ह्याचें मूळ हिंदुस्थानांतच होतें कीं बाहेरून आलें हें सांगणें इतिहासाच्या आळोक्याबाहेरचें काम आहे. कारण हा विषय वेदांहिपेक्षां इतका पुरातन आहे, कीं त्याला लेखी पुरावा नाहीं, ह्यांत कांहींच आश्चर्य नाहीं. मार्कंडेय पुराण व देवी भागवत अशीं पुस्तकें आहेत, पण तीं वैदिक धर्मियांनीं व अगदीं अलीकडच्यांनीं लिहिलीं असल्यानें अशा लेखी पुराव्यांत फारसा राम नाहीं. तुलनात्मक भाषा आणि लोकरूढी (Folk Lore) ह्यांवरून कांहीं अनुमानें काढतां येतील, पण कालनिर्णयाच्या बाबतींत हीं प्रमाणें अगदीं पंगू ठरतात. दुर्गा हें नांव वेदांतील रात्री ह्या देवीला होतें; काली, कराली, केशिनी, रुद्राणी, रोदसी इत्यादि नांवे अग्नि अथवा रुद्र ह्या वैदिक देवतांवरून जरी पडलीं असावीं, तरी ही देवी वैदिक नाहीं अशी स्पष्ट कबुली मॅक्समुल्लरनें दिली आहे. कदाचित् ही देवी ईशान्येकडून आली असावी असा मॅक्समुल्लरचा तर्क आहे. तिबेटांतून आलेल्या मोंगलांनीं (मुद्गलांनीं) किंवा ब्रह्मदेश सयामांतून आलेल्या ऑष्ट्रिकांनीं ही देवी आणिली असावी. देव अथवा सैतान वाचक मारू असा एक शब्द अथवा नांव पाली भाषेंत आहे, आणि मारी असें अत्यंत प्राचीन नांव ह्या देवीला आहे. त्यावरून ही देवी ईशान्येकडून आली असावी असा संभव दिसतो. मध्य प्रांतांतील डोंगरी प्रदेशांत, तेलंगणांत, महाराष्ट्रांत आणि सर्व द्रावीड देशांत विशेषतः ग्रामदेवता ह्या नात्यानें ह्या मरीआईची पूजा अद्यापि बलवत्तर आहे. हिचा संबंध पटकी, गोवर, देवी इत्यादि सांसर्गिक आजाराशीं विशेषतः लहान अर्भकांच्या आरोग्याशीं निकट आहे. गृह्यसूत्रांत शूलगव नांवाचा विधि आहे; त्यांत रुद्राच्या नांवाने बैलाचा बळी द्यावा लागत असे व त्याची वपा गांवाबाहेर फिरवून बैलांच्या गोठ्यांत पुरण्यांत येत असे, व जनावरांच्या आजारावर हा एक तोडगा करण्यांत येई. इंद्राणी, रुद्राणी, भवानी, अर्वीणी वगैरे देवींच्या नांवानें ह्या विधींत स्वाहा करावा लागत असे. हल्लीं मरीआईची जी रेडा मारून भयंकर गांवजत्रा दक्षिण महाराष्ट्र, तेलंगण आणि द्राविड देशांत करण्यांत येते, ती आर्यांनीं वरील शूलगज विधीच्या रूपानें किती प्राचीन काळीं घेतली हें दिसतें. चंडी, मुंडी, मातंगी अशीं जीं नांवें ह्या देवीचीं आहेत त्यांवरून चंड, मुंड आणि मातंग - खरें नांव मांग किंवा माँग हें आहे - ह्या ईशान्येकडून आलेल्या राष्ट्राची ही देवी असावी. सर्व हिंदुस्थानांत उत्तरेपेक्षांहि विशेषतः दक्षिणेंत आणि पूर्वेस, हिचें अधिक साम्राज्य आहे. ह्यावरून ही देवता कदाचित् हिंदुस्थानांत मूळचीच असावी, असाहि बराच संभव आहे. कित्येक मानववंशशास्त्रवेत्त्यांचें असें मत आहे कीं, ही देवी असीरिया किंवा बाबिलोनिया देशांतून आलेल्या असुर लोकांनीं ह्या देशांत आणिली असावी. असुर अथवा द्राविड आर्यांप्रमाणेंच वायव्येकडून, परंतु आर्यांपूर्वी हजारों वर्षें येथें आले असावेत. आर्यांनी जसा घोडा हा प्राणी हिंदुस्थानांत प्रथम आणिला, तसा द्राविडांनीं बैल प्रथम आपल्याबरोबर आणिला; त्याच्याहि अगोदर आलेल्या किंवा येथेंच मूळचे असणार्या कोल, मांग वगैरे लोकांजवळ म्हैस, रेडा हा प्राणी होता. ह्या असिरियांनीं ऊर्फ द्राविडांनीं आपल्या देवीच्या साह्यानें ह्या म्हैस पाळणार्या कोल (माँग) जातींचा पराजय केला, म्हणून त्या देवीला महिषासुरमर्दिनी हें नांव पडलें. अगदीं दक्षिणेकडच्या तिनेवल्ली जिल्ह्यांत आदिचिन्नलूर गांवीं संशोधकांना नुकतेच कांहीं अत्यंत प्राचीन स्मशानघाट सांपडले आहेत त्यांत कांशाचीं चित्रें आणि मूर्ति मिळाल्या, त्या मद्रास म्यूझियममध्यें हल्लीं ठेविल्या आहेत. ह्या मूताअत कुत्र्याच्या आणि रेड्याच्याच आकृति आहेत, इरत प्राण्यांच्या नाहींत. ह्यावरून दक्षिण हिंदुस्थानांतील कोल, मांग इ. मूळच्या म्हैसवाल्यांच्या आणि उत्तरेकडून आलेल्या द्राविड बैलवाल्यांच्या लढाया होऊन बैलवाल्यांची सरशी होऊन महिषासुरमर्दिनीचा उदय झाला असावा. महिषासुरमर्दिनीच्या सुंदर मूर्ति जावा आणि सुमात्रा बेटांतील जुन्या हिंदु देवळांतहि आढळतात.
चंडी, मुंडी, काली, कराली इ. देवींचीं जशीं उग्र रूपें आहेत, तशींच त्रिपुरसुंदरी, सरस्वती, अन्नपूर्णा, वरदा, शीतला वगैरे सौम्य रूपेंहि आहेत. विशेषतः बंगाल्यांतील नामशूद्रादि खालील शेतकरी वर्गांत ह्या सौम्य देवीच्या मूर्ति मीं घरोघरीं धान्याच्या संचयावर ठेविलेल्या पाहिल्या आहेत. सरस्वती व अन्नपूर्णा ह्यांचा संबंध जमिनींतील पिकांशीं अधिक दिसला. अशाच प्रकारच्या उग्र आणि सौम्य स्वरूपाच्या देवी इष्टार अथवा ऍस्टोरेथ ह्या नांवाच्या प्राचीन बाबिलोनिया आणि फिनिशिया देशांत होत्या; आणि फिनिशिअनांचें हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्याशीं जलमार्गानें तसेंच बाबिलोनियाचें सिंध देशाशीं खुष्कीनें दळणवळण होतें. तरी पण द्राविड राष्ट्र हें बाहेरून आलें व त्यांनीं बैल हा प्राणी प्रथम हिंदुस्थानांत आणिला, ह्या विधानाच्या उलट जे सिंध प्रांतांत अत्यंत क्रांतिकारक शोध लागले आहेत, त्यांवरून पुरावा मिळतो. सिंधमध्यें उकरून काढलेल्या ४०००।५००० वर्षांमागच्या शहरांतून ज्या प्राचीन संस्कृतीच्या असंख्य वस्तु पुणें येथील ऑर्किऑलॉजिकल ऑफिसमध्यें ठेवल्या आहेत, त्यांत हिंदी बैलांच्या अत्यंत सुबक आणि सुंदर आकृति आहेत. ही संस्कृति आर्यांपूर्वी हजारों वर्षे येथें असलेल्या द्राविड अथवा सुमेरियन सुमेरुवंशी राष्ट्रांची आहे. मुंबई इलाख्याचे ऑर्किऑलॉजिकल सुपरिंटेंडंट रा. दीक्षित ह्यांनीं सांगितलें कीं, बाबिलोनिया देशांत ख्रिस्ती शकापूर्वी १००० वर्षापूर्वी बैल हा प्राणी नव्हता. तें कसेंहि असो. काली, कराली, चंडी इ. उग्र आणि सरस्वती, त्रिपुरसुंदरी, अन्नपूर्णा इ. सौम्य अशीं देवींचीं दोन्हीं रूपें हिंदुस्थानांतील मूळच्या देवीचींच आहेत, असें मानण्यासहि अद्यापि विशेष हरकत दिसत नाहीं. स्त्रीजननेंद्रियाला संस्कृतांत भग असा शब्द आहे. त्यावरून किंवा भग ह्याचा भौमिक संपत्ति किंवा ऐश्वर्य असाहि अर्थ आहे. त्यावरून देवीला भगवती अशी संज्ञा मिळाली. देवी भागवत हें पुराण प्रसिद्धच आहे. अठरा पुराणांत त्याची गणना आहे. श्रीमत्भागवत हें फारच अलीकडचें म्हणजे सन १२०० नंतरचें आहे.