वैदिक ऊर्फ ब्राह्मण धर्मांची आणि शैव, शाक्त, बौद्ध, जैन, वैष्णव आणि तर वैदबाह्य ऊर्फ भागवत धर्मांची झटापट सुमारें २००० वर्षांपूर्वीं भरतखंडांत कशी लागली, हें वर सांगितलें. बौद्ध व जैनांप्रमाणेंच शैव व वैष्णवादिक संप्रदायांना मी वेदबाह्य म्हणत आहें, ह्यांचे ब-याच तज्ज्ञांनाहि आश्चर्य वाटेल. वैदिक धर्माला मी ब्राह्मण धर्म म्हणत आहे, ह्यासंबंधीं कांहींजण आक्षेप घेतील, पण विचार व शोधाअंतीं माझे म्हणण्याची सत्यता सहज पटण्यासारखी आहे. जेव्हां वैदिक धर्माला केवळ पोकळ कर्मठपणाचें स्वरूप आलें, यज्ञयाग करणें कांहीं विशिष्ट वृत्तींच्या माणसांचा धंदा झाला व त्यांची एक जात अथवा जूट (Guild) बनूं लागली, तेव्हांच ह्या पोकळ कर्ममार्गाच्या उलट विरक्त ज्ञानमार्गाची उठावणी झाली. कर्ममार्गी ब्राह्मण आणि ज्ञानमार्गी क्षत्रिय अशा दोन जुटी किंवा जाती उपनिषद्-काळीं आर्य लोकांमध्यें निर्माण झाल्या, आणि जे आर्य ह्या धर्माच्या अगर परमार्थाच्या भानगडींत न पडतां आपली शेती, गुरेंढोरें, धंदा वगैरे ऐहिक व्यवहारांतच तृप्त राहून दिवस काढीत, त्यांची गणना वैश्य अथवा आर्यांचा बहुजनसमाज ह्या नांवाखालीं होऊं लागली. ह्या तीन जुटींचे तीन भिन्न वर्ण मानले जाऊन त्यांचें प्रथम त्रैवर्ण्य बनलें. पुढें ब-याच काळानें ज्या आर्येतरांनीं आर्यांच्या धार्मिक चालीरीति आणि आश्रय स्वीकारिला त्यांचा एक निराळा हीन वर्ण ‘शूद्र’ या नांवानें मानण्यांत आला. उपनिषद्काळांत चातुर्वर्ण्य नव्हतें, किंबहुना त्रैवर्ण्याचेंहि बंड पुढच्या काळींच उद्भवलें असावें. भगवद्गीतेंतील ‘स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेSपि यान्ति परागतिम्’ ह्या वाक्यावरून हें बंड त्या काळींच माजलें होतें असें दिसतें, म्हणजे ब्राह्मण व क्षत्रिय ह्या दोनच वर्णांचा शिरजोरपणा चालून शूद्रांना व आर्य वैश्यांनाच नव्हे तर ब्राह्मण-क्षत्रियांच्या स्त्रियांना देखील धर्माच्या दृष्टीनें हीन लेखण्यांत येत होतें, असें दिसतें. एरव्हीं गीतेंतल्या सुधारक धर्मानें ‘तेSपि यान्ति परागतिम्’ अशी थोरवी गाइली नसती. तात्पर्य इतकेंच, आर्यांचें कर्मकांड आणि कांहीं अशीं क्षत्रियांनीं उभें केलेलें ज्ञानकांडहि ब्राह्मण म्हणविणा-यांनीं आपलेंसें केल्यावर क्षत्रियांनीं, विशेषतः मथुरेकडचे सात्वतपुत्र ऊर्फ कृष्णायन, कपिलवस्तूचे शाक्यपुत्र ऊर्फ बौद्ध, वैशालीचे नाथपुत्र ऊर्फ (लाट) ह्यांनीं आपला भक्तिमार्ग ऊर्फ भागवत धर्म वैदिक धर्मांचे बंडाला तोंड देण्याकरितां निरनिराळ्या ठिकाणीं आणि वेळीं संस्थापिला. ह्यांपैकीं सात्वत अथवा भागवत धर्म हा मुळांत श्वेताश्वेतरोपनिषदाचे काळापर्यंत शैव आणि शाक्त मतवादी होता; तो पुढें गीतेच्या उत्तर काळीं वैष्णव संप्रदायी बनला. शैव-वैष्णव आणि बौद्ध-जैन व इतर लहानसान संप्रदाय पूर्वींसारखेच वेदबाह्य होते. निदान ते सर्व ब्राह्मणांना व कांहीं जुन्या मतांच्या क्षत्रियांना सारखेच तिरस्करणीय वाटत होते; कारण काय तर त्यांचा वेदांशीं संबंध नव्हता. त्या सर्वांना भागवत हें सामान्य नांव होतें. गुरुपूजा आणि त्या गुरूंची अथवा देवादिकांची मूर्ति, देवळें वगैरे पार्थिव साधनांच्या द्वारा भक्ति करण्याचा प्रघात शैवमतांत होता. त्यांच्या संसर्गानें प्रथम बौद्ध-जैनांमध्यें आणि नंतर त्यांच्या द्वारां वैष्णव संप्रदायांत हा प्रघात फारच बोकाळला. ही गुरुपूजा अथवा देवादिकांची पार्थिव पूजा आर्यांच्या अस्सल वैदिक धर्माला प्रथम मुळींच पसंत नव्हती. पण अस्सल आर्यवैदिक धर्म प्रथम बाहेरून आलेल्या मूठभर परकीयांचा होता. येथें भरतखंडांत असणा-या सुसंकृत अथवा असंस्कृत आर्येतरांमध्यें ब-यावाईट त-हेची ही गुरुभक्ति उर्फ श्रमणपूजा (Shramanism) पुरातन काळापासून चालत आलेली आहे. ह्या प्राकृत आर्येतरांच्या प्रागैतिहासिक धर्माची सुधारणा ज्या धर्मानें ऐतिहासिक काळांत केली, त्यालाच मीं ह्या व्याख्यानांतून ‘भागवत’ हें नांव दिलें आहे. ह्या धर्माचा मूळ संस्थापक जरी वासुदेव कृष्ण होता असे अंधुक पुरावे सांपडतात तरी खरे आणि उज्ज्वल संस्थापक भगवान् गौतम बुद्ध आणि महावीर वर्धमान जिन हेच होते, असा भरभक्कम ऐतिहासिक पुरावा आहे.