं फारसा आढळत नाहीं. तक्षक (तकशक) कद्रुपुत्र नाग याची कथा आस्तिक पर्वांत प्रामुख्यानें आली आहे. हें नांव एका प्रमुख शक वंशाचेंच आहे. त्याचें आणि पुरुवंशाचें महायुद्ध जन्मेजयाचे वेळीं आलेलें जनमेजयानें केलेल्या सर्पयज्ञाच्या कथेवरून दिसून येतें. एकंदरींत बुद्धपूर्व कालीं जे शक, पल्लव, जाठ इत्यादि रट्टवंश हिंदुस्थानांत आले त्यांचे महाभारतांत असे तुरळकच उल्लेख आढळतात.
अश्व : दनुपुत्र: असुर: अशा अर्थाचा उल्लेख (आदिपर्व, अ. ६६, श्लोक २४) आहे. म्हणजे अश्ववंश देव अथवा मानव नसून दानव किंवा असूर असा किंचित् पूर्वेकडील भारतीय आर्यांकडून तिरस्कार दाखविणारा अर्थ वरील महाभारताच्या उल्लेखावरून दिसतो. आर्य म्हणजे भारतांत सिंधु नदीच्या पूर्वेकडे राहणारे तेवढेच, असा आकुंचित अर्थ मागाहून झाला. येरवीं शक, पल्लव, जाठ, काठ, भाट, वगैरे मध्यआशियांतील फिरत्या जातीहि सारख्याच आर्य असणें अधिक संभवनीय आहे. प्रत्यक्ष पारश्यांना भारतीय आर्य असुर म्हणूं लागले, आणि त्याचप्रमाणें पारशीहि सिंधु नदीच्या पूर्वेकडील सर्वच आर्यांना इंद्रपूजक म्हणजे पिशाचपूजक हीनजातीय म्हणूं लागले. त्याच न्यायानें शक, पल्लव, हूण, जाठ वगैरेंची मनुस्मृतीच्या नंतरच्या कालांत व्रात्यक्षत्रियांत गणना होऊं लागली. तें कसेंहि असो, त्यांची क्षत्रियांतच मात्र गणना केव्हांहि होत होती, हाच मुद्दा येथें विशेष ध्यानांत घेण्यासारखा आहे. पुढें ऐतिहासिक कालांत शक-पल्लवादि प्राचीन नांवेंहि मागें पडून क्षत्रियत्वबोधक राजपूत, मराठे, रेड्डी, वगैरे ज्यांत राज् धातु प्रधान आहे, हींच नांवें रूढ झालीं. नांव कोणतेंहि असो, ह्या सर्व जाती हिंदुस्थानांत बाहेरूनच आल्या आहेत एवढाच प्रतिपाद्य विषय आहे.
मध्यआशियांतून अगर पूर्व युरोपांतून प्राचीन आर्य जाती बाहेर गेल्या, त्यांपैकीं स्कॉटलंड, आयर्लंड वगैरे ठिकाणीं हल्लीं आढळणा-या केल्ट्स, गॉलस या जाती युरोपांत प्रथम गेल्या व नंतर जर्मनी-हंगेरी वगैरे देशांत हल्लीं आढळणा-या गॉथसव्हँडॉल्स्, सॅक्सन (शक् सेन), हूण या जाती किंचित् मागाहून गेल्या. पण त्या ज्याप्रमाणें सर्व सारख्याच आर्य होत्या यांत शंका नाहीं, त्याप्रमाणें यदु, पुरु, इक्ष्वाकु इत्यादि जाती प्रथम हिंदुस्थानांत आल्या आणि नंतर शक, पल्लव, हूण, जाठ भाट, इ. आले आहेत हें सिद्ध आहे. परंतु सर्व सारखेच आर्य होते हें मत राजस्थान या महत्त्वाच्या ग्रंथाचे कर्ते कर्नल जेम्स टॉड यांनीं फार परिश्रमानें प्रतिपादिलें आहे. टॉडनें आपला राजपुतांचा मोठ्या सहानुभूतीनें लिहिलेला इतिहास शंभर वर्षांपूर्वीं (१० मार्च १८३२ रोजीं) प्रसिद्ध केला. त्याच धर्तीवर ग्रांट डफनें मराठ्यांचा इतिहासहि गेल्या शतकांतच प्रसिद्ध केला आहे. पण टॉडची सहानुभूति आणि अविश्रांत शोधक बुद्धि या हडेलहप्पी ग्रांट डफमध्यें मुळींच नव्हती. त्यामुळें मराठ्यांसंबंधीं फार कोते विचार त्यानें प्रसिद्ध केले आहेत. टॉडच्या सहानुभूतीचा घोट वाजवीपेक्षां जास्त झाला असें वाटल्यावरून त्याच्या मागाहून उद्यास आलेल्या ग्राँट डफचे कान कोणीतरी तत्कालीन चर्चिलपिशाचानें फुंकले असल्यास न कळे ! तें कसेंहि असो, मराठ्यांच्या पूर्वपीठिकेविषयीं शोधीत असतां राजपुतांच्या पूर्वपीठिकेविषयीं ज्यांनीं ज्यांनीं लिहिलें आहे त्यांचा आधार घेणें भाग पडतें; आणि त्यांत वावगें असें कांहींच नाहीं. शकपल्लवादि वंश टॉडच्या म्हणण्याप्रमाणें आर्य असोत किंवा नसोत, ते सर्व मध्यआशियांतून हिदुंस्थानांत आले येवढें तरी टॉडच्या प्रयत्नावरून उघड दिसतें.
टॉडनें निरनिराळ्या पांच मूळ अस्सल पुराव्यांच्या आधारावर अस्सल राजपुतांच्या मूळ ३६ कुळांची एक यादी आपल्या पुस्तक १ लें भाग ७, पान ८६-१२५ यांत सविस्तर वर्णिली आहे, ती फार महत्त्वाची आहे. या ३६ कुळांचाच विस्तार मागाहून मराठ्यांच्या प्रथम ५६ व नंतर ९६ कुळांत झाला आहे. मराठ्यांच्या या कुळांची माहिती मी एन्थोव्हेनकृत Castes and Tribes of Western India,  ह्या अलीकडच्या ग्रंथांतून घेतलेली आहे. खालील कोष्टकांत दाखविलेल्या नामसादृश्यावरून राजपूत असोत किंवा मराठे असोत त्यांचीं मूळ कुळें ३६ हून कमी असोत,  किंवा ९६ हूनहि जास्त असोत; त्या सर्वांचें मूळ मध्यआशियांतील शक-द्वीप (शकताई) नांवाच्या विस्तीर्ण भागांत संचार करीत असलेल्या शक, पल्लव, पृथू, अश्व ऊर्फ असीर, मसागेटी- महाजाठ, हूण, तार्तार, इ. शूर, लढाऊ, राज्यकर्त्या वंशांतच आढळतें, आणि त्यांनाच पुढें कालांतरानें उत्तर हिंदुस्थानांत राजपूत, पश्चिम हिंदुस्थानांत मराठे आणि दक्षिण हिंदुस्थानांत रड्डी हीं गुणवाचक नांवें पडलीं असें आमचें शोधाअंतीं मत बनूं लागलें आहे.