फ्याचून

फयाचून : ह्या नांवाचा अर्थ देवळी गुलाम असा आहे. ब्रह्मदेशांतील देवस्थानें अत्यंत पवित्र मानलीं जातात. इतकीं कीं युरोपियनांना देखील पादत्राण घालून देवळांतच नव्हे तर भोंवतालच्या विस्तीर्ण आवारांतहि पाय टाकण्याची छाती होत नाहीं. अशा बाबतींत युरोपियनांचेहि खून पडले म्हणून जोड्याविषयीं सरकारी ठराव आणि वटहुकूम मोठमोठ्या पाट्यांवर आवारापासून कांहीं अंतरावर जाहीर केलेले आढळतात. देवळें पवित्र तरी देवळी अपवित्र हें मोठें कोडेंच मला पडलें. शोध करितां देवळीच नव्हत तर देवळांत वाहिलेले इतर पदार्थ - फळें, फुलें, सुगंधी पदार्थ व नैवेद्य सर्वच वस्तु मनुष्यांना अग्राह्य आहेत. ह्या न्यायानें फयाचून म्हणून जो देवळी गुलामवर्ग तोहि पूर्वीं अग्राह्य असला पाहिजे. तो कालांतरानें त्याज्य व नंतर अपवित्र मानला असणें अगदीं संभवनीय आहे. ह्या गुलामवर्गांत पूर्वीं बहुतेक धरून आणलेले राजकैदी असत. ह्याचें एक उदाहरण अत्यंत हृदयद्रावक पण अगदीं इतिहासप्रसिद्ध आहे तें असें.
दक्षिण-ब्रह्मदेशांत मोलमेन शहराचे उत्तरेस २०-२२ मैलांवर किना-यालगत थटून म्हणून एक इतिहासप्रसिद्ध प्राचीन राजधानीचा गांव आहे. तेथें इ. सन ११ व्या शतकाच्या मध्यसमयीं मनुहा नांवाचा तेलंग राजा राज्य करीत होता. ह्या प्रदेशांत द्राविड देशांतून कांची येथून गेलेला “हीन यान” बौद्ध-धर्म जोरावर होता. उत्तरेकडे ऐरावती नदीचे कांठीं पगान येथें अनिरुद्ध नांवाच्या ब्रह्मी जातीच्या राजानें जेव्हां पहिली ब्रह्मी बादशाही स्थापिली तेव्हां दक्षिणेंत थटून येथें मनुहा राज्य करीत होता. अनिरुद्धाला उत्तरेकडील भ्रष्ट बौद्ध - धर्माची सुधारणा करावयाची होती. थटूनकडून नामांकित बौद्ध भिक्षू पगान येथें जाऊन अनिरुद्धाच्या राष्ट्रीय कार्यांत मार्गदर्शक झाला. त्यानें थटून येथें बौद्ध त्रिपिटक ग्रंथाच्या प्रती आहेत त्या मिळविण्याचा अनिरुद्धास मंत्र दिला. सामोपचारानें मागून मनुहा त्रिपिटक देत नाहीं, म्हणून त्यावर रागावून अनिरुद्धानें मनुहाच्या राज्यावर मोठी चाल करून त्रिपिटकच नव्हे तर त्याचें अक्षरशः सर्वस्व हरण केलें. म्हणजे त्याच्या राज्यांतील सर्व मौल्यवान चिजा ऐन जिनशी आपल्या राज्यांत नेल्या; इतकेंच नव्हे तर प्रजाहि गुलाम म्हणून आपल्या राज्यांत नेली. तेव्हांपर्यंत दक्षिण ब्रह्मदेशांतील संस्कृति दक्षिण हिंदुस्थानांतील आंध्र आणि द्राविड देशांतून दक्षिण ब्रह्मदेशांत हीनयान बौद्ध संस्कृतीचे मार्गानें गेली होती; ती ह्या बुद्धापुढें उत्तर ब्रह्मदेशांत पसरूं लागली. थटूनचे बौद्धग्रंथ, बौद्धभिक्षू, आचार्य आणि करागीर नेले इतकेंच नव्हे तर सर्व राजघराणें आणि दरबारहि गिरफदार करून पगान येथें नेण्यांत आलें. शेवटीं त्या थटून राजघराण्यासह सर्व नामांकित प्रजेला पगान येथें बांधलेल्या नवीन पगोडामध्यें बहिष्कृत देवळी गुलाम म्हणून कायमचे वंशपरंपरा नेमण्यांत आलीं. मीं थटून आणि पगान हीं जुन्या संस्कृतींचीं दोन्ही ठिकाणें शिल्पशास्त्र, समाजशास्त्र आणि धर्मशास्त्राच्या तिन्ही दृष्टीनें निरखून पाहिलीं. दक्षिण ब्रह्मदेशांत ब्रिटिशांचा अंमल जसा इ. स. १८२५ चे सुमारास बसला तसाच तो उत्तर ब्रह्मदेशांत १८८५ सालीं बसून सर्व ब्रह्मदेश नव्या मनूंत आला. ह्या साठ वर्षांच्या अंतरामुळें मला दक्षिण देशांत बहिष्कृत वर्ग कोठेंच आढळला नाहीं. तो पाहण्यास मला उत्तरेकडे मनुहा पगानला जावें लागलें. पगान येथील बहिष्कृत वाड्यांत मनुहा राजाचें घराणें, वाडा, व त्याचा हृदयस्पर्शी लवाजमा अद्यापि आहे. शेवटचा पुरुष ऊ बा ल्विन हा २६ वर्षें वयाचा पाणीदार तरुण व त्याची खानदानी वृद्ध आई मीं डोळ्यांनीं पाहिली. त्यांचीं गा-हाणीं ऐकलीं. न्याऊ ह्या बंदराजवळ श्वेझीगो नांवाच्या मोठ्या राष्ट्रीय पगोडाजवळ एक फयाचूनांचें एक वेगळे खेडें आहे. त्याचा थजी ऊर्फ पाटील म्हणून ब्रिटिश सरकारनें उ बा ल्विनची नेमणूक केली आहे. कारण तो मोठ्या राजवंशांतील पिढीजाद फयाचून आहे.
फयाचून हे लोक लहानमोठ्या देवळांत दहीं, फुलें, माळा, उदकाड्या, मेणबत्त्या विकण्यासाठीं दुकानें मांडून बसलेले आढळतात. हा धंदा किफायतीचा असल्यानें अलिकडे फयाचून नसलेल्या इतर अंतःकृत लोकांचींहि अशीं दुकानें आहेत. उलट फयाचूनहि आपलें मूळ लपवून अंतःकृत वर्गांत सर्रास मिसळत आहेत. ह्यामुळें खरा फयाचून कोण हें ओळखून काढणें मोठें मुष्किलीचें काम आहे. विशेष तपशील निरीक्षण नं. ४ यांत पुढें दिला आहे.