तुकाराम

भागवत धर्माचा कळस तुकाराम. ह्यांना तर प्रसिद्ध श्रीशिवरायाच्या राजाश्रयाचाहि विटाळ सहन झाला नाहीं ! रामदासांनीं तो आश्रय संपादन केला, म्हणूनच उलट त्याला संतमालिकेंत स्थान मिळणें अशक्य झालें!! राजेलोकांनीं दिलेल्या देणग्या बडवे घेतात, पण त्यांचा वारक-यांच्या धर्माशीं कांहींच संबंध नाहीं. वारक-यांची हल्लींची घटना विशेष करून तुकाराममहाराजांच्या चौदा शिष्यांनीं त्यांतल्या त्यांत महाराजांच्या निधनानंतर शिष्य झालेल्या निळोबांनीं केलेली दिसते. तुकाराम ह्यांना नामदेवांचा अवतार समजण्यांत येतें. नामदेवांचा शतकोटी अभंगांचा पण तुकारामांनीं पूर्ण केला. त्यामुळें त्यांच्यानंतरच ‘ज्ञानदेव पाया व तुकाराम कळस’ अशी म्हण प्रचारांत आली आहे. पण ज्ञानदेवाचें चरित्रलेखन, त्याचें धार्मिक शिक्षण व त्याची कार्यसिद्धि सर्वस्वी नामदेवावरच अवलंबून होती. त्याच्या बुद्धिवैभवाची साक्ष पुढें एकनाथांनीं उजळ राखिली नसती तर ज्ञानदेवाची आठवणहि पार विसरून महाराष्ट्र आज कृतघ्न ठरला असता. ज्ञानदेव, नामदेव, एका, तुका, हीं जीं चार नांवें महाराष्ट्राच्या हृत्पटावर अक्षय्य कोरलीं आहेत, त्यांत ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद मुळींच नाहीं. येणेंप्रमाणें नामदेवानें स्थापिलेला भक्तिमार्ग प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या व अप्रत्यक्षपणें पंजाबाच्या उद्धारला आणि ह्या दोन स्वराज्यसंपन्न राष्ट्रांच्या द्वारां अखिल भारताच्या उद्धाराला एके काळीं कारण झाला. त्या नामदेवाची पुण्यतिथि पाळणें महाराष्ट्राचें आद्य कर्तव्य आहे, ह्यांत शंका नाहीं.