आधुनिक रूपान्तरें

इतकें सांगितल्यावर मागील कलमांत निर्दिष्ट केलेल्या महाराष्ट्रीय आधुनिक मानसिक भांडवलाचा आपण थोडक्यांत ठाव घेऊं या. प्रत्येकी वेळीं प्रत्येक देशीं स्वतंत्रच विचार चालूं असतात - किंबहुना असावयाला पाहिजेत असें नाहीं. पृथ्वीचे पाठीवर केव्हां ना केव्हां कोठें ना कोठें तरी स्वतंत्र विचार, स्वतंत्र काव्य, आणि स्वतंत्र कृति चालूं असतेच. वाहतूक आणि दळणवळणाचीं साधनें असतील त्या मानानें, ह्या स्वतंत्र पैदाशीचें स्थलांतर आणि कालांतर भाषांतराचे व रूपांतराचे द्वारें होणारच. ह्या न्यायानें पाहतां मध्ययुगीन इस्लामी संस्कृतीच्या संकर्षणानें महाराष्ट्राच्या आचारविचारावर जो परिणाम झाला, त्याच्या शतपट परिणाम प्रस्तुत पाश्चात्त्य संस्कृतीचा झाला आहे, व ह्याहून पुढें अधिकच होणार. पाश्चात्त्य देशांत भौतिक शोध आणि आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळें प्रत्यक्ष धर्माच्या निष्ठास्थानावर हल्ले चढून त्यांचीं शिखरें आणि गाभारें डळमळूं लागलीं. तो चित्कंप सर्व सुसंस्कृत जगाला अद्यापि भोंवतो आहे. ह्यांतून प्रागतिक महाराष्ट्र तेवढा कसा अलग राहणार? मुंबई विश्वविद्यालय सुरू होऊन एक पिढी उलटते न उलटते तोंच डार्विनसारखे शोधक आणि स्पेन्सरसारखे तार्किक ह्यांच्या विचारांनीं तत्कालीन महाराष्ट्रीय लेखकांना व वाचकांना भारून टाकलें. आम्ही कॉलेजांत जाण्यापूर्वींच मराठी वाङ्मयावर ह्या नूतन पाश्चात्त्य विचारांची भाषांतराच्या आणि रूपांतराच्या द्वारें इतकी छाप बसलेली दिसली कीं, तितकी छाप ब्रह्मसूत्र, शांकरभाष्य किंबहुना गीता-भागवत ह्या संस्कृत ग्रंथांचीहि महाराष्ट्रांतील वाचकवर्गावर निदान श्रीएकनाथाचे काळीं तरी बसली नव्हती. असती तर श्रीएकनाथांना अवघ्या अडीचशें वर्षांपूर्वींची ज्ञानेश्वरी धुंडाळून शुद्ध करून नवी कां नटवावी लागली असती? आणि श्रीनामदेवांनीं अमुक एक अभंग लिहीन म्हणून केलेली प्रतिज्ञा पूर्ण करावयाला पुन: त्यांच्यामागून तीनशें वर्षांनीं श्रीतुकारामांना कां ह्या मर्त्य लोकाची यात्रा करावी लागली असती ! असो, संस्कृत वाङ्मयाचें स्वदेशी प्राकृतांत कालांतर होण्याला जो काळ लागला, त्याच्या शतांशनिंहि काळ पाश्चात्त्य विचाराचें महाराष्ट्रांत स्थलांतर व्हावयाला लागला नाहीं; कारण संस्कृतीचा प्रवास, तो बरा असो वा कसाहि असो, गणितश्रेढीनें नव्हे तर ह्यापुढें भूमितीहून अधिक वेगानें होणार आहे.

आमचा देश तूर्त तरी बिचारा विचारसंपत्तीची नुसती उतारपेठ होऊन राहिला आहे; पण हल्लीं जेथें पिकतें तेथेंच विचाराची कशी क्रांतीची धुनी पेटली आहे पाहा ! पृथ्वीवरील सृष्टीच्या इतिहासाचें अवलोकन करून विशेषत: प्राणिशास्त्राच्या व भूगर्भशास्त्राच्या अभ्यासाच्या जोरावर पाश्चात्त्य तार्किक उत्क्रांतिवादासारखे अतिव्याप्त सिद्धान्त काढूं लागले होते. पण सर्व शास्त्रांत अधिक निश्चित शास्त्र जें गणित त्यांतच आतां युगांतर करणारे शोध होऊं लागले आहेत. त्यामुळें न्यूटनला शिळें ठरविणारे वैज्ञानिक आइनस्टाइनसारखे निर्माण होऊं लागले आहेत. आइनस्टाईननें विज्ञान जगांत जी एक अपूर्व क्रांति चालविली आहे, तिचा एक ठोकळ परिणाम जागतिक विचारावर किंबहुना वाङ्मयावरहि कदाचित् होईल असें वाटतें, तो हा कीं, यापुढें निवळ तार्किक अथवा काल्पनिक (Deductive or Apriori) विचारपद्धतीला आळा बसून तदनुसार गंभीर वाङ्मय, ललित नव्हे अधिकाधिक आनुभविक आणि निश्चित पद्धतीचा (Inductive or Aposteriori) अवलंब करील. प्रस्तुत सारें जगच वैज्ञानिक क्रांतीमुळें आणि त्याहूनहि अधिक तीव्र ज्या राजकीय, सामाजिक व आर्थिक क्रांतींनीं हादरूं लागलें आहे त्यामुळें ह्यापुढें नुसत्या तार्किक अर्थवादाचा खप कमी होईल. मग त्याची निपजहि कमीच झाली, तर कोणाला फारसें वाईट वाटण्याचें कारण नाहीं. ह्या दृष्टीनें पाहतां अमक्याचें तत्त्वज्ञान किंवा तमक्याच्या तत्त्वज्ञानाचा इतिहास वगैरे आकाशाला गवसणी घालण्याचा आव आणणारीं पुस्तकें मराठींत न झालीं तरी चालेल. त्यांत कांहीं नाविन्य अगर गांभीर्य नसणार. ह्यापेक्षां जास्त स्वतंत्र आणि सुटसुटीत ग्रंथ तयार करावयाचे नसल्यास आमच्यांतील कांहीं कॉलेजांतल्या प्रोफेसरांप्रमाणें आधुनिक विद्याविशारदांनीं लघुकथा, भावगीतें, फार तर विनोदी कादंब-या लिहिलेल्या ब-या. त्याहि खपत नसल्या, तर परीक्षेचे कागद तपासण्यांत अधिक किफायत मिळेल तर पाहावी. मग उगाच वाचकांचा वेळ घेणारीं तत्त्वज्ञानें कशाला? ह्या बाबतींत जबलपूर कॉलेजचे प्रोफेसर श्री. द. गो. मटगे, M. SC. ह्यांनीं नुकतेंच लिहिलेल्या “अपेक्षावाढ” ह्या चोपड्याची मला स्वाभिमान आठवण होत आहे. ह्या चोपड्याचा आकार एखाद्या बेकार तरुण कवीच्या कवितासंग्रहाहूनहि लहान आहे, आणि त्यांचा विषय पाहावा तर “जगता व्यापून दशांगुळें उरला.” सापेक्षता वाद सिद्ध असो वा नसो, जाड्या विद्वानाला बारकें पुस्तक लिहिलां येणें शक्य आहे, ही अपूर्व गोष्ट ह्या प्रोफेसरांनीं सिद्ध केली, म्हणून मी त्यांचें अभिनंदन करतों. अशीं क्षुद्र पुस्तकें आमच्या पुण्यांत कोणी प्रसिद्ध करीत नाहींत. तें आपण काम केलें म्हणून बडोदावासियांचेंहि अभिनंदन करतों. आमचे पुण्यांतले मीमांसक आणि वेदान्ती प्रत्यक्ष आईनस्टाईनचीच थट्टा करतील. ते म्हणतील ह्या जर्मनानें आमच्या आद्य शंकराचार्यांचा मायावाद चोरला. तें कसेंहि असो. आमच्याकडील प्रोफेसरांनीं नवीन शोध लावले नाहीं तर परकीयांच्या ख-या शोधांचीं साध्या भाषेंत रूपांतरें करून आम्हां अडाणी मराठ्यांना त्यांची ओळख करून दिली तरी पुरे. नागपूरच्या नवभारत ग्रंथमालाकारांनीं ह्याच आकर्षक विषयावर “सापेक्षता दर्शन” नांवाच्या एका होऊं घातलेल्या ग्रंथाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दुर्बोध विषयाचें सुबोध विवरण होणार अशी जाहिरात आहे, ती लवकर खरी ठरो ! असो. तत्त्वज्ञानावर झालें तेंच च-हाट माझ्या इच्छेपलीकडे लांबलें. आतां अधिक लोकप्रिय नसलें तरी खात्रीनें लोकोपयोगी अशा समाजशास्त्राकडे वळूं या.