इतिहास

महाराष्ट्रांत भौगोलिक धरणाकंप मागें झाले नाहींत; किंबहुना महाराष्ट्राचें उंच पठार हें एक जगांतील अति स्थिर व प्राचीन भूमिभाग आहे असें भूगर्भशास्त्री म्हणतात; पण अखबारनवीस निराळीच गोष्ट सांगतात. ते म्हणतात, महाराष्ट्रांत ऐतिहासिक भूकंप फार झाले आहेत, आणि ते होण्यापूर्वीं सह्याद्रीचें कोणतें ना कोणतें तरी एक शिखर पेट घेतें. हल्लीं प्रचंडगड, राजगड, विचित्रगड शिखरांनीं पेट घेतला आहे. महारांष्ट्रांतील मराठ्यांत दोन भिन्न वर्ग (वंश नसल्यास) आहेत. ते वर्ग म्हणे (१) नेते मराठे व (२) अनुयायी कुणबी. पहिला वर्ग हिंमतवान्, हिकमतवान्, खोल दिलाचा व स्वतंत्र बाण्याचा आहे; तर दुसरा वर्ग शरीरचा सोशिक, मनाचा मोकळा, हाडाचा इमानी आणि जीवाचा करारी आहे. स्वराज्य ह्या दोन्हीं वर्गांची रोजची भाकर आहे. सणावाराची पोळी नव्हे. दोघेहि खेड्यांत किंबहुना रानांत जन्मून तेथेंच वाढून तेथेंच मरणारे आहेत. ह्यांची संस्कृति नागरिक मुळींच नव्हे. किंबहुना केवळ नागरिक संस्कृति त्यांना बाधते म्हटलें तरी चालेल. खेड्यांतलें स्वाभाविक स्वराज्य त्यांचें कोणी हिरावूं शकत नाहीं. अनेक धर्मांचीं व संस्कृतींचीं साम्राज्यें वावटळीप्रमाणें ह्यांच्यावरील वातावरणांतून गर्जना करीत आलीं व गेलीं. खालीं जमिनीवर ह्यांच्या स्वराज्याचा संसार तसाच चालूं आहे. जमीनमहसुलाची रयतवारी पद्धत, आणि धर्म, जात, वंश आणि धंदा कोणाचा कांहींहि असो, गांवगाड्यामध्यें सर्वांचा समाईक हक्क जर अद्यापि कोठें पुरातन कालापासून चालत असलेला दिसत असेल तर ह्याच हल्लींच्या महाराष्ट्रांत, कोंकणपट्टी मात्र ह्या नियमास अपवाद आहे. म्हणून ह्या दृष्टीनें ती पट्टी ऐतिहासिक महाराष्ट्राचा भागच नव्हे - बाकीचा देशावरला महाराष्ट्र ह्याची रयतवारी ऊर्फ स्वराज्य ही प्रकृतीच आहे. नुसतें भावी आदर्श नव्हे.
युद्धपूर्वकालांत हिमालयाच्या पायथ्याशीं झल्ल, मल्ल, लिच्छवी, वज्जी, रट्ट इत्यादी कुळें अथवा वसाहती केवळ स्वराज्यसुखांत राहात होत्या. त्यांचें शासन लोकसत्तात्मकपद्धतीचें (Limited Monarchy) होतें, हें पाली वाङमयावरून उघड दिसतें. सालो, मालो, लेचे, पेचे असे ह्यांच्या नांवांचे भाषाविषयकच नव्हे तर पोकळ नागरिक संस्कृतिवाल्यांनीं, गुणवाचकहि अपभ्रंश बनविले असतील, पण साळी, मराठे हे हल्लींचे क्षत्रिय अथवा शेतकरी हे त्या हिमालयांतून खालीं दक्षिणेंत उतरलेल्या स्वराज्य-शाली राष्ट्राचे आजचे अस्सल वंशज आहेत, असें मी तरी समजतों. स्वराज्याचे पायीं ह्या मराठ्यांनीं गेल्या २।। हजार वर्षांत पुष्कळ लहानमोठ्या कटकटी केल्या आहेत. त्यांतलीच एक शेवटची कटकट ह्या परिषदेची चळवळ होय !
स्वराज्यासाठीं कटकट करणें मराठ्यांची उपजत बुद्धीच आहे. “स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे” ही शाब्दिक म्हण लो. टिळकांनीं रूढ केली; पण राहणीची रूढी निदान अडीच हजार वर्षें महाराष्ट्रांतील मराठ्यांची जुनीच आहे ! तिचा इतिहास आहे !!
मावळे म्हणजे केवळ पश्चिमेकडचे असा नुसता शब्दार्थ झाला, पण स्वतंत्र पाहण्यानें आपल्या मालकीची जमीन स्वत: वाहणारा साधासुधा मराठा असा ध्वन्यर्थ आहे. मावळ्याचा हा बहाणा श्रीशिवरायापूर्वीं हजारों वर्षांचा जुना आहे. शिवाजीनें ह्या बहाण्याला उत्पन्न केलें नसून उलट ह्या बहाण्यानें शिवाजीला उत्पन्न केलें. इतर आधुनिक कमअस्सल नागरिक बहाण्यानें शिवाजीला नुसतें नामशेष केलें मात्र. शेटे, पोतनीस, वाळिंबे हे आजचे मावळे होत. ह्यांची जात विचारूं नका, प्रकृति विचारा. ती प्रकृति स्वराज्यशील आहे. त्यांनीं चालविलेल्या परिषदेची बैठक जरी आजची आठवीच असली तरी त्यांची प्रकृति भूगर्भांतल्या आगीप्रमाणें पुरातन आहे. ती आग ब्रिटिशांसारख्या जगाला डोईजड झालेल्या धेंडालाहि शुद्ध करील. मग सचीवासारख्या आजकालच्या चिमुकल्या शक्तीला ती शुद्ध करणार नाहीं म्हणजे काय?