तुबायाझा

तुबायाझा : ह्या नांवांतील मूळ शब्द वर सांगितल्याप्रमाणें अशुभराजा ह्यासंबंधी मीं एक दंतकथा ठिकठिकाणीं ऐकली ती अशी :- ‘एकदां एका ब्रह्मी राजाची एक गर्भवती राणी अत्यवस्थ आजारी पडली. ती मेलीच असें समजून तिला स्मशानांत पाठविलें. थडग्यांत उतरवितांना ती जिवंत आहे असें आढळलें. स्मशानांत नेलेली राणी राजानें पुन्हा स्वीकारणें शक्यच नव्हतें. तिला थडगें खणणा-या संडाला जातींतच ठेवून दिलें व तिचे पोटीं पुढें जो राजपुत्र झाला त्याला अशुभराजा हें नांव पडले. त्याला संडालांचें मुख्य पद मिळून, स्मशानांतील धार्मिक संस्कारांत बौद्ध फौंजीला (भिक्षूला) जी दक्षिणा मिळेल तितकीच ह्या राजवंशालाहि मिळावी असें राजशासन मिळालें’. ही दंतकथा मला पगाम येथील तुबायाझांच्या खेड्यांतील पाटलानें व सगाईन येथील एका सभ्य गृहस्थानेंहि स्वतंत्रपणें सांगितली. कथा खरी असो नसो, ब्रह्मी संडाला लोक राजवंशाशीं आपला संबंध कसा पोंचवितात हें ह्यावरून दिसतें. मलबारांतील पुलयन, चिलमन ह्यांचाहि अन्य रीतीनें राजवंशाशीं कसा संबंध येतो हें मीं हिंदुस्थानांत पाहिलें तें मला स्मरलें. तुबायाझा हे बहिष्कृत असले तरी कधीं जित नव्हते असें त्यांचें म्हणणें आहे. हे संडालाहून – संडाला लोक मणीपूरच्या बाजूनें हिंदु संस्कृतीच्या राजानें प्राचीन काळीं ब्रह्मदेशांत नेले असावेत. ह्याशिवाय माझा तर्क दुसरा धांवत नाहीं. अलिकडे दक्षिण हिंदुस्थानांतील लक्षावधी पारया, फुलया इत्यादी अस्पृश्य जतींचे लोक पोट भरण्यासाठीं ब्रह्मदेशांत अगदीं हीन धंदे करून राहिले आहेत ते मुळींच बहिष्कृत नाहींत. पण हे संडाला मात्र प्राचीन काळीं गेलेले अद्यापी तुरळक तुरळक आपल्या जुन्या वतनाच्या गांवीं थडगें खणण्याचें आपलें जुनें वतनच चालवीत आहेत; त्याअर्थीं हे प्राचीन हिंदी संस्कृतीचें वतन प्राचीन हिंदी राजांनींच स्थापिलें असेल असें माझें मत आहे. विशेष तपशिलासाठीं पुढें निरीक्षण नंबर १ व ३ हीं पाहा.