भागवत धर्म हा पुरातन काळीं द्राविडांचा होता. पुढें शाक्यपुत्र गौतम बुद्धानें त्यांचा ऐतिहासिक काळीं उठाव केला. शैव, वैष्णव, जैन पंथांनीं अखिल भरतखंडांत आणि बौद्धांनीं तर सर्व आशियाभर त्यांचा प्रसार केला. पुढें महायान, मंत्रयान, वज्रयान इ. तांत्रिक अधोगतीच्या द्वारां बौद्धांचीच नव्हे तर शैव, वैष्णवादि हिंदु भागवतांचीहि अवनति कशी झाली, हें आम्हीं वर दाखविलें आहेच. आतां येथें भागवत धर्माचें पुनरुज्जीवन करण्यासाठीं पुन: द्राविडांनींच आधुनिक उत्कृष्ट भक्तीचा उठाव कसा केला, तो सर्व जातीच्या संतांनीं अगोदर केल्यावर द्राविड ब्राह्मण आचार्यांनीं शास्त्र आणि काव्यग्रंथ लिहून त्या धर्माला ग्रांथिक स्वरूप कसें दिलें; पुढें ह्या धर्माचा प्रसार प्रथम कर्नाटक, नंतर महाराष्ट्र, नंतर उत्तर हिंदुस्थान व बंगाल ह्या प्रांतांत कसा व कोणीं केला, हें वर सांगितलें. वल्लभाचार्यांनीं ह्याच धर्माचा उपदेश प्रथम काशी येथें करून तो पुढें गुजराथेंत केला. पण त्याच्या पंथांत लवकरच राधावल्लभी पुष्टिमार्गाचें बंड माजल्यानें व कांहीं अंशीं हाच वाममार्ग चैतन्याच्या वैष्णवमार्गांत झाल्यानें ह्या सर्वच पंथांची अवनति होणें क्रमप्राप्तच झालें. आतां भागवत धर्माची एक अत्यंत शुद्ध आणि उज्वळ शाखा शीख धर्म ह्या नांवानें हिंदुस्थानांत प्रसिद्ध आहे. त्या धर्माचा विचार करून हा विषय आटोपूं.