न्याँऊ

निरीक्षण ४ थें : ता. २० मार्च १९२७ रविवारीं सकाळीं ९ वाजतां आम्हीं न्याँऊ पश्चिम येथें पोंचलों. श्वेझिंगो पगोडा पाहिला. हा अनिरुद्धानें (इ. स. १०४४-१०७७) बांधण्यास सुरू करण्याचे पूर्वीं त्याचा समजला गेलेला मुलगा कॅझिटा ह्या राजानें (इ. स. १०८४ – १११२) केली. अनिरुद्धानें याटूनचा राजा मनुला ह्याला युद्धांत जिंकून त्याच्या सगळ्या प्रजेला कैदी करून पगानला आणिलें. मनुहानें इ. स. १०५९ त “मनुहाचें देऊळ” म्हणून प्रसिद्ध असलेला पगोडा पगानमध्यें बांधिला. शेवटीं त्याला असें मोकळें ठेवणें इष्ट न वाटल्यामुळें, अनिरुद्धानें त्याच्या कुटुंबांतील सर्व माणसें व त्याचे सर्व लहानथोर चाकर अनुयायी यांना देवळी गुलाम करून त्यांचा सामाजिक दर्जा अत्यंत क्रूरपणानें अतिशय नीच करून टाकिला. श्वेझिगाँ देवळाची झाडलोट करण्याचे कामावर इतरांप्रमाणें मनुहाची नेमणूक झाली. त्यापूर्वींहि देवळी गुलाम होतेच. मात्र मनुहाच्या वंशाला अशा देवळी गुलामांचें “राज्यपद” देऊन दुःखावर अपमानाचा डाग दिला. अगदीं आतांपर्यंत श्वेतछत्र, पायांत सोन्याच्या कलाबूतचा जोडा, घराला सरळ उभा जिना इ. राजचिन्हें मात्र मनुहाच्या वंशजांस अद्यापि कायम आहेत. मात्र त्यांना देवाचा नैवेद्य व देव्हा-यावरच्या देणगीशिवाय उपजीविकेचें साधन दुसरें नव्हतें. हें त्यांना पूर्वीं मुबलक मिळत असावें. एरव्हीं त्यांना अशा लवाजम्यानें कसें राहतां येईल.
अशा देवळी नोकरांना फयाचून - देऊळ – नोकर – अशी संज्ञा आहे. तुबायाझा आणि फयाचून हे एकमेकांस महाराष्ट्रांतील महारामांगांप्रमाणें कमी लेखितात. तुबायाझांचें म्हणणें आपण कधीं जिंकलेले गुलाम नव्हतों. फयाचुनांपैकीं मनुहाच्या खानदानी अनुयायांचें म्हणणें तर उघडपणेंच आपण श्रेष्ठ असून कोणतेंहि हलकें काम आपण केलें नाहीं. पण ज्या अर्थीं ते जिंकलेले गुलाम आहेत, त्या अर्थीं कोणी त्यांच्याकडे तिरस्काराशिवाय पाहणार नाहींत. आम्हीं ह्या गांवीं या लोकांचा राजा म्हणा, पाटील म्हणा, जो होता, त्याची भेट घेतली. त्याचें नांव उबाल्विन (Ubalwin) वय २७. हल्लीं हा आपल्या बायकोचे घरीं राहतो. तिचा बाप खाऊन पिऊन सुखी व स्वतः रुबाबदार दिसला. बायकोच्या माहेरचें मध्यम प्रकारचें दुकान व तिच्या बापाचा वैद्यकीचा धंदा आहे. घर दोन मजली व भोंवतालीं स्वच्छ आंगण, लतामंडप, भोंवतालीं कुंड्यांतून फुलें दिसलीं. उ बा ल्विन आतां फयाचून गांवचा राजा अथवा धनी ऊर्फ पाटील झाला आहे. ह्यांनीं सरकारी रजिस्टर काढून दाखविलें. त्यावरून ह्या फयाचून वाडींत ५०० घरें आहेत, असें आढळलें. लोकसंख्या सुमारें २००० असावी. ह्या गांवासाठीं एक सरकारी प्राथमिक मोफत शाळा आहे. पण ह्या लोकांवरचा बहिष्कार पूर्वींप्रमाणें आतां कडक नाहीं. ह्यांच्या विहिरींतील पाणी वरचे वर्ग खुशाल पितात. उघड रोटीबेटी व भेटीव्यवहार मात्र अद्यापि होत नाहींत. त्यांच्यापैकीं बरेच लोक दुसरीकडे खाऊन पिऊन सुखी आहेत, व ते बिनबोभाट वरच्या वर्गांत मिसळून जातात.
पक्वोक म्हणून एक जिल्ह्याचा गांव आहे, तेथें एक गृहस्थ ४०|५० हजारांचे मालक आहेत. ते म्युनिसिपालिटीचे सभासद आहेत, घरीं स्वतःच्या मोटारी आहेत, लाखेचीं भांडीं व इतर बरेच धंदे करितात. तुबायाझाप्रमाणें थडगी खणणें व भिक्षा मागणें हें ते करीत नाहींत. मात्र देवळांचे दारांतून फुलें, मेणबत्त्या, उदकाड्या, पंखे वगैरे विकणा-या दुकानांची जी रांग असते, ती ह्याच लोकांची. पण अलीकडे हीं दुकानें वरील वर्गाचे गरीब लोकहि घालूं लागल्यामुळें फयाचून कोण, हें ठरविणें फार कठीण झालें आहे. नंतर आम्हांला उ बा ल्विन यांनीं पगानचे रस्त्याचे पश्चिम बाजूकडील वाडींत असलेला आपला वंशपरंपरागत खास वाडा दाखविला. हा खरोखरच आमच्याकडील खेड्यांतील एकाद्या श्रीमंत पाटलास शोभण्यासारखा आहे. वाड्याच्या नैर्ऋत्य कोप-याला लागून एक लाकडी मनोरा दिसला. तो सर्व घरांपेक्षां उंच होता. ह्यावर रखवालदार बसून रात्रीं पहारा करण्याची ही जागा. वाडा इतर घरांप्रमाणें खांबाच्या एका मजल्यावर उभा केला आहे. सर्व घर एकच मजली पण भक्कम व रुबाबदार दिसलें. पूर्वीं ह्याला दोन जिने (एक समोर व दुसरा आडवळणाचा भिंतीला समांतर असे) होते. समोरचा जिना पडल्यामुळें आतां दिसला नाहीं. ह्या समोरच्या जिन्याच्या पाय-या चढण्यास मात्र देशाच्या बादशहाशिवाय इतराला अधिकार नसे. सफाईदार सागवानी लाकडाचें सर्व काम होतें. खिडक्यांना व्हिनिशिअन शरसू होतें. दरवाजे विशेष सफाईदार दिसले. दिवाणखाना, निजण्याच्या खोल्या, स्वयंपाकघर हीं सर्व ऐसपैस, उंच व रुंद होतीं. एक मोठा रुंद लाकडी पलंग व त्यावर सुंदर मच्छरदाणी होती. घरांतील चटयाहि खानदानी थाटाच्या होत्या. एकंदरींत मोडकळीस आलेल्या इनामदारीचा दिसला, हें पाहून वाईट वाटलें.
उ बा ल्विन पाटलाची आई ६० वर्षांची वृद्ध आहे. तरी तिचें वय सुमारें ५० वर्षांचें दिसलें. चेहरा शांत प्रसन्न खानदानीचा दिसला. तिचे सर्व दांत स्वच्छ, बळकट, डोळे मोठे व पाणीदार दिसले. हिचा नवरा उ नान पाटील वारून आतां १८ वर्षें झालीं, असें तिनें सांगितलें. त्याच्या मागें तिच्या दोन मुलांना पाटीलकीचीं वस्त्रें मिळालीं. तेहि वारल्यामुळें सर्वांत लहान मुलगा उ बा ल्विनला आतां पाटीलकी मिळाली आहे. मी हिंदुस्थानांतील एक उदार (ब्राह्म) धर्माचा प्रचारक विशेषतः निकृष्ट वर्गाचा एक सेवक आहे, असें तिला सांगण्यांत आलें होतें, त्यामुळें ह्या देशांतील फौंजीपुढें जमिनीवर लवून त्रिवार नमस्कार करितात, तसा तिनेंहि मला नमस्कार केला. आमचें संभाषण चाललें असतां तिनें माझें काम व हृद्गत लवकर ताडलें. तसे तिचे पाणीदार डोळे दाबून ठेविलेल्या विरळ अश्रूनें स्निग्ध झालेले दिसूं लागले. शेवटीं सरकारला सांगून कांहीं तरी आपली दाद लावा, अशी स्पष्ट विनंति केल्यावांचून तिला राहवेना. हें माझ्या हातून ह्या धांवत्या सफरींत आणि उतार वयांत कसें व्हावें, हें आठवून मीहि किंचित् गडबडलो. मी केवळ मनःपूर्वक आशीर्वाद देऊन माझें समाधान करून घेतलें.
दक्षिण ब्रह्मदेशांत मोलमेनच्या उत्तर किना-यालगत थटून हें शहर इतिहासप्रसिद्ध आहे. ह्या स्थानीं दक्षिणेकडील सिंहली हीनयान बुद्ध धर्माची पहिली उठावणी झाली. येथें कांची येथूनहि बुद्ध धर्माची लाट आली. येथील राजे आंध्र वंशांतील हिंदी क्षत्रिय कुळांतील असून तेलंग ह्या नांवानें एक हजार वर्षांपूर्वीं त्यांचा दबदबा सा. पा. ब्रह्मदेशांत होता. पण इ. स. १०५० चे सुमारास पगानचा ब्रह्मी राजा अनिरुद्ध यानें थटून राज्यावरून सफाईनें नांगर फिरवून ह्या क्षत्रियांना आतां अत्यंत हीन बनविलेले प्रत्यक्ष पहाण्याची पाळी माझ्यावर आली !! इतिहासाची पुनरावृत्ति चहूंकडेच होते. आमच्या देशांत जे आज महार, मांग, पारिया, चिरुया, नामशूद्र, ह्या अनेक नांवांच्या जाती आहेत, त्यांनींहि एके काळीं राज्यवैभव भोगिलें, असें माझ्या संशोधनांत आढळलें आहे. पण इतका अलीकडचा उघड पुरावा मला आजवर मिळाला नव्हता, त्यामुळें मला संशोधनाच्या दृष्टीनें आनंद होत होता. किंवा मानवी स्वभावांतील आनुवंशिक विषारीपणाचा मासलाहि प्रत्यक्ष पाहून दुःख होत होतें ! हें उघड सांगण्यांत कांहीं तात्पर्य नाहीं. मी करीत आहे हें कार्य पवित्र आहे, येवढेंच मला पुरें आहे.
निरीक्षण ५ वें : शुक्रवार ता. १ एप्रिल १९२७ रोजीं सायंकाळीं प्रोम येथील श्वेसानडो ह्या मुख्य बगोडाच्या बाजूस असलेला तुबायाझाचा गांव पाहिला. गांव गरीब लोकांचा दिसला. गांव दाखवावयास एक इंग्रजी जाणणारे ब्रह्मी गृहस्थ बरोबर होते परंतु ह्या खेड्यांत शिरून चौकशी करण्याचें त्यांना धैर्य झालें नाहीं. एखाद्याची खासगी चौकशी करण्याची ब्रह्मी लोकांस फार भीड व भीति वाटते, असें दिसतें. मोलमेडमध्यें मला हाच अनुभव आला. ह्या गृहस्थांनीं मला मुकाट्यानें गांवापासून दूर नेलें. मला ब्रह्मी येत नसल्यानें स्वतः चौकशी करितां आली नाहीं व हे गृहस्थ तर फारच भित्रे दिसले. तेव्हां मी पगोडा येथें गेलों. तेथें एका वृद्ध गृहस्थाजवळ थोडी चौकशी केली. “हे तुबायाझा आहेत” ह्या पलीकडे हे गृहस्थ कांही सांगू शकले नाहींत.
येणेंप्रमाणें ब्रह्मदेशांतील मूळ बहिष्कृत वर्गांची हल्लींची स्थिति आहे. हिंदुस्थानांतून अलीकडे गेलेल्या अस्पृश्य जातीचे पुष्कळ लोक ब्रह्मदेशांत ठिकठिकाणीं पोटासाठीं अनेक हलकीं सलकीं व काबाडकष्टाचीं कामें करून आहेत. पण ते बहिष्कृत नाहींत.