शब्दकोश

(१३) वर सांगितल्याप्रमाणें कोंकणी ही भाषा कोंकणांतल्या मूळ रहिवाशांची नसून, तेथें फार तर हजार बाराशें वर्षांपूर्वीं गेलेल्या उप-या लोकांची असल्यामुळें तिच्या शब्दकोशांत मराठीशिवाय इतर स्वदेशी परदेशी, प्रचलित आणि मृत, इ. अनेक भाषांतील शब्दांची भेसळ मराठींतल्यापेक्षांहि फार झाली आहे. ह्याचें एक मुख्य कारण असें कीं, हिंन्दुस्थानचा सबंध पश्चिम किनारा कराचीपासून कन्याकुमारीपर्यंत पाश्चात्त्य धाडशी लोकांच्या स्वा-या, व्यापार, प्रवास इत्यादि अनेक प्रकारच्या दळणवळणाला अत्यंत प्राचीन काळापासून अगदीं मोकळा होता. हें दळणवळण सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रांतांशीं तसें नव्हतें. ह्या
किना-याला विशेषतः ठाण्यापासून खालीं कन्याकुमारीपर्यंत परशुरामक्षेत्र असें पौराणिक नांव आहे. प्रस्तुत कोंकणी भाषा ह्या परशुरामक्षेत्रभर पसरली आहे. तरी तिचा खरा भर रा. सा. डॉ. चव्हाण म्हणतात त्याप्रमाणें उत्तरेकडील सोपारें गांवाजवळील वैतरणीपासून तों दक्षिणेकडील कारवार जिल्ह्याच्या सीमेवरील गंगावली नदीपर्यंत आहे. त्यांतल्या त्यांत तिचें खरे वैशिष्ट्य राजापूर तालुक्यांतील खारेपाटण पासून खालीं कारवाराजवळील शिवेश्वर गांवापर्यंतच आहे. ह्याच्या उत्तरेकडील भागांत मराठीचा व दक्षिणेकडील भागांत कानडीचा व त्याच्याहि खालीं मल्याळीचा, वरचष्मा भासत आहे; आणि मधल्या भागांतील हल्लींच्या कोंकणींत शेंकडा निदान दहा तरी शब्द पोर्तुगीज भाषेंतून आले आहेत असें दालगादो यांचें मत आहे. तें खरें आहे. पोर्तुगिजांच्या अमलानंतर कोंकणी भाषेंत किंवा कोंकणी भाषेसंबंधी पोर्तुगीज भाषेंत जे कांहीं ग्रंथ झाले आहेत ते केवळ ख्रिस्ती पंडीतांच्याच श्रमांमुळें झाले आहेत. ह्या पंडीतांमध्यें पाश्चात्य धर्माचाच नव्हे तर पाश्चात्त्य भाषा आणि पेहरावांचाहि अभिनिवेश फार असतो. त्यामुळें पोर्तुगीज भाषेचें हें एकदशांश शब्दांचें ऋण मात्र त्यांना तत्काळ पटतें; त्याचप्रमाणें कोंकणीचा संस्कृताशीं ऋणानुबंधहि त्यांना सहज झुगारून देतां येत नाहीं. परंतु कोंकणीचा द्राविड भाषेशीं किती ऋणानुबंध आहे हें कबूल करण्याची पाळी येते, तेव्हां मात्र ह्यांचें पांडित्य विरघळूं लागतें. कानडी व इतर द्राविडी भाषेविषयीं लिहितांना कांहीं ख्रिस्ती विद्धानांचा जो चमत्कारिक प्रतिकूल ग्रह झालेला दिसतो तो रा. सा. चव्हाण यांच्या “कोंकण आणि कोंकणी” ह्या पुस्तकांतील खालील उता-यावरून स्पष्ट दिसत आहे.
“The Konkani language was at one time known as Lingua (Canarin or Canarina. Whatever may be the consideration that led early Portuguese to call it Lingua Canarin, the following comparative table from Mr. Saldana’s Notes on Goan language will show at a glance that Canarese or any of the Dravidian language had no hand whatsoever in building up of the Konkani dialect. The latter in fact shows a special affinity not only for Marathi and Sanskrit but also for Latin. (Page 14).
गोवें येथील “हेरल्डो” पत्राच्या ४४५१ अंकांत Mr. Stuarts Gomes लिहितात — “From the times of the Portuguese domination of Goa, the Goan Christians are dubbed as Canarians, and this term is considered offensive at present. The fact is that the Goans have nothing in common with Canarese or the Canarese people.”
शतकांचीं शतकें परधर्म व परराज्याच्या वातावरणांत वाढलेल्या अभिनिविष्टांचा कानडीवरील राग आणि लॅटिनवरिल प्रेम पाहून वाईट वाटण्याचें कारण नाहीं. पण अशांनीं दिलेल्याच तुलनात्मक शब्दावलीवर विसंबून रावसाहेब डॉ. चव्हाणांसारख्यांनीं कोंकणी ही कानडीपासूनच नव्हे तर प्रत्यक्ष तिची आई किंवा थोरली सख्खी बहीण मराठी हिच्याहूनहि भिन्न आहे किंवा स्वतंत्र आहे असें म्हणावें, हें मात्र आश्चर्य आहे. त्यांनीं आपल्या व्याख्यानांत कोंकणीहून मारठीची भिन्नता दाखविण्यासाठीं ज्या दोन चार शब्दांचीं कोष्टकें दिलीं आहेत, त्यांतील निदान तीनचतुर्थांश तरी शब्द मराठीहून मुळींच भिन्न नाहींत. त्या ख्रिस्ती मंडळींना, कदाचित् मराठी येत नसल्यास ही चूक शोभते, पण चव्हाणांना शोभत नाहीं. शब्दकोशाच्या दृष्टीनें पाहतां खुद्द चव्हाणसाहेबांनींच आपल्या चौदाव्या पानावर “हांव ताका नंबूना” = मी त्यावर विश्वास ठेवीत नाहीं, “कुडले यो” लवकर ये; वगैरै कानडीचा प्रभाव दाखविणारे प्रयोग कबूल केले आहेत, अशीं उदाहरणें आणखी विपुल देतां येतील. पण ही गोष्ट द्राविड द्वेषापासून मुक्त असलेल्यांनाच मात्र पटण्यासारखी आहे. कोंकणी ही मराठीच असल्यानें तिच्यांत मराठी शब्द किती आहेत हा प्रश्नच उरत नाहीं पण तिच्यांत संस्कृत तत्सम, मराठी तद्भव, आणि पोर्तुगीजशिवाय दुस-या भाषांचे इतके शब्द आहेत कीं, ते द्राविड अगर आर्येतर भाषांतूनच आले असणें शक्य आहे. खालीं कांहीं कोंकणी म्हणी देतों. त्यांत ज्या शब्दांखालीं टिंबें दिलीं आहेत त्यांच्याशीं संस्कृताचा फार दूरान्वय लागतो; व ज्यांच्याखालीं रेघ आहे त्यांचा संस्कृताशीं मुळींच संबंध लागत नाहीं, म्हणून ते आर्येतर शब्द असले पाहिजेत. हा संबंध कानडीच्या द्वारा लागतो, कीं तुळूच्या द्वारा, किंवा इतर कोणत्याहि आर्येतर भाषेच्या द्वारा हें तूर्त ठरविणें फारच कठीण आहे. तरी ते बहुतकरून द्राविड शब्द असावेत असें अनुमान करण्याला पंडितांनीं इतकें नाखुष कां असावें हें कळत नाहीं.
१ तोण्णी थोडी पूण खोंड वळो = तण (गवत) थोडें पण खड्डा मोठा. ह्यांतील तण थोडी व खड्डा हे शब्द मराठींत आहेत. थोडी आणि वळ्ळे हे शब्द कानडींत आहेत. पूण हा शब्द पुनः ह्याचा अपभ्रंश आहे. अपभ्रंश महानुभावी मराठींतच सर्वत्र आढळतो. पूण हा एक शब्द वगळला तर ही सर्व म्हण आर्येतर शब्दांची आहे हें उघड दिसतें.
२ दुवेक तेल आमास पुणवेक सुनेक दिवाळीचे दिवाळीक. मुलीला अमावस्येला व पौर्णिमेला तेल व सुनेला दिवाळीस. दूव = दुहिता हा संस्कृत शब्द मराठीपासून स्वतंत्र आहे. आमास आणि पुनव हे शब्द कानडीचे द्वारा अपभ्रंश पावलेले, संस्कृत तद्भव आहेत.
३ वकाल गोरे खायना, वाण भरलें बिकनांनीं = वधू (नवीन सून) (फणसाचे) गरे खात नाहीं (असें दिसतें मात्र), उखळ मात्र बियांनीं भरलें. ती चोरून खात असावी असा अर्थ. ह्यांत वकाल (वक्कल) हा कानडी शब्द आहे. वाण ह्याचें निरुक्त लागत नाहीं. बिकन हें बी ह्या अर्थीं मराठी शब्दाहून निराळें रूप आहे.
(१४) अशा दृष्टीनें शोध करून कोंकणींतल्या असंख्य शब्दांचा माग लावल्यास ते दूरान्वित तद्भव आहेत किंवा कोंकणांतलेच मूळ देश्य आहेत हें दिसून येईल; आणि हे शब्द इतके विपुल आणि कोंकणीशीं इतक्या जुन्या काळापासून एकजीव झालेले आहेत कीं, कोणाहि परप्रेरित पंडिताला कोंकणी ही आमूलाग्र आर्य भाषाच आहे आणि तिचा एक वेळ लॅटिनशींहि संबंध पोंचेल, पण द्राविड भाषांशीं पोंचणार नाहीं, असा तोरा मिरविण्याला मुळींच अवकाश सांपडेल असें दिसत नाहीं. माझा मुख्य मुद्दा असा आहे कीं, खुद्द मराठीचा जसा कानडीशीं निकट संबंध आहे, तसा शब्दकोशाच्या दृष्टीनें तरी किंबहुना जास्तच कोंकणीचाहि कानडी, तुळु, मल्याळी इत्यादि भोंवतालच्या द्राविडी भाषांशीं संबंध आणि ऋणानुबंध खास आहे.
कोंकणींत मराठींतल्याहून भिन्न अशा कांहीं देश्य शब्दांचाच भरणा नसून तिच्यांत कांहीं स्वतंत्र संस्कृत तद्भवांचाहि बराच भरणा आहे; त्यावरून ती भाषा कित्येक परकीय पंडितांना मराठीपासून स्वतंत्र असावी आसा भास होण्याचा संभव कसा आहे, पण ही खरी स्वतंत्रता कशी नव्हे वगैरे गोष्टींचा खुलासा खालीं २० व्या व २१ व्या कलमांत केला आहे.