लिंगायत धर्म

वर श्रीनामदेवमहाराजांची पुण्यतिथि कां करणें अवश्य आहे या संबंधांत ‘महाराष्ट्रांतील भागवत धर्माचा संस्थापक कोण?’ ह्या विषयावर विचार करून त्या धर्माचें संक्षिप्त वर्णन केलें. आणखी दोन पंथांचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्रांतील चालू भागवत धर्माचा विषय पूर्ण झाला असें म्हणतां येणार नाहीं.

ख्रिस्ती शकाच्या पहिल्या सहस्त्रकांत महाराष्ट्रांत विशेषत: बौद्ध आणि जैन ह्या दोनच धर्मांचा जोर होता. बौद्ध व जैन धर्माला जसजशी उतरती कळा लागली, तसतसा शैव धर्माचा प्रसार वाढूं लागला; बहुजनसमाजांत-विशेषत: मराठ्यांत-गोरखनाथ पंथाची वाढ होऊं लागली. मच्छिंद्रनाथानें हा पंथ प्रथम काढला. त्याचा पराक्रमी शिष्य गोरखनाथ हा पूर्वीं बौद्ध होता. त्याच्यानंतरचा नाथपंथ म्हणजे बौद्ध आणि शैव धर्माचें मिश्रण होय. हा पंथ खालीं मलबारपर्यंत पसरला होता. अद्यापि सह्याद्रीच्या अनेक उंच शिखरांवरून ह्या नाथपंथाचीं ठाणीं जागजागीं आढळतात.

आर्यांचे जसे वेद, तसे द्रविडांचे आगम नांवाचे पुरातन ग्रंथ आहेत. ह्या ग्रंथानुधारें शैव धर्मानें बाराव्या शतकामध्यें एक नवीन उचल केली. कल्याणी येथें कलच्छुरी वंशाचा बिज्जल नांवाचा जैन राजा राज्य करीत असतां (इ. स. ११५७-११६७) बसव नांवाचा ब्राह्मण त्याचा प्रधान होता. तो मूळ विजापूर जिल्ह्यांतील बागेवाडी गांवचा होता. ह्यानेंच लिंगायत धर्माची स्थापना केली. कोणी म्हणतात-एकोराम, पंडिताराध्य, रेवण, मरूळ, विश्वाराध्य, ह्या पांच आराध्य जातीच्या ब्राह्मणांनीं हा पंथ काढिला. त्याला बसवानें राजाश्रय दिला. हा आश्रय बिज्जल राजाचा विचार न घेतांच दिल्यामुळें त्या राजानें बसवावर स्वारी केली. ह्या कटकटींत बसवानें राजाचा खून केला. पुढें बसवाचाहि अंत झाला. हा सुधारक धर्म असल्यामुळें बौद्ध धर्माचीं कांहीं लक्षणें ह्यांत उतरलीं आहेत. ह्यांत जातिभेद, मूर्तिपूजा, मंदिरांतील आराधना, तीर्थयात्रा, वगैरेंचें फारसें बंड प्रथम नव्हतें. बायकांना समान हक्क असून, त्याहि लिंगधारणा करितात. विधवांना विवाहाचा मुळींच प्रतिबंध नाहीं. कोणत्याहि जातीच्या माणसाला दीक्षा देऊन लिंगायत करतां येतें. ह्यांत देवळांपेक्षां मठांचेंच विशेष प्राधान्य आहे, व गुरूंचेंच महत्त्व विशेष असून, गुरु म्हणजे जंगम, (हलतेंचालतें) लिंग म्हणजे ईश्वराचें चिन्ह असें समजण्यांत येतें. ह्या धर्माचा ब्राह्मणी धर्माशीं कडकडीत विरोध असल्यामुळें ह्याची एकंदर घटना सामान्य हिंदुधर्माहून अगदीं अलग झाली आहे.