भागवत धर्माचें ऐतिहासिक अवलोकन करतां करतां आम्ही वेदान्ताचें शेवटचें प्रस्थान जी अतिशय पवित्र भगवद्गीता तिचे जवळ आलों. हें प्रस्थान भागवत धर्माचें केवळ केंद्रच होय. सर्व हिंदुमात्रांचें हें आध्यात्मिक काळीजच म्हटलें असतां अतिशयोक्ति मुळींच होत नाहीं. ह्या ग्रंथांच्या उपासना, विवेचनें, पारायणें, भाष्यें, भाषांतरें आणि गुणगौरव जितके झाले आहेत तितके हिंदूंच्या दुस-या कोणत्याहि ग्रंथाचे झाले नाहींत. ह्या गौरवाच्या अनेक कारणांपैकीं एक कारण हें कीं, हा ग्रंथ हिंदूंच्या अनेक तत्त्वज्ञानांचा किंबहुना धार्मिक भावनांचाच नव्हे तर त्यांच्या धार्मिक इतिहासाचाहि एक अतिसंक्षिप्त निष्कर्ष आहे. इतकेंच नव्हे तर ह्या ग्रंथांनंतर हिंदुस्थानांतील अनेक भिन्न भिन्न धर्मांचा जो पुढें विकास झाला त्याला हा चिमुकला आणि चटकदार काव्यमय ग्रंथच प्रत्यक्ष अथवा पर्यायानें कारणीभूत झाला आहे. हें सर्व अत्यंत श्रद्धापूर्वक मानूनच आम्ही पुढील टीकात्मक विवेचन करीत आहों.
ही गीता अगदीं संक्षिप्त असली तरी अगोदर हल्लींहूनहि अधिक संक्षिप्त असावी आणि तिच्यांत वेळोवेळीं मागाहून भर टाकण्यांत आली असावी, हें सूक्ष्मदर्शीयांना सहज दिसण्यासारखें आहे. बाराव्या अध्यायानंतर गीताकारांनीं ती संपवली असती, तरी गीतेंत कांहीं उणीव भासली असती, असें नाहीं. पण हिंदूंच्या अनेक ग्रंथांप्रमाणें प्रस्तुत गीतेचेहि अनेक कर्ते असावेत असें दिसतें व ते मूळ गीतेंत भर टाकणारे निरनिराळ्या मताचे व मतलबाचे लोक असावेत, त्यामुळें ह्या ग्रंथाला केवळ अवास्तव पुनरुक्तीचाच नव्हे तर परस्पर विसंगतपणाचाहि दोष कांहीं अंशीं जडला आहे. अनेक इतर तेजस्वी गुणांत हे दोष झाकल्यासारखे आहेत, पण टीकेच्या दृष्टीला ते ढळढळीत दिसतात. ज्ञान, भक्ति, कर्म आणि वैराग्य ह्या चारी मानसिक अवस्थांची ह्या काव्यांत जी भेसळ झाली आहे, ती अगदीं बेमालूम एकजीव झालेली नाहीं. त्यामुळें जरी पुषक्ळदा पृथक् पृथक अवस्थांच्या माणसांना ही गीता मोहनीसारखी मोहून टाकीत आहे, तरी ज्यांच्यामध्यें ह्यांपैकीं कोणतीच अवस्था असावी तितकी उत्कट झालेली नसते, अशा वावदूकांना ही गीता म्हणजे एक भली खाशी भांडकुदळच गवसल्यासारखी होते. पहिल्या व्याख्यानांत सांगितल्याप्रमाणें प्रो. गार्बे ह्यांनीं ह्या गीतेंत निरनिराळ्या संप्रदायांचे सिद्धान्त आणि विश्वास ह्यांची निरनिराळ्या काळीं भर पडून हल्लीं उपलब्ध असलेलें हिचें स्वरूप किती संकीर्ण किंबहुना विसंगत झालें हें चांगलें दाखविलें आहे. थोडक्यांत गार्बे यांचा गीतेंतील धर्माविषयीं निर्णय असा आहे :- मुळांत या भागांत धर्माचा वेदांशीं कांहीं संबंध नव्हता, कृष्ण अथवा वृष्णि कुळांतील यादवांमध्यें श्रीवासुदेवानें ह्याचा प्रथम प्रसार केला. पुढें कांहीं बौद्धांनीं जसें बुद्धाला देवाप्रमाणेंच मानून त्यांनीं एक महायान पंथ स्थापला तसेंच कांहीं सोमवंशीय क्षत्रियांनीं ह्या वासुदेवाला भगवान बनवून कृष्णोपासक एकांतिक ईश्वर-धर्म स्थापून त्यांचें त्यांनीं एक मूळ गीतोपनिषद् रचलें असावें. ही गोष्ट बुद्धानंतर परंतु ख्रिस्तपूर्वीं अगदीं ढोबळ मानानें ३०० वर्षांच्या सुमारास झाली असावी. जैन आणि बौद्ध ह्या पूर्वेकडच्या सूर्यवंशी क्षत्रियांना जशी सांख्य आणि योग दर्शनाचीं मतें पसंत होतीं, तशींच पश्चिमेकडील ह्या सोमवंशीय क्षत्रियांनाहि हींच मतें पसंत होतीं. वेदान्तदर्शनाला विशेषत: पुढें आद्य शंकराचार्यांचे वेळी जें शुद्ध अद्वितीय वादाचें स्वरूप प्राप्त झालें तें ह्या वेळीं रूढ झालें नसावें, अणि पूर्वमीमांसेचा तर सर्व क्षत्रियांना कंटाळा येऊन त्यांतील कर्मठपणाचा अभिमानी जो ब्राह्मणवर्ग त्याच्याशीं ह्या दोहोंकडच्या सूर्य आणि चंद्र वंशी क्षत्रियांचे खटके उडूं लागले असावेत. बुद्धोपासक, जिनोपासक, आणि कृष्णोपासक क्षत्रियांमध्येहि आपसांत एकी होती असें मुळींच नव्हे. त्या प्रत्येकांचे इतिहास, पुराण आणि चरित्र-ग्रंथ ऊर्फ गीता अथवा जातकें अर्थात् निरनिराळे बनत चालले. ह्या भानगडीमुळें भारताप्रमाणेंच तदंगभूत मूळ भगवद्गीतेंतहि वेळोवेळीं सांप्रदायिक भर पडत चालली असावी. सांख्य योग, पूर्व-उत्तर मीमांसा, न्याय-वैशेषिक अशीं षड्दर्शनांचीं संलग्न जोडपीं आहेत. गीतेचे सांख्य-योगपर भाग आणि पूर्व-उत्तर मीमांसापर भाग कोणकोणते आहेत, हें गार्बे ह्यांनीं अत्यंत परिश्रमानें तपशीलवार पृथक् करून दाखविले आहेत. त्यांच्या मतें गीतेच्या विस्ताराचा काळ इ. स. पूर्वीं २०० पासून नंतर २०० वर्षांपर्यंत आहे. ह्या विस्तारांत मूळच्या एकेश्वरी गीतेंत अगदीं शेवटी शेवटीं ब्राह्मण वर्गानें आपलीं पूर्व आणि उत्तर मीमांसेचीं मतें घुसटलीं असें गार्बे म्हणतो. मला वाटतें अशोक मौर्याचें राज्य, त्याच्या मागें लवकरच पुष्यमित्र शुंग नांवाच्या सेनापतीनें बळकावून जी ब्राह्मणी धर्माची धामधूम अखिल भरतखंडांत उठविली तिच्याच साह्यानें पुढें कण्व नांवाच्या ब्राह्मण मंत्र्यानें क्षत्रियांना कायमचे चित् केले. बौद्ध, जैन आणि शैव भागवतांना पायबंद लावले; राम, कृष्ण इ. क्षत्रिय विभूतींच्या ऐतिहासिक स्वरूपाचा लोप करून त्यांचे नुसते पौराणिक देव्हारे माजविण्यासाठीं वेदांतील विष्णु ही अगदीं गौण देवता पुढें आणिली. क्षत्रियांच्या वर्चस्वालाच नव्हे तर सर्वसाधारण सनातन भागवत धर्मालाहि वैष्णव सांप्रदायाचें कायमचें ग्रहण लावून, पुढील युगांतील चिरस्थाई ब्राह्मणी वर्चस्वाची कायमची मेढ रोविली; वगैरे वगैरे ज्या क्रांतीकारक गोष्टी ख्रिस्ती शकापूर्वींच्या व नंतरच्या ह्याच एकदोन शतकांत घडल्या, त्याच आणिबाणीच्या काळांत वर गार्बेनें सिद्ध केल्याप्रमाणें मूळ गीतेला हल्लींचें संकीर्ण स्वरूप प्राप्त झालें असावें.
येथवर भागवत धर्माचा आमच्या देशांत निरनिराळ्या बाजूनें पाया कसा घालण्यांत आला व तो कोणीं, केव्हां, कोणकोणत्या नांवाखालीं घातला, हें सांगितले. ह्यापुढील भाग ह्या धर्माच्या सांप्रदायिक प्रसाराचा फार मनोवेधक आहे. तो पुढील तिस-या व्याख्यानांत सांगूं.