येथवर थोडक्यांत विचार झाला मराठींतील स्वतंत्र विचाराचा, किंवा मूळ ग्रंथनिर्मितीचा. यावरून जवळजवळ एक हजार वर्षांच्या मराठी वाङ्मयानें अगर महाराष्ट्रीय प्रासादिक वागभक्तांनीं महाराष्ट्राच्या मानसिक भांडवलांत कांहीं भरीव शिल्लक टाकली नाहीं, असें म्हणण्याला मात्र मी तयार नाहीं. पण या मुद्द्यावर अधिक चर्चा करण्यापूर्वीं मानसिक भांडवल किंबहुना तत्त्वज्ञान म्हणजेच काय ह्याचें किंचित् स्पष्टीकरण करणें अवश्य आहे.
द्वे विद्ये वेदितत्त्वे
इतिह स्म
यद्ब्रह्मविदो वदन्ति
परा चैवापरा च ।।४।।
तत्रापरा ऋग्वेदो यजुर्वेदः
सामवेदोSथर्ववेदः शिक्षा कल्प
व्याकरणं निरुक्तं
छन्दो ज्योतिषमिति ।।
अथ परा यया
तदक्षरमधिगम्य ते ।।५।।
मुंडकोपनिषद्-१ मुंडक. १ खंड.
वरील उता-यावरून अस्सल तत्त्वज्ञानाची गणना श्रौत वाङ्मयांत देखील होत नसे, असें दिसतें. पराविद्या ऊर्फ तत्त्वज्ञान हें अतिवाङ्मय असतें हेंच खरें.
“ यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह” असें प्रत्यक्ष ब्रह्मतत्त्वाचें लक्षण प्रसिद्धच आहे. त्या तत्त्वाचें ज्ञानहि अतिवाक् आहे असें मुंडकोपनिषद् म्हणतें. पण तें ज्ञान अतिमनस् आहे, असें मुंडक म्हणत नाहीं. तें शब्दज्ञानाचें पलिकडे असलें तरी मानवी हृदय आणि संकल्प ह्यांच्या पलीकडे नाहीं. म्हणून तें ज्ञान साक्षात्कारगम्य आहे खास.
“मनोवाचातीत तुझें हें स्वरूप||
म्हणोनिया माप भक्ति केली||१||
भक्तिचियें मापें मोजितो अनंता||
इतरानें तत्त्वतां न मोजावे||२||
ह्या उद्गारांत तुकारामानें भक्ति ही अतिमनस् आहे असें सहज म्हटलें ती त्याची केवळ नजरचूक आहे. तें कसेंहि असो. टाळ कुटणारे म्हणून ज्या वारक-यांची पावलोंपावलीं निंदा होते-आणि अशा निंदकांमध्येंच वामन पंडितासारख्या धेंडाचीहि भर पडत आली आहे ! त्या साक्षात्कारी कांहीं टाळकुट्यांनीं महाराष्ट्राच्या मानसिक भांडवलांतच नव्हे तर इतर पुरुषार्थामध्येंहि जी भर टाकली आहे, ती पंडितमन्य शाब्दिकांच्याहि हातून झाली नाहीं. ह्या भाविकांच्या अमूल्य कारागिरीची गणना तत्त्वज्ञासंबंधीं गद्य वाङ्मयांत करण्याऐवजीं काव्य वाङ्मयांतच केली असतां हा विषय अधिक निर्विवाद होईल.