वर्धा शिक्षण परिषदेंत ज्याचा विचार व योजना झाली तें केवळ पोटार्थी शिक्षण होय. तें महत्वाचें नाहीं असें नाहीं, पण पोट म्हणजेच मनुष्य नव्हे, पोट भरलें कीं सर्व संपलें असें नसून, उलट पोट भरल्यावर मानवी जीवित सुरू होतें. त्याचा आज विचार करणें कर्तव्य आहे. श्री ख्रिस्तांनीं वर्णिलेल्या दहा धन्यावस्था (Beautitudes) उद्बोधनाचे वेळीं वाचण्यांत आल्या त्यांचें संपादन म्हणजे आत्मीय शिक्षण होय. तें प्राचीनकाळीं गुरुकुलांतून देण्यांत येत होतें असें सांगतात. त्या कुलांची कौलिकता कोणत्या दर्जाची होती हें पाहूं. हीं कुलें निबिड अरण्यांत असत. आजच्यासारखीं गर्दीचीं शहरें प्राचीन काळीं मुळीं नव्हतींच. जीं त्या वेळीं होतीं, त्यांच्या उपाधीपासूनहि हीं ऋषिकुलें दूर असत. ह्यां कुलांत ऋषीबरोबर त्याची पत्नी किंबहुना पत्न्याहि असत. त्यांची सेवा शिष्यांना अगदीं घरच्याप्रमाणें करावी लागे. ह्या घरोब्याचा मोठा इष्ट परिणाम निरनिराळ्या ठिकाणांहून आलेल्या शागिर्दांवर कळत न कळतहि घडत असे. शिक्षण देणें हें खरोखरी आईबापांचेंच काम. अगदीं प्राचीन काळीं आईबापेंच हें करीत असले पाहिजेत. पुढें जसजशी समाजाची घटना विकीर्ण होत चालली, तसतसा श्रमविभाग अवश्य होऊन, आईबापांची जागा शिक्षणापुरती गुरु व त्याच्या पत्नीकडे गेली. तरी शाळांचें घरगुती स्वरूप कायमच राहिलें. मात्र एक व्यंग राहिलें, तें हें कीं शिष्यवर्गांत मुलींना स्थान मिळेनासें झालें. त्या आईबापांकडेच राहून, चूल, मूल, दूध-दुभतें, जळण-काटूक वगैरे हस्त व्यवसायांत वाकब होत असल्या तरी विचार व्यवसायाला त्या मुकल्या. इतक्या कीं, पुरुषांप्रमाणें विज्ञानांत व अध्यात्मांत स्त्रियांना गतीच नाहीं; व ब्राह्मणादि वरिष्ठ वर्गाच्या स्त्रियाहि जातीनें अथवा वर्णानें शूद्रच असा समज बळावला. स्त्रियो वैश्या तथा शूद्राः स्तेपि यांति परां गतिम् । हा गीतेचा उदारभावहि गीतेपूर्वींचा अनुदार भावच प्रकट करितो. गीतेचा हा उदारभावदेखील इंग्रज राणीच्या जाहीरनाम्याप्रमाणें पोकळ आशीर्वादच ठरला. कारण मनुस्मृतींसारख्यांनी अधिकृत हातांनीं तोहि काढून घेतला; आणि होतां होतां हीं पूर्वींचीं गुरुकुलेंहि बंद झालीं. शेवटीं वैचारिक शिक्षण म्हणजे केवळ ब्राह्मणांचाच मिराशी हक्क झाला. क्षत्रियांना त्यांत कमीपणा आणि वैश्यांना अजागळाप्रमाणें व्यर्थपणा वाटूं लागला ! एकूण अध्यात्म म्हणजे केवळ पोट भरण्याचा धंदा झाला. आणि ख-या शिक्षणाचें दिवाळें वाजलें !
पाश्चात्य देशांत मध्ययुगांत ऑक्सफर्ड, केंब्रिंज, सालामांका वगैरे गुरुकुलें निघालीं. पण तीं संन्याशांनीं काढलीं होतीं. त्यांत स्त्रियांना शिष्य म्हणूनच नव्हे तर गुरुपत्नी म्हणूनहि शिरकाव नव्हता. गाईला आत्मा नाहीं. स्त्री म्हणजे एक मानवी गाय हाच समज तिकडेहि होता. ह्या शतकाचे आरंभीं हें प्रवचन करणारा ऑक्सफर्ड येथें शिकत होता. तेव्हां स्त्रियांचीं कॉलेजेस् ऊर्फ हॉल्स होते. पण त्यांना पदव्या मिळणें अशक्य होतें. त्यांना पास झालेल्यांना पदव्या मिळाव्यात असा विचार थोड्या दिवसांपूर्वीं पुढें आला होता तेव्हां पुरुष विद्यार्थ्यांनीं इतका गिल्ला केला कीं कॉलेजच्या खिडक्यांना एकहि तावदान राहिलें नाहीं, असें कळलें. पास झालेल्या विद्यार्थिनींच्या भग्न आशाच जणूं ह्या वक्त्यानें पाहिल्या ! ऑक्सफर्डमध्यें अंशतः तरी तेव्हां शिक्षणांत कौलिकता दिसली. पदव्यांत असहकार असला तरी प्रत्यक्ष शिक्षणांत कांही अंशीं सहशिक्षण होत होतें. अध्यापक गृहस्थाश्रमी होते. इतकेंच नव्हे तर त्यांच्या पत्नीच्या व सर्व कुटुंबाच्या सहवासाचा इष्ट परिणाम तरुण विद्यार्थ्यांवर घडत असलेला स्पष्ट दिसला. फार काय, वर्षांतून दोनदां सुटी सुरू होण्यापूर्वीं, वार्षिक पदवीदान समारंभाचे वेळीं आणि Eight’s week म्हणजे आइसीस नदीवरील बोटींच्या शर्यतीचे वेळीं ऑक्सफर्ड शहरीं विद्यार्थ्यांच्या स्त्री-नातलगांचा मोठा सामाजिक मेळा भरविण्यांत येत असतो. त्या वेळीं तरुणतरुणींचा गोड मिलाफ फार फलदायक होतो, ह्यांत संशय नाहीं. ह्या बाबतींत युनिटेरिअन् मॅंचेस्टर कॉलेजांतील सामाजिक जीवित केवळ आदर्शभूत आहे. कॉलेजचे विद्यार्थी फार तर १५-२० च असतात. त्यांना अध्यापक ५-७ ! त्यांच्या बायका, बहिणी, मुली ह्या सर्वांशीं तेथील प्रौढ विद्यार्थ्यांचा हमेशा संबंध येतो. अध्यापकांचे घरीं पाळीपाळीनें सर्व विद्यार्थ्यांना चहाचें अगत्याचें आमंत्रण असतें. दर रविवारीं कॉलेजचे देवळांत जाहीर उपासना असते. शिवाय प्रत्येक टर्ममध्यें एक सामाजिक संमेलन असतेंच. ह्यामुळें शाळा म्हणजे मुदतीचा कैदखाना नसून सुधारून वाढविलेलें कुटुंब हा अनुभव विद्यार्थ्यांना वरचेवर येतो. ह्यामुळेंच येथील विद्यार्थी भावी पाळकपणाच्या जबाबदार वृत्तीला पात्र होतात. तें असो.
आमचेकडे काय चाललें आहे ? आमचीं कॉलेजें म्हणजे विद्यार्थ्यांची खिल्लारें. वसतीगृहें म्हणजे घोड्यांच्या पागा. प्रोफेसरांच्या बायका असतात. पण, त्यांच्या गोठ्यांत गाईहि असतात. विद्यार्थ्यांपासून दोन्ही सारख्याच दूर. विद्यार्थिनी वसतीगृहें एका कोप-यांत लाजून बसल्यासारखीं त्याच आवारांत असतात. पण त्यांच्या रस्त्यावर इकडून विद्यार्थ्यांना येण्याजाण्याला सक्त मनाई आहे अशा ठळक पाट्या लटकत असतात. जणूं इतरांना मोकळीच ! मग बिचा-यांना घरोबा कोठून मिळणार? दुधाची तहान ताकावर भागविण्याकरितां हे कमनशिबी प्राणी – मुलें-मुली - रेस्टॉरंट व सिनेमांत घुसतात. मग नवमतवाद बोकाळतो ! त्याचें कारण “उच्च” शिक्षणाचा पाया शुद्ध नाहीं हेंच. आई जेवूं घालीत नाहीं, बाप भीक मागूं देत नाहीं, अशी अनवस्था होते. फुकट्या उपदेशानें पोट कसें भरणार ? ह्याला उपाय काय? उपाय उघड व सोपा आहे. पुरुषविद्यार्थ्यांबरोबरच स्त्रीविद्यार्थ्यांचें शिक्षण झालें पाहिजे. तें हल्लीं कसेंबसें अंशतः चाललें आहे. मनापासून व पूर्णपणें, प्रवाहानें नव्हे; जाणूनबुजून जबाबदारपूर्वक चाललें पाहिजे. सहशिक्षण ही शिक्षणशास्त्राची आवश्यक शर्तच आहे. येथें टाळाटाळी काय उपयोगाची ? आईबापांच्या घरीं ज्या साहचर्यानें मुलांमुलींना भावंडपणा येतो, तोच अति कुशलतेनें, दक्षतेनें, विशेषतः सहानुभूतीनें अध्यापकांनीं आपल्या संस्थांतून आणिला पाहिजे. पण भावंडपणा मातृपितृपणाशिवाय कसा येणार ? मायेशिवाय रड नाहीं, जाळाशिवाय कढ नाहीं. पुरुषांचे शिक्षण पुरुष चालवितात. तसेंच स्त्रियांचें शिक्षण चालविण्याकरितां कांहीं स्त्रिया एम्. ए., बी. टी. टी. डी. चे झगे घालून दिमाखानें पुढें येत आहेत. फार ठीक. पण हा अर्धवटपणा पूर्वीं एकपक्षी होता तो आतां दोहोंपक्षीं झाला. दोन निम्मे एक गणितांत होतो तसा शिक्षणांत कसा होईल ? आंकडे निर्जीव व मानीव आहेत, तसे मानवी आहेत. नव्हत तेथें दोन अंक म्हणजे एक पूर्ण अंक ऊर्फ घटक चयार होतो. म्हणून सहाध्ययनाबरोबर सहाध्यापन आवश्यक आहे.
शिक्षकाची पत्नी म्हणजे शिकलेली बी. टी. पाहिजे असें नव्हे. ती नसलेलीच बरी. ती सहानुभूतीची स्त्री असली कीं पुरे. वकिलीच्या धंद्याला वकिलीण, डॉक्टरीच्या धंद्याला डॉक्टरीण पाहिजे असें नाहीं. पण शिक्षकाला त्याच्या पत्नीच्या साहचर्याची आवश्यकता आहे. शिक्षण कौलिकच पाहिजे. एरवीं शिक्षणाला हल्लींप्रमाणें गिरणीचें स्वरूप येतें. आम्ही खातों ते तांदूळहि हातानें सडावेत, नाहींतर त्यांतील कस व गोडी जाते, असें गांधी म्हणतात. पण विद्यार्थ्यांची गोडी व कस पार पिळून निघत आहे. ती वांचविणारा गांधी कधीं येणार ? विश्वविद्यालयांतून मातृभाषांचें माध्यम पाहिजे असें इतर ओरडतात. पाहिजे हें खरेंच. पण जेथें माताच नाहीं, तेथें नुसता भाषेचा कोण अट्टाहास ! मातेनें भाषा येईल, कां भाषेनें माता येईल ? शाळा म्हणजे कुटुंब होईल, त्या दिवशींच राष्ट्र म्हणजे बृहत् कुटुंब, तेव्हांच स्वराज्याची पोकळ बडबड थांबेल?
हे शिक्षणावरील विशेष आणि मूलभूत विचार आज प्रकट करण्याचें कारण कीं येथें पुणें शहरांतील तीन निरनिराळ्या वसतीगृहांतील पुरुष विद्यार्थी, आणि प्रार्थनासमाजाच्या मताचीं चार निरनिराळीं कौटुंबिक उपासनामंडळें सर्व दिवसभर धर्मसाधनासाठीं जमलीं आहेत. पुरुषविद्यार्थ्यांप्रमाणें तितकींच स्त्रीविद्यार्थ्यांच्या वसतीगृहाची सोय अद्यापि कोणी करीत नाहीं हें मोठें दुर्दैव. आणि जरी तशी सोय झाली तरी त्यांचा सहयोग होण्याचे दिवस अजून आले नाहींत. अशी सहवसतीगृहें झालीं तरी, त्यांच्यावर दिवसरात्र देखरेख करणारे गुरु व गुरुपत्नीचें दांपत्य आपल्या प्रेम-पंखाखालीं आत्मीय शिक्षणाचें काम करूं लागल्याशिवाय धर्मशिक्षणाच्या वल्गना ज्या अलीकडे चालल्या आहेत त्या अगदीं व्यर्थ आहेत. असें कधीं होईल तेव्हां होवो; तूर्त हीं गृहें व हीं उपासनामंडळें ह्यांचा परस्पर परिचय व्हावा, स्नेह वाढावा, आणि सर्वांचें एक जिवंत जागृत आत्मियकुल बनावें, ह्या पवित्र हेतूनें आजचें हें संमेलन भरविण्यांत आलें आहे. लहानथोर स्त्रीपुरुष आज जवळ जवळ २०० चा जमाव ह्या (फर्ग्युसन कॉलेजजवळील) टेकडीवर उघड्या हवेंत जमला, ही मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. विश्वधर्माचा हा विजय आहे. तिसरे प्रहरीं संगत-सभा होईल त्यांत कांहीं तरी निश्चय करून पुढील वर्षीं सहकार्य सुरू व्हावें, म्हणजे बरें.