लकबा

वरील संयुक्त क्रियापदांप्रमाणें आणखी किती तरी भाषेच्या लकबा कानडींतून मराठींत आल्या असाव्यात. पायांत जोडा, अंगांत अंगरखा, गळ्यांत माळ घालणें, तोंडांत मारणें, पाठीस लागणें, (अपराध) पोटांत घालणें, डोळ्याआड करणें, जीवावर येणें, इत्यादि ढबा केवळ कानडी आहेत. त्याला वाचायला येतें, हें वाक्य कानडींतल्या अवनिग ओदलिक्के बरूत्तदे ह्या वाक्याचें शब्दशः भाषांतर आहे. भक्ति करीत जा, सांगत बैस, तो असेंच सांगत आला आहे, ह्या लकबाहि कानडीच दिसतात. वरलीकडे म्हणजे पश्चिमेकडे; खालतीकडे म्हणजे पूर्वेंस हे प्रयोग, मेक्क (मेलादिक) आणि (कीळदिक) ह्या तामील प्रयोगाच्या हुबेहुब प्रतिमा आहेत. वीस (द्विदश), तीस (त्रिदश) इत्यादिप्रमाणें कानडींत ही दहाचीच दुप्पट तिप्पट करून मोजण्याचा व्यवहार आहे, इतकेंच नव्हे तर सत्तर न म्हणतां मराठे कुणबी तीन वीसा अन् दहा असें जें म्हणतात त्याचें मूळ कानडींतील मूर इपत्तु रदुहूत्त ह्या शब्दांत तंतोतंत आहे.
कानडींतल्या आणखी एका लकबेचा फार जोराचा छाप मराठीवर पडल्याचें उदाहरण म्हटलें म्हणजे मराठी शब्दाचें अंत्यस्वर ‘उ’ होणें. त्याचें कारण कोणी सांगतात कीं, अशा शब्दांपुढें संस्कृतांत विसर्ग होता, त्याचा ‘ओ’ झाला आणि मग त्याचा ‘ऊ’ झाला. कोणी म्हणतात कीं, कवितेंतील यमक साधण्यासाठीं हा उकारान्त होतो. पण पुढील जुन्या गद्य पंचतंत्रांतील उतारा पाहिला असतां हीं दोनहि कारणें लागू होत नाहींत असें दिसेल. “कव्हणी एके नगरी देव शर्मा म्हणिजे ब्राह्मणु; तयाचिये भार्येसि प्रसूति जाली. एकु पुत्र, एकु मुंगस, पुणु तयासि विश्वास तीना..... थोरू विलापू करूं आदरिला...” हा उकारान्त अनिश्चित रीतीनें होत असे आणि तो आतां प्रचारांतून पार गेला आहे; त्यावरून ही एक कानडीवरून घेतलेली ढब होती आणि ती आतां नाहीं एवढेंच अनुमान निघतें.