ऐतिहासिक विवेचन

(५) हें विवेचन बाह्य पुराव्यांनींच होणारें आहे. पण अशा पुराव्यांची तूर्त तरी अत्यंत वाण आहे.
प्रथम आपण ही भाषा प्रांतीय (Territorial) आहे कीं जातीय (National) आहे, हें पाहूं. कोंकणांतच ही भाषा आढळते, येवढ्याच आकुंचित अर्थानें ही भाषा हल्लीं प्रांतिक गणली जात आहे. पण मुळांत ही भाषा कोंकणी नव्हती. म्हणजे कोंकण प्रांताशीं हिचा पूर्वापार संबंध नाहीं. हजार-बाराशें वर्षांपूर्वीं ही भाषा कोंकणांत प्रचारांत असणें संभवनीय नाहीं. त्या वेळीं हा सारा किनारा कानडीनें हस्तगत केलेला होता, हें इतिहासावरून व उपलब्ध शिलालेख व ताम्रपटांवरून दिसतें. भूगर्भशास्त्राच्या दृष्टीनें जरी कोंकण हा प्रांत अर्वाचीन आहे, तरी ह्या कोंकणपट्टीचें व्यापारी दळणवळण फिनिशियन नांवाच्या अति प्राचीन दर्यावर्दी राष्ट्रानें पाश्चात्त्य इजिप्त, असीरिया, व त्याच्याहि पलीकडच्या प्राचीन राष्ट्रांशीं ठेविलें होतें, असे दाखले बरेच मिळतात. कापसाचें व रेशमाचें तलम कापड, मिरीं, वेलदोडे व इतर मसाले, मयूर, वानर इत्यादि प्राणी वगैरे माल, या फिनिशियनाकडून द्राविड सुसंपन्न देशांतून पाश्चात्त्य राजवटींना पुरविण्यांत येत असे;  व त्यासाठीं पश्चिम किना-यावर नामांकित बंदरेंहि असत. इतका प्राचीन काळ सोडून, केवळ मध्ययुगीन संस्कृति जरी विचारांत घेतल्या तरी, ठाण्यापासून खालीं गोकर्णापर्यंत कानडीचें, तेथून खालीं दक्षिण कानडा जिल्ह्यांतील कासरगोड तालुक्यापर्यंत तुळु भाषेचें व त्याच्याहि खालीं सबंध केरळ देशांत तामिळचें (जिचें परिणत स्वरूप सुमारें तीन शतकांपूर्वीं हल्लींच्या मल्याळीं भाषेंत होऊं लागलें), अशीं ह्या किना-यावर निरनिराळ्या भाषांचीं साम्राज्यें होतीं. मौर्य, कदंब, चालुक्य इत्यादि उत्तरेकडील राजवट्यांचा पसारा इ. स. पूर्वीं निदान २०० वर्षांपासून पुढें ह्या किना-यावर होऊं लागला. तोंपर्यंत द्राविडी भाषांच्या साम्राज्याच्या केसालाहि धक्का नव्हता; व पुढेंहि कित्येक शतकें राजकीय साम्राज्य ढांसळलें तरी, भाषाविषयक द्राविडचा अम्मल जनतेमध्यें चालू होता. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे कोंकणी ही कोंकणांत प्रांतिक अथवा स्थानिक भाषा नसून उपरी आणि जातीय भाषा आहे हें सिद्ध होतें. आतां ती कोणत्या जातीची किंवा राष्ट्राची भाषा होती, हा प्रश्न उरला.