नानक चरित्र

शीख धर्माचा संस्थापक गुरु नानक हा लाहोर जिल्ह्यांत तळवंडी ह्या गांवी इ. स. १४६९ सालीं वैशाख शुद्ध तृतीयेला जन्मला. त्याच्या बापाचें नांव कालू आणि आईचें नांव त्रित्पा. कालूचें कुल क्षत्रिय असून धंदा तलवंडीच्या कुळकर्णीपणाचा होता. नानक सात वर्षांचा झाल्यावर त्याला शाळेंत पाठविण्यांत आलें. पण आपणांस शिकविण्याची योग्यता शिक्षकांत आहे काय, असें त्यानें विचारलें; कारण त्याला ईश्वरी ज्ञान शिकावयाचें होतें. नानकानें स्वभाषेप्रमाणें पार्शी भाषेचाहि चांगला अभ्यास केला. त्या भाषेंतील इस्लामी धर्माच्या ज्ञानामुळें त्याच्या भावी धार्मिक मतांवर परिणाम झाला असावा. तो नऊ वर्षांचा झाल्यावर मुंज करून जानवें घालण्याचा विधी झाला. तेव्हां त्यानें एक कविता केली कीं, दया हा कापूस, समाधान हा दोरा, संयमन ही गांठ आणि सत्य हा पीळ, असें जानवें मळत नाहीं कीं तुटत नाहीं. एरव्ही मनुष्य मेला कीं इतर सुतांचें जानवें गळून पडतें आणि आत्मा जानव्याशिवायच जातो. मग अशा सुताड जानव्याचा काय उपयोग ? पुढें नानकाचें लक्ष कांहीं केल्या संसाराकडे लागेना म्हणून त्याच्या आईबापाला फार काळजी पडली. कोणी म्हणूं लागले, नानकाला खूळ लागलें !  कोणी त्याला आजारी समजून गांवच्या वैद्याला बोलावून आणिलें. नानक हसून म्हणाला, ‘आजार माझ्या मनांत आहे, तर तो माझ्या हाताची नाडी पाहून कसा कळेल ?’ पंजाबचा सुभेदार दौलतखान नामें मुसलमान होता. त्याचा एक फडणीस जयराम नांवाचा हिंदु सुलतानपूर येथें राहात होता. तो नानकाचा मेहुणा होता. त्याच्या वशिल्यानें शेवटीं नानकास कोठी कामगार नेमण्यांत आलें. कांहीं दिवस काम चांगलें केल्यावर नानकानें पूर्वींप्रमाणेंच टाळाटाळी चालविली. रानांत जाऊन तो तीन तीन दिवस बसे, “ कोणी हिंदु नाहीं व कोणी मुसलमानहि नाहीं” असें तो वरचेवर म्हणे. मुसलमानाच्या काजीला राग येऊन त्यानें नानकास सुभेदारापुढे उभें केलें. नानक गाऊं लागला, “दया ही मशीद, प्रामाणिकपणा हेंच आसन, न्याय आणि कायदा हेंच कुराण, विनय हीच सुन्ता, सभ्यता हाच उपवास व अशानेंच मनुष्य मुसलमान होतो ” असें नानकानें आपल्या म्हणण्याचें तात्पर्य सांगितलें. इतक्यात नमाजाची वेळ झाली म्हणून काजी मशिदींत गेला. नानकहि त्याचे मागोमाग गेला. काजी प्रार्थना करूं लागला, तर नानक हसूं लागला ! काजीनें कारण विचारतां नानक म्हणाला, ‘ काजीचें लक्ष प्रार्थनेकडे नसून त्याचें शिंगरूं सुटून आडांत पडेल, ह्या विचाराकडे त्याचें सारें लक्ष लागलें आहे !’ काजी खजील झाला !!

नानकाचा मर्दाना नांवाचा डोम जातीचा एक स्वामिनिष्ठ शिष्य होता. त्याला घेऊन नानक यात्रेला निघाला. कामरूप ( आसाम ) नंतर जगन्नाथपुरी येथें जाऊन आणि सर्व पूर्व हिंदुस्थानभर फिरून परत पंजाबांत आला. नंतर दोघें पाकपट्टण येथें शेख फरीद हें मुसलमानी क्षेत्र पाहावयास गेले. तेथील साधु शेख इब्राहिम हा नानकाचा अनुयायी झाला. पुढें नानक सैय्यदपुरास गेला असतां, त्या गांवावर लवकरच बाबरानें हल्ला केला; आणि बहुतेक सर्व लोकांची कत्तल केली. ह्याचा हृदयद्रावक उल्लेख नानकानें आपल्या कवनांत केला आहे. त्या वेळीं बाबरचा सरदार मीरखान ह्यानें नानक आणि मर्दाना ह्यांना कैद करून कामाला लावलें. नानकाच्या डोक्यावर जें ओझें दिलें होतें तें एका हाताच्या अंतरावर अंतराळांतच राहिलें असलेला चमत्कार मीरखानानें पाहिला. बाबरहि नानकाला पाहावयाला तुरुंगांत आला. असा साधु ह्या गांवांत आहे, असें कळलें असतें, तर ही कत्तल मीं केली नसती, असें तो म्हणाला. मग नानकाचा त्यानें मोठा सत्कार करून त्याच्या सांगण्यावरून सर्व बंदीवानांना मुक्त केलें. ह्यानंतर एका पंजाबी व्यापा-यानें शीख धर्माची दीक्षा घेऊन तो व्यापारानिमित्त सिलोन येथें गेला. त्याच्यामार्फत सिलोनचा राजा शिवनाभ ह्याचें लक्ष शीख धर्माकडे वळलें. पुढें नानक दोघा शिष्यांना घेऊन दक्षिणेंत मद्रासेकडे यात्रेस गेला. तेथें कांहीं जैन संन्याशांना त्यानें शीख केलें. पुढें पूर्व समुद्रांतील कांहीं बेटांत (लखदीव, मालदीव) त्यानें आपल्या धर्माचा प्रचार करून मग सिंहलद्वीपांत गेला व तेथील राजाला शीख धर्माचा उपदेश केला. याच ठिकाणीं त्यानें आपलें प्राणसंगली नांवाचें स्तोत्र रचिलें.

सिंहलद्वीपाहून परत आपल्या देशीं गेल्यावर नानकानें कित्येक हिंदु पंडित, योगी, गोसावी, फकीर वगैरेंना शीख धर्माची दीक्षा दिली. नंतर तो काश्मिरांतून हिमालयांत गेला. तेथून पुढें वायव्येकडे पेशावर, कंदाहार, वगैरे मुसलमानी क्षेत्रांची यात्रा त्यानें केली. त्यानंतर तो मक्केच्या यात्रेला निघाला, त्यावेळीं त्यानें मुसलमान फकीराचा वेश केला होता. बरोबर मर्दाना होताच. मक्केस जाईपर्यंत तो फारच थकला. तेथें गेल्यावर मक्केच्या मशिदींतील काब्याकडेच पाय करून निजला. एका मुसलमानानें त्याला रागानें उठविलें. त्याचे पाय जातील तिकडे सर्व मशीद फिरूं लागली, तेव्हां त्याच्या भोंवतीं तेथील सर्व मुल्ला जमले. ते विचारूं लागले कीं, हिंदु धर्म श्रेष्ठ कीं मुसलमानी धर्म श्रेष्ठ ? नानकानें उत्तर केलें, ‘ सत्कृत्याशिवाय दोन्ही धर्म व्यर्थ आहेत. ज्याअर्थीं दोन्ही धर्म एकमेकांचा द्वेष करतात, त्याअर्थीं ते दोन्हीहि खोटेच आहेत.’ हें ऐकून सर्व मुल्लांनीं व मुख्य गुरूनेंहि त्याचा सत्कार केला. ह्यानंतर नानकानें मदीना, बगदाद, वगैरै ठिकाणीं जाऊन आपल्या सार्वत्रिक धर्माचा संदेश गाजविला. स्वदेशीं परत आल्यावर लवकरच त्याचा एकनिष्ठ शिष्य मर्दाना वारला. ह्या वेळीं नानकाच्या भोवतीं शिष्यसमुदाय पुष्कळ जमला होता. पण त्यांपैकीं थोडेच खरे होते. त्याची परिक्षा केली असतां लहिना नांवाचा एक शिष्य खरा ठरला. नानकाला दोन मुलगे, श्रीचंद आणि लखमीदास नांवाचे होते; पण दोघेहि त्याच्या गुरुपणाचा वारसा चालविण्याला नालायक होते, म्हणून त्यानें आपल्या मागें अंगदाला आपल्या जागेवर नेमलें. इ. स.१५३८ सालीं आश्विन शुद्ध दशमीचे दिवशीं नानकानें समाधि घेतली. मुसलमानांनीं त्याच्या नांवानें रावी नदीचे कांठीं मशीद बांधली, आणि हिंदूंनीं देऊळ बांधिलें. पण हीं दोन्हीहि पुढें पुरानें वाहून गेलीं व भांडणाचें मूळच गेलें.