संप्रदाय

(२४) संप्रदाय, लकब (Idiom) विषयीं मला विशेष सांगतां येत नाहीं. कारण कोंकणीचा व माझा प्रत्यक्ष परिचय अल्प, आणि तोहि केवळ व्याकरणावरून मिळविलेला आहे. ह्या भागाचें विवरण ज्यांना दोन्ही भाषांचा बाळपणापासून निकट परिचय आहे त्यांनाच नीट करतां येईल. दालगादो हयांनीं कोंकणी भाषेंतील म्हणींचा जो अपूर्व संग्रह केला आहे, त्यांतील कांहीं थोड्या म्हणी व त्यांचे अर्थ खालीं देऊन हें लांबलेलें पुराण आटपतों. त्यावरून कोंकणी ही कशी जोरदार आणि मार्मिक बोली आहे ह्याची थोडीशी कल्पना वाचकांस होईल.
१. बासांऊचें थोडें दिवचें चड, हें जब्बर गोड = बोलावें थोडें आणि द्यावें फार, हें बरें.
२. लोखंड उदक प्याल्यार आतां कधींच मिळ न = तापलेल्या लोखंडानें उदक शोषण केल्यावर, मगरीनें गिळलेल्या मण्याप्रमाणें तें पुनः मिळण्याची आशा नको.
३. वाटेची हर्याळी जगइना आणि मरइना = वाटेवरचें गवत जीर्ण होत नाहीं कीं मरतहि नाहीं - नम्र माणसें फार वेळ टिकतात.
४. गांवांतलो चोर व्हय, परगांवांतलो साव नय = स्वदेशी चोर बरा, पण परकीय साधु नको !
५. दुवेक मारून सुनेक बेंकडाउंक = लेकी बोले सुने लागे.
६. आडली सून काढले घरचे गुण = सुनेवरून माहेरची पारख.
७. मोनेक स्वपन पडल्या सांगूं नो कळो = मुक्याला स्वप्न पडल्यास तो तें कसें सांगूं शकणार !
८. ते फिरंगे गेले आणि ते उंडे काबार झाले =मोठे लोक उठले कीं, मेजवानीहि आटपतेच. लहानांनीं अर्धपोटींच हात धुतले पाहिजेत !
९. नेसली दांट विसरली वाट = भपकेदार लुगडें नेसलेली बया, त्या भरांत आपली वाट विसरून भलतीकडेच चालली !
१०. उडालो कोलो झाडळी शेपटी = खाणें संपल्याबरोबर कोल्हा आपली शेपटी झाडून पसार होतो !
असो. तज्ज्ञांनीं मराठीच्या भोंवतालच्या द्राविड भाषांचें अधिक अध्ययन करून तौलनिक भाषाविषयावर अधिक अधिकारयुक्त प्रकाश पाडावा, म्हणजे शेवटल्या म्हणींतल प्रकार न घडून लेखकाचें समाधान होईल.