मराठ्यांविरुद्ध आगळीक

गेल्या अंकांत आम्हीं रा. राजवाड्यांचे इतिहाससंशोधक ह्या पदवीला न शोभणारे कांहीं दोष दाखविले. मानवी इतिहासांतील अमुक एक संस्कृति दुसरीहून श्रेष्ठ आहे, अमुक एक धर्म इतरांहून श्रेष्ठ आहे किंबहुना एकाच देशांतील अमुक एक जाति अथवा उपजाति तिच्या समकालीन व समानशील दुस-या जातीहून अथवा उपजातीहून बरी किंवा वाईट आहे म्हणून वाक्तांडव करणें हें इतिहाससंशोधकाचें मुळींच काम नव्हे. पण ह्या फंदांत पडण्याची राजवाड्यांना आनुवंशिक खोड लागली आहे, हा त्यांचा सामान्य दोष आहे. रा. चिं वि. वैद्य ह्यांनीं संशोधनाहून अधिक श्रेष्ठ दर्जाचें म्हणजे इतिहास लिहिण्याचें अथवा ऐतिहासिक मीमांसा करण्याचें काम स्वीकारूनहि त्यांनीं जो उपद्व्याप केला नाहीं, तो ह्या संशोधकानें चालविला आहे; म्हणून अशा अनाठायीं उपद्व्यापांचा वेळींच निषेध करणें आमचें कर्तव्य आहे. रा. वैद्य देखील अमुक कोणी आर्य म्हणून श्रेष्ठ व इतर कोणी अनार्य म्हणून कनिष्ठ, अमुक जाति क्षत्रिय व इतर शूद्र वगैरे ठरविण्याच्या अनैतिहासिक भानगडींत गुरफटलेले दिसून येतात. तरी त्यांच्यांत एक प्रकारची जी प्रशंसनीय समोतल वृत्ति व प्रामाणिक जाबाबदारी दिसून येते ती राजवाड्यांच्या गांवींहि नाहीं. त्यामुळें, उपरिनिर्दिष्ट सामान्य दोषांहूनहि विशेष निषेधार्ह अशा कित्येक घोडचुका त्यांनीं आपल्या प्रस्तावनेंत केल्या आहेत. त्यांपैकीं पहिली ही कीं, महाराष्ट्रांतील मराठे व कुणबी ह्यांमध्येंच त्यांनीं भिन्नता कल्पून स्वस्थ न राहतां, महारट्टे, विरट्टे आणि रट्टे इ. मराठ्यांमध्येंच एक प्रकारचा उच्चनीच भाव निर्माण करून सर्व मराठा समाज हा हीन क्षत्रिय, अराष्ट्रीय १६०० वर्षें परतंत्र राहिलेला अतएव नादान आहे असें ठरविण्याचा प्रयत्न केला आहे.
गोदावरी कांठावरील मराठे महारठ्ठे म्हणवितात व तुंगभद्रेवरील लोक आपल्यास नुसते रठ्ठे किंवा रड्डी म्हणवितात येवढ्यावरूनच त्यांच्या मूळ दर्जांत भिन्नता मानण्याची आम्हांस मुळींच आवश्यकता दिसत नाही. हल्लीं ब्रिटिश सरकार एखाद्य जमीनदारालाहि “महाराज” बनवीत आहेत व तंजावराकडील श्री शहाजीच्या वंशजांनाहि ते राजे म्हणावयालाहि कांकूं करीत आहेत. म्हणून येवढ्याशा उपपदावरून वंशदृष्ट्या दरभंग्याचे ब्राह्मण महाराज तंजावरच्या हल्लींच्या क्षत्रिय शिवाजी राजाहून वरिष्ठ आहेत असा सिद्धान्त ठोकून देण्याला राजवाडे तयार होतील काय? “वर्णानां ब्राह्मणो गुरुः” ह्या न्यायानेंच जर दरभंग्याचे महाराज दर्जानें श्रेष्ठ ठरतील म्हणावें, तर पूर्णावतार गणलेल्या क्षत्रिय श्रीकृष्णाहूनहि त्याचा एखादा ब्राह्मण पाणक्याहि श्रेष्ठच मानावा लागेल; महारठ्ठे आणि रठ्ठे ह्यांच्या दरम्यान विराठे हा एक तिसरा भेद राजवाड्यांनीं आपल्या व्युत्पत्ति सृष्टींतून नवीनच निर्माण केला आहे. कारण काय, तर वाईला विराटनगरी असेंहि कोणी म्हणत असत आणि तेथें जवळपास विराटगड म्हणून एक डोंगर आहे ! एवढा शोध केल्याबरोबर त्यांना असा संशय येऊं लागला कीं विराटे व बेरड हे एकच असतील ! काय हें राजवाड्यांचें भाषाव्युत्पत्तिशास्त्रावरील प्रभुत्व !! ह्यावरून पांडवांचा व्याही विराट हाहि एक बेरड ठरला म्हणावयाचा ! फार तर काय, पुरुषसूक्तांतील विराट् पुरुष हाहि एका प्राचीन बेरडांच्या टोळीचा नायकच होता म्हणावयाचा ! बेरड ह्या शब्दाची खरी व्युत्पत्ति येणेंप्रमाणें आहे. हा कानडी शब्द मूळ बेडरू अथवा ब्याडरू असा अनेकवचनी आहे. त्याचें एकवचन ब्याड असें आहे. तो संस्कृत व्याध शब्दापासून किंवा तेलगू पेड म्हणजे महार अथवा मोठा (उरीया बोडो; संस्कृत ब्रहत् मोठा म्हातारा, जुना) ह्यापासून आला असला पाहिजे. तें कांहीं असो. विराट आणि बेरड ह्या दोन शब्दांचा मुळींच कांहीं संबंद नाहीं, हें राजवाड्यांनीं कानडी भाषेकडे यत्किंचितहि लक्ष पुरविलें असतें तर समजून आलें असतें. रड्डी हे आज एक हजाराहून अधिक वर्षें महारठ्यांहून अलग झालेले आहेत; त्यांची भाषा कानडी किंवा तेलगू, तर महरठ्यांची मराठी; जैन धर्मांतून रड्डी हे लिंगायत धर्मांत गेले आहेत; तर महारठ्ठ बुद्ध धर्मांतून शैव धर्मांत गेले आहेत. इत्यादि महत्त्वाच्या घडामोडीमुळें ह्या दोघांत आतां पुष्कळ फरक दिसून येणें साहजिक आहे. तरी पण राजवाड्यांसारख्या शोधकाला त्यांचें मुळांतलें निरतिशय साम्य स्पष्ट दिसूं नये हें आश्चर्य होय. असले नसते भेद दक्षिणेकडील क्षत्रियांत त्यांनीं रचिले आहेत, इतकेंच नव्हे तर, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, पल्लव इत्यादि अनेक शतकें दक्षिणेंतच वसाहत करून राहणा-या राजवटींतील मराठ्यांच्या विशिष्ट घराण्यांना केवळ आपल्या भिंवईची भीति घालून, बिचा-या इतर सामान्य मराठ्यांच्या पंक्तींतून उठवून निराळ्या पाटांवर बसविलें आहे. नागपूरच्या आजच्या जिवंत राजे भोसल्यांनीं डॉ. कुर्तकोटींच्या शापाला भिऊन आपला दर्जा घालविला, तर आमच्या ह्या हजारों वर्षांपूर्वींच्या स्मृतिशेष राजघराण्यांनीं राजवाड्यांच्या कृपाप्रसादानें उत्तम क्षत्रियत्वाचा मान मिळविला ! कोण हे कुर्तकोटी आणि राजवाडे ह्यांमधील अंतर !!
आम्ही खालील कोष्टकांत पंधरा निवडक राजवटींतील घराण्यांची तपशीलवार माहिती देतों. ह्या सर्व घराण्यांत पिढ्यानपिढ्या रोटीव्यवहार तर काय, पण बेटीव्यवहारहि झालेले ऐतिहासिक दाखले आहेत. ह्या सर्व घराण्यांनीं राजवैभव भोगिलें आहे. इतकेंच नव्हे तर कांहींनीं पातशाही गाजवून, कांहींनीं तर नर्मदेच्या पलीकडील मोठमोठ्या नामांकित उत्तर क्षत्रियाचीं सिंहासनें कैक वेळां पालथीं घातलीं आहेत. ह्यांचे शरीरसंबंध उत्तरेकडील क्षत्रियांशींच नव्हे तर दक्षिणेकडील साधारण साधारण मराठ्यांशीं केव्हां प्रत्यक्ष तर केव्हां पर्यायानें, झाले असले पाहिजेत. प्रत्यक्ष राजांच्या परस्पर विवाहाचे दाखले इतिहासांत जसे मिळतात तसे त्यांचे किंवा त्यांच्या नातलगांचे दाखले मिळविणें सोपें नाहीं;  तरी अशा दाखल्यांच्या अभावावरूनच ह्या राजघराण्यांचा वंशदृष्ट्या दर्जा इतर मराठ्यांहून श्रेष्ठ मानणें हें मराठा समाजाला तरी खपणार नाहीं. इतकेंच नव्हे तर असला भेद राजघराण्यांनाहि रुचणार नाहीं. चालुक्य, राष्ट्रकूट इ. ज्यांनीं ज्यांनीं राज्यें मिळविलीं तेवढेच राष्ट्रभक्त व श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ व अराष्ट्रीय ठरविणें, हा कोठला न्याय? श्री शिवाजीला स्वराज्य संपादण्यांत यश मिळालें नसतें, तर तेहि कनिष्ठच ठरले असते ना? ह्यांनीं किंवा इतरांनीं जें यश संपादिलें तें काय एकएकट्यानें संपादिलें किंवा आपल्या समानशील जातभाईंच्या जोरावर मिळविलें? हीं चार दोन घराणीं वगळलीं असतां बाकीं सर्व मराठा समाज पोटावारी भाडोत्री लढणाराच ठरतो काय? आणि असे पोटाची खळगी भरणारे उत्तरेकडील क्षत्रियांत नाहींत किंवा नव्हते काय? ज्या मराठा समाजानें जवळ जवळ दोन हजार वर्षें राजवैभव भोगिलें, आणि मध्यंतरी आलेली मुसलमानांची लाट परतवून स्वराज्यहि स्थापिलें, त्यांच्यांतील पुढा-यांना तेवढे निवडून श्रेष्ठ मानणें आणि त्यांच्यांतील अनुयायांना पारतंत्र्याखालीं चिरडलेले असें समजून कनिष्ठ मानणें, हा शुद्ध विपर्यास आहे. अशानें कोणाची फसगत होण्याचा संभव नाहीं.


(कोष्टका साठी येथे क्लिक करा)

 

आडनांव अपभ्रंश अथवा पर्याय वंश गोभ देवक राजधानी
१.स्वातिवाहन शातिवाहन सातव, शालिवाहन सालव? शेष कौंडिण्य पैठण
२ चोळ  कांची, सेलम
३ गंग गोंक, कंक, निकम सूर्य मानव्य म्हैसूर
४ चालुक्य चाळके, साळुंखे सूर्य चंद्र काश्यप वसिष्ठ कमळ, साळुंखीचें पीस वातापि, धनकटक
५ राष्ट्रकूट राठोड सूर्य चंद्र कौशिक, अत्रि, गौतम मर्यादवेल, शंख मान्यखेट, मालखेड
६ पल्लव पालव, सालव सूर्य भारद्वाज कळंब कांची
७ यादव जाधव सोम कौंडिण्य कळंब, पांच पालवी देवगिरी
८ भोज भोय, होयसळ, भोइरे, भोइटे, भोसले सूर्य वसिष्ठ शालंकायन शंख, रूई सातारा, कोल्हापूर, मुधोळ, म्हैसूर
९ काळभ्र कळभूर्य, काळभोर, कलच्छुरी चंद्र त्रिपुर, मदुरा
१० सेंद्रक सिंधु, शिंदे, छंद सूर्य शेष कौंडिण्य कळंब, रूई, अगाडा छिंदवाडा, कलादगी
११ शिलाहार शेलार सोम दाल्भ्य कमळ कोल्हापूर
१२ सात्वत सांवत, सातपुते सोम कौंडिण्य सांवतवाडी
१३ परमार पवार सूर्य भारद्वाज कळंब फलटण
१४ कदंब कदम सूर्य भारद्वारज हळद गोंवें, बनवासी
१५ मौर्य मोरे सोम बृहदश्वा मोराचें पीस जांवळी

वरील पंधरा नांवें आणि त्यांचे अपभ्रंश आजकालच्या सामान्य मराठ्यांत सर्रास आढळतात. ह्याशिवाय मराठ्यांत अद्यापि कितीतरी सुप्रसिद्ध आणि तेजस्वी घराणीं आढळतील कीं ज्यांनीं, सरदा-या, सरंजाम, जहागि-या मागें उपभोगिल्या आहेत व आतांहि उपभोगीत आहेत. ह्यांपैकीं कित्येक घराणीं पूर्वीं नुसत्या देशमुख्या, पाटीलक्या करून हल्लीं तीं राजपदारूढ झालीं, तर ह्याच्या उलट कांहीं उच्च पदावरून उतरून आतां नुसते नांगराचे धनी बनले आहेत. पुष्कळ वेळां आपापसांत युद्धें करून वैभवाचा नाश करून घेतला आहे, तर पुष्कळ वेळां आपल्या हाडवै-यांशीं जूट करून त्याहून अधिक जबरदस्त अशा तात्पुरत्या संकटांतून आपला निभाव करून घेतला आहे; आणि जरी यदाकदाचित् बादशाही दरबारांतील वजन मराठ्यांच्या हातून गेलेलें दिसलें, तरी थंड देशांत ज्याप्रमाणें वरती बर्फाचें दाट आवरण पडलें असूनहि त्याचेखालीं पिकें सुरक्षित वाढत असतात, त्याप्रमाणें डोक्यावरील बादशाही छत्राची कशीहि क्रांति होवो, महाराष्ट्रांतील मराठ्यांच्या स्थानिक स्वातंत्र्याला कायची मूठमाती कधींच कोणाला देतां आली नाहीं. ह्याचें कारण मराठा म्हणजे केवळ आपल्या तलवारीवरच अवलंबून राहणारा अन्योपजीवी प्राणी नसून, त्याच्या आड जर कोणी येईल तर तो कांहीं काळ नांगराचा फाळ मोडूनहि त्याची तलवार करून आपलें स्वत्व व आपला इतिहास राखील असा आहे. ह्या गुणांत जसा गोदेच्या कांठचा महरठ्ठा, तसाच तुंगेच्या कांठचा रड्डीहि कोणास हार जाणार नाहीं. कलकत्ता युनिव्हर्सिटीचे प्रो. सेन ह्यांनीं मराठ्यांची राज्यपद्धति “Administrative system of the Marathas” ह्या नांवाचा ग्रंथ नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यांतील Village System ह्या भागांत अशी स्पष्ट कबुला दिली आहे कीं, “मराठा शेतकरी हा बंगाल्याप्रमाणें ज्या पायाची लाथ बसली तो पायच पुनः चाटण्यास तयार असणारा भ्याड प्राणी नाहीं. पेशव्यांचें राज्य काबीज झाल्यावर जे युरोपिअन अंमलदार शेतावर जात त्यांच्याशीं खेडवळ मराठेहि दिलदार आणि स्वतंत्र बाण्यानें आपला आब राखून कसे वागत ह्याचें प्रत्यक्ष एलफिन्स्टनहि फार कौतुक करीत असे.” पान १७९ वर एलफिन्स्टनच्या शब्दांतच त्याचा खालील अभिप्राय दिला आहे. These (Village) communities contain in miniature all the materials of a state within themselves and are almost sufficient to protect their members if all other Governments were withdrawn. “खेड्यांतील पाटलाचें राज्य म्हणजे एक आपल्यापुरतें लुटुपुटीचें संस्थानच असे. वरील सरकार जरी लयास गेलें तरी हें संस्थान आपलें रक्षण करून घेण्यास समर्थ असे.” पण आमच्या संशोधकांस ह्या हाडींमाशीं खिळलेल्या स्थानिक स्वातंत्र्याची कांहीं किंमतच नाहीं. ज्यानें उठावें त्यानें अटकेवर घोडा नाचवावा, तरच तो स्वतंत्र; मग त्यांत दुस-याच्या स्वातंत्र्याची आहुति पडली, किंबहुना आपल्या शेजा-यांची व स्वकीयांचीहि आबाळ झाली तरी बेहेत्तर ! अशा अपद्रवी दिमाखखोर कर्झनशाहिपेक्षां आपल्या पायांवर उभारून आपली पगडी तोलून धरणा-या गणराज पद्धतीची किंमत बंगाल्यांनीं व युरोपिअनांनीं वाखाणावी आणि आमच्या स्वकीय इतिहाससंशोधकांनीं मात्र तिला हेटाळावें ह्याचें इंगित काय? गणराज पद्धतीचा पाया बळकट बसल्याशिवाय साम्राज्यपद्धतीची इमारत तिच्यावर उठविणें शक्य नाहीं. दक्षिणेंतील मराठ्यांनीं म्हणजे सर्वसामान्य मराठा समाजानें (केवळ शहाजी-शिवाजी अशा अपवादांनींच नव्हे) ह्या गणराज पद्धतीचा पाया सह्याद्रीच्या कणखर पाठीच्या कण्यावर बसविला. इतकेंच नव्हे तर त्या पायावर वरील कोष्टकांत दाखविलेल्या मराठे घराण्यांनीं मोठमोठीं राज्यें व साम्राज्यें स्थापिलीं. चालू सहस्त्रकांत जसा मराठ्यांचा दरारा आहे तसा किंबहुना त्याहूनहि जास्त गेल्या सहस्त्रकांत दक्षिणेंतील मालखेड्याच्या राष्ट्रकूट ऊर्फ राठोड्याचा दरारा अखिल भारतांत होता, हें रा. वैद्य विस्तारानें व अभिमानानें एकपक्षीं प्रतिपादितात; तर दुसरे पक्षीं राजवाडे मराठ्यांना नादान ठरवितात ! राजवाड्यांनीं आपला कावा साधण्यासाठीं रट्टे हे दक्षिणेंतील अधम क्षत्रिय आणि राठोडे मात्र उत्तम क्षत्रिय असें ठरविलें आहे; तर वैद्यांनीं आपल्या मध्ययुगीन भारतांत सर्व मराठ्यांना एकजात उत्तम क्षत्रिय ठरविलें आहे. इतकेंच नव्हे तर परवां ‘केसरी’ पत्रांतून मराठे हे क्षत्रियच आहेत असें रा. वैद्यांनीं पुन: आपले सिद्धान्त प्रसिद्ध केले आहेत. ह्या दोघां चितपावन ब्राह्मणांतच अशी लठ्ठालठ्ठी सुरू झाली आहे हें काय मराठ्यांचें भाग्य कीं दुर्भाग्य ! आपल्या मतें पिसें | परी तें आहे जैसें तैसें || हें तुकोबांचें म्हणणेंच खरें ! दुसरें काय !!