हिंदुस्थानच्या कसल्याहि इतिहासाची सुरुवात करावयाची म्हणजे साधारण माणसाची धाव वेदांकडे जाते. ह्याचें कारण वेद हे हिंदुस्थानच्या संस्कृतीचा उगम, असें मुळींच नव्हे. केवळ वेदांहून इतर लेखी पुरावे नाहींत, म्हणूनच असें करावें लागतें. भारतीय संस्कृति वेदांहून फारच प्राचीन आहे. हिंदुस्थानांतील आर्यांच्या संस्कृतीचा उगम वेद असतील ! द्रावीड (ताम्रवर्णी), मोंगल (पीतवर्णी), शुद्ध कृष्णवर्णी, मिश्रवर्णी असे कितीतरी असंख्य मानववंश ह्या भरतखंडांत अनादि कालापासून राहात आहेत. त्यांच्या एकंदर संस्कृति-महासागराला आर्य संस्कृतीची एक तेजस्वी पण लहानशी नदी मिळाली आहे; एवढ्यावरूनच अखिल भारतीय संस्कृतीचा उगम वैदिक किंबहुना आर्य संस्कृतीचा आहे, असें सांगत व ऐकत सुटणें, किती धाडसाचें आहे, हें तज्ज्ञांनाच माहीत !
वेदांमध्येंहि त्रैविद्या म्हणजे ॠक्, साम आणि यजुः आणि चौथा वेद अथर्व असा भेद प्राचीन आहे. अथर्व वेदाचें पहिलें नांव अथर्वांगिरम्. ह्या दोन शब्दांच्या रूढ अर्थांतहि श्रौत वाङ्मयामध्यें भेद आढळतो तो असा. अथर्व वेद म्हणजे एकंदरींत एक मोठें जादू ऊर्फ अभिचारशास्त्र. अथर्व म्हणजे भेषज अभिचार आणि अंगिरस् म्हणजे घोर अभिचार ! म्हणजे प्रकृति सुधारण्यासाठीं वेदकालीन आरोग्यशास्त्राचा चालूं असलेला एक जादूचा प्रचार; घोर अभिचार म्हणजे जारण, मारण, उच्चारण इ. जादूचे अत्याचारी भयंकर प्रकार. जादूचे हे दोन्ही प्रकार आर्यांमध्यें हिंदुस्थानांत येण्यापूर्वीं व आल्यावरहि चालूं होते. हे प्रकार हिंदुस्थानांत आल्यावर दुसर्या भयंकर प्रकारावर कदाचित् आळा बसला असेल. हिंदुस्थानांतील आर्यांच्या ग्रंथांना 'वेद' ही संज्ञा आहे. इराणांतील आर्यांच्या ग्रंथांना 'अवेस्ता' ही संज्ञा आहे. वेदांच्या ज्या निरनिराळ्या संहिता ऊर्फ बांधण्या झाल्या, त्यांत पहिले तीन वेद 'त्रैविद्या' ह्या नांवानें व चौथा अथर्वांगिरस् हा वेद 'अथर्व' ह्या संक्षिप्त नांवानें ओळखण्याचा पूर्वीं प्रघात होता. ह्याचा अर्थ पहिले तीन वेद पूज्य व चौथा त्याज्य असा मुळींच नव्हे तर पहिले तीन सामान्य आचरणासाठीं आणि चौथा विशेष किंवा तज्ज्ञांच्याच आचरणासाठीं, एवढाच अर्थ. ह्या चौथ्या वेदाला क्षत्रवेद, राजाचरण (राजकारण), ब्रह्मवेद अशींहि नांवें होतीं. ह्या वेदांत नुसती बरीवाईट जादूच नव्हती तर आर्यांची विश्वविद्या (Cosmogony) आणि ब्रह्मविद्या (Theosophy) हींहि विशेष शास्त्रें होतीं. यावरून चौथ्या वेदाचें महत्त्व आणि पावित्र्य समजून येतें. इतकेंच नव्हे तर अथर्वांतच काय ती जादू ऊर्फ अभिचारशास्त्र होतें आणि पहिल्या तीन वेदांमध्यें तें नव्हतें असेंहि नव्हे, तर तें शास्त्र भेषज म्हणजे औषधोपचारासाठीं व इतर सौम्य उपायांसाठीं सर्व वेदांत आढळतें. किंबहुना वेद म्हणजे जादू आणि जादू म्हणजे वेद, असा जो शेरा ब्लूमफील्ड ह्या अमेरिकन वेदवेत्त्यानें दिला आहे, त्यांत बरेंच तथ्य आहे.
वरील विवेचनावरून वेद-धर्माचें स्थूलमानानें लक्षण समजण्यासारखें आहे. वेद म्हणजे जादू ! शुक्ल आणि कृष्ण असे तिचे दोन भाग करतां येतील. दुसर्याचें अहित न करतां आपल्या हितासाठीं केलेली ती पांढरी, व दुसर्याचें अहित करूनहि आपलें हित साधण्यासाठीं केलेली ती काळी, असे ह्या दोन जादूचे प्रकार असतील. पहिलीच्या साह्यानें इंद्र, चंद्र, वरुण, सूर्य, रुद्र, पर्जन्य अशा बलवत्तर देवतांनाहि वश करून घेण्यांत येत असे व दुसरीच्या द्वारां अनन्वित अत्याचाराचे प्रयत्न होत असत. हे दुसरे प्रयत्न सिद्ध न झाल्यास ते करणार्यांवर भयंकर रीतीनें उलटत, असाहि समज आर्यांचा होता. ह्या समजांत व प्रयत्नांत अस्सल वैदिक धर्माचें मुख्य लक्षण आहे.
वैदिक धर्मांत वरील लक्षणांहून अधिक चांगला भागहि आहे. विशेषेंकरून वरुण ही मुख्य देवता, आणि तिच्या प्रभावळींत जी ७ पासून १२ आदित्यांची गणना आहे, ती सर्व प्रभावळ नैतिक दृष्ट्या फारच सुंदर आहे, हें विशेष ध्यानांत ठेवण्यासारखें आहे. कांहीं पाश्चात्त्य पंडितांचा तर्क, वैदिक धर्माची ही नैतिक बाजू केवळ अपवादकच असून ती बाबिलोनियन अथवा इतर प्राचीन सेमेटिक संस्कृतींतून आर्य संस्कृतींत आली असावी, असा आहे. ह्या तर्काला बळकट पुरावा नाहीं. प्रो. विकलरच्या शोधाअंतीं मेसोपोटेमियामध्यें बोगाझकुई येथें एक महत्त्वाचा प्राचीन लेख मिळाला. तो. इ. स. पूर्वीं १४०० वर्षांचा आहे. सुब्बील्युल्युमा (आर्य ?) राजा आणि मिट्टानी ह्या सेमेटिक राष्ट्राचा राजा तुस्त्राटा ह्याचा मुलगा माट्युअर्झा ह्या दोघांमध्यें घडलेल्या इ. स. पूर्वींच्या १४०० वर्षांमागच्या तहासंबंधीं हा लेख आहे. ह्यांत मित्र, वरुण, इंद्र आणि नासत्य (अश्विनीकुमार) ह्या आर्य दैवतांचा स्पष्ट आणि प्रामुख्यानें उल्लेख आहे. पण ह्या उल्लेखावरून प्राचीन आर्य कास्पियन समुद्राच्या उत्तरेकडून मध्य आशियांत आले ते सरळ न येतां कदाचित् मेसोपोटेमियामध्यें कांहीं दिवस सेमेटिक लोकांच्या सहवासांत राहून नंतर ईशान्येकडे व पूर्वेकडे वळले, असा अर्थ होईल, किंवा हिंदुस्थानांत आल्यावर देखील आर्यांच्या कांहीं टोळ्या, भारतीय संस्कृति घेऊन पश्चिमेकडे वळल्या, त्या तहत मेसोपोटेमियापर्यंतहि पोंचल्या, असाहि अर्थ होईल. अर्थात् सिंधू नदीच्या पूर्वेकडे येण्यापूर्वीं हिंदी इराणी आर्यांच्या अविभक्त काळीं देखील आर्यसंस्कृतीवर इतर संस्कृतींचा विशेषतः सेमेटिक संस्कृतीचा परिणाम झाला नसावा, असा माझा आग्रह नाहीं. असा आग्रह धरणें कोणालाहि शक्य नाहीं. पण वैदिक धर्माचा यच्चयावत् सर्व नैतिक अथवा भागवत भाग आर्यांनी बाहेरूनच घेतला, असें समजावयाला मी तयार नाहीं. कां तर असा आग्रह धरावयाचा तर झरतुष्ट्रानें इराणमध्यें विशेषतः बॅक्ट्रियामध्यें व आर्य धर्मामध्यें जी पहिली मोठी नैतिक क्रांति घडवून आणिली, तीहि बाहेरूनच आली असें म्हणावें लागेल.
वर सांगितल्याप्रमाणें आर्यांच्या अविभक्त स्थितींत जरी नैतिक भाग खास आढळतो, तरी पण हे आर्य सिंधू नदीच्या पूर्वेकडे आल्यावर त्यांच्या आणि पश्चिमेकडच्या इराणी आर्यांमध्यें जी कांहीं अज्ञात कारणांवरून स्पष्ट दुफळी झालेली दिसते, ती लक्षांत घेतां हा नैतिक भाग हिंदुस्थानांतील आर्यांच्या वैदिक धर्मांत कितपत उरला, ह्याविषयीं मात्र संशयाला जागा आहे. इराण्यांना असुर पूज्य तर हिंदीयांना देव पूज्य; इतकेंच नव्हे तर इराण्यांना देव शत्रु तर हिंदीयांना असुर शत्रु, असा हा विरोध पुढें बळावत गेला. ह्या उपास्यांच्या विरोधावरून असुरयज्ञ आणि देवयज्ञ अशा नांवाखालीं उपासकांचाहि दारुण विरोध असलेला या दोघांच्याहि ग्रंथांमधून दिसून येतो. इतकेंच नव्हे, तर पुढें पुढें पूर्वेकडील आर्यांत मित्र, वरुण आणि त्यांच्या प्रभावळींतील सर्व आदित्यांचें महत्त्व कमी कमी होत जाऊन शेवटीं नाहींसें झालें; तर तिकडे पश्चिमेस इराणी आर्यांना इंद्र आणि इतर पूर्वेकडील देव म्हणजे मोठीं पिशाच्चेंच होऊन बसलीं. इंद्र हा अत्याचारी लष्करी देव. त्याला सोमरसाच्या कितीहि घागरी भरून पाजल्या तरी तो अतृप्त; तो केव्हां सोमरसाच्या लालसेनें शत्रूलाहि वश होईल, ह्याचा भरंवसा नसे. अशीं वर्णनें इंद्राभिमानी हिंदी आर्यांच्या वेदांतच आढळतात. पुढें तर इंद्र हा देवांचा राजा झाला असूनहि अतिशय भित्रा व मत्सरी अशा कथा आढळतात. कोणी १०० यज्ञ करणारा मनुष्यहि आपलें पद हिरावून घेईल, अशा भीतीनें आपल्यापेक्षांच नव्हे तर सर्वांत लहान जो आदित्य - विष्णु ह्याला वेळोवेळीं शरण जाणारा अशीं वर्णनें पुराणांतून आहेत. ह्यावरून अविभक्त स्थितींतील आर्य संस्कृतीचा नैतिक भाग इराणांत झरतुष्ट्रानें कांहींसा वाढविला, पण हिंदी आर्यांनीं तो कायमहि ठेविला नाहीं कीं काय, अशी शंका येते. वरुण आणि त्याच्या भोंवतालच्या मांडलीक आदित्यांची सुंदर प्रभावळ ही स्मृतिशेष झाली. इतकेंच नव्हे तर त्यांच्या पदीं विराजमान झालेल्या इंद्र, चंद्र (सोम), पर्जन्य, नासत्य इ. देवता उपास्य स्थानावरून च्युत होऊन उलट शक्ति, शिव, गणपति इ. केवळ परकीय असलेल्या संस्कृतींतील पराक्रमी देवतांना आर्यांना आपलीं उपास्यें करावीं लागलीं व त्यांचीं थोडींबहुत स्तोत्रें पर्यायानें प्रत्यक्ष वेदसंहितांतून क्वचित् आणि इतर वैदिक वाङ्मयांतून पुष्कळ चमकूं लागलीं. हा कशाचा महिमा ! ब्रह्मणस्पति (ब्रह्मा), विष्णु हीं (आर्य ?) दैवतें मागून पुढें आलीं तरी, शिव आणि शक्ति या लोकप्रिय देवतांच्यापुढें ब्रह्मणस्पतीचीहि डाळ शिजेना, असें कां व्हावें ? शेवटीं विष्णु तेवढाच आर्यांचा उरला, पण तोहि अथर्व वेदामध्यें (भक्ति तर नाहींच पण) ज्ञानापेक्षां जादूमंत्रालाच अधिक वश होणारा असा वर्णिलेला आहे, हें काय गूढ ! तें कसेंहि असो. हा विष्णु देखील प्रत्यक्ष आपल्या जोरावरच पुढें न येतां, वासुदेव कृष्ण या थोर मानवाच्या आश्रयानें पुढें येतो, याचें मर्म काय ? एकंदरींत वैदिक संस्कृतींत नैतिक ऊर्फ भागवत धर्माचें जें जडान्न क्वचित् आढळतें तें त्या संस्कृतीला पचलें नाहीं, असें मानावें लागत नाहीं काय ? जरी पुढें उपनिषत्काळीं अथर्ववेदानें आपल्या ज्ञानमार्गाचा जोरानें विकास केला आणि ब्रह्म विद्येच्या द्वारा हिंदुस्थानावरच नव्हे तर अखिल जगावर तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनें अनिर्वचनीय उपकाराचें ओझें केलें, तरी भागवत धर्माची वाट काय ? हा प्रश्न शिल्लक राहतोच. तो प्रश्नच तर आमचा प्रस्तुत विषय आहे.