हिंदुस्थानांतील भागवत धर्माच्या विकासाचा किंवा इतिहासाचा प्रश्न किती गुंतागुंतीचा आहे, ह्याविषयीं थोडीबहुत कल्पना वरील विंवेचनावरून येण्यासारखी आहे. अत्यंत प्राचीन उपास्य दैवत म्हणजे शक्ति अथवा देवी. तिच्यानंतर शिव अथवा रुद्र-शिव हीं उपास्यें आर्य लोकांचा हिंदुस्थानांत शिरकाव होण्यापूर्वींच येथें होतीं. द्राविड ब्राह्मण व द्राविड क्षत्रिय सर्व हिंदुस्थानभर किंबहुना बलुचिस्थानांतहि होते. त्यांचीं दैवतें हींच होतीं. राम, कृष्ण, भीष्मादिकांचींहि हींच दैवतें होतीं. नंतर वासुदेवांनीं बहुदेवांची उपासना टाकून एकांतिक धर्म संस्थापिला. देवकी पुत्र वासुदेवाला ह्या धर्माची दीक्षा घोर आंगिरस ह्यानें दिली. कृष्णानें आपल्या गुरूला जी दक्षिणा दिली ती छांदोग्य उपनिषदाच्या तिस-या अध्यायाच्या १७ व्या खंडांतील ४ थ्या श्लोकांत अशी सांगितली आहे : “अथ यत्तपो दानमार्जवमहिंसा सत्यवचनमिति ता अस्य दक्षिणा” ह्यावरून दान, तप, आर्जव (सरळपणा), अहिंसा, सत्य वचन हीं पांच तत्त्वें कृष्णाच्या भागवत धर्मांत होतीं. तींच पुढें जैनांच्या व बौद्धांच्या भागवत धर्मांत उतरलीं. पण हीं नैतिक तत्त्वें वैदिक धर्मांचीं नसून मूळ भागवत धर्माचीं होतीं हें ध्यानांत ठेवलें पाहिजे. श्वेताश्वेतर उपनिषदांत शिव हे एकांतिक उपास्य आणि हीं पांच लक्षणें अधिक रूढ झालेलीं दिसतात. मात्र हें उपनिषद ऊर्फ शिवगीता ही बौद्धांच्या बरीच नंतरची आहे ह्यामुळें बौद्ध धर्माचाहि परिणाम तिच्यावर झाला असावा. तिच्या काळापर्यंत ब्राह्मणांवर क्षत्रियांचाच वरचष्मा होता. जनक, भीष्म, कृष्ण, राम, (दाशरथ), कृष्णद्वैपायन (व्यास), महावीर, सिद्धार्थ (बुद्ध), अशोक मैर्य वगैरे क्षत्रिय केवळ राज्यकर्तेच झाले नाहींत तर धर्मसंस्थापक आणि प्रवर्तकहि होते, म्हणून भगवद्गीतेच्या काळापर्यंत त्यांची “नाराणां (विभूति) नराधिप” अशी कीर्ति साक्ष देत आहे. परंतु जेव्हां जैनांनीं व बौद्धांनीं वेदांची परंपरा झुगारून दिली; इतकेंच नव्हे तर वेदान्ताचें मुख्य तत्त्व जो ब्रह्मवाद तोहि टाकून नुसतें ब्रह्मचर्य म्हणजे प्रज्ञा, शील, समाधि इ. नैतिक तत्त्वें प्रत्यक्ष आचरणांत आणण्याविषयीं आग्रह धरूं लागले; तेव्हां त्यांच्या उलट पुष्कळ ब्राह्मण आणि जुन्या मताचे क्षत्रियहि जाऊं लागले. इतकेंच नव्हे, सम्राट अशोकांनीं जेव्हा ह्या नैतिक भागवत धर्माला राजाश्रय दिला, तेव्हां त्यांच्या घराण्यालाच नव्हे तर सर्व जगांत वणव्याप्रमाणें परसरणा-या बौद्ध धर्मालाहि आग लावणारे निखारे त्याच्या अस्तनींतूनच बाहेर पडले. त्यांचा विरोध नुसता जैनांशीं व बौद्धांशींच नसून, शिव-भागवतांशीं व क्षत्रियांशीं देखील होता म्हणून मौर्यांचा उच्छेद करणारें जें शुंग, कण्वादिकांचें ब्राह्मणी राजकारण पुढें आलें, त्यामुळें पूर्वीं जो वासुदेव-भागवतांचा धर्म होता, त्यांचा संस्थापक वासुदेव हा विष्णूचा अवतार होता असें अवतारमत पुढें ढकलण्यांत आलें. त्यामुळें प्रत्यक्ष वासुदेवहि मागें पडून विष्णूच पुढें आला. हा अवतारवाद श्वेताश्वेतर उपनिषदांत नाहीं; किंबहुना मूळच्या भगवद्गीतेंतहि नव्हता. कारण हे दोन्ही ग्रंथ मुळीं सांप्रदायिक ग्रंथच नव्हत. शैव (पाशुपत), वैष्णव (पांचरात्र) इ. सांप्रदायिक मतें ह्या अवतारवादामुळेंच निघालीं; ह्यामुळें भगवद्गीतेचेंहि पहिलें वासुदेवप्रधान स्वरूप जाऊन विष्णु-प्रधान हें स्वरूप बनलें. आणि भागद्गीतेंत वासुदेवाला विष्णूचा अवतार आणि परब्रह्म बनवून त्याच्या ऐतिहासिक स्वरूपाचा अगदीं लोप करण्यांत आला. येणेंप्रमाणें प्रथम कृष्णानें स्थापलेला शिव-भागवत नंतर जैन व बौद्ध भागतव आणि नंतर ह्या सर्वांना तोंड देण्यासाठीं ब्राह्मणांच्या वर्चस्वाखालीं निघालेला विष्णु-भागवत असें ह्या भागवत धर्माच्या विकासाचे टप्पे स्पष्ट दिसत आहेत. आतां शेवटीं भगवद्गीतेचें थोडक्यांत दिग्दर्शन करून हें लांबलेलें दुसरें व्याख्यान समाप्त करूं.