सगाईन

निरीक्षण पहिलें : सोमवार ता. १४ मार्च १९२७ चौथे प्रहरीं ४ वाजतां सनाईन शहरांतून सगाईन टेकडीकडे जाण्यासाठीं आम्ही उमाँगाँचे मोटारींतून निघालों. ऐरावती नदीचे कांठीं मंडालेपासून ८-१० मैलांवर हें शहर आहे. माझेबरोबर रा. भिडे व वृद्ध ब्रह्मी पेन्शनर गृहस्थ उ पो विन हे तुबायाझा ह्या लोकांची वस्ती दाखविण्यासाठीं होते. ह्या शहराच्या स्मशानाजवळ आम्ही मोटारींतून उतरलो. तेथें सुमारें २०-२५ तुबायाझा लोकांची लहान वस्ती होती. हे लोक स्मशानांतील थडगीं खणण्याचा धंदा व इतर मार्तिकासंबंधीं कामें करितात. हे लोक आपणांस फयाचून लोकांपेक्षां श्रेष्ठ समजतात, कारण फयाचून हे देवळी, साधारण गुलाम. पण तुबायाझा हे राजवंशांतील आहेत, कारण याझा हें यांच्या नांवांतील शेवटलें पद राजा या शब्दाचा अपभ्रंश आहे. तुबा हें शुभ याचा अपभ्रंश आहे. पूर्वीं हा शब्द अशुभ असा होता, त्यांतील अ जाऊन शुभ तुबा हा अपभ्रंश उरला. याविषयीं खालील दंतकथा पुष्कळ ठिकाणीं मीं ऐकली : एक ब्रह्मी राजा होता. त्याची गर्भवती राणी वारली असें समजून स्मशानांत पाठविण्यांत आली. पण थडग्यांत पुरण्यापूर्वीं ती जिवंत झाली. राजानें तिला परत न नेतां थडगें खणणा-या चंडाल लोकांना तिला दिलें, व तिचे मुलास चंडालांचा राजा केला. मार्तिकविधींत फोंजी भिक्षूला जितकी दक्षिणा मिळेल तितकीच ह्या राजवंशालाहि पुढें मिळावी असा नियम घालून दिला. तेव्हांपासून हे नांव प्रचारांत आलें. ह्या राजवंशानें भिक्षेशिवाय दुसरा कोणताच धंदा करतां कामा नये ह्यामुळें ह्यांना केबा (मला मदत करा) हें नांवहि पडलें. वस्ती एकंदरींत स्वच्छ व नीटनेटकी दिसली. तरुण मुलींना लिहितां वाचतां येत होतें. वस्तीच्या मध्यावरील झोंपडी चांगली बंगलीवजा होती. ती म्युनिसिपालिटीनें बांधिली आहे. येथील म्युनिसिपालिट्या हिंदुस्थानांतल्यापेक्षां चांगल्या किंवा ह्या विवक्षित म्यु. टीचे अध्यक्ष हेच उदारात्मे आहेत याचा निर्णय करण्यास मला सुचलें नाहीं. या लोकांनीं वस्तींत आपलें स्वतःचें चांगलें देवस्थान उभारलें होतें. त्यांत म. गौतम बुद्धाच्या व नाटांच्या (भूत, यक्षांच्या) पुष्कळ मूर्ति होत्या. फोंजी (बौद्ध भिक्षू) ह्यांच्याकडे जेवणाला, भिक्षेला व धार्मिक कृत्याला येत आहेत. तरी यांच्यांत विशेष महत्त्वाकांक्षा दिसली नाहीं. एकंदर स्थिति मागासलेली व करुणास्पद दिसली. माझे बरोबरीचे उ पो विन हे वृद्ध व श्रीमंत गृहस्थ असूनहि ह्या लोकांबरोबर उघडपणें बसून जेवण्यासहि आपण तयार आहों असें म्हणालेय. ह्या लोकांना मीं विचारलें कीं, तुम्ही इतरांप्रमाणें सुशिक्षण मिळवून मोठीं हुद्द्याचीं कामें कराल काय ? तेव्हां ह्या प्रश्नाचा अर्थच त्यांना कळला नाहीं. कारण हें कसें कळेल ? हें अशक्य कोटींतलें त्यांना वाटलें. एकंदर स्थिति अज्ञानाची, आत्मविश्वासाच्या अभावाची व अल्पसंतुष्टतेची दिसली. पुष्कळ अंशीं हिंदुस्थानांतहि हल्लीं हाच प्रकार आहे !
निरीक्षण दुसरें : ऐरावती मेंढाई नदीकिना-यावरील अमरपुरा शहराजवळ केबाचा गांव ता. १८ मार्च १९२७ रोजीं शुक्रवारीं सकाळीं पाहिला. इरावती किना-यापासून पूर्वेकडे एक मैलाच्या आंत मेंढाई नांवाचा सुमारें २५० लोकवस्तीचा एक गांव आहे, त्याला लागून २-२ फर्लांगावर केबांची लहान वस्ती आहे. ह्या वस्तींत सुमारें ५-७ झोपड्या व त्यांत सुमारें २०-२५ बायका व पुरुष पाहिले. सर्व कोष्ट्याचा धंदा करितात. गुजराथेंत व नागपुराकडे धेड लोक नुसती खादी विणतात पण हे केबा उत्तम रेशमी कापडहि विणतात. खाऊन पिऊन स्वतंत्र आहेत. ते केबा हें आपलें नांव सांगत नाहींत म्हणून माझ्या दुभाष्याला त्यांच्या स्वतःविषयीं जातीवाचक माहिती विचारण्याचें धैर्यच होईना. तथापि ते केबाच होते ह्याची त्याला खात्री होती. पुढें आम्हीं मेंढाई गांवांत जाऊन चौकशी केली. मेंढाईचे लोकहि विणकराचा धंदा करीत होते. त्यांतील एका प्रमुख विणकराच्या घरीं गेलों. तो ब्रह्मी राष्ट्रीय शाळेंत थोड्याच दिवसांपूर्वीं शिक्षक होता. हा मनुष्य उ. उत्तमाच्या राष्ट्रीय पंथाचा आहे. त्यानें सांगितलें कीं जवळच्या केबांशीं मेंढाई लोक संबंध ठेवीत नाहींत. तरी त्यांच्यांत व मेंढाईचे लोकांत कांहीं फरक नाहीं. रोटीबेटी किंवा भेटीव्यवहार होत नाहींत याचा अर्थ ते अस्पृश्य आहेत असें मुळींच नव्हे. ब्रह्मदेशांत, अस्पृश्यता अशी पूर्वींहि नव्हती, आतां मुळींच नाहीं. तरी पण ह्या बहिष्कृत लोकांना कोणी लग्नमुंजीत किंवा अशा सामाजिक प्रसंगीं भेटीव्यवहाराचें आमंत्रण करणार नाहीं. पूर्वीं त्यांना गांवांत येण्याचीहि मनाई होती. भिक्षेपुरतें यावें पुनः बाहेर जावें; पण यांची स्थिति इतकी सुधारली आहे किंवा मनु पालटला आहे कीं, त्यांना कोणीहि उघड आमंत्रण करीत नसलें तरी त्यांना दूर सर म्हणण्याची छाती कोणाचीहि नाहीं. फौंजीच्या शाळेंत त्यांचीं मुलें जाऊं शकत. पण सरकारी शाळेंत कोठें कोठें जाऊं शकणार नाहींत. त्यांच्याकडे फौंजी भिक्षेलाहि येत नसत, पण आतां येतांना मींच पाहिलें. फार तर काय ग्रामबाध्यता आतां पुष्कळ ठिकाणीं नष्ट होत चालली आहे. धंद्यामुळें त्यांना पूर्वींच्या रिवाजाला चिकटून राहावें लागतें. स्थान व धंदा बदलला तर कोणी त्यांचे मूळ विचारीत नाहीं. ते साधारण समाजांत मिसळून जातात. हिंदुस्थानच्या व ब्रह्मदेशाच्या बहिष्कारांत हा विशेष फरक आहे कीं, हिंदुस्थानांत ह्याला धार्मिक स्वरूप आलें असून ह्याला केवळ लौकिक व सामाजिक रूप आहे. हिंदूंतील ब्राह्मणादि वरिष्ठ वर्ग बहिष्कार कडकडून पाळतात. पण ब्रह्मदेशांत फौंजी ह्यांची भिक्षा आतां सर्रास उघडपणें घेतात व त्यांना आपल्या शाळांतून शिकवितात. मात्र त्यांना पूर्वीं फौंजीची दीक्षा मिळण्यास अडचण पडे. कारण ती दीक्षा देण्यापूर्वी तो मनुष्य स्वतंत्र पुरुष असावयास पाहिजे, दास स्थितींत असून चालावयाचें नाहीं, असा नियम आहे. आतां हे लोक फौंजी होऊं शकतात. ह्यानंतर मिढाई येथील नाटाचें देऊळ पाहिलें. बौद्ध धर्मापूर्वीं ब्रह्मदेशांत नाट ऊर्फ नास ऊर्फ भूतपूजा चालत असे. खालील व पुष्कळशा वरील वर्गांतहि अद्यापि चालू आहे. ही नाथाचीं देवळें मी पुष्कळ ठिकाणीं पाहिलीं. ह्या देवळांत दोन मूर्ति आसनावर व एक घोड्यावर बसलेल्या पाहिल्या. हे पूर्वीं मुसलमान बंधु होते. किना-यावर यांची नाव बुडाली तेव्हां ते ब्रह्मी राजाच्या आश्रयाला राहिले. ते मेल्यावर त्यांचीं हीं क्षुद्र देवळें झालीं. मुसलमानांशिवाय सर्व लोक त्यांना भजतात. वार्षिक यात्रा होते तेव्हां ह्या गांवासाठीं रेल्वेचें स्वतंत्र स्टेशन करावें लागतें. ह्या (मुसलमान) नाथांचीं नांवें चेफिनी, श्वफिगले अशीं आहेत. नाट शब्दाचा अर्थ भूतपिशाच्च असा आहे. कोणी प्रसिद्ध पुरुष अपघातानें मेला तर त्याचें देऊळ होतें व त्याला नाट म्हणतात.
निरीक्षण तिसरें : २६ मार्च रोजीं शनिवारीं सकाळीं ९ वाजतां पगानचे दक्षिणेकडे एक मैलावर नदीकांठीं टाँववा नांवाचें तुबायाझांचें एक स्वतंत्र खेडें आहे. तें पगानच्या स्मशानालगतच आहे. मी प्रिन्सिपाल उसैन (लॅकरस्कूलचे) यांच्यासह तेथें गेलों. गांवांत सुमारें ७० घरें व लोकसंख्या आहे. ही तपासणी आम्हीं तीन तासांवर बारकाईनें केली. गांव नदीकांठावर असल्यामुळें पाण्याची व पायखान्याची सोय नैसर्गिक आहे. म्यु. शहरांतच विशेष सोय नाहीं मग ह्यांना कोठून मिळणार? स्वतंत्र शाळा नाहीं, पण फौंजीच्या शाळांत सर्वांबरोबर शिकण्यास हरकत नाहीं. तेथें मुलामुलींचा भेद नाहीं, पण फौंजी मठांत मुलींना शिकतां येत नाहीं. येथें भिक्षुणींचा मठ नसल्यानें मुलीं घरीं शिकतात. २|४ बायकांना लिहितां वाचतां येतें. ब्रिटिश राज्य होईपर्यंत ह्यांच्यावर कसलाहि कर नव्हता. कारण हे बहिष्कृतच होते. आतां कर आहेत, पण त्यांचा उपयोग मात्र त्यांच्या उन्नतीकडे होत नाहीं. हाच प्रकार हिंदुस्थानांत आहे. ब्रिटिश राज्याचा ‘घेऊं जाणें, परि देऊं ना जाणें’ हा भोळेपणा सर्वत्र प्रसिद्धच आहे ! माझ्या समक्ष फौंजींना भिक्षा शिजलेल्या भाताचीच मिळाली. थडगें खणणें, टेप विणणें, वैद्यकी करणें, शिवाय सर्वमान्य भिक्षा मागणें इ. यांचीं हक्काचीं कामें आहेत. कित्येक घरांचीं दारें लागलेलीं होतीं; कारण पुरुष, बायका, मुलें भिक्षेस गेलीं होतीं. भिक्षेचे तांदूळ स्वस्त दरानें विकून रोख पैसा करितात. मग त्यांनीं इतर काबाडकष्ट कां करावेत? राहणी आमच्याकडील चांभारापेक्षां पुष्कळ बरी दिसली; तरी गांवांत घाणेरडेपणा, बागबगीचे, टापटीप यांची मिसळ दिसली. सर्वसाधारण ब्रह्मदेशांत घराभोंवतीं पुष्कळ जागा असतेच, त्यांत कुंड्यांतून गुफा लावून, फुलझाडें आणि भाजीपाला करण्याची चाल चहूंकडे आहे. ब्रह्मी लोक (बहिष्कृतांसह) फुलामाळांचे मोठे शोकी; ह्या महारवाड्यांतील कांहीं स्वच्छ आंगणें व फुलावेलींचे मंडप मला हिंदुस्थानांतील खेड्यांतील ब्राह्मणांच्या परसांत आढळतील कीं नाहीं, याची शंकाच आहे ! तरी ह्या खेड्यांत मला कुजलेल्या माशांची दुर्गंधी येत होती. अशा खेड्यांतून डुकरें कोठेंच दिसलीं नाहींत, पण गांवगुंड कुत्रीं मात्र ब्रह्मदेशांत वतनदारांप्रमाणें वावरत आहेत. जेथें जावें तेथें त्यांचें स्वागत आहेच ! नंतर आम्ही खालील ७ घरें बारकाईनें पाहिलीं :-
१ लें घर – वृद्ध मालकीण बैलासाठीं सुती काढण्या वळीत बसली होती. इतरांप्रमाणें सर्व घर ६ फूट उंच खांबावर बांधिलें होतें, तें सर्व लांकूड व बांबूचें होतें. पक्ष्याच्या घरट्याप्रमाणें हवेचा तोटा नव्हता. पुढें पडवी, बाजूस सैंपाकाची खोली, नंतर माजघर, त्याचे बाजूस निजावयाची खोली अशी प्रशस्त सोय होती. प्रत्येक खोली अदमासें १२- १० फूट लांबरुंद होती. स्वयंपाकाचीं भांडीं मातीचीं, माजघरांत एक मोठा आरसा, भिंतीस पूर्वेकडच्या बाजूस बुद्धाचें चित्र, निजावयाच्या खोलींत मच्छरदाणी असें सामान होतें. भिंती व जमीन बांबूच्या कुडाच्याच होत्या. आई, मुलगा, सून अशीं तीन माणसें. पैकीं मुलगा व सून भीक मागावयास गेलीं होतीं ! हें मध्यम प्रकारचें घर म्हणावयाचें.
२ रें घर – मालक तरुण व धडधाकट होता. धंदा भीक मागण्याचा.
३ रें घर – मालकाचें वय ७३ वर्षें, त्याच्या बायकोचें वय ७७ वर्षें. त्याचा पहिला मुलगा वय ५५, बायको व तीन मुलें. दुसरा वय ४७, बायको व तीन मुलें. तिसरा वय ४०, बायको व दोन मुलें; अशा एकंदर सोळा माणसांचें हें कुटुंब होतें. म्हाता-याचा धंदा वैद्यकीचा, शिवाय भिक्षा ही आहेच. मधला मुलगा दुसरीकडे आपल्या बायकोच्या घरीं राहात होता. नवराबायकोशिवाय सर्व माणसें भिक्षेला गेलीं होतीं. कारण सकाळची भिक्षेची वेळ. चमत्कार हा कीं, स्वतः भिक्षा मागणा-या बहिष्कृतांच्या घरीं सर्वांस पूज्य व श्रेष्ठ मानिलेला फोंजीवर्ग सकाळीं भिक्षा मागायला येत होता. घराला स्वच्छ व प्रशस्त आंगण होतें. उजव्या बाजूस चांगला लतामंडप व व भोंवतालीं कुंड्यांतून फुलझाडें होतीं. मंडपांत एक लाकडी मंचक होता. बसावयाचीहि आरामवाटिका होती. डाव्या बाजूस स्वतंत्र स्वयंपाकाची जागा होती. हें पहिल्या प्रकारचें घर म्हणावयाचें.
४ थें घर – मालकाचें वय ५२. धंदा वैद्यकीचा, भिक्षा मागत नाहीं. घर दोन मजली व मजबूत लाकडी होतें. बायकोचें वय ४२. चार मुलें. कोणासहि लिहितां वाचतां येत नव्हतें.
५ वें घर – मुख्य मालकीण नवार विणीत बसली होती. नवराबायको, मुलें राहावयास एकच खोली. हें कनिष्ठ प्रकारचें घर.
६ वें घर – मालक तरुण ताजातवाना. धंदा वैद्यकीचा. बायको व तीन सुंदर मुलें. भिक्षा मागत नाहीं.
७ वें घर – हें सर्व खेड्यांत सुंदर होय. सागवानी लाकडाचें खालवर बांधिलेलें, वॉरनीश केलेलें अगदीं पेटीसारखें ! पण नवरा-बायकोंचा धंदा केवळ भिक्षेचा ! भिक्षेला गेल्यामुळें घर बंद होतें. प्रशस्त आंगणहि होतें. एक देवालय होतें, तें गांवक-यांनीं स्वतःच्या खर्चानें बांधिलेलें. पुढें सभामंडप होता. गाभा-यांत उच्च कट्ट्यावर १० लहानमोठ्या बुद्धाच्या मूर्ति होत्या, त्या सर्व सोनेरी वर्खानें मढविलेल्या होत्या, शिवाय दोन मूर्ति संगमरवरी दगडाच्या व सुंदर होत्या. चातुर्मास्यानंतर (नवंबरच्या सुमारास) वार्षिक महोत्सव होतो. त्या वेळीं मागान गांवांतील सर्व लोक देवास नैवेद्य आणितात. त्यांत मांस, मासे वगैरे सर्व प्रकार असतात; पण देवळापुढें बळी मारला जात नाहीं. गांवांत कॉलरा, देवी वगैरे आजार झाल्यास ह्यांतील एका मूर्तीचा छबिना शांतिप्रीत्यर्थ गांवांतून मिरविण्यांत येतो. येणेंप्रमाणें “मरीआईचें काम बुद्धाला” आणि महारमांगाचे अधिकार ह्यांना आहेत. हा सर्व हिंदू संस्कृतीचा परिणाम. फौंजी येऊन ह्या लोकांच्या मुलांचा उपनयन विधि ह्या सभामंडपांत करितात. हीं मुलें फौंजी चाँ शाळेमध्यें इतरांबरोबर समान दर्जानें राहतात. फौंजीच्या मठांत भेदभाव नाहीं. ह्या लोकांतील भिक्षुणी इतर भिक्षुणींच्या, संघांत राहूं शकतात, अशी एक भिक्षुणी आतां आहे.
प्रिन्सिपॉल सैन यांनीं दुभाष्याचें काम उत्तम कौशल्यानें व धोरणानें केलें म्हणून ह्या लोकांचा विश्वास आम्हांवर बसला. त्यांनीं आपला खरा वृत्तांत सांगितला. एरव्हीं उडवाउडवीच केली असली. आम्ही जाऊं तेथें स्त्रीपुरुषांचा घोळका जमत असे. नागडीं, उघडीं, शेंबडीं मुलें कांखेंत व जात्याच्या खुंट्याएवढा मोठा चिरूट तोंडांत धरून धुराचे लोट हवेंत सोडीत बायका भोंवतालीं जमत असत. प्रथम ज्यांनीं भुंकून हैराण केलें तींच कुत्रीं तपासणी चालली असतां पायाशीं स्वस्थ निजून राहात. जणूं काय, भुंकणारे वेगळेच होते.
शेवटीं मीं सभामंडपांत मंडळीस बसावयास सांगून ब्राह्मण समाज आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशन ह्यावर सुमारें १५ मिनिटें व्याख्यान दिलें. तें प्रि. सैन यांनीं ब्रह्मी भाषेंत समजावून सांगितलें. मंडळींना तें आवडलें. असेंच मिशन ब्रह्मदेशांत काढावें, अशी त्यांनीं कळकळीची इच्छा दाखविली. प्रि. सैन ‘आपण ह्या कामीं मदत करूं’ म्हणाले. वेळवाच्या टोपल्यांवर लाख मढवून सुंदर भांडीं करण्याच्या सरकारी शाळेचे ते प्रिन्सिपॉल आहेत, पण त्या शाळेंत ह्यांच्या मुलांना घेण्यास मात्र ते तयार नव्हते. कारण यांची शाळा निघून तीन वर्षें झालीं, तरी ती अद्यापि प्रयोगाचे अवस्थेंत आहे. यांचीं मुलें आल्यास वरिष्ठ वर्गांचीं मुलें शाळा सोडतील ! ही त्यांना अद्यापि भीति आहे. ही सर्व तपासणी व आमचें मिशन प्रि. सैनच्या पत्नीला फार आवडलें. दोन प्रहरीं पत्ते खेळतांना तिनें जो पैसा जिंकला होता तो सर्व ह्या कामासाठीं घ्या, असें म्हणाली !