पुणेरी पेशव्यांची राष्ट्रीय कामगिरी!

“केसरी”कारांनीं प्रो. जदुनाथ सरकारांची भेट घेऊन, त्यांचे मराठ्यांच्या इतिहासासंबंधीं विचार प्रसिद्ध करण्याचा खटाटोप ता. ४ नवंबरचे अंकांत केला आहे. त्याविषयीं माझें स्पष्ट मत लिहून देण्याचा फारच आग्रह झाल्यानें मी लिहीत आहें.
जदुनाथ हे इतिहासाचे मोठे वरच्या दर्जाचे व्यासंगी आहेत, हें कोणासहि कबूल करावें लागेल. पण मराठ्यांच्या आधुनिक इतिहासाच्या कांहीं नाजूक भागासंबंधीं लिहितांना प्रो. जदुनाथबाबूंची परकीयत्वामुळें जी धांदल उडते ती अक्षम्य नसली तरी अनुकंपनीय आहे. तात्यांनीं बिचा-या बाबूना साक्षीदाराच्या पिंज-यांत खेचून उलटतपासणीच्या निवडक प्रश्नांच्या जाळ्याची तांत त्यांच्या गळ्यास लावून त्यांचा जो अंत पाहिला, तो मात्र तितका क्षम्य दिसत नाहीं. ‘मराठे आणि इंग्रज’ असें जे तात्या उत्तरार्ध १४ पानांवर “नानासाहेब पेशव्यांनीं इंग्रजांच्या हातांनीं आंग्र्यांना मारण्यांत जो मराठेशाहीचा अक्ष्यम्य द्रोह केला” असें स्पष्ट कबूल करतात तेच आतां बंगाल्याकडून मराठ्यांचा पाणउतारा करून व अशा शिताफीनें दोघांची नामुष्की करून आपल्या धरसोडीचें प्रदर्शन करितात, ह्यास काय नांव द्यावें? ही तात्याशाही राष्ट्रीय कामगिरी ! तात्यांना जसा आपल्या पत्राचा खप व्हावा ही इच्छा, तशीच जदुनाथालाहि आपलीं पुस्तकें खपावींत असें वाटणें मानवी आहे. पत्रकारानें स्वतःच्या जाहिरातीसाठीं हा कठीण प्रश्नांचा पाश आपल्या गळ्यांत अडकविलेला पाहून ग्रंथकारानें ही खुबी ओळखलेली दिसते. कारण चालून आलेली संधी विनाकारण न दवडतां त्यांनींहि आपल्या भावी पुस्तकांची जाहिरात “केसरीं”त फुकट प्रसिद्ध करून वरती नफ्यांत ब्राह्मणांकडून बहादुरीचें शिफारसपत्र मिळविलें ! हें सर्व ठीक जुळलें पण या खटाटोपांत इतिहासमीमांसेचा कितीसा संबंध पोंचतो, हा किंचित् गैरसोयीचा प्रश्न शिलकींतच पडला; येवढेंच काय तें व्यंग उरलें !
“पेशव्यांनीं फार मोठी राष्ट्रीय कामगिरी बजावली” येवढेंच सांगून जदुनाथ आटपते घेते, तर मलाही लिहिण्याची दगदग घेण्याचें मोठेंसें कारण नव्हतें. पण ह्या बंगाली बाबूनें पुढील दोन उद्गार काढिले असें जें केसरीकार सांगतात, तें खरें असल्यास मात्र बाबूमजकुरास मराठ्यांच्या इतिहासाचा गाठ्याळपणा कळून घेण्याची अक्कल असो किंवा नसो (तो पुढचा प्रश्न आहे) पण इच्छा तरी फार तीव्र नाहीं असें तूर्त दिसून येतें. शिवाजीमहाराज जातिभेद मानीत होते, ह्या सबबीवर जदुनाथांनीं कांहीं शिंतोडे उडवून आपलें लाघव दाखविलेलें पुष्कळांच्या स्मरणांतून अद्यापि गेलें नाहीं, तोंच आतां पुनः थोरल्या शाहूमहाराजांवरच नव्हे तर सगळ्याच मराठ्यांवर ह्या परकीय इतिहासकारानें आपली खप्पामर्जी दाखविली आहे. ते प्रसिद्ध झालेले उद्गार असे :-
(१) “सातारच्या शाहूमहाराजांच्या अंगांत राज्य चालविण्याची धमक नव्हती. त्याच्या मताप्रमाणें सगळ्या गोष्टी चालल्या असत्या तर तो एक मोंगलांचा दक्षिणेंतील लहानसा जहागीरदार होऊन राहिला असता.”
(२) “साम्राज्याच्या कल्पना मराठ्यांच्या डोक्यांत त्यांनींच (पेशव्यांनींच) भरवून दिली. त्यांनींच (पेशव्यांनींच) मराठ्यांस साम्राज्य व संपत्ति मिळवून दिली.”
हे उद्गार धाडसाचे आहेत. हे इतिहासकारांस पेलण्यासारखे मुळींच नाहींत. खुद्द पेशव्यांची चंदी चरत असलेल्या कोणत्याहि ब्राह्मण हरिदासाला किंवा शाहिराला हीं अशीं विधानें करण्याचें धाडस झालें नाहीं. फार तर काय, राजवाड्यांसारखे विषारी, केळकरांसारखे समतोल, सरदेसायांसारखे विशेष लक्षणविरहित अशा ब्राह्मण लेखकांनाहि पेशव्यांसंबंधीं लिहितांना आपला मोह आवरतां यावा; पण ह्या परक्या बंगाल्याला तो आवरतां येऊं नये, ह्यांत कांहीं तरी गौडबंगाल आहे, असें वाटतें.
शिवरायाच्या अवतारापासून तों पहिल्या शाहूच्या सुटकेपर्यंत इतिहास लिहिणें जितकें सोपें व सुखकर आहे, तितकें शाहूच्या सुटकेपासून तों नानासाहेब पेशव्यांच्या मरणघटकेपर्यंतचा मराठ्यांचा इतिहास लिहिणें सोपें नाहीं. निदान सुखकर तर मुळींच नाहीं. बखरी लिहिण्याची गोष्ट वेगळी. त्या कांहींनीं लिहिल्या आहेत. पण खरा इतिहास अद्यापि कोणीं लिहिला नाहीं, असें आपलें मला वाटतें. इतिहास लिहिणें म्हणजे जसें नुसत्या घडलेल्या गोष्टी टिपणें नव्हे, तसेंच घडलेल्या गोष्टींच्या आरशांत आपल्या लाडक्या उपपत्तींचें प्रतिबिंब दाखवणेंहि नव्हे, तर घडलेल्या गोष्टींची न्यायशुद्ध परंपरा ओळखूनच स्वस्थ न राहतां, शक्य असल्यास समाजशास्त्राच्या कांहीं नैतिक सिद्धान्तांची उठावणी, ह्या परंपरेच्या पायांवर करतां आल्यास प्रयत्न करणें होय. हा प्रयत्न करावयाचा तर तो ज्या जातीचा इतिहास लिहावयाचा, त्याच जातीकडून तो झाला पाहिजे, अशी माझी तरी ठाम समजूत झाली आहे. म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास लिहावयाचा तर मराठ्यांनींच लिहावा, महाराष्ट्रांतील ब्राह्मणांनीं लिहूं नये असें म्हणण्याइतका दूर मी तूर्त वाहून जात नाहीं. पण महाराष्ट्राच्या इतिहासावर, विशेषतः त्याच्या उपरिनिर्दिष्ट नाजूक भागावर - बंगाल्यांनीं, गुजराथ्यांनीं, किंबहुना महाराष्ट्रांत हल्लीं वस्ती करून राहिलेले मुसलमान, पार्शी अथवा ख्रिस्ती परधर्मीयांनीं देखील आपल्या अंगांत विशेष नैतिक धमक असल्याचा योग्य आत्मविश्वास असल्याविना, लिहिण्याचें किंबहुना बोलण्याचेंहि धाडस करूं नये, असें मला वाटतें !
पहिल्या शाहूच्या चरित्राविषयीं किंबहुना चारित्र्याविषयीं विचार करतांना, पुष्कळांना एक अक्षम्य मोह सुटण्याचा साहजिक संभव आहे; तो हा कीं, ह्या शाहूकडे शिवरायाशीं तुलनात्मक दृष्टीनें पाहावें. पण ही ऐतिहासिक शास्त्राच्या दृष्टीनें मोठी नालायकी व गहन अपराध आहे. कारण शिवराय लोकोत्तर पुरुष होते; तसा शाहू नव्हता, हा कांहीं त्यांचा गुन्हा नव्हे. शाहू मोठा साम्राज्यसंस्थापक होता, असें कोणीं कधीं म्हटलें नाहीं. पुढें म्हणतील कीं नाहीं, ह्याची फारशी शंका नाहीं. पण स्थापलेलें साम्राज्य पुढें चालविण्याची ताकद त्याच्यांत नव्हती आणि त्याच्या मताप्रमाणें झालें असतें, तर तो केवळ मोंगलांचा जहागीरदारच झाला असता, असें म्हणणें म्हणजे “बंगाली बाबू आणि दिडकीचा साबू” असें म्हणण्याइतकेंच निष्कारण निंदाव्यंजक आहे. फरक इतकाच कीं, ही फटकळ मराठी म्हण, गांवठी पोरांच्या तोंडांत आढळते. पण वरील बंगाली उद्गार एका बड्या इतिहासकारांच्या तोंडून निघाले असा त्या बिचा-यावर आरोप आला आहे. मोंगलांच्या कैदेंत शाहू केवळ विलासांतच रंगला होता आणि म्हणून तो सुटून आल्यावर त्यानें साता-यांतील “धणीचा बाग” सारखे केवळ रंगमहालच बांधले हें म्हणणें अगदीं शाहूची कामगिरी व स्वभाव ओळखण्याचें किंचित् कठीण काम करण्याची आपल्यांत पात्रता नाहीं, असा कबुलीजबाब देणेंच होय.
शिवरायांनीं घातलेल्या साम्राज्याच्या पायावर इमारत उभारण्याच्या कामीं शाहूला प्रत्यक्ष त्याच्या जातींतीलच नव्हे, जर जवळच्या आप्तांतील प्रतिस्पर्ध्यांकडून जितके जोराचे अडथळे आले, तितके प्रत्यक्ष शिवरायालाहि हा पाया घालण्याच्या कामीं आले कीं नाहीं हा लक्षांत घेण्यासारखा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. शाहूनें लढवय्येपणा केला नाहीं हा त्याचा अक्षम्य अपराध, ह्यांत शंका नाहीं. पण एवढ्यावरून त्याच्यांत खरा मुत्सद्दीपणाहि नव्हता, असा कांगावा करण्यांत कोणती इतिहासज्ञता आहे, हें मला तरी कळत नाहीं. ज्यांनीं त्याच्या पायांतील जोडे उचलले त्या नानासाहेब पेशव्यांत तरी लढवय्येपणा होता काय? निदान शिपायास शोभणारा सरळपणा तरी? मात्र ज्याचे मरेपर्यंत जोडे उचलावे, त्याचीच मरतांना केसांनीं मान कापावी व त्याच्या पाणीदार बायकोच्या भावाला लालूच देऊन, त्याच्याकडून तिला सतीच्या चितेवर डांबवावें, अशीं त्याच्यांत गनिमी होती हें खरें. पण हा हरामखोरपणा म्हणजे मुत्सद्देगिरी, आणि असल्या हरामखोराच्याच बाप-आजांचे कान धरून त्यांच्याकडून साम्राज्याची पुढील इमारत उठविणें म्हणजे मुत्सद्देगिरी नव्हे, असें का ह्या बंगाली बाबूला वाटतें?