पण खरें पाहतां परकीयांना शेतक-यांनीं आपले हितशत्रु काय म्हणून म्हणावें ? शेतक-यांचा हितशत्रु त्यांच्या शेजारीं त्यांच्या दाराशींच उभा आहे. तो खेड्यांतला जमीनदार असो किंवा शहरांतला गिरणीवाला असो, सावकाराच्या रूपानें शेतक-यांशीं झगडत आहे ! आणि उलट त्यालाच सरकार आणि संस्थानिकांचें लष्कर व पोलीस मिंधे झाले आहेत ! शेतक-यांनीं जी संघटना करावी अशी मी ओरड करीत आहे ती सरकारविरुद्ध नव्हे, तर ह्या दाराशीं भिडलेल्या हितशत्रूविरुद्धच होय. या कामगारांनीं जी जगभर स्वसंरक्षणासाठीं संघटना चालविली आहे ती सरकारविरुद्ध नव्हे. शेतकरी झाला तरी तो श्रमजीवी कामगारच ना ? त्यांच्या तोंडांतील घास जर कोणी अगोदर ओढून घेत असेल तर तो भांडवलदार. सरकार ह्या भांडवलदाराच्याहि तोंडांतून घास काढून घेत असेल तर तें त्या भांडवलदाराचें पाहणें आहे. तुम्ही तुमच्यापुरतें पाहा. मी बोरगांवास वाळवें तालुक्याच्या शेतक-यांस जें बजावलें तेंच तुम्हासहि पुनः बजावित आहें. तें हें कीं तुम्ही आपली स्वतःची संघटना करा; इतकेंच नव्हे, तर शहरांतील कामगारांच्या संघटनेशीं खांद्याला खांदा लावून मिळून संघटना करा. शहरांतल्या व खेड्यांतल्या श्रमजीवी लोकांमध्यें पुढें कदाचित परस्पर कलागती लावून देण्याचा प्रयत्न तुम्हां दोघांचे समानशत्रु कशावरून करणार नाहींत ? म्हणून अगोदरच सावध राहून ही जोडघटना साधणें अत्यावश्यक नाहीं काय ?