पुढें कुशानांचा –हास होऊन सुमारें १०० वर्षें अराजक माजलें. शेवटीं चंद्रगुप्त ह्या नवीन राजानें इ. स. ३२० वें वर्षीं पाटलीपुत्र येथील गादीचा जीर्णोद्धार केला. ह्या वेळेपर्यंत साम्राज्याचें ऐश्वर्य वायव्येस पेशावर येथें कुशानांच्या व दक्षिणेंत कृष्णेच्या कांठीं धनकटक येथें शातवाहनांच्या राजवटींत होतें. मध्यंतरीच्या अराजकानंतर चंद्रगुप्तानें पुनः पूर्वींचें मागधी साम्राज्य स्थापिलें. हें घराणें धर्मानें वैष्णव होतें. तरी ह्या घराण्यानें बौद्ध धर्माचा छळ न करतां त्याला आश्रय दिला, त्याचा मानमरातब राखला. केव्हां केव्हां कांहीं राजे बौद्धांना आपले खासगी गुरु करीत. तरी मुख्य राजधर्म वैष्णवच होता. ह्या घराण्यांत पुढें समुद्रगुप्त व विक्रमादित्य असे एकाहून एक प्रतापी व शहाणे राजे झाले. ह्यांचा काल हिंदुस्थानच्या इतिहासांतला सोन्याचा काल समजण्यांत येत आहे. भव्य देवळें, सुंदर मूर्ति, ह्यांचाच नव्हे तर संस्कृत भाषा, वाङ्मय, नाटकें इत्यादि साहित्याचाहि प्रसार ह्या काळांत फार झाला. कालिदास आणि नऊ कविरत्नें ह्याच वेळीं होतीं. महाभारत, रामायण, मनुस्मृति वगैरे ग्रंथांना हल्लींचें स्वरूप ह्याच काळीं प्राप्त झालें. एकंदरींत आतां ब्राह्मणी हिंदुधर्मानें बरीच उचल केली. बौद्ध धर्महि जोरांत होता, पण तो आंतून पोखरला जात होता. बौद्धांच्या संघांमध्यें पूर्वींचा जोम राहिला नव्हता. राजाश्रयामुळें त्याला जें दोंद सुटलें तेंच त्याला घातक झालें. मौर्यांचा –हास झाल्यापासून बौद्ध संघांत ब्राह्मणांचाच बहुतेक शिरकाव होऊं लागला होता. नागार्जुन ह्या विद्वान् ब्राह्मणानें महायान पंथ काढला, तेव्हांच बौद्ध धर्माला ब्राह्मणी स्वरूप प्राप्त झालें. संस्था काय किंवा व्यक्ति काय, ती वाढीला लागते, तेव्हांच तिच्यांत विनाशाचींहि बीजें शिरतात. एकंदरींत महायान स्वरूपांत बौद्ध धर्म भाळ्याभोळ्या बहुजनसमाजाला पूर्णपणें मोकळा झाला, हें खरें; पण त्याचा भरीवपणा जाऊन तो पोकळ होऊं लागला, हेंहि खरें. भक्तीबरोबर त्याच्यामध्यें भोळेपणा शिरून त्याच्या मागोमाग भामटेगिरी व ऐतखाऊपणाचाहि सुकाळ होऊं लागला. ब्राह्मण जात केव्हांहि चतुर आणि समंजस. “अशोकाच्याच वेळीं बौद्धांचा संघ बहुतेक सर्व ब्राह्मणांनींच आक्रमिला होता; हल्लीं जसें ब्रिटिश सरकारचें राजयंत्र आंतून ब्राह्मणांनीं व्यापिलें आहे, तसेंच भरभराटीचेहि काळीं बौद्धांचे संघ ब्राह्मणमयच बनले होते.” (History of Aryan Rule) पान १४८ इ. वि. हॅवेलचें असें जें म्हणणें आहे, तें “धूर्त चिटणिसापुढें काय कलेक्टर बापुडें” ह्या सत्यशोधकी म्हणण्याप्रमाणेंच मोठें मार्मिक आहे, यांत शंका नाहीं.