मराठी व्याकरणकर्ते रामचंद्र भिकाजी जोशी हे हल्लीं आपल्या मराठी भाषेची घटना ह्या ग्रंथाची दुसरी आवृत्ति छापीत आहेत. त्यांत परिशिष्ट म्हणून वरील विषयावर एक लेख लिहावा अशी त्यांनीं मला विनंति केली. हिंदुस्थानांतील भाषांच्या व्युत्पत्तीची परिपूर्तता तौलनिक भाषाशास्त्राच्या साह्याशिवाय करूं पाहणें फार धाडसाचें, नव्हे धोक्याचें, आहे असें माझें फार दिवसांचें ठाम मत झालें असल्यानें, जोशी ह्यांचे विनंतीला मान देण्याची प्रथम मला छाती होईना. पण मजपेक्षां योग्य अधिकारी विद्वानाकडून त्यांची गरज भागेना म्हणून केवळ नाइलाजानें मीं हा लेख लिहिला. तो प्रमाणाबाहेर वाढला म्हणून त्याचा जरूर तेवढाच भाग जोशी ह्यांनीं आपल्या परिशिष्टांत घेतला आहे. विद्वान् वाचकांनीं निर्विकार मनानें ह्यांतील दोष दाखविल्यास मजवर फार उपकार होतील.