वारकरी पंथाची लोकसत्तात्मकता

पंढरीचा वारकरी पंथ उभारण्यांत ज्ञानेश्वरीपेक्षां नामदेवाच्या गाथेचीच मदत अधिक झाली आहे. नामदेवाचें नांव उत्तर हिंदुस्थान आणि विशेषत: पंजाबांत प्रसिद्ध होऊन त्याचीं जोमदार हिंदी पदें शीख लोकांच्या ग्रंथसाहेबांत कायमचें ठाणें देऊन बसलीं आहेत. इतकेंच नव्हे तर नामदेवाच्या समाधीवर पंजाबांत गुरुदासपूर जिल्ह्यांत घुमण नांवाच्या गांवांत शीख लोकांनीं बांधलेलें एक सुंदर जुनें मंदिर अद्यापि आहे. ह्यावरून नामदेव महाराज हे अखिल भारतीय भागवतपदावर आरूढ होऊन चुकले आहेत, ह्यांत आतां शंका घेण्याचें कारण उरलें नाहीं. नामदेव-ज्ञानदेवाचे काळींच ह्या पंथाचें धुरीणत्व सर्व जातींच्या संतांनीं घेतलें. ह्या पंथांत केवळ कोणत्याहि एकाच व्यक्तीचें प्राधान्य नसून भागवतधर्माचें विशेष तत्त्व जें लोकसत्तात्मकत्व, तें तर सर्व हिदुंस्थानांतील त्या वेळच्या पंथांमधून दिसून येत होतें, पण ह्या नवीन तत्त्वांचा पूर्ण विकास जसा आणि जितका महाराष्ट्रांत झाला आहे तितका पंजाब सोडून इतर कोणत्याहि प्रांतांत झालेला आढळणार नाहीं. पंढरपूरच्या देवळांतील बडवेपण म्हणजे पोट भरण्याच धंदा जरी आतां ब्राह्मणांनीं आपलासा केला आहे, तरी प्रत्यक्ष देव आणि त्याच्या भजनाचा प्रकार आमूलाग्र सामान्य जनतेच्या ताब्यांतच अद्यापि आहे. कीर्तनाच्या सांप्रदायांत तर महार चोखामेळ्यानें प्रवीणत्वच मिळविलें आहे. वारक-यांचे मुख्य दोन फड १ देहुकर आणि २ वासकर. हे दोन्ही निर्भेळ ब्राह्मणेतरांच्या स्वाधीनच आहेत. ठरलेल्या संतमालिकेंत तर ब्राह्मण-ब्राह्मणेतर हा वाद माजविणें हें वारकरी वर्गांत मोठें पाप समजलें जातें. ह्या मालिकेंत बहुसंख्या ब्राह्मणेतरांचीच आहे. त्यांच महार, चांभार आणि वेश्याहि आहेत ! ज्याच्या गळ्यांत वीणा त्याची जात न पाहतां ब्राह्मणहि श्रद्धेनें त्याच्या पायांवर डोकें टेकतात आणि आनंदानें गोपाळकाल्याचा भाग परस्परांच्या तोंडांत घालून सेवन करितात! एकनाथासारख्या संतानें महाराचा भोजनव्यवहारांतहि विटाळ मानला नाहीं, मग इतर ब्राह्मणांच्या भेदभावाचा शिरकाव होणें दूरच राहिलें. तसेंच शिव आणि विष्णु हाहि भेद नाहीं. एकनाथ व इतर महाराष्ट्र भागवतांची बहुसंख्या नाथपंथी शैवच होती. इतर कांहीं तर शाक्त, लिंगायत आणि मुसलमानहि होते. ह्या पंथांत मूर्तिपूजा, सोवळेंओवळें, व्रथवैकल्यें, तीर्थविधि, मंत्रतंत्र, यज्ञयाग, दान, तप वगैरे कशाचेंहि मुळींच थोतांरड खपत नाहीं. ज्यानें जावें त्यानें एकदम धुळीच्या पायानिशीं देवाला प्रत्यक्ष आलिंगन द्यावें ! मग तो पुरुष असो, स्त्री असो, राजा असो, रंक, विधवा अथवा वेश्या असो. अठरापगड जातींच्या निरनिराळ्या वारक-यांचे सर्व हक्क समान आहेत. विशेष हा कीं, महाराष्ट्र वारकरी पंथांत राधाभक्तीचें खूळ तर मुळींच खपत नाहीं. तें बंड केवळ बंगाल्यांतून आलेलें आहे व त्याचा खप केवळ तिकडेच आहे. आणखी एक विशेष हा कीं, ह्या पंथाला राजकारणाची विषबाधा अद्याप झालेली नाहीं. संस्थापनेच्या वेळीं काय झालें असेल तेंहि असो. तें अगदीं अनिश्चितच आहे. पण जर एखादा धर्म केवळ जनतेच्या आश्रयानें व बळावरच चालला असेल, आणि त्याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ह्या त्रैवर्णिकांच्या कुटिल नीतीचा विटाळ झाला नसेल, तर तो हाच एक पंथ अद्यापि उजळमाथ्यानें वावरत आहे !