(१) कानडी आणि मराठी ह्या मथळ्याखालीं ह्या दोन भाषांच्या व्युत्पत्तीचा तौलनिक संबंध काय आहे हें दाखविण्यासाठीं मराठी व्याकरणकर्ते श्री. रा. भि. जोशी ह्यांच्या नवीन मराठी भाषेची घटना ह्या ग्रंथाचा शेवटचा भाग म्हणून एक निबंध मीं लिहिला होता; तो १९२३ अखेर केसरीच्या चार अंकांतून प्रसिद्ध झाला आहे. त्यानंतर बंगाल, ओरिसा, तेलंगण आणि दक्षिण कोंकण उर्फ केरळ ह्या चार प्रांतांतून गेल्या दोन वर्षांत मला प्रवास करावा लागला, त्यावरून हल्लींची मराठी ही केवळ महाराष्ट्री असें नांव असलेल्या एका प्राचीन प्राकृतांतूनच आलेली नसून ती मगध देशांतून पश्चिम बंगाल, ओरिसा, तेलंगण, व-हाड आणि १ हजार वर्षांपूर्वीचा उत्तर-कर्नाटक (कृष्णा आणि गोदावरी ह्यांमधला भाग) त्या प्रांतांतून प्रवास करीत आलेली एक भाषा असावी असा माझा पूर्ण ग्रह बनत चालला आहे. इतकेंच नव्हे तर अशा अर्धवट बनलेल्या स्थितींतच ही प्रगमनशील भाषा सुमारें १०००।१२०० वर्षांत उत्तर-कोंकण ऊर्फ अपरांत या प्रांतीं आणि तेथून खालीं दक्षिण- कोंकण ऊर्फ केरळ या प्रांतांत उतरली आणि त्या दोनहि प्रांतांत हल्लीं ही माळवणी, गोव्हणी आणि कोंकणी या नांवांनीं रूढ आहे. मुंबई येथील अँथ्रॉपॉलॉजिकल सोसायटीचे व्हाइस-प्रेसिडेंट राव ब. डॉ. चव्हाण ह्यांनीं कोंकणी भाषेवरील आपलीं कांहीं व्याखानें प्रसिद्ध केलीं आहेत. त्यांत मराठीचा कोंकणीशीं संबंध नसून कोंकणी ही स्वतंत्र व मराठीच्या पूर्वींची भाषा असावी असें प्रतिपादन केलें आहे ! मंगळूर आणि कालिकत येथील कांहीं सारस्वत मंडळीमध्यें अलीकडे राव. ब. चव्हाणांप्रमाणेंच मराठीपासून सुटून सवता सुभा करण्याची प्रवृत्ति मला आढळली. ह्याचे उलट असलेलें माझें मत पुढें कधीं तरी सविस्तर प्रसिद्ध करीन. तूर्त मला ह्या कलमांत मराठीच्या प्रवासी स्थितींत तिला किती प्रांत ओलांडावे लागले एवढेंच सांगावयाचें आहे.