पंजाब प्रांत

हिंदुस्थान हा एक देश नसून तो एक देशसमूह–निदान राष्ट्रसमूह-आहे, ह्यांत संशय नाहीं. गेल्या चार हजार वर्षांच्या इतिहासांत ह्या खंडप्राय देशाच्या सीमा पश्चिमेस इराणपासून पूर्वेस ब्रह्मदेश, सयाम, मलाक्का, द्वीपकल्प, जावा सुमात्रा या बेटांपर्यंत आणि उत्तरेस बल्क, तिबेटापासून तों दक्षिणेस सिंव्हलद्वीपापलीकडील समुद्रापर्यंत वेळोवेळीं मागेंपुढें सरकल्या आहेत. धर्म व संस्कृतीच्या दृष्टीनें पाहतां आणि बौद्ध धर्माच्या प्रसारामुळें, ह्या देशांतील धर्म, भाषा चालरीति सर्व आशियाभर पसरलेल्या दिसतील. व्यापाराचे दळणवळणाच्या दृष्टीनें पूर्वेस पासिफिक महासागरापासून तों पश्चिमेस अतलांतिकापर्यंत ह्या देशाच्या भौतिक संस्कृतीचा संसर्ग पोंचत आहे. ह्या विशाल दृष्टीनें पाहूं गेल्यास पंजाब प्रांत हा भरतवर्षाची हद्द नसून जवळ जवळ मध्यबिंदु म्हटला तरी चालेल. आर्यांच्या विशिष्ट संस्कृतीच्या दृष्टीनें पाहिलें तरी पंजाबच भारताचा मध्यबिंदु हें ठाम ठरतें. सिंध आणि पंजाब येथें आज जरी मुसलमानांची बहुसंख्या आहे, अफगाणिस्थान, बलुचिस्थान येथें तर निव्वळ मुसलमानांचीच वस्ती दिसत आहे, तरी गेल्या सहस्त्रकांत ह्या सर्व भागांतून बौद्ध अथवा शैव धर्माचा प्रसार असून, हा भाग भरतखंडांतील एक प्रांत म्हणून मोडत होता आणि वंशाने व भाषेनें बलुचिस्थानचे लोक द्राविड आणि अफगाणिस्थान व पंजाबचें लोक तुर्की-आर्य आहेत, हेंहि तज्ज्ञांना माहित आहेच. शीख धर्माचें ऐतिहासिक विवेचन करण्यापूर्वीं ह्या वरील भौगोलिक व संस्कृतिक गोष्टी निश्चितपणानें ध्यानांत बाळगल्याशिवाय शीख धर्माचें स्वारस्य मनांत नीट भरणें कठीण पडणार आहे.

शीख धर्म हा अस्सल हिंदु धर्म आणि जगांतील एक सर्वांत अत्यंत शुद्ध भागवत धर्म आहे, ही गोष्ट निरपेक्ष इतिहासतज्ञांशिवाय इतरांस किंबहुना पुष्कळशा शिखांना देखील असावी तशी अवगत आहे कीं नाहीं ह्याची शंकाच आहे. कारण अशी सुसंस्कृत जाणीव असण्याला तौलनिक धर्माचें यथार्थ ज्ञान असावें लागतें. महमद कासीमची सिंधवर स्वारी झाल्यावर पुढें तीनशें वर्षांनीं गिझनीचा पहिला सुलतान महमद ह्यानें इ. स. १००१ पासून १०२४ पर्यंत हिंदुस्थानावर १७ स्वा-या केल्या. ह्या स्वा-यांत त्याचा धर्मप्रसाराचा बहाणा होता. ह्यानंतर चारपांचशें वर्षे मुसलमानांचा धर्म आणि राजसत्ता हिंदुस्थानांत सारखी वाढूं लागली. त्यांच्या संस्कारानें भाजून निघालेले व शुद्ध झालेलें हिंदु धर्माचें स्वरूप म्हणजेच शीख धर्म होय.