आजचा विषय केवळ केशवचंद्र सेन असा नाहीं, कारण सेन या विषयावर आज वर्षभर चहूंकडे भाषणें व लेखांचा वर्षाव चालला आहे. ‘सुबोध पत्रिके’नें तर अमूल्य काम केलें आहे. विश्वधर्म विकास हाहि विषय आजचा नव्हे. तो सनातन आहे. आजच्या तास दीड तासांत तो मावणारा नव्हे. म्हणून ह्या दोन विषयांची मर्यादा परस्परांवर घालून तो आटोपशीर करण्यांत येणार आहे. तरी सेनपेक्षां विश्वधर्माचें महत्त्व जास्त असल्यानें त्याला जागा व वेळ जास्त घ्यावी लागत आहे, ह्याबद्दल माफी असावी.
सुविशाल मिदं विश्वं पवित्रं ब्रह्म-मंदिरम् |
चेतःसुनिर्मलं तीर्थं सत्यं शास्त्रमनश्वरम् |
विश्वासो धर्म मूलंहि प्रीतिः परमसाधनम् |
स्वार्थ नाशस्तु वैराग्यं ब्राह्मेरेवं प्रकीर्त्यते ||
ह्या बीजमंत्रांत केशवाचें हृदय व सर्व कार्याची घोषणा होत आहे. केशवाच्या प्रेरणेनें त्यांचे शिष्य गौरगोविंद राय ह्यांनीं हें सूत्र रचिलें आहे. पण ह्यांत नवीन काय आहे? राममोहन रायांनीं प्रथम ब्राह्म मंदिराची स्थापना केली, त्याच्या ट्रस्ट-डीडमध्यें हाच भावार्थ आहे. वैष्णव व ख्रिस्ती धर्मांचें तात्पर्य हेंच आहे.फार काय प्राचीन वैदिक उपासनेचे शेवटीं मंत्रपुष्पांजलीचा जयघोष होतो,तोहि असाच आहे:-
ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं
पारमेष्ट्यं राज्यं महाराज्य माधिपत्यमयम् |
समंतपर्या ईस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आंतादा
परार्धात पृथिव्यै समुद्र पर्यंताया एकराळिति |
तदप्येषश्लोकोsभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्य वसन् गृहे |
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वदेवाः सभासद इति ||
ह्यांत तर विश्वधर्माची केवळ उपासनाच नव्हे तर एकांतिक राजाचा (देवाचा) हा स्तोम आहे ! आणि हा घोष सर्व देवांनीं मिळून पृथ्वील परिवेष्टणा-या वायुदेवतेच्या घरीं बसून गावयाचा आहे. ह्यांत किती आदर्श व किती काव्य आहे ! असें असून ह्या धर्माचे पुढे किती तुकडे व कशी अवनति झाली ! तेंच आज पाहावयाचें आहे. त्यांतच पुनः विकासाचे वळसे काय दिसतात तें पाहावयाचें आहे.
ह्या मंत्रपुष्पाचा सनातन देवाची पूजा हा मीं केलेला अर्थ चुकला असला तर कोणी भोजकुलोत्पन्न सार्वभौम सम्राटाचा स्तोम असावा जसा हिटलरचा गौरव होत आहे. ह्या वैदिक प्रार्थनेला अनुसरून ख्रिस्तानें प्रार्थना केली -
Our father in heaven Thy Kingdom come.
Thy will be done on earth as it is in heaven.
अंतराळांतल्या एक राजा तुझें स्वराज्य पृथ्वीवर येवो. महमुद पैगंबरानेंहि हेंच एक राळ् आळविलें. गौतमबुद्धानें जो नैतिक साम्राज्याचा दिग्विजय केला त्याची सर तर कोणलाच येत नाहीं; ह्यापूर्वीं व नंतरहि आंतरराष्ट्रीय पुष्कळ चलन वळणें झालीं, पण ह्या सर्व गत गोष्टी झाल्या. मध्य युगीन काळोखांत सर्व स्वप्नवत झालें. गेल्या पांच शतकांत विश्वामित्रानें पुनः जणूं एक नवीनच सृष्टी निर्माण केली आहे. ह्या आधुनिक विकासांत केशवचंद्राचें स्थान कोठें आहे तें पाहूं या.
पंधराव्या शतकाच्या अखेरीस युरोपांत एका प्रचंड दिग्विजयाच्या चळवळीस सुरुवात झाली. ती म्हणजे जलमार्गानें प्रवास करून नवीन जगाचा शोध लावणें, विशेषतः भरतभूमीचा मार्ग हुडकून काढणें ही होय. ह्या वेळीं इंग्लंड किंवा फ्रान्स देशाची आरमारी शक्ति उद्यास आली नव्हती. ह्या बाबतींत पहिला प्रयत्न पोर्तुगाल देशाचा होता. कोलंबसानें अमेरिका शोधून काढण्याच्याहि पूर्वीं इ. स. १४८६ चे सुमारास पोर्तुगालच्या बार्थालोम्यू डायास ह्या धाडशी पुरुषानें आफ्रिकेचा पश्चिम किनारा जवळजवळ १००० मैल लांब शोधून काढला व ह्या खंडाचें अत्यंत दक्षिणेकडचें टोंक गांठलें. त्यानंतर इ. स. १४९८ सालीं ह्या केप ऑफ गुड होपास वळसा घालून वास्को ड गामा ह्यानें हिंदुस्थानच्या नैर्ऋत्य कोप-यांत असलेलें कालीकत हें प्रमुख बंदर गांठलें. ह्यापुढें युरोपांतील धाडशी पुरुषांना नवीन मुलूख शोधून काढण्याचें व्यसनच लागलें. शेवटीं १५७७ मध्यें फ्रॅन्सिस डेक नांवाच्या इंग्रज दर्यावर्दीनें अटलांटिक मार्गानें निघून दक्षिण अमेरिकेस व नंतर केप ऑफ गुड होपलाहि वळसा घालून परत इंग्लंड गांठण्याचा दिग्विजय केला. ह्याप्रमाणें जुन्या जगाइतक्याच एका मोठ्या नवीन जगाची भर पडली. पुराणांत अमृताचा शोध करण्यासाठीं देवदानवांनीं समुद्रमंथन केलें त्याहूनहि हें मंथनाचें दिव्य अधिक परिणामीं झालें आहे. पोर्तुगाल, स्पेन, डच, फ्रेंच, इंग्रज राष्ट्रांच्या धाडशी पुरुषांची व मंडळ्यांची ह्या मंथनांतून निघालेलें एक अलभ्य रत्न भरतभू ह्या लक्ष्मीचा अभिलाप धरून हिंदी महासागरांत घिरट्या घालण्याची रीघच लागली. शेवटीं ही लक्ष्मी इंग्लंडरूपी विष्णूनें एकट्यानेंच पळविली !
पहिल्या टोळ्या चांचे, लुटारू, वाटमा-यांच्या, नंतर व्यापारी मंडळ्यांच्या, नंतर मिशन-यांच्या, शेवटीं साम्राज्यप्रसारक मुत्सद्द्यांच्या घिरट्या, असा ह्या आंतरराष्ट्रीय घटनेंत क्रम लागतो. बाजाराच्या अगोदर उचल्यांची तयारी, ही म्हण ह्या विशाल राजसूययज्ञांतहि खरी ठरते. स. १५९९ त ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. लवकरच इतर राष्ट्रांच्या कंपन्या निघाल्या, त्याबरोबर इतर राष्ट्रांच्या सनदशीर कंपन्याच नव्हत तर इतर लहानमोठ्या बेसनदशीर, बेजबाबदार चळवळ्यांचा सुळसुळाट सारखा चालूं होता, त्यांना “इंटरलोपर्स” हें नांव मिळालें होतें. हल्लीं अमेरिकेंत जसे सनदशीर सरकाराबरोबरच गुन्हेगारांचे एका दुस-या पॅरलल गव्हर्नमेंटचें राज्य चालू आहे तसाच ह्या इंटरलोपर्सचा गडबडगुंडा अगदीं सन १७७३ सालीं रेग्युलेशन ऍक्ट पास होऊन वॉरन हेस्टिंग्ज हा पहिला जबाबदार गव्हर्नर जनरल नेमला जाईपर्यंत चालूं होता. ह्याच सालीं, ह्याच मुहूर्तावर उत्क्रांति क्षितिजवर राममोहन राय हा तारा उदय पावला. हा एक अपूर्व योगायोग आहे !
पंधराव्या शतकाचे शेवटीं नवीन जगाच्या शोधाच्या ऐहिक प्रकाशानें युरोपचे डोळे दिपून गेले आहेत, तोंच ख्रिस्ती धर्मांत सुधारणेची मोठी क्रांति घडून सोळाव्या शतकाच्या आरंभीं युरोपचे आध्यात्मिक डोळेहि चक्क उघडले, व रोमच्या पोपशाहीची (पापशाही) अंधारी रात्र संपून नवीन ख्रिस्ती धर्माचा उदय झाला. या नव्या ख्रिस्ती धर्माचें राजकारण कांहीं असो, सर्वांमागून निघावयाचें; अखेरीस शिखर गांठून सर्वांवर शिरोमणी व्हावयाचें. १७९२ च्या ऑक्टोबर महिन्यांत नॉर्थ्याम्पटन शहरीं बॅपटिस्ट पंथानें हिंदुस्थानाकरितां पहिलें मिशन काढलें. त्या वेळीं त्यांची पुंजी अवघी १३ पौंड २ शिलिंग ६ पेन्स होती, पण ईस्ट इंडिया कंपनीची मूळ पुंजी ३०,००० पौंडांची होती. जॉन टॉमस व वुइल्यम केरी हे दोनच प्रचारक लाभले. दोघेहि अर्धवटच होते. टॉमस हा उडाणटप्पू व दिवाळखोर, आणि केरी हा आपदग्रस्त, अशी ही जोडी अजब होती. ईस्ट इंडिया कंपनीला अशा मिशनचें मोठें वावडेंच होतें. चांचे पुरवले पण त्या काळीं मिशनरीची कंपनीला व्याद नको होती ! ह्यांत ब्रिटिश आत्मा दिसून येतो.
निरनिराळ्या “सुधारलेल्या” ख्रिस्ती मिशनचीं धोरणें परस्परांशीं किती विघातक होतीं व सर्वच मिळून ख-या धर्मापासून किती दूर होतीं ह्याचें एकच उदाहरण पुढें दिलें आहे.