सामाजिक सुधारणेचा व्यापक अर्थ

सामाजिक सुधारणेच्या कार्याचें पाऊल जितक्या जोरानें पुढें पडावयास पाहिजे तितकें न पडण्याचें दुसरें कारण असें कीं सामाजिक सुधारणा या शब्दाची व्याप्ति अद्यापहि अगदीं मर्यादित समजली जाते हें होय. सामाजिक सुधारणा म्हणजे जुन्या कर्मठ धार्मिक भावना व जुन्या रूढी यांचेविरुद्ध चाललेला झगडा आहे एवढें सांगितल्यानें त्या शब्दांची निम्मीअर्धीहि व्याप्ति सांगितल्यासारखें होत नाहीं. अफाट हिंदु समाजाच्या सामाजिक पुनर्घटनेच्या विस्तृत प्रश्नांपैकीं बराच मोठा भाग धार्मिक भावना अगर सामाजिक दर्जाविषयींच्या भावना यांशीं कोणत्याहि प्रकारचा संबंध नसलेला असा आहे. त्याचें आर्थिक दृष्ट्या आणि इतर दृष्टीनेंहि महत्त्व आहे. पाश्चात्य देशांमध्यें सामाजिक प्रश्नांचा व्यापक दृष्टीनेंच विचार करण्यांत येतो. आणि त्यामुळेंच त्या देशांतून सामाजिक सुधारणेस फारसा विरोधहि होत नाहीं; आणि सर्व देशाची सहानुभूति व साहाय्य थोडक्याच अवधींत कोणत्याहि सामाजिक सुधारणेच्या कार्यास मिळूं शकतें. उलटपक्षीं आमच्या देशांत मात्र गेल्या दोन पिढ्यांमध्यें सामाजिक सुधारणा म्हणजे एका बाजूस इंग्रजी शिक्षण मिळालेले सुबुद्ध व उत्साही पण विशिष्ट कार्यक्षेत्र व धोरण ठरवून अनुयायांना निश्चित दिशा लावण्यास समर्थ नसलेले थोडेसे सुशिक्षित व दुस-या बाजूस बहुतेक सर्व देश (विशिष्ट वर्ग व बहुजनमसाजसुद्धां). यांच्यामधील असमान झगडा असा अर्थ होऊन बसलेला आहे आणि हा बहुजनसमाज ज्यांना राष्ट्रीय हिताची व्यापक दृष्टि नाहीं अशा शास्त्री-पंडितांच्या धोरणानें केव्हां केव्हां चालत असला तरी वस्तुतः कार्यविन्मुखता व शिथिलता यांचाच पगडा पुष्कळ वेळां त्यांच्या मनावर बसलेला असतो, व त्या योगानेंच आमचें राष्ट्र मागासलेलें राहिलेलें आहे. याकरितां सामाजिक सुधारणा या शब्दाच्या अर्थाची व तिच्या कार्यक्षेत्राची व्याप्ति वाढविण्याची वेळ आलेली आहे. अशा त-हेची व्याप्ति वाढविण्याच्या कार्यास सुरुवात झालेली आहे हें नमूद करण्यास मला संतोष वाटतो. कांहीं थोड्या दिवसांपूर्वीं आमच्यामधील सार्वजनिक कार्यकर्त्यांमध्यें ‘सामाजिक सुधारणा आधीं कीं राजकीय सुधारणा आधीं’ असा एक अर्थशून्य वाद चालू होता; जणूं कांहीं या दोन महत्त्वाच्या  व परस्परमिश्र अंगांपैकीं प्रथम एकाचा परिपोष करतां येऊन नंतर दुस-याचा करतां येणेंच शक्य आहे ! परंतु कालांतरानें ही वृत्ति आतां पालटली असून कट्टर राजकीय सुधारणावादी व कर्मठ व रूढ धार्मिक मतांचे कट्टे अभिमानी हेहि थोड्याफार स्वखुषीनें सामाजिक सुधारणेच्या कार्याची उपासना करण्यांत गढून गेलेले दिसत आहेत; त्याचप्रमाणें समाजसुधारक म्हणविणारे लोकहि जुन्या कर्मठ वृत्तीच्या विचारांची कोंडी कशी फोडावी एवढ्यापुरतीच पहिली संकुचित वृत्ति न ठेवतां खेडेगांवांतील आरोग्यसंवर्धन, शहरांतील मजूर वर्गाची सुधारणा, शिशुसंगोपन, वगैरे समाजसुधारणेच्या इतर बाबींचा झपाट्यानें पुरस्कार करूं लागलेले आहेत.