वेदोक्त पूजेचा अधिकार पूर्वीं आर्यत्रैवर्णिकांनाच होता. परंतु अशोक सम्राटानें वेदोक्ताच्या अधिकाराचें मूळच उखडून टाकणा-या बौद्ध जैनांना आश्रय दिला, म्हणून त्याच्यावर ब्राह्मण आणि त्यांच्या ओंजळीनें पाणी पिणारे बरेच क्षत्रियहि चवताळले, आणि त्यांच्या रागाचें पर्यवसान ‘नंदान्तं क्षत्रियकुलम्’ म्हणजे कलियुगांत नंद घराण्याच्या मागून जगांत क्षत्रिय उरले नाहींत, ह्या धादांतांत झालें, हें मागें वर्णिलें आहेच. पुढेंपुढें वेदोक्ताचा अधिकार केवळ ब्राह्मणांसच आहे आणि ब्राह्मणांशिवाय इतर सर्व हिंदु शूद्रच हा समज दृढ होऊं लागला. सर्वसाधारण ब्राह्मणवर्गालाहि संस्कृत समजेनासें झालें, मग वेदांची जुनी भाषा पंडितांनाहि समजेना, यांत काय नवल? इकडे बौद्ध-जैनादि वेदबाह्यांनीं तर आपला प्रचंड ग्रंथसमूह, पाली आणि प्राकृत भाषेंत पसरल्यामुळें बहुजन-समुदायांत त्यांचेंच प्रस्थ वाढलें. क्षत्रिय किंवा इतर राज्यकर्त्यावर्गांना आपसांतील तंटे मिटविण्याला, आणि परकीयांच्या स्वा-या हटविण्यालाच वेळ मिळेना, मग धर्मसारख्या परमार्थाला कोण विचारतो. कुशान, शक, यवन, गुर्जर, पल्लव, अहिर, हूण इ. अनेक परकीय वंशांचे राज्यकर्त्यांनीं तर भरतवर्षांत उत्तरेकडे व दक्षिणेकडे कायमचेंच ठाणें दिलें. चेर, चोल, पांड्य, आंध्र, गोरख (गुरखे), नायर इत्यादि अनेक एतद्देशीय आर्येतर क्षत्रियांनीं उचल खाऊन एकामागून एकांनीं आपापलीं लहानमोठीं साम्राज्येंहि स्थापिलीं. अशा राज्यक्रांतीमुळें वरचेवर धर्मक्रांत्या होऊन आज बौद्ध तर उद्या शैव, परवा जैन तर तेरवा वैष्णव, अशा धर्मक्रांतीचे हेलकावे भागवत धर्महि खाऊं लागला. बौद्धांनीं व जैनांनीं रचलेल्या धर्मशास्त्रांना, स्मृत्यांना, मंत्रप्रकरणांना आणि पुराणांना तोंड देण्यासाठीं ब्राह्मणांनीं हल्लींच्या पुराणांचें अठरा धान्याचें कडबोळें रचिलें. तें विशेषत: संस्कृत भाषेंतच रचण्यांत त्यांनीं फारच दूरदृष्टि दाखविली. ह्या संस्कृताचा जीर्णोद्धार पुष्यमित्र शुंगाच्या काळापासून तो तहत् स्थानेश्वरच्या हर्षवर्धनाच्या किंबहुना धारच्या भोज परमाराच्या काळापर्यंत सारखा चालला होता. त्यामुळें बौद्ध आणि जैन धर्म चीत झाले, इतकेंच नव्हे तर पाली व प्राकृत भाषाहि मृतप्राय होऊन संस्कृतला मात्र नवें नकली तारुण्य प्राप्त झालें.