प्रश्न - ब्राह्मण व मराठे यांच्या अंगांत गुणदोष कोणते आहेत ?
उत्तर - मराठ्यांत हिशेबीपणा नाहीं; ब्राह्मणांत तो गुण आहे. ब्राह्मणांत काटकसर आहे, मराठ्यांत ती नाहीं. तुम्ही पाहा, मराठा कुटुंबामध्यें दोन पिढ्यापेक्षां श्रीमंती राहूं शकत नाहीं. ब्राह्मणांत शिस्त आहे, मराठ्यांत ती नाहीं. कर्मठपणा हा गुण ब्राह्मणांत आहे तसेंच ते प्रगतिप्रिय आहेत. आजपर्यंतची सर्व सामाजिक सुधारणा ब्राह्मणांनींच केली. पण ब-याच ब्राह्मणांमध्यें दिलदारपणा कमी आहे. विद्यापीठामध्यें परीक्षा पास होण्यास लागणारी बुद्धि त्यांच्यामध्यें असेल, पण खरी पल्लेदार बुद्धि, दूरदृष्टि त्यांच्यांत नाहीं. मीं ही टीका केल्याबद्दल ब्राह्मणांनीं मजवर रागावूं नये. मला मराठे लोकांतहि दोष दिसतात. ब्राह्मणांच्या मानानें एकंदरींत मराठे पुष्कळच खालावलेले आहेत. खानदानी मराठ्यांमध्यें दोनतीनशें वर्षांपूर्वीं दिलदारपणा फार होता. पण आज तो कोठें राहिला आहे? पूर्वी जो जातिवंतपणा होता तो आतां राहीला नाहीं. स्वतंत्रवृत्तीचा बाणा होता तो गेला. ब्राह्मणांच्याविषयीं म्हणावयाचे तर आतांच सांगितलेले सर्व गुण त्यांच्या अंगीं आहेत खरे; पण त्यांचा फायदा दुस-यास देण्याची बुद्धि त्यांच्यामध्यें नाहीं. तसेंच त्यांच्यामध्यें एक प्रकारचा अहंकार असल्यामुळें बाकीचे लोक त्यांजकडे मत्सरबुद्धीनें पाहतात. हा अहंकार त्यांच्यामध्यें नाहीं असें सर्वांच्या प्रत्ययास आलें पाहिजे.
प्रश्न - एकंदरींत ब्राह्मणांच्या अंगीं वसत असलेली अहंकारवृत्ति ब्राह्मण-ब्राह्मणेतरांमधील एकीच्या आड येते म्हणावयाची?
उत्तर - ब्राह्मणांचे गुण मीं मनमोकळेपणानें सांगितले तेव्हां त्यांच्या दोषांविषयीं थोडें बोललों त्याबद्दल ते गैरसमज करून घेणार नाहींत अशी आशा वाटते. ब्राह्मणांच्या ठायी जसे मला कांही दोष दिसतात तसे ते मला मराठ्यांच्या अंगीहि दिसतात. मराठे निर्बुद्ध निस्सत्व होऊन बसले आहेत असें मला वाटतें. ब्राह्मणांजवळ बुद्धि आहे, पण ती पल्लेदार नाही. हिशेब आहे पण केवळ स्वतःपुरता आहे. संकुतित मनोवृत्ति व स्वार्थपरायणता हेहि ब्राह्मणांच्या अंगचे महत्त्वाचे दोष आहेत असें मला वाटतें. पण मराठ्यांत जो एक गुण नाहीं ते ब्राह्मणांत आहे असें वाटतें. संघटनेचें सामर्थ्य मराठ्यांतून पार निघून गेलें आहे. ब्राह्मण अद्यापि संघटनाकुशल आहेत. हा ब्राह्मणांचे दृष्टीनें फार महत्त्वाचा मुद्दा आहे. महार-मांगांमध्यें आज जी जागृति जी संघटना आहे तितकीसुद्धां मराठ्यांत नाहीं. मराठ्यांत संघटना होईना व ब्राह्मणांची संघटना त्यांच्या स्वतःपलीकडे जाईना. तेव्हां सांगा पाहूं महाराष्ट्राचा उत्कर्ष व्हावा कसा? ब्राह्मणांनीं मराठ्यांना उदाहरण घालून द्यावें व दोघांनीं मिळून व्यापार व शेती, जातिनिष्ठा विसरून करावी यांतच उभयतांचें कल्याण आहे.
प्रश्न - सनातनी पक्षाविषयीं आपणांस काय वाटतें ?
उत्तर - सनातनी म्हणजे ब्राह्मण. सनातन्यांमध्यें ब्राह्मण, मराठे हे दोघेहि आहेत खरे; पण त्यांचे नेते ब्राह्मण व अनुयायी मराठे आहेत. सनातनी ब्राह्मणेतर सनातनी ब्राह्मणांच्या सैन्यांतील केवळ बाजारबुणगे आहेत. म्हणून या वादाची खरी जबाबदारी ब्राह्मणांवर आहे. सनातन्यांनीं जो जोर धरला त्याची सर्व जबाबदारी ब्राह्मणांवर आहे. ब्राह्मणेतर बोलून चालून निर्बुद्ध. सनातनी म्हणून जी आजकाल शिकवणूक आहे ती निव्वळ ब्राह्मणांची. हे ब्राह्मण म्हणजे निव्वळ भिक्षुक नसून त्यांत गृहस्थी बाण्याचे लोकसुद्धां आहेत. त्या सर्वांस माझें नम्रपणें एवढेंच सांगणें कीं, ‘बाबांनो भारताचें भवितव्य काय तें लक्षांत आणाल कीं नाहीं ? या दृष्टीनें विचार कराल कीं नाहीं ?’
प्रश्न - आपण मराठ्यांमध्यें घटना नाहीं म्हणतां, पण एवढीं एकापेक्षां एक प्रबळ मराठी संस्थानें मराठयांचा पाठपुरावा करावयास असतांना मराठ्यांत घटना नाहीं हें संभवतें तरी कसें ?
उत्तर - अहो, तेंच तर मोठें अरिष्ट आहे. ही संस्थानें आमची उन्नति कधींहि घडवून आणणार नाहिंत. ती सदैव आमच्या उत्कर्षाच्या आडच असावयाची. एका माळी परिषदेंत ते लोकसुद्धां असेंच म्हणाले कीं, मराठे लोकांस मदत करणारीं संस्थानें किती ते पाहा! तशीं आमच्यांत कोठें आहेत ? मीं त्यांस उत्तर दिले कीं, म्हणून तर तुम्ही तुमच्या पायावर उभे आहांत. मराठे लोकांचीं संस्थानें असल्यानें मराठे परावलंबी होऊन बसलेले आहेत. मराठ्यांमध्यें संघटना नाहीं. तेव्हां एखादा चांगला संस्थानिक झाला तरी त्याच्या औदार्याचा नीट फायदा संघटनेच्या अभावी मराठ्यांना मिळूं शकत नाहीं.
प्रश्न - मराठे लोकांचा सरकारी नोक-यांमधून मोठ्या प्रमाणावर भरणा केला जातो ही गोष्ट मराठे लोकांच्या उत्कर्षाच्या दृष्टीनें आपणांस कितपत साह्यभूत वाटते?
उत्तर - सरकारी नोक-यांमधून मराठ्यांना ज्या सवलती मिळतात त्यांपासून मराठ्यांचा फायदा होईल असें मला तरी वाटत नाहीं. सरकारी नोकरी म्हणजे हजरजबाबीपणा. नोकरीपेशामध्यें स्वतंत्रपणाला वाव नाहीं. नोक-यांनीं परवशता वाढते. नोकरपेशे ब्राह्मण होवोत किंवा मराठे होवोत, ते गुलाम झाले, त्यांची स्वतंत्र वृत्ति मावळली असें समजावें. नोकरीपेशाच्या दृष्टीनें गुलामगिरी हा शब्दसुद्धां नरम वाटूं लागतो. नोकरी म्हणजे वेश्यावृत्ति, तीपासून कोणत्याहि जातीचा फायदा होणें शक्य नाहीं. हं! सरकारी नोक-यांच्या द्वारें जनहित करण्याची सोय असती तर गोष्ट वेगळी होती. मग नोक-यांपासून त्या मिळणा-या जातीचें हित झालें असतें. पण जेथें धडधडीत वरिष्ठांचें ऐकून समाजाचा गळा कापण्याचा धंदा चालतो तेथें नोक-यांनीं कोणाचेंहि खरें हित साधणें शक्य नाहीं. अशा नोक-यांमधून जातवारी असावी असें म्हणणें म्हणजे एखाद्या जनानखान्यांत आमच्याहि मुली ठेवा असें म्हणण्यासारखें आहे.
प्रश्न - अस्पृश्यतेच्या प्रश्नाला हल्लीं जें तीव्र स्वरूप आलें आहे, त्याविषयीं आपणांस काय वाटतें ?
उत्तर - माझें असें मत आहे कीं, सर्वांनीं मिळून हा अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवावा. नाहीं तर तो एक कायमचा काटा होऊन बसेल. आपण तर स्वखुषीनें अस्पृश्यांस स्वतंत्र केलें नाहीं तर त्यांस आपल्या उलट जावयास तयार केल्यासारखें होईल व ते तसे तयार झाले व आम्हांला विरोध करून पुढें येऊं शकले तर त्यांस नांव ठेवण्यास आपणास कांहींहि हक्क नाहीं. म्हणून आपण उदार दृष्टीनें अस्पृश्यांस आपणांत अगदीं मिळवून घेतलें पाहिजे; इतकें कीं, त्यांचा वेगळा नामनिर्देशसुद्धां करावा लागूं नये. असें जर आपण केलें नाहीं तर अस्पृश्यांचा मुसलमानासारखा सवतासुभा होईल व तो झाल्यास अखेरपर्यंत जाचक होऊन बसेल. तेव्हां आपण आत्महिताच्या दृष्टीनें विचार केला तरी अस्पृश्यांस वर आणणें आपलें कर्तव्य ठरतें. राजकारणामध्यें ब्राह्मणेतर, मुसलमान हे जसे सवतेसुभे आतांपर्यंत झाले आहेत तशीच अस्पृश्यांची ही तिसरी मेख तयार होत आहे याचा सर्वांनीं, विशेषतः ब्राह्मणांनीं, विचार करावा सनातन्यांचा बोजा ब्राह्मणांवर आहे. त्यांची सर्व जबाबदारी ब्राह्मणांवर आहे, तेव्हां त्यांनीं आपलें कर्तव्य नीट रीतीने पार पाडावें.
प्रश्न - तरुण महाराष्ट्रीयांस संदेश म्हणून कांहीं सांगाल काय?
उत्तर - आतांपर्यंत झालें तें सर्व लक्षांत घेऊन तरुण पिढीनें आपण केवळ हिंदी आहोंत एवढें ध्यानांत ठेवावें. एकी करावयाची तीसुद्धां महाराष्ट्रापुरती न करतां प्रांतिक भेद व मात्सर्य यांना आपणांमध्यें येऊं देऊं नये. महात्मा गांधी तर विश्वकुटुंबीच आहेत. तरुणांनीं आपला दिलदारपणा विश्वकुटुंबियत्वाला शोभेल असाच ठेविला पाहिजे. भवितव्य जर एवढें विशाल आहे तर तरुणांनीं मी ब्राह्मण, मी ब्राह्मणेतर असे सटरफटर भेद लक्षांत कां आणावे ? हा सटरफटरपणा टाकला पाहिजे. हिंदुस्थाननें जगाला धडा घालून दिला आहे. असें एका तोंडानें म्हणावयाचें आणि आपल्यांतच सोंवळेपणा ठेवायचा हा म्हाता-यांचा दुटप्पीपणा आहे, त्यापासून तरुणांनीं सावध राहावें. जुन्याचा सर्वच त्याग करावा असें कोणीहि म्हणत नाहीं. पण तें नव्याच्या कसाला लावावें. तें म्हाता-यांकडून होत नाहीं. या दिव्यांतून तरुण पार पडले म्हणजे म्हतारे त्यास आशीर्वाद देण्यास पुढें येतीलच. तेव्हां तरुणांनीं विनय न टाकतां शिस्तीनें व श्रद्धेनें सुधारणेच्या कामाला पुढें यावें हा माझा त्यांस नम्रपणाचा संदेश आहे.