आतांपर्यंत मराठ्यांच्या पूर्वपीठिकेचा केवळ भाषाशास्त्राच्या आधारें विचार झाला. आतां तो समजशास्त्राच्या दृष्टीनें कर्तव्य आहे. भाषाशास्त्राच्या दृष्टीनें निरनिराळीं नांवें आणि निरनिराळे धातु यांच्या संबंधांवरून ‘मराठा’ या नांवांत निरनिराळे वंश कसे मिसळले आहेत हें दाखविण्यांत आलें. आतां रीतिरिवाज, खाणेंपिणें, पेहराव, विवाह, धर्म आणि धंद्यांच्या परंपरा यांचा विचार करूं. ह्या दृष्टीनें पाहतां मराठा आणि कुणबी हे दोन शब्द अतिशय चिंतनीय आहेत. ह्या दोन शब्दांनीं गणले जाणारे जे दोन मनुष्यसमूह आजकाल ‘मराठा’ ह्या नांवाच्या जातींत जितके एकजीव झालेले दिसत आहेत तितके ते दोन हजार वर्षांपूर्वीं खास नव्हते. भाजें येथील शिलालेखांत जें महारथी अथवा महारथिनी हें जातिवाचक विशेषनाम आढळतें तें त्या वेळच्या कुणब्यांना खास लावलें जात नसावें. महारथीचा धंदा इतमामाने लढण्याचा व कुणब्याचा धंदा स्वतःची अगर दुस-याची जमीन इतमामानें वाहण्याचा. दोन्ही धंदे तेव्हां प्रतिष्ठित खानदानीचे होते. केवळ पोटार्थी मजुरी करण्याचे नव्हते.
कुणबी ह्या शब्दाची व्युत्पत्ति आणि व्याप्तिहि मनोरंजक आहे. कुणबी हा शब्द कूळ ह्या शब्दापासून झाला आहे. यांत कूड = एकत्र होणें, राहणें हा तामिळ धातु आहे. कुलू असा अपभ्रंश संस्कृत भाषेंत झालेला आहे. कूली = मजूर हा शब्द तामीळ भाषेंत प्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ शेतावरचा मजूर असा कानडी भाषेंत प्रसिद्ध आहे. कुणबी हा मराठी शब्द कुटुंबी असा संस्कृतांत, कणबी असा गुजराथेंत, कुडमी अथवा कुरमी असा संयुक्तप्रांत आणि बिहारांत प्रतलित आहे. ह्या नांवाचेच नव्हे तर अर्थाचे व वृत्तीचे अफाट समाज महाराष्ट्राबाहेर, गुजराथ-बिहारपासून खालीं दक्षिणेंत पसरलेले आहेत; परंतु ह्या नांवाचे समाज महाराष्ट्राबाहेरील इतर सन्मान्य समाजांत न मिसळतां स्वतंत्रपणें आहेत. ते महाराष्ट्रांतील मराठ्यांत मात्र एकजीव झाले आहेत; तथापि हा मराठ्यांचाच विशेष आहे असें नाहीं. गुजराथेंत पाटीदार म्हणून जो एक वर्ग आहे तो कुणबी क्षत्रियांचा आहे; आणि उत्तरेकडील राजपुतांत जाटांचा समावेश तंतोतंत मराठ्यांतील कुणब्यांच्याप्रमाणेंच झाला आहे.
जाट पाटीदार आणि बिहारमधील कुर्मि क्षत्रिय हे वंशानें कोण आहेत हें ठरविणें आपल्या विषयाबाहेरचें आहे. महाराष्ट्रांतले कुणबी मात्र अस्सल द्रावीड आणि मराठ्यांचे दक्षिणेंतील आगमनापूर्वीं येथें आलेल्या किंवा येथेंच मूळचे असलेल्या कोणा इतर वंशाचे असतील, असें त्यांच्या चालीरीतींवरून दिसतें. ह्या चालीरीति मराठ्यांनीं यांच्याशीं सर्रास शरीरसंबंध ठेवल्यामुळें मराठ्यांतहि आतां दृढमूल झाल्या आहेत. मराठ्यांचे मुख्य धंदे दोन. कटकटीच्या काळीं मुलुखगिरी, किंबहुना प्रतिष्ठित लूट आणि एरवीं जमीनदारी. कुणब्यांची वृत्ति एकच आणि ती अधिक सात्त्विक . ती म्हणजे जमीनदारी व जमिनीची मशागत. इंग्रजींत Peasant Proprietor म्हणून जो शब्दप्रयोग आहे तो कुणबी शब्दाचा सोळा आणे अर्थवाहक आहे. रा. त्रिं. ना. अत्रे यांनीं आपल्या गांवगाडा या नमुनेदार पुस्तकांत या अर्थाचें यथार्थ वर्णन केलें आहे. महाराष्ट्राच्या वसाहतीचें मराठ्यांपेक्षांहि कुणब्यांकडे अधिक श्रेय जातें हें या बालबोध पुस्तकावरून उघड होतें.
हिंदुस्थानांत किंबहुना दक्षिणेंत येण्यापूर्वीं मराठे हे फिरत्या अवस्थेंत होते. त्या प्राचीन काळीं यांचा विकास शेतकींत झालेला नसावा. ते पशूचे पालक आणि लुटारू होते. ते रथी आणि अश्वी होते, ह्याचें कारण ते फिरते होते. हींच नांवें त्यांच्या जातीला पडलीं. अशी ह्या नांवाची शकांची जी एक प्रतिष्ठित शाखा होती, तिचेमुळेंच असिरिया, सीरिया, आशिया वगैरे देशवाचक आणि खंडवाचक नांवें प्रचारांत आलीं असावीं. मराठे हे फिरते आणि मुलुखगि-या ऊर्फ लुटालूट करणारे असल्यामुळें, खाण्यापिण्याचा व शरीरसंबंधाचा सोवळेपणा त्यांच्यांत शक्य नव्हता; आणि तो अद्यापि शक्य नाहीं. “राजे लोकांना जात नाहीं” ही म्हण ह्या वृत्तीवरूनच पडली आहे. परधर्मी आणि अस्पृश्य ह्यांना शिवायकरून मराठ्यांची रोटीलोटी आजहि राजरोस सर्व हिंदु जातींशीं चालूं आहे. हजार वर्षांपूर्वीं मिश्र बेटीव्यवहार निदान अनुलोमानें तरी ( Hypergamy ) चालू होता ही गोष्ट आतां लपूं शकत नाहीं. संशोधनामुळें ती दिवसेंदिवस अधिक उजेडांत येईल. जातिभेद मानणें व माजविणें हें धनलोलुप नेभळ्या भांडवलशाहीचें हीन लक्षण आहे. बुद्ध, महावीरादि सुधारकांनाहि न जुमानतां हे आजचे भेद वैश्यांच्या वृत्तिसंघांनीं (Trade Guilds) मधल्या पौरुषविहीन अडाणी युगांत माजविले गेले आहेत; आणि उप-या ब्राह्मणांनीं व क्षत्रियांनीं त्यांना हातभार लावला असला तर तोहि त्यांच्या वेदबाह्य बिनबुडाच्या मतलबामुळेंच आहे. ब्राह्मण, क्षत्रिय ह्या जाती नव्हत, वृत्ति होत; आणि त्यांचा पाया जन्मावर नसून गुणकर्मावर आहे. ह्या विधानाला एका गीतेचाच नव्हे, तर सा-या इतिहासाचा पाठिंबा आहे. असो. ह्यामुळें मराठे व कुणबी हे भिन्न वंश वृत्तिसाम्यानें सहज एक झाले, असें मानण्यांत आम्ही मोठेंसें धाडस करितों असें नाहीं.
धर्म—धर्म म्हणजे उपास्यांची परंपरा व जन्म, विवाह, मृत्यु इ. गृह्यसंस्कारांची रूढि असा अर्थ घेतल्यास, शक, मराठे आणि त्यांचे पूर्वीं दक्षिणेंत आलेले द्रावीड कुणबी ह्यांच्यांत बरेंच वैषम्य असलें पाहिजे. पण समान वृत्ति आणि चिरसहवास ह्यांमुळें हें वैषम्य कमी कमी होत जाऊन हे दोघे आज एकजीव दिसत आहेत. तथापि त्यांच्यांत शारीरिक सादृश्य नव्हतें, हें शरीर, मस्तक, रंग, केस वगैरे गोष्टींवरून वंश ठरविण्याचें जें एक शास्त्र किंवा तंत्र आहे, त्यावरून दिसतें. उत्तरेकडील राजपुतांत जाटांची भेसळ झाली असली, तरी ते दोघे वंशाच्याच पोटशाखा असल्यामुळें शरीरतः त्यांची भिन्नता दिसत नाहीं; पण कुणबी भिन्न वंशाचा असल्यामुळें त्यांच्यांत मिसळलेल्या मराठ्यांचे रूपरंग विविध असणें साहजिक आहे. मराठ्यांचीं मूळ उपास्यें सूर्यचंद्रनागादि देवकें, त्यानंतर अधिक विकसित काळांत शिव आणि भूदेवी हीं दैवतें, नंतर बुद्ध जैनांची सुधारणा, त्यानंतर पुन्हा लिंगायतांची छाप, अगदीं अलीकडची लाट म्हणजे वारकरी-वैष्णव पंथ, असा ह्यांच्या धर्माचा विकास होत आला आहे. “ महाजनो येन गतः स पंथा ” ह्या न्यायानें मराठ्यांच्या गाड्याबरोबर कुणब्यांच्या मात्र नळ्यांची यात्रा चालली आहे. हाडाचा मराठा शैव आणि शाक्त आहे. कुणब्याचे मात्र नागनरसोबा अनंत आहेत. मराठा काय, कुणबी काय, ह्यांच्या धर्माची पृच्छा फार न केलेलीच बरी. ब्राह्मण पुराणिकासंबंधानें तुकाराम म्हणतात, “ पुढिला सांगे आपण न करी ”. सामान्य ब्राह्मणांचा धर्म जसा सांगण्यापुरताच, तसाच मराठ्यांचाहि ऐकण्यापुरताच ! हे देखल्या देवाला दंडवत करतील, वेळ पडली तर मुसलमानहि होतील; पण ह्यांच्या देव्हा-यांवर केव्हांहि टाक म्हणजे ह्याच्या पूर्वजांच्या मूर्तिच दिसतील. टाक = तक् नांवाची शक वंशाची एक प्रतिष्ठित शाखा होती. तिचेवरून ही टाकांची परंपरा आली असावी. तिचें नांव तक्षक. हे पांडवांचे मोठे शत्रु. जैमिनीनें ह्यांचा निःपात केला असें महाभारतांत रसभरीत वर्णन आहे. ह्या तक्षक नामक नागवंशांत पूर्वजपूजा विशेष होती असें वर्णन Story of Parthian Nation या पुस्तकांत आहे. प्रागेतिहासिक काळांतील हीं देवकें मराठ्यांत म्हणा अगर कुणब्यांत म्हणा आतां केवळ लगीनसराईंतच आठवतात. येरवीं आजकाल ह्यांचें दैवत भूदेवी जगदंबा. हें प्रस्थहि आजकालचें नव्हे. सर्व उपास्यांत कालानुक्रमें ह्यांचा नंबर पहिला आहे. हें प्रकरण मी माझ्या भागवतधर्माचा विकास ह्या भागांत सांगोपांग व्यक्त केलें आहे. उत्तरेकडे राजपूत व राठी आणि दक्षिणेंतील रड्डी हे प्रसिद्ध शैव आणि शाक्त होत. तैलंगणांत हिंडत असतां मला रड्डी घराणीं मरीआई, शीतळादेवी वगैरे ग्रामदेवतांचे वतनदार पुजारी व मालक दिसलीं. रड्डी जसे पुढें पुढें व्यापारांत शिरले, तसे ते शाकाहारी आणि वैष्णव बनले. इकडेहि दुकानदार मराठे व कुणबी तुकारामाच्या काळापासून वारकरी होऊं लागले. तरी पण त्यांच्या देवता जाखाईजोखाई; आणि त्यांना नैवेद्य रक्ताभाताचा ! ह्याशिवाय त्यांच्या शेतांतला डाबरा म्हणा किंवा राजधानींतला अश्वमेध म्हणा कसा सिद्ध होणार ? “धंदा तसाच देव” हेंच खरें.
शक, हूण इ. नांवांच्या मानवी टोळ्या वायव्येकडून पुरातन काळापासून, किंबहुना आर्य म्हणवणा-यांच्याहि पूर्वींपासून तों इ. सनाच्या ४।५ व्या शतकापर्यंत हिंदुस्थानांत आल्या आहेत. दक्षिणेंतहि इ. स. पूर्वीं ५।७ शतकांपासून त्यांचें अगमन वेळोवेळीं झालें असावें. तक्षक ह्या नांवावरून वर दर्शविल्याप्रमाणें हे लोक जसे नागवंशी असावेत असा तर्क वाहतो, तसेंच तौलनिक भाषाशास्त्राच्या अंतर्गत व्याकरण आणि शब्दकोशांच्या पुराव्यावरून शकांच्या, पल्लवांच्या, यवनांच्या (ग्रीकांच्या) टोळ्या आर्य, द्रावीड इत्यादि वंशाच्याहि असाव्यात असा तर्क होतो. ह्या जाती फार फिरस्त्या आणि मुलुखगिरी करणा-या असल्यानें यांनीं आपल्या पेहरावाप्रमाणें आणि भाषेप्रमाणें धर्महि वेळोवेळीं बदलला असल्यास मुळींच नवल नाहीं. उलट नसल्यासच महदाश्चर्य ! अगदीं अलीकडे म्हणजे शालीवाहन शतकाच्या आरंभीं दक्षिणेंत नहपान क्षत्रप नांवाच्या एका शक राजानें व त्याच्या घराण्यानें दोनतीन शतकें ब-याच वैभवानें राज्य केलें आहे. या राजांनीं बौद्धधर्म स्वीकारून ब्राह्मणांनाहि फार खुष राखिले होतें. नाशिक जिल्ह्यांतील चार शिलालेखांचा डॉ. सर भांडारकरांनीं आपल्या पुस्तकांतील पान १३ वर जो तपशीलवार उल्लेख केला आहे, त्यांत नहपानाचा जांवई उशवदात यानें लक्ष गाई दान केल्या, बारणासा या नदीला घाट बांधला, देवब्राह्मणांना सोळा गांवांचा अग्रहार दिला, ब्राह्मणाचीं लक्षभोजनें घातलीं, इतकेंच नव्हे; तर अस्सल ब्राह्मणी धर्माच्या रिवाजाप्रमाणें प्रभासक्षेत्रांत आठ ब्राह्मणांचीं लग्नें स्वखर्चानें करून दिलीं. इ. माहिती आहे. १८५७ सालच्या बंडानंतर ५।७ वर्षांनीं ग्वाल्हेरच्या शिंदेमहाराजांनीं पुण्यास येऊन बरेच दिवस तळ दिला होता, तेव्हां त्यांनींहि ब्राह्मणसंतर्पणाचीं अशींच शतकृत्यें केलीं होतीं. एकूण राजांचा धर्म लवचीक असणें साहजिक आहे.
धंदा—मराठ्यांचे धंदे दोन, शेतकी व शिपाईगिरी, आणि कुणब्यांचा शेतकी एकच, असें आम्ही वर म्हणालों. ह्यावरून मराठे हे कसब्यांत राहणारे आणि कुणबी गांवखेड्यांत राहणारे हें सिद्ध होतें; पण ह्या दोघांचा इतका एकजीव झाला आहे कीं, धंद्यांच्या दृष्टीनें त्यांच्यांत भिन्नता कल्पिणें केवळ अशक्य झालें आहे. शंभर वर्षांत म्हणजे तिस-याच पिढींत मराठ्याचा कुणबी आणि कुणब्याचा मराठा, म्हणजे शेतक-याचा राजा आणि राजाचा शेतकरी अशी उलटापालट निदान महाराष्ट्रांत तरी गेल्या दोन हजार वर्षांत बेमालूम चालू आहे. कोल्हापूरच्या श्रीशाहू राजांनीं मला स्वतः सांगितलें कीं, राणीपैकीं कोणी बाळंतीण झाली कीं, पहिल्या रात्रीं मुलाला वाळलेल्या गवतावर निजवावें, अशी चाल महाराजांच्या घराण्यांत होती. ह्या चालीचा अर्थहि स्वतः महाराजांनींच सांगितला कीं, आम्ही राजे लोक शेतकरी आहों, हें केव्हांहि विसरूं नये म्हणून ही चाल आहे. कुणबी हा बळी राजा कसा आहे, तो गाय व सर्व गांवठाण त्याचें वांसरूं कसें वगैरे गोष्टी रा. अत्रे ह्यांनीं आपल्या गांवगाड्यांत तपशीलवार वर्णिल्या आहेत. खेड्याचा राजा पाटील. गावडा (ग्रामठा) ह्यालाच कानडींत गौडा (पाटील) म्हणतात. ब्राह्मणापासून तों महारमांगापर्यंत सर्व जातींचें बलुतेंअलुतें ऊर्फ कारूनारू ह्यांचीं वांसरें. ही गांवगाड्याची घटना व ही सर्व परिभाषा फारच पुरातन आहे. समाजशास्त्राच्या दृष्टीनें ही अपूर्व घटना मराठ्यांच्याहि आगमनापूर्वींची असावी, असा माझा ह्या परिभाषेवरून तर्क होतो. शेतकीचीं उपकरणें, आउतें, चालीरीति, फार काय बलुतेंअलुतें हे शब्दहि अस्सल देशी, म्हणजे कानडींतले आहेत. एक हजार वर्षांपूर्वीं गोदावरीच्या दक्षिणेकडील सर्व देश, आणि ठाण्याच्या दक्षिणेकडील सर्व कोंकण थेट कावेरीच्या किना-यापर्यंत राजरोस कर्नाटकांत मोडत असें. बगळ म्हणजे कुटुंबाचा पसारा अथवा बल म्हणजे उजवी बाजू ह्या दोन शब्दांपासून बलुतें या शब्दाची व्युत्पत्ति असावी. बगळ + कूड अथवा बल + कूड (उड—ट-त) बलोत असा हा मूळ कानडी शब्द आहे. त्याचें कारूं ( कार, कृ धातूपासून ) हें आर्यन रूप होय. तसेंच अलोतें याचें नारु असें आर्यन भाषांतर होय. बलोतें अथवा कारूं म्हणजे हातानें (उजव्या हातानें) श्रम करणा-याला जें अव्वल दर्जाचें वेतन मिळतें तें; आणि नारु अथवा अलोतें म्हणजे देवांच्या अगर धर्माच्या नांवावर दुय्यम आणि गौण दर्जाची भिक्षा जी मिळते तो हक्क. नारु = नारायण असा देववाचक आर्य भाषेंतला अर्थ आहे. एल म्हणजे देव. ह्या अर्थाचा सेमेटिक आणि सुमेरियन भाषेंतला आहे. तो कानडींत किंवा कर्नाटकांत सिंध प्रांतांतून आला असावा. एल्लप्पा (यल्लाप्पा), एलापूर, एलूर व यल्लम्मा वगैरे माणसांचीं, गांवांचीं, दैवतांचीं नांवें शक मराठ्यांनीं दक्षिणेंत आणलीं किंवा द्रावीड कुणब्यांनीं त्यांच्या पूर्वींच तेथें नेलीं तें सांगतां येत नाहीं. तीं आज मराठा आणि कानडी कुणब्यांशीं एकजीव झालीं आहेत. बलुतें म्हणजे उजवीकडचा संघ असा अर्थ असल्यास त्याला जुळणारा एलुतें म्हणजे एर = दुय्यम अथवा एड = डावीकडचा संघ असाहि अर्थ लागतो. बल=उजवा, एड=डावा असे कानडी शब्द आहेत. व्युत्पत्ति कशीहि असो, हीं नांवें आणि ज्यांचीं हीं नांवें आहेत त्या संस्था मराठ्यांशीं आणि विशेषतः कुणब्यांशीं एकजीव आहेत; पण चमत्कार हा कीं, स्वतः मराठा किंवा कुणबी हा बलुतेदार नसतो. अलुतेदार तर कधींच नसावयाचा. बलुते अलुत्याचा तो दाता अगर धनी असतो. म्हणजे कारूंचा धंदा किंवा नारूंची भिक्षा मराठा अगर कुणबी कधीं स्वतः करणार नाहीं कीं मागणार नाहीं. असा हा परिपाठ पुरातन आहे.
संशोधक कै. राजवाडे ह्यांनीं “राधामाधवविलासचंपू” च्या प्रस्तावनेंत लिहितांना मराठ्यांचे दोन भेद कल्पून पुष्कळ टीका केली आहे. तिचें खंडण मीं मागें ‘विजयी मराठ्यां’त एक लेखमाला लिहून केलेंच आहे. उत्तरेकडच्या मराठ्यांना राजपुतांचे वंशज व आर्य असें कल्पून आणि दक्षिणेकडचे मराठ्यांना नाग असें कल्पून एकाची स्तूती व दुस-याची निंदा राजवाड्यांनीं केली आहे. वंशवाचक पुरावा देतांना दक्षिणेकडच्या मराठ्यांचें बिराठे ऊर्फ बेरड हें निंदाप्रचुर एक नसतें नांव कल्पून अतिप्रसंग केला आहे. बेरड = बेडर ह्या नांवाची जी एक हीन मानलेली जात कर्नाटकांत आहे तिच्या नांवाची राजवाड्यांनीं केलेली बिराठे ही व्युत्पत्ति म्हणजे एक अक्षम्य चुकी आहे. बेड हें कानडी व तेलुगु जातिवाचक नांव आहे. हिंचे मूळ व्याध हा संस्कृत शब्द आणि त्याचेंहि मूळ बेटे = शिकार हा अस्सल कानडी व तेलुगु शब्द आहे. मराठे ही शिकारी जात आहे; पण तेवढ्यावरून त्यांना बेडरांप्रमाणें कधीं कोणीं हीन मानलें आहे, असें राजवाड्यांशिवाय कोणी म्हणूं शकणार नाहीं. बेड या एकवचनाचें कानडी व्याकरणांत बेडर हें अनेकवचन आहे. कानडींत व तेलुगूंत जातिवाचकच नव्हे तर समाहारवाचक सर्व शब्द अनेकवचनांत असतात. जसे कुरूब = धनगर एकवचन. कुरुबर अनेकवचन = धनगर जात. जोन्ना = जोंधळा एक जोंधळ्याचा कण. जोन्नलु = जोंधळें (तेलुगू). बिराठ = बेडर ही व्युत्पत्ति कशीहि असो. मराठे हे मृगयाप्रिय असले तरी बेडर, हरिणशिकारी, कटबु, शिकलगार ह्याप्रमाणें हीन अशी एक गुन्हेगार जात खास नव्हत.
ह्याचसंबंधीं राजवाड्यांनीं मराठ्यांचा राजकीय व सामाजिक दर्जा ठरवितांना त्यांना गणराज पद्धतीचें (म्हणजे जिला इंग्रजींत Feudal = सरंजामी म्हणतात त्या पद्धतीचे) ठरविलें आहे. हा ठराव मराठ्यांना व कुणब्यांनाहि लागू आहे, हें खरें. उत्तरेकडचे राजपूत आणि युरोपांतले जर्मन-रशियनांतहि ही पद्धत मागें व आतांहि आढळते. ही सरंजामी पद्धत आणि रा. अत्रे ह्यांनीं वर्णिलेली गांवगाड्याची अति पुरातन पद्धत ह्या दोन्ही एकच नव्हत. सरंजाम ही मराठ्यांची लष्करी घटना आहे, आणि गांवगाडा ही कुणब्यांची मुलकी घटना आहे. मराठे हे धंद्यानें राजकारणी असल्यानें त्यांच्या परंपरेंतच नव्हे तर वैयक्तिक स्वभावांतहि अशा अनेक सामाजिक संस्थांचे अवशेष दडी मारून बसलेले संशोधकाला आढळतील.
विवाह — मराठा ओळखण्यांत त्याची पुरातन विवाहपद्धति एक मुख्य साधन आहे. वर म्हटलेंच आहे कीं, मराठा जात आणि धर्म यापेक्षां कुळ अधिक मानणारा आहे. तो वाटेल त्याच्याशीं जेवील, वाटेल त्या देवाला नवस करील, वाटेल त्याचें नांव आपल्या मुलास देईल; पण धंदा करतांना आपली तरवार व नांगर हींच स्मरेल व त्यांची पूजा करील, आणि लग्न करतांना – विशेषतः मुलगी देतांना, ( घेतांना तितकें नाहीं) प्रतिपक्षाच्या कुळाचा पदर शोधीत बसेल. लष्करी जात असल्यानें बहुपत्नीक बहाणा साहजिक वाढत गेला. त्यामुळें कोँणाचीहि मुलगी उचलून आणली तरी चालेल; पण आपल्या पोटचा गोळा दुस-याला देतांना मात्र त्याला कुळीचा पदर शोधावा लागतो. द्राविडी भाषेंत कुळीलाच जातकुला अशी संज्ञा आहे. आर्यवर्णाश्रमधर्म आर्येतरांमध्यें तंतोतंत नसणारच; पण आपल्या कुंळाचा अभिमान सर्व मानवमात्रांमध्यें आहे. मग स्वत:ला राजे म्हणविणा-या मराठ्यांत व कुणब्यांत तो अधिकच असणार. येवढ्यावरून मराठ्यांमध्यें आर्य म्हणविणारे वंश नाहींतच असें म्हणणें नाहीं. परंतु विवाहाच्यां दृष्टीनें पाहूं जातां त्यांच्या खानदानींत अनेक आर्येतरांच्या रूढि अद्यापि प्रमुखपणानें झळकत आहेत त्या खालीं दिल्या आहेत.
देवक : ब्राह्मणांच्या विवाहांत अग्नीचें प्राधान्य आहे. तसें मराठ्यांत किंबहुना राजपुतांतहि नाहीं. संसगामुळें होम, सप्तपदी, कन्यादान, जांवयाची पायपूजा वगैरे ब्राह्मविवाहाच्या रूढी जशा मराठ्यांनीं उचलल्या; तशाच हळदी, देवकार्य, राजभेटी, रासन्हाणी, गडगनेर, रुखवत वगैरे धार्मिक व केवळ सामाजिक रूढि मराठ्यांच्या ब्राह्मणांनींहि उचलल्या. या रीति कांहीं अंशीं हौसेनें व कांहीं अंशीं प्रतिष्ठा वाढविण्यासाठीं एकमेकांपासून उचललेल्या असणें साहजिक आहे. हल्लींचीं क्षुद्र देवकें हीं पूर्वींचीं आद्य उपास्यें. तीं मराठ्यांना लग्नांतच तेवढीं आठवतात. देवकें हीं गोत्राचीं द्योतकें होत. देवक जमलें कीं, गोत्र अथवा कूळ जमलें असें समजून, ब्राह्मणांत जसा सगोत्र विवाह त्याज्य तसाच मराठ्यांत सदेवक विवाह त्याज्य समजतात. देवक जसें मराठ्यांत आहे तसेंच दक्षिणेंतील रड्डीमध्येंच नव्हे, तर इतर आर्येतरांमध्येंहि आहेत. त्याला कानडींत बळि असें नांव आहे. याची व्युत्पित्ति बड्डी = मुळी किंवा बळ्ळी = वेल अशी असावी. कोणत्या तरी झाडाची मुळी अगर वेल हींच पूर्वींचीं विशेष देवकें होतीं. सूर्य, चंद्र, नाग, मच्छ, कच्छ, वराह हीं प्रतिष्ठित चिन्हें राजकीय निशाणांवरून पुढें मराठा वाघ्याच्या पाग्या झाल्यावर त्यांच्यांत झळकूं लागलीं. फार तर काय; कवडी, केरसुणी व फाटकी वहाण हींहि देवकें आहेत; पण कोणी क्षत्रियकुलावतंस असल्या देवकांचें देवकार्य आपल्या राजवाड्यांत आजकाल करील हें संभवत नाहीं. उलट होम, सप्तपदी आणि ऐरणीदान या आर्यपरंपरा अनार्य राजवाड्यांत वेदमंत्र म्हणूनहि जर कोणीं करूं म्हटल्यास, मराठ्यांच्याच काय; पण इतरांच्या मिश्रविवाहांतहि पौरोहित्य करण्यास प्रत्यक्ष शंकराचार्य म्हणविणारे आजकाल प्रसिद्धपणें पुढें येत आहेत ! येथें प्रश्न वंशाचा नसून दक्षिणेचा असतो हें उघड आहे.
एंथोव्हन आपल्या Tribes of Bombay Presidency या पुस्तकांत ऐशीं देवकें आणि ब्यायशीं बळींचा उल्लेख करून म्हणतो कीं, “या सर्वांचीं इंग्रजी नांवें देणें शक्य नाहीं. तीं सर्व कर्नाटक व म्हैसूर प्रांतांतील झाडें व वेली आहेत.” मग या देवकांचें देवकार्य करणारे मराठे व रड्डी यांनीं या वेली उत्तरेकडून येतांना बरोबर आणून त्यांची कर्नाटकांत लागवड केली कीं हें सर्व मूळ कर्नाटकांतलेच वंश? हें कोडें मराठे हे शक आणि कुणबी हे द्रावीड असें मानल्याशिवाय सुटण्याचा संभव दिसत नाहीं. खालील पदार्थ देवकांत आहेत व बळींतहि आहेत. या एकाच माळेंत प्राणी, वनस्पति व निर्जीव पदार्थांचीहि गणना झालेली आहे.
१ केतकी
२ जांभूळ
३ वड
४ नागचांफा
५ वेत
६ कांसव
७ नाग-साप
८ डुक्कर
९ हरीण
१० कु-हाड
११ सोनें
१२ हळद इ.
प्राचीन मानवी वंशांत कांहीं वंश मातृप्रधान, तर कांहीं पितृप्रधान होत. म्हणजे कांहींची कौटुंबिक आणि वारशाची पद्धति आईकडून व इतरांची बापाकडून चालत आलेली आहे. उदा. मलबार आणि ब्रह्मदेशांत स्त्रियांचें प्रस्थ अद्यापि अबाधित असलेलें मीं स्वत:शोधून पाहिलें. स्त्री म्हणजे कस्पटाप्रमाणें मानणारें वंश सेमेटिक, तुर्क, शक आणि आर्यहि होते व अद्यापि आहेत. पण ब्रह्मदेशांत पुरुषच कस्पटाप्रमाणें बायकोच्या नजरेखालीं नांदतो ! कुराणांत चार बायका कराव्या असें सांगून महमदानें स्वत: नऊ केल्या ! पण श्रीकृष्णाला तर सोळा हजार बायकांचे स्वामी हा एक जणू किताबच अर्पण केलेला आढळतो. शक, पल्लव इत्यादि वंश बुहपत्नीक होते; पण मराठ्यांप्रमाणें कुणबी हे पितृप्रधानच (Patriarchs) होते असें म्हणवत नाहीं. त्यांच्यामध्यें मामेबहिणींशीं प्रत्यक्ष भाचीशींहि (बहिणीची मुलगी) लग्नें घडतात. ही अस्सल द्राविडी चाल आहे. लग्नांत काकाचें किंबहुना बापाचें कांहींच प्रयोजन नसून मावळ्याचें मात्र महत्त्व फार आहे. ‘आई मरून मावळा असावा’ अशी कानडींत म्हण आहे. लग्नांत वधूवरांच्या मागें, विशेषत: वराच्या मागें त्याचा मावळा नंगी तलवार उगारून सर्व पाणिग्रहणाचा विधि उरकेपर्यंत उभा राहावा लागतो. ही गोष्ट मातृप्राधान्य दाखविते. मलबारांत जरी वारसा आईकडून चालतो तरी मावळा तिचा कारणवानू म्हणजे वहिवाटदार असल्यामुळें वारसा त्याच्या मुलीस उतरतो !
पडदा : मराठ्यांमध्यें पडदा आहे; तर कुणब्यांत तो मुळींच नाहीं. उलट कुणब्यांत पुनर्विवाह आहे, तर मराठ्यांना तो मान्य नाहीं. पण हा सोंवळेपणा मराठे हिंदुस्थानांत आल्यावर ब्राह्मणांच्या संसर्गानें त्यांच्यांत आलेला दिसतो. ह्या गोष्टीवरून भिन्नवंशीय कुणब्यां-मराठ्यांचा व्याहीपणा मराठे हे दक्षिणेंत आल्यापासून घडल्याचें व्यक्त होत आहे. राजपूत व जाठ ह्यांचाहि परस्पर संबंध अगदीं मराठ्यां कुणब्यांसारखाच उत्तरेकडे चालू आहे. जाट हे बाहेरून राजपुतांबरोबच आलेले कुणबी होत. दक्षिणेंतील कुणबी कदाचित् मराठ्यांच्या पूर्वींच इकडे अतिप्राचीन काळीं आले असतील; पण ते जाठांपेक्षांहि मराठ्यांशीं अधिक एकजीव झाले आहेत. पडदा हिदुंस्थानांत मुसलमानांनीं प्रथम आणिला ही गोष्ट निव्वळ खोटी आहे. राजपुतांनीं आणि मराठ्यांनीं तरी तो मुसलमानांपासून घेतला नसून, तो ते हिंदुस्थानांत येण्यापूर्वींच पाळीत होते. हिंदुस्थानाबाहेरील शकपल्लवांमध्यें तो पूर्वीं होता हें आपणांस पुढें लिखित इतिहासाच्या पुराव्यावरून दिसेलच. राजपुतांची व मराठ्यांची वरात घोड्यावरूनच निघाली पाहिजे. इतकेंच नव्हे तर ह्या जाती जोरावर असल्यामुळें, इतर जातींची वरात घोड्यावरून काढण्यास ह्यांची हरकत होऊं लागली. सिंध देशाचा दाहीरनामा ह्या नांवाचा एक जुना इतिहास आहे. त्यांत राजपुतांनीं जाठांना हीन समजून त्यांचा अनन्वित छळ केल्याचें वर्णन आहे. तितका छळ मराठ्यांनीं महारांचाहि केलेला आढळत नाहीं. तरी महारांनीं घोड्यावरून वरात काढण्यास मराठे पाटील परवानगी देण्यास धजणार नाहींत; महारांची वरात बैलावरून निघेल; आणि महारहि मांगांना आपली वरात रेड्यांवरूनच काढण्याचा आग्रह चालवतील. ह्यावरून काय सूचित होतें? घोडा हा प्राणी सबंध हिंदुस्थानांत फार फार प्राचीन काळीं मुळींच नव्हता. हें जनावर मूळ मध्य आशियांतलें. अश्वी = असी, ही शकवंशाची एक मुख्य शाखा, जिचें नांव सबंध आशिया खंडाला पडलें, त्या जातीचें हें मुख्य वाहन. पल्लव ऊर्फ पार्थ म्हणून जें एक राष्ट्र मध्य आशियांत होतें, त्यांतील योद्धे घोड्याच्या पाठीवर झोपहि घेत असें वर्णन Story of Parthian Nation ह्या पुस्तकांत आढळतें. अस्सल घोडा जसा जमिनीला पोट टेकत नाहीं तसा अस्सल मराठा स्वार घोड्यावरून न उतरतां त्याच्या पाठीवरूनच दिवस आणि रात्रहि काढील असा अलीकडच्या इंग्रज सेनापतींचाहि भरंवसा आहे, तसाच राजपुतांविषयीं मोगल बादशहांना होता. बैल हा प्राणी सिंध व उत्तर हिदुंस्थानांत पूर्वीं जितका होता तितका दक्षिणेंत नव्हता. तंजावरकडील एका अत्यंत प्राचीन कबरस्थानांतील मडक्यांत नुसत्या म्हशी, रेडे, डुकरांचींच छायाचित्रें आढळलीं. ह्यावरून बैलवाल्या कुणब्यांचें मूळ स्थान दक्षिणेंतलें नसावें आणि घोडेवाल्या मराठ्यांचें मूळ स्थान तर मध्य-आशियांतलें असावें, असें अनुमान करण्यास काय हरकत आहे?
वीर : मराठ्यांच्या लग्नांत कर्नाटकांत वीर निघत असतो. हा एक वरातीप्रमाणेंच छबीना असतो. एका मनुष्याचे अंगाला हळद माखून त्यावर पुष्कळसे दागिने घालितात. तो हातांत नागवी तलवार घेऊन वाद्यांच्या तालावर ती परजीत छबिन्यापुढें चालतो. त्याला वीर म्हणतात. पण ही चाल आतां रट्टी आणि लिंगायतांमध्येंच विशेष आहे. कोल्हापुराकडील कुणब्यांच्या लग्नांत वीर निघतो; पण खानदानी मराठ्यांत अलीकडे ही लग्नांतील चाल कोठें फारशी आढळत नाहीं हा चमत्कार आहे. मराठे सारे वीर म्हणून त्यांच्यांत ही चाल नसावी. ज्या कुणबी घराण्यांत मागें एकदा वीर पुरुष रणांत मारला गेला, त्यांतच अशी चाल असेल असें वाटतें. कुणबी पूर्वीं जैन, लिंगायत वगैरे होते. धर्म बदलला तरी लग्नांतल्या रूढि बदलत नाहींत, ह्याचें हें उदाहरण आहे. एकंदरींत ही चाल कुणब्यांचीच दिसते.
खाणेंपिणें : ह्या बाबतींत कुणब्यांत आणि मराठ्यांत कालपरत्वें आणि देशपरत्वें भेद आढळतो, तो मुख्यत: मांसाहार आणि मद्यपान ह्या बाबतींतच होय. साधारणत: देशावरील शेतकीच्या प्रदेशांतील खेड्यांत राहणारे कुणबी मांसाहार फार बेताबेतानें करितात व दारू तर पीतच नाहींत. अलीकडे इंग्रजी अंमलांत व त्यांचेंच अबकारी धोरण संस्थानांनीं उत्पन्नाच्या लोभानें स्वीकारल्यामुळें, खेड्यांतील कुणब्यांची फार शीलहानि होऊं लागली आहे ! साधारणत: मद्यपान हें उत्तरेकडचें व्यसन असून दक्षिणेकडील द्रावीड उष्णकटिबंधांत हें व्यसन पूर्वीं नसावें असा अजमास आहे; परंतु पूर्वींपासून शहरांत राहणा-या लष्करी पेशाच्या मराठ्यांनीं दारू पिणें हें साहजिकच नव्हे तर भूषणावहहि मानिलें आहे. खानदानी पेशाच्या मराठ्यांना शिकारीचा नाद असल्यानें ते स्वत: मारून आणलेल्या जनावराचेंच मांस खाण्याचा संप्रदाय पाळणारे अद्यापि पुष्कळ आढळतात. अशा जनावरांत डुकराची शिकार प्रतिष्ठित मानण्यांत येते. भाल्यानें डुकर मारणें व त्याचें मांस आपल्या इष्टमित्रांस वांटणें ही मराठ्यांची मोठी मिजास. खेड्यांत राहणारे कुणबी पिढ्यानपिढ्या कृषीवलाच्या सात्त्विक धंदा केल्यानें म्हणा, किंवा दूधदुभत्याची लयलूट असल्यामुळें, किंवा गरिबीमुळें म्हणा, अगर जैन, लिंगायत, वैष्णव धर्मांच्या संस्कारामुळें म्हणा, बहुतेक शाकाहारीच असतात. महानुभाव पंथाच्या सान्निध्यानें व-हाड-नागपूरकडचे कुणबीच नव्हत, तर श्रीमंत नागरिक, देशमुख, पाटीलदेखील कसल्याहि मांसाला कधींहि शिवत नाहींत. मद्यपानाची तर गोष्टच दूर. पुरुषांपेक्षां कुणब्यांच्या बायका अधिकच निरामिष राहतात. ह्या भेदामुळें क्वचित् प्रसंगीं रोटीबेटीच्या व्यवहारावरहि परिणाम होत असलेला आढळतो.
मराठे हे भोजनव्यवहारांत अस्पृश्यांशिवाय इतर हिंदूंशीं अटक पाळीत नाहींत असें म्हटलें; पण केव्हां केव्हां हा सोंवळेपणाहि पाळल्याचीं चमत्कारिक उदाहरणें घडतात, तीं धर्माच्या दृष्टीनें नसलीं तरी इतिहाससंशोधनाच्या दृष्टीनें चिंतनीय वाटतात. कोल्हापुराकडे गडकरी आणि कोटकरी म्हणजे लष्करी पेशाचे मराठे मराठी स्वराज्याचे पुरातन वतनदार आहेत. यांना वेतन आणि वतनाशिवाय प्रसंगविशेषीं शिधा मिळतो. तो ते कधींहि शिजलेला न घेतां कोरडाच घेत असतात. फार काय, ही पुरातन नोकरमंडळी प्रत्यक्ष छत्रपति महाराजांच्या पंक्तिला बसून जेवण्यालाहि तयार नसत, असा पूर्वींचा रिवाज मला एका सन्मान्य मित्रानें सांगितला. मरहूम ग्वाल्हेरचे महाराज माधवराव शिंदे यांचे सासरे रत्नागिरीचे राणे त्यांच्या पंक्तीला जेवण्याचें नाकारीत असेंहि मीं ऐकलें आहे. हा भेद शेतकरी पेशा अगर खेड्यांतील वस्तीमुळें पडणें संभवनीय नाहीं. कोल्हापूर आणि कोकण प्रांतांत एक वेळ जैन धर्माचाच व्याप फार होता. त्यानंतर लिंगायत धर्माची छाप बसली. या धार्मिक कारणावरूनहि जर या भेदाची मीमांसा होत नसल्यास राजघराणीं हीं नेहमीं उप-या मराठ्यांचीं असल्यामुळें त्यांच्याशीं स्थाइक मूळ कुणबी राजरोस बेटीव्यवहार करूनहि रोटीव्यवहार नाकारणें शक्य आहे. दिल्लीच्या मोगलांना राजपुतांनीं बेटी दिली; पण रोटी घेतली नाहीं. तोच प्रकार खालीं, मलबारांत नंबुद्री ब्राह्मण नायर जातीच्या बेटी घेतात; पण रोटी घेत नाहींत, या रिवजांतहि दिसतो. व-हाड-नागपूरकडचे जुने मराठे कुणबी चांगलें सुसंपन्न आणि देशमुखी-पाटिलक्यांचे सरंजामदार आहेत. ते प्रत्यक्ष नागपूरचे भोसले घराणें उपरे समजतात. कारण, भोसल्यांचें घराणें त्या प्रांतांत अलीकडे गेलें. हे कुणबी मद्यमांसाला शिवत नाहींत. माझे एक देशमुखी मित्र आहेत, त्यांना तर मांस किंवा रक्त पाहिल्याबरोबर घेरीच येते ! असले लोक बेटी देऊनहि पंक्तीला बसत नसल्यास आश्चर्य तें काय?
महार मेलेल्या पशूचें मांस खातात; पण डुकराचें मांस मुसलमानाप्रमाणेंच त्याज्य समजतात. मराठे तर जंगली डुकराचें मांस आवडीनें खातात. महारांचें डुकर हें कदाचित् प्राचीन देवक असावें. मराठ्यांतहि ज्यांच्या घरीं बोलाई देवी आहे. ते शेळीचें किंवा बोकडाचें मांस वर्ज्य समजतात. धिम्मेपणानें माग काढीत मागें गेल्यास मराठ्यांत आणि कुणब्यांत आज ज्या अनेक तत्सम जातींचा समावेश झालेला आढळतो त्यांची परस्पर वंशभिन्नताहि अधिक स्पष्ट आढळून येईल.
बेटीव्यवहार, रोटीव्यवहार आणि भेटीव्यवहार इत्यादि हिंदुस्थानांत जे जातिभेदाचे नियम पाळण्यांत येतात ते केवळ भरतखंडांतच आहेत व ते आर्यांनींच येथें आणिले असा जो सर्वत्र समज आहे तो चुकीचा आहे. ते भरतखंडाबाहेर आणि निरनिराळ्या मानववंशांनीं मानवी इतिहासांत निरनिराळ्या काळीं पाळले आहेत, हें मानववंशशास्त्रज्ञांना नीट अवगत आहे. विगोत्रविवाह (Exogamy), अनुलोम उद्विवाह (Hypergamy), एकत्र खानपानाचा प्रतिबंध (Non-Commensality), अस्पृश्यता (Untouchability or Polution) इत्यादि जातिभेदाचे नियम हिंदुस्थानाच्या दूरदूरच्या निरनिराळ्या भागांतच नव्हे, तर अखिल जगाच्या निरनिराळ्या दूरदूरच्या भागांत निरनिराळ्या काळीं पाळण्यांत आलेले आहेत, ते असे :- इस्त्रायल देशांत प्रचीन काळीं तेथील पुरोहितवर्ग इतरांच्या हातचें खात नसत. इंग्लंडांत अद्यापि सामान्य वर्ग आपल्यापेक्षां उच्च दर्जाच्या सरदार लोकांत आपल्या मुली देण्याला उत्सुक असतात आणि हे वर्ग सुसंपन्न व सुसंस्कृत असल्यास तेथील सरदारहि अशा मुली घेण्यास फारशी हरकत घेत नाहींत. जपानांत एटा व हीना या जाती अद्यापि अस्पृश्य आहेतच. ब्रह्मदेशांत तुबा याजा, पयाचून, संडाला, केबा, तुताँसा, पक्वे, लेयाडाँ, थेंजाँ वगैरे तद्देशीय वर्ग आमच्यांतल्या महार, मांग, भंगी लोकांप्रमाणेंच अगदीं अस्पृश्य आहेत हें मीं स्वतः पाहिलें. त्याचें तपशीलवार वर्णन मीं माझ्या “ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्ग” या लेखमालेंतून “नवा काळ” वगैरे वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केलें आहे. हें सर्व येथें सांगण्याचें कारण हें कीं, बृहन्महाराष्ट्रांतील मराठा म्हणून राष्ट्रवजा जो एक मोठा जनसमूह आहे तो वर्ग आणि कुणबी व तत्सम जाती यांच्या दरम्यान अस्पृश्यता शिवायकरून वरील सर्व नियम नेहमीं नसले तरी प्रसंगविशेषीं पाळण्यांत आलेले वरील परिच्छेदांत सांगितलेल्या खाण्यापिण्यांतल्या सोंवळेपणावरून लक्षांत येण्यासारखें आहे. प्रत्यक्ष मराठे हे स्वत: कधींच खाण्यापिण्याचे बाबतींत सोंवळेपणा पाळींत नाहींत, तरी कांहीं कुणबी केव्हां केव्हां हा सोंवळेपणा दाखवितात. हा सोंवळेपणा दक्षिण देशांतील द्राविडांत आणि महाराष्ट्रांतील लिंगायतांत फार आहे. फार तर काय, खाण्यापिण्यांत हे द्रावीड लोक दृष्टीचाहि विटाळ मानतात, मग भेटीची गोष्ट तर दूरच राहिली ! यावरून कुणबी हे द्रावीड आणि मराठे हे आर्य, शक, पल्लव, हूण, अभीर इत्यादि मध्य एशियांतील मागाहून वेळोवेळीं आलेल्या अनेक वंशांचें एक जाळें असावें हें सुचविण्याचा माझा उद्देश आहे. इंग्लंडांतील सरदार वर्गाप्रमाणें अस्सल मराठेहि श्रीमंत कुणब्यांच्या मुली घेतात, इतकेंच नव्हे, तर वेळ पडल्यास गरीब मराठे श्रीमंत कुणब्यांस मुली देतातहि. यालाचां मीं अनुलोम उद्विवाह (Hypergamy) असें नांवा दिलें आहे. आपल्यापेक्षा उच्च मानलेल्यांना आपल्या मुली देणें (Hypergamy) हाच प्रकार राजपूत आणि जाठ यांमध्यें उत्तर हिदुंस्थानांत आहे आणि खालीं मलबारांत नायर त्यांच्या खालच्या वर्गांतहि आहे. नंबुद्री ब्राह्मण आणि नायर राजवंश यांचे दरम्यान हा उद्विवाह हल्लीं चालू आहेच.
अंत्येष्टि : मराठ्यांत प्रेतें जाळण्याची चाल आहे; पण दक्षिण हिंदुस्थानांतील कांहीं मराठ्यांत प्रेतें पुरण्याचीहि चाल आढळते. हे मराठे श्रीशिवोत्तरकालीं जर दक्षिणेंत गेले असतील तर त्यांच्यांत ही पुरण्याची चाल कशी पडली याचें आश्चर्य वाटतें. दोनचार शतकांत अंत्येष्टीसारख्या गंभीर विधींत फरक होणें संभवनीय नाहीं. यावरून हे दक्षिणेंतील मराठे एक तर द्रावीड असावेत किंवा तसें नसल्यास त्यांनीं केव्हां तरी लिंगायत धर्माचा स्वीकार करून त्यांनीं पुन्हा अलीकडे ब्राह्मणी धर्माचा स्वीकार केला असावा; पण प्रेतें पुरण्याची चाल तशी राहून गेली असावी.
श्राद्ध : खरें पाहतां ब्राह्मणी पद्धतीचा श्राद्धविधि मराठ्यांत नाहीं. जेथें हा रिवाज आढळतो तेथें तो ब्राह्मणांच्या सहवासाचा परिणाम असावा. राजे लोक व इतर प्रतिष्ठित मराठा समाज यांवर असा परिणाम होणें केवळ साहजिक आहे. मराठ्यांनीं हिंदुस्थानांत आल्यावर बौद्ध व जैन धर्मांचा स्वीकार केला, तसाच ब्राह्मणी धर्माचाहि केला. पण सामान्य दर्जाचे मराठे आणि कुणबी यांच्यांत श्राद्ध नसून नुसती महाळ घालण्याचीच चाल आहे. सर्व मराठे जर आर्य असते तर त्यांच्यांतील गृह्यसंस्कारांत वेदोक्त पुराणोक्ताचा तंटा किंवा वेदबाह्य ग्राम्य चालींचा शिरकाव झाला नसता. कोणी विचारतील कीं, कांहीं ब्राह्मणांत वेदबाह्य ग्राम्य चाली आणि उपास्यें आढळतात आणि त्यावरून त्यांनाहि व्रात्यस्तोम करावा लागतो, तेवढ्यावरून ते अनार्य ठरतात काय? पण त्याला उलट प्रश्न असा कीं, तेवढ्यावरूनच ते अनार्य ठरले नाहींत तरी आजचे सारेच ब्राह्मण प्राचीन काळींहि आर्यांत गणले जात होते याला तरी पुरावा काय? असो. प्रस्तुत विचार मराठ्यांपुरताच असल्यानें अशा अवांतर वादास एथें अवकाशच न देणें बरें. मनुस्मृतींत ज्या क्षत्रियांसाठीं व्रात्यस्तोम विधि सांगितला आहे अशा क्षत्रियांत शक, पल्लव, यवन, ग्रीक, अंगवंगादि आहेत, तर हे मराठे नसतील काय?
पेहराव : हिंदुस्थानचा बराच भाग उष्ण कटिबंधांतला असल्यामुळें दक्षिण हिंदुस्थानांत तरी पेहरावास प्राधान्य नाहीं. निदान शिरोवस्त्र तरी उत्तरेकडून आलेलें दिसतें यांत शंका नाहीं. डोईवरचा रुमाल, फेटा, बांधलेली पगडी, टोपी या सर्व गोष्टी हिंदुस्थानाबाहेरच्या, विशेषत: मध्यआशियांतल्या आहेत हें ख्रिस्ती शकाच्या पूर्वींच्या व नंतरच्या दोनचार शतकांतील नाण्यांवरून आढळणारे ठसे व इतर चित्र यांवरून दिसून येतें. अद्यापि मद्रासी व बंगाली राष्ट्रें हीं बोडकींच आहेत. ब्रह्मी व आसपासचीं मोगली राष्ट्रें डोईला एक लहानसा हातरुमाल गुंडाळतात. दक्षिणेंत आज जें शिरोवस्त्र दिसतें तें मराठ्यांनीं प्राचीन काळीं मध्यआशियांतून आणिलेलें असावें. जेथून पूर्वीं मराठे आले, तेथूनच मोगल बादशहाहि आले व मुसलमानी धर्माचा उद्य होण्यापूर्वीं त्यांचा पेहराव मध्य-आशियांतलाच असणार. मग झुबकेदार अथवा पिळाचें पागोटें, ढिली पेहरण, तंग वासकूट, पायघोळ विजार अथवा तंग मांडचोळणा इत्यादि पेहरावांच्या तपशिलाचें बाबतींत हल्लींच्या मराठ्यांचें इतर वरिष्ठ वर्गांच्या हिंदूंपेक्षां मुसलमानांशीं-मोगल वंशाशीं अधिक साम्य असावें, यातं काय आश्चर्य? “जसा राजा तशी प्रजा” या न्यायानें हा दरबारी पोशाख पुढें ब्राह्मण-वैश्यांनींहि स्वीकारणें साहजिक आहे. धोतराचा कासोटा ही विजारीची सस्ती नक्कल आहे आणि ती विजारीपेक्षां अधिक सोईची आहे; पण अगदीं दक्षिणेकडील द्राविडांनीं ती अद्यापि उचललेली नाहीं. ते बिनकासोट्याचें एक फडकें कंबरेभोंवतीं पायघोळ गुंडाळतात; तरी पण तंजावरकडील मराठे अद्यापि धोतराचा घट्ट काचा घालतात. राजूपत, मारवाडी वगैरे धोतराचा, दोन्ही टांगांवरून काचा घालतात व दक्षिणेकडील लष्करी व पोलीस मराठे तेवढेच अशी दुटांगी कास घालतात. इतर डाव्या टांगेवरून एक कास घालतात पण मोकळें फडकें कोणीहि मराठा कितीहि गरीब असला तरी वापरीत नाहीं. पादत्राणांचाहि विशेष ध्यानांत घेण्यासारखा आहे. मद्रासकडे श्रीमंत आणि सभ्य द्रावीडहि रस्त्यांतून अनवाणी हिंडतो; पण गरीब मराठा फाटका जोडा अगर तुटकी वहाण तरी घालून रखडत चाललेला आढळेल. अस्सल मराठ्यांच्या बायका लुगड्याचा कासोटा घालीत नाहींत. घोट्यांवरील पायाचा कोणताहि भाग दाखविणें गरीब मराठणीला खपणार नाहीं. हें पायघोळ लुगडें लहंग्याचें रूपांतर होय. खानदानी मराठणींचीं नखें व टांचहि कोणास दिसणार नाहींत. गरिबांच्या लग्नांतहि वधूच नव्हे, तर विहिणी आणि करोल्या लुगड्यावरून शुभ्र पासोड्यांचा सर्व अंग आणि चेहराहि झाकणारा बुरखा वापरतात. आणखीहि इतर बारीकसारीक भेद आहेत, त्यांवरून मराठ्यांचा वंश व मूलस्थानाचें दिग्दर्शन होतें. तें मूलस्थान मध्यआशिया असावें, असें सांगण्याचा उद्देश आहे.