अमेरिकेसारख्या देशांतील शेतक-यांनीं केवळ जमिनीवरच नव्हे तर देशाच्या व्यपारावरहि आपला ताबा राखला आहे. ते कच्चा माल नुसता तयार करून दुस-याचीच, केवळ तुमच्याप्रमाणें भर करीत नाहींत; तर तो कोठें कसा जातो हें पाहण्यासाठीं उतारपेठेवरहि आपला ताबा चालवितात. कच्च्या मालाची केव्हां किती किंमत असावी हें ठरविणें अमेरिकेंत शेतक-यानें आपलें हातीं ठेविलें आहे. परवां दोन कोटी डॉलरचा (२||रु. = १ डॉलर) कापूस अमेरिकेंतील शेतक-यांनीं जाळून बाजारांत त्याची किंमत राखली असें मीं कोठेंसें वाचल्याचें आठवतें. ह्यालाच म्हणावें शेतकरी ! इतर ते नुसते भारवाही !! पण अमेरिकेंतील शेतकरी हा केवळ कुणबी नसून तो एक प्रकारचा जमीनदार व भांडवलदार बनला आहे. खरे कष्ट तेथें तुमच्या आमच्यासारखे काळे शिद्दी लोकच करतात. म्हणून अमेरिकेचें उदाहरण तुम्हीं जसेंच्या तसेंच गिरवावें असें माझें म्हणणें नाहीं. आमची परिषद तालुक्यापुरतीच आहे म्हणून तुम्ही तालुक्याची तरी उतारपेठ आपल्या ताब्यांत घेण्याच्या मार्गास लागा. खरें पाहिलें तर अशी शेतक-यांची संघटना सर्व देशभर होणें जरूर आहे.